श्रीरामाचा पाळणा Shri Ram Palna
पहिल्या दिवशी बोलली गंगा । नका बायांनो करु गं दंगा ।
दशरथ राजाला जाऊनी सांगा । गुढ्या उभारा पाचही रांगा ।। जो बाळा जो. ।।
दुसऱ्या दिवशी बोलली भागा । विनाकारण होईल जागा ।
बायांनो तुम्ही चरणाशी लागा । दान चुड्याचे रामाला मागा ।। जो बाळा जो. ।।
तिसऱ्या दिवशी बोलली उमा ।। रामरुपाची लागेना सीमा ।
ऐसे बोलले महादेव भिमा ।। जो बाळा जो. ।।
चवथ्या दिवशी बोलली तारा । आणा सोनारा आपल्या घरा ।
बाण धणुष्य रामाला करा ।। जो बाळा जो.।।
पाचव्या दिवशी सटवी बोलली । सीता रामाची रावणाने नेली ।
कशी देवा निद्रा लागली । गेला मारुती लंका जाळली ।। जो बाळा जी. ।।
सहाव्या दिवशी जना बोलली । लक्ष्मणाला शक्ती लागली ।
पहाड आणाया गेला मारुती । जिवंत केला उर्मिला पती ।। जो बाळा जो. ।।
सातव्या दिवशी सातवा कल्लोळ । राम जन्मला रुप मंजूळ ।
गर्जे आसमानी सूर्य मंडळ । आले मारुती घेऊन निळराम ।
जन्मला सये रावणाचा काळ ।। जो बाळा जो.।। Shri Ram Palna
आठव्या दिवशी बोलली लीला । दशरथ राजाला पुत्र हो झाला ।
कौसल्यामातेने झोका जो दिला ।। जो बाळा जो. ।। Shri Ram Palna
नवव्या दिवशी नवल बाळाचे । कळी खुलली जशी कमळाची ।
प्रस्तुत झाली त्याच वेळासी ।। जो बाळा जो.।। Shri Ram Palna
दहाव्या दिवशी बोलला गजा । संगे घेऊन वानर फौजा ।
आधी जाऊनी रावण बघा । इंद्रजीताच्या उडवल्या भूजा ।
बिभिषण केला लंकेचा राजा ।। जो बाळा जो. ।।
अकराव्या दिवशी अकरावा रंग । ब्रह्मा विष्णूला लागला छंद
। पाची हत्यारे रामाच्या संग ।। जो बाळा जो. ।।
बाराव्या दिवशी हकीकत सारी । बिजली बत्तीचा प्रकाश भारी ।
उजेड पडला रामदरबारी । तेहतीस कोटी देव जमले दरबारी ।। जो बाळा जो.।।
तेराव्या दिवशी धनुष्य टाकीले । लक्ष्मण आपले अवतार शोधीले ।
त्यातून एक युग मागे लोटले ।। जो बाळा जो. ।।
चौदाव्या दिवशी नंदीवर बैसले । देशोदेशी वानर लोक लावीले ।
रामाने मारुतीस स्वराज्य दिले ।। जो बाळा जो.।।
पंधराव्या दिवशी अवतार बदले । कृष्ण पांडव पुढे निघाले ।
कंस मामाला त्यांनी मारिले ।। जो बाळा जो. ।।
सोळावे दिवशी सोळावा केला । गुरु वशिष्ट धन्य बोलला ।
ज्याने रामाचा पाळणा गाईला ।। जो बाळा जो.।।