Dnyaneshwari | सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला Sarth Dnyaneshwari Chapter 101-200

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥

॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥

॥ अथ प्रथमोऽध्यायः – अध्याय पहिला ॥

॥ अर्जुनविषादयोगः ॥

हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवार्जुनु ।तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखें द्रोणा ॥ १०१ ॥
दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंत:करणाला आनंद देणारा व प्रतिअर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यु हा पहा. ॥१-१०१॥ Dnyaneshwari

आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर ।मिती नेणिजे परी अपार । मीनले असती ॥ १०२ ॥
आणखीही द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी वीर आहेत. त्यांची मोजदाद करता येणार नाही. पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत. ॥१-१०२॥ Dnyaneshwari

आतां आमुच्या दळीं नायक । जे रूढवीर सैनिक ।ते प्रसंगें आइक । सांगिजती ॥ १०३ ॥
आता आमच्या सैन्यामधे प्रमुख प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघानेच सांगतो ऐका. ॥१-१०३॥ Dnyaneshwari

उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी ।तुम्ही आदिकरूनी । मुख्य जे जें ॥ १०४ ॥
तुम्ही आदिकरून जे मुख्य मुख्य वीर आहेत त्यांची नावे केवळ दिग्दर्शनार्थ (आपल्या माहिती करता) सांगतो. ॥१-१०४॥ Dnyaneshwari

हा भीष्म गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानु ।रिपुगजपंचाननु । कर्णवीरु ॥ १०५ ॥
प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण आहे. ॥१-१०५॥ Dnyaneshwari

या एकेकाचेनी मनोव्यापारें । हें विश्व होय संहरे ।हा कृपाचार्यु न पुरे । एकलाचि ॥ १०६ ॥
या एकेकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात. फार कशाला ? हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का ? ॥१-१०६॥ Dnyaneshwari

एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें ।याचा आडदरु सदां वाहे । कृतांतु मनीं ॥ १०७ ॥
येथे विकर्ण वीर आहे. तो पलिकडे अश्वत्थामा पहा. याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहेमी बाळगीत असतो. ॥१-१०७॥ Dnyaneshwari

समितिंजयो सौमदत्ती । ऐसे आणीकही बहुत आहाती ।जयांचिया बळा मिती । धाताही नेणें ॥ १०८ ॥
समितिंजय आणि सौमदत्ति असे आणखीही पुष्कळ आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. ॥१-१०८॥ Dnyaneshwari

जे शास्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त ।हो कां जें अस्त्रजात । एथूनि रूढ ॥ १०९ ॥
ते शस्त्रविद्येत तरबेज आहेत, अस्त्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे ? जेवढी म्हणून अस्त्रे आहेत, तेवढी सर्व यांच्यापासूनच प्रचारात आली आहेत. ॥१-१०९॥ Dnyaneshwari

हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगीं ।परी सर्व प्राणें मजलागीं । आरायिले असती ॥ ११० ॥
हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत. यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे. एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जिवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत. ॥१-११०॥ Dnyaneshwari

पतिव्रतेचें हृदय जैसें । पतिवांचूनि न स्पर्शे ।मी सर्वस्व या तैसें । सुभटांसी ॥ १११ ॥
ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पतीवाचून इतराला स्पर्श करीत नाही त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. ॥१-१११॥ Dnyaneshwari

आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें ।ऐसे निरवधि चोखडें । स्वामिभक्त ॥ ११२ ॥
आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते. असे हे निस्सीम व उत्तम स्वामिभक्त आहेत. ॥१-११२॥ Dnyaneshwari

झुंजती कुळकणी जाणती । कळे किर्तीसी जिती ।हे बहु असो क्षात्रनीति । एथोनियां ॥ ११३ ॥
हे युद्धकुशल असून युद्धकौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहेत. फार काय सांगावे ? क्षात्रधर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झाला आहे. ॥१-११३॥

ऐसे सर्वांपरि पुरते । वीर दळीं आमुते ।आतं काय गणूं यांतें । अपार हे ॥ ११४ ॥
याप्रमाणे सर्व अंगांनी परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. आता यांची काय गणती करू ? हे अपार आहेत. ॥१-११४॥

वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु ।तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासि पैं ॥ ११५ ॥
आणखी क्षत्रियांमधे श्रेष्ठ व या जगात नाणावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य, त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. ॥१-११५॥

आतां याचेनि बळें गवसलें । हे दुर्ग जैसे पन्नासिलें ।येणें पाडें थेकुलें । लोकत्रय ॥ ११६ ॥
आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जसे काय किल्लेच बांधले आहेत. याच्यापुढे त्रिभुवनही क:पदार्थ आहे. ॥१-११६॥

आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं ।मग वडवानळु तैसे याही । विरजा जैसा ॥ ११७ ॥
आधी असे पहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही ? तशात ज्याप्रमाणे वडवानल साह्यकारी व्हावा, ॥१-११७॥

ना तरीं प्रळयवन्ही महावातु । या दोघां जैसा सांधातु ।तैसा हा गंगासुतु । सेनापति ॥ ११८ ॥
किंवा प्रलयकाळचा अग्नि व प्रचंड वारा या दोहोंचा ज्याप्रमाणे मिलाफ व्हावा, त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळाली आहे. ॥१-११८॥Dnyaneshwari

आतां येणेंसि कवण भिडे । हें पांडवसैन्य कीर थोकडें ।परि वरचिलेनि पाडें । दिसत असे ॥ ११९ ॥
आता या सैन्याबरोबर कोण झगडेल ? वर सांगितलेल्या आमच्या या सैन्याच्या मानाने हे पांडवांचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे. ॥१-११९॥Dnyaneshwari

वरी भीमसेनु बेथु । तो जाहला असे सेनानाथु ।ऐसें बोलोनियां मातु । सांडिली तेणें ॥ १२० ॥
आणि त्यात भीमसेन (अगोदरच) आडदांड आणि तो त्यांच्या सैन्याचा अधिपती झाला आहे (मग काय?) असे बोलून त्याने ती गोष्ट सोडून दिली. ॥१-१२०॥Dnyaneshwari

मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांतें म्हणितलें ।आतां दळभार आपुलाले । सरसे करा ॥ १२१ ॥
मग दुर्योधन सर्व सेनापतींना असे म्हणाला की आपापले सैन्यसमुदाय सज्ज करा. ॥१-१२१॥

जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणी ।वरगण कवणकवणी । महारथीया ॥ १२२ ॥
ज्यांच्या ज्या अक्षौहिणी आल्या असतील त्यांनी त्या अक्षौहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्याकडे द्यायच्या आहेत त्या द्याव्या. ॥१-१२२॥Dnyaneshwari

तेणें तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे ।द्रोणातें म्हणे पाहिजे । तुम्ही सकळ ॥ १२३ ॥
त्या महारथ्याने त्या अक्षौहिणीला आपल्या हुकमतीत ठेवावे. आणि भीष्मांच्या आज्ञेत रहावे. (नंतर) दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर देखरेख ठेवावी. ॥१-१२३॥Dnyaneshwari

हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा ।येणें दळभारु आघवा । साचु आमुचा ॥ १२४ ॥
या भीष्मांचेच फक्त संरक्षण करावे. यांना माझ्याप्रमाणेच मानावे. यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार खरा समर्थ आहे. (आमच्या सेनेची मदार यांच्यावरच आहे.) ॥१-१२४॥DnyanDnyaneshwari eshwari

या राजयाचिया बोला । सेनापति संतोषला ।मग तेणें केला । सिंहनादु ॥ १२५ ॥
राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला. मग त्याने सिंहासारखी गर्जना केली. ॥।१-१२५॥

तो गाजत असे अद्भुतु । दोन्ही सैन्याआंतु ।प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ॥ १२६ ॥
ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तर्‍हेने दुमदुमत राहिली. तिचा प्रतिध्वनीही आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला. ॥१-१२६॥Dnyaneshwari Dnyaneshwari

तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें ।दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ॥ १२७ ॥
तो प्रतिध्वनी उठत असताच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्मांनी आपला शंख वाजवला. ॥१ -१२७॥

ते दोन्ही नाद मीनले । तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहलें ।जैसें आकाश कां पडिलें । तुटोनिया ॥ १२८ ॥
ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या. त्यावेळी जणू काय आकाशच तुटून पडते की काय असे वाटले. ॥१-१२८॥Dnyaneshwari

घडघडीत अंबर । उचंबळत सागर ।क्षोभलें चराचर । कांपत असे ॥ १२९ ॥
त्यामुळे आकाश घडाडले, सागर उसळला, आणि स्थावर व जंगम थरथर कापू लागले. ॥१-१२९॥

तेणें महाघोषगजरें । दुमदुमिताती गिरिकंदरें ।तव दळामाजीं रणतुरें । आस्फुरिलीं ॥ १३० ॥
त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दर्‍या दणाणून राहिल्या. इतक्यात त्या सैन्यात रणावाद्ये वाजू लागली. ॥१-१३०॥

उदंड सैंघ वाजतें । भयानखें खाखातें ।महाप्रळयो जेथें । धाकडांसी ॥ १३१ ॥
नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली मी मी म्हणणारांनाही तो महाप्रलय वाटला. ॥१-१३१॥

भेरी निशाण मांदळ । शंख काहळ भोंगळ ।आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ॥ १३२ ॥
नौबत, डंके, ढोल, शंख, मोठ्या झांजा व कर्णे आणि महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना (या सर्वांची एकच गर्दी झाली.) ॥१-१३२॥

आवेशें भुजा त्राहाटिती । विसणेले हांका देती ।जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ॥ १३३ ॥
ते योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले, कोणी चिडून एकमेकांना युद्धासाठी हाका मारू लागेले आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरेनासे झाले. ॥१-१३३॥

तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु ।जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ॥ १३४ ॥
तेथे अशा स्थितीत भित्र्यांची तर गोष्टच कशाला पाहिजे ? कच्चे लोक तर कस्पटासमान उडून गेलेच, पण प्रत्यक्ष यमास सुद्धा धाक पडला. तो गर्भगळित होऊन पायच धरीना. ॥१-१३४॥

एकां उभयाचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले ।बिरुदाचे दादुले । हिंवताती ॥ १३५ ॥
त्यापैकी कित्येकांचे तर उभ्याउभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते, त्यांची दांतखिळी बसली आणि मी मी म्हणाणारे नामांकित वीर थरथर कापू लागले. ॥१-१३५॥

ऐसा अद्भुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु ।देव म्हणती प्रळयकाळु । वोढवला आजी ॥ १३६ ॥
असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रलयकाल येऊन ठेपला असे देव म्हणू लागले. ॥१-१३६॥

ऐसी स्वर्गीं मातु । देखोनि तो आकांतु ।तव पांडवदळाआंतु । वर्तलें कायी ॥ १३७ ॥
तो आकांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली. इतक्यात इकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले ॥१-१३७॥

हो कां निजसार विजयाचें । कीं तें भांडार महातेजाचें ।जेथ गरुडाचिये जावळियेचे । कांतले चार्‍ही ॥ १३८ ॥
जो रथ विजयाचा गाभा, किंवा महातेजाचे भांडारच होता, ज्याला वेगात गरुडाची बरोबरी करणारे चार घोडे जुंपले होते ॥१-१३८॥

कीं पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा ।तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥ १३९ ॥
व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या व जो दिव्य असा शोभत होता, जणु काय पंख असलेला मेरु पर्वतच. ॥१-१३९॥

जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठींचा राणा जाण ।तया रथाचे गुण । काय वर्णूं ॥ १४० ॥
ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णन करावेत ? ॥१-१४०॥

ध्वजस्तंभावरी वानरु । तो मुर्तिमंत शंकरु ।सारथी शारङ्गधरु । अर्जुनेसीं ॥ १४१ ॥
रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर शंकराचा अवतार असलेला प्रत्यक्ष वानर मारुती होता व शारंगधर श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी होता. ॥१-१४१॥

देखा नवल तया प्रभूचें । अद्भुत प्रेम भक्ताचें । जें सारथ्यपण पार्थाचें । करितु असे ॥ १४२ ॥
पहा त्या प्रभूचे नवल ! त्याचे भक्ताविषयीचे प्रेम विलक्षण आहे. कारण ( तो सर्वशक्तिमान परमेश्वर, पण) अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करत होता. ॥१-१४२॥

पाइकु पाठींसी घातला । आपण पुढां राहिला ।तेणें पाञ्चजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ॥ १४३ ॥
आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वत: युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लीलेनेच वाजवला ॥१-१४३॥

परि तो महाघोषु थोरु । गर्जतु असे गंहिरु ।जैसा उदेला लोपी दिनकरु । नक्षत्रांतें ॥ १४४ ॥
परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणे घुमत राहिला. ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो, ॥१-१४४॥

तैसें तुरबंबाळु भंवते । कौरवदळीं गाजत होते ।ते हारपोनि नेणों केउते । गेले तेथ ॥ १४५ ॥
त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे दुमदुमणारा जो वाद्यांचा कल्लोळ तो त्या शंखाच्या महानादाने कोणीकडे लोपून गेला ते काही कळेना. ॥१-४५॥

तैसाचि देखे येरे । निनादें अति गहिरे ।देवदत्त धनुर्धरें । आस्फुरिला ॥ १४६ ॥
त्याप्रमाणे पहा, नंतर त्या अर्जुनाने अतिगंभीर आवाजात आपला देवदत्त नावाचा शंख वाजवला. ॥१-१४६॥

ते दोन्ही शब्द अचाट । मिनले एकवट ।तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे ॥ १४७ ॥
ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले तेव्हा हे सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय असे वाटू लागले. ॥१-१४७॥

तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला ।तेणें पौण्ड्र आस्फुरिला । महाशंखु ॥ १४८ ॥
इतक्यात खवळलेल्या यमाप्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला. ॥१-१४८॥

तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गहिंरु ।तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ॥ १४९ ॥
त्याचा आवाज कल्पांताच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणे अतिगंभीर असा मोठा झाला. इतक्यात धर्मराजाने अनंतविजय नावाचा शंख वाजवला. ॥१-१४९॥

नकुळें सुघोषु । सहदेवें मणिपुष्पकु ।जेणें नादें अंतकु । गजबजला ठाके ॥ १५० ॥
नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावाचे शंख वाजवले. त्या आवजाने कालही गडबडून गेला. ॥१-१५०॥

तेथ भूपति होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक ।हा काशीपति देख । महाबाहु ॥ १५१ ॥
त्या युद्धभूमीवर द्रुपद, द्रौपदीचे पुत्र. इत्यादी अनेक राजे होते. हा वीर्यशाली काशीराजा पहा. ॥१-१५१॥

तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु ।धृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥ १५२ ॥
तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यु, अजिंक्य सात्यकी, राजश्रेष्ठ धृष्टद्युम्न व शिखंडी ॥१-१५२॥

विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर ।तिहीं नानाशंख निरंतर । आस्फुरिले ॥ १५३ ॥
विराटादिक मोठे मोठे राजे, जे महत्वाचे शूर सैनिक होते, त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजवण्यास आरंभ केला. ॥१-१५३॥

तेणें महाघोषनिर्घातें । शेष कूर्म अवचितें ।गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती ॥ १५४ ॥
त्या मोठ्या घोषाच्या दणाक्याने शेष व कूर्म हे एकदम गोंधळून गेले आणि आपण धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून देण्याच्या बेतात आले. ॥१-१५४॥

तेथ तिन्ही लोक डळमळित । मेरु मांदार आंदोळित । समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ॥ १५५ ॥
त्य़ामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरु व मंदार पर्वत मागेपुढे झोके खाऊ लागले. व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या. ॥१-१५५॥

पृथ्वीतळ उलथों पहात । आकाश असे आसुडत ।तेथ सडा होत । नक्षत्रांचा ॥ १५६ ॥
जमीन उलथते की काय व आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच पडतो की काय असे वाटू लागले. ॥१-१५६॥

सृष्टी गेली रे गेली । देवां मोकळवादी जाहली ।ऐशी एक टाळी पिटली । सत्यलोकीं ॥ १५७ ॥
सृष्टी चालली रे चालली, देवांना निराधार स्थिती आली, अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली. ॥१-१५७॥

दिहाचि दिन थोकला । जैसा प्रलयकाळ मांडला ।तैसा हाहाकारु जाहला । तिन्हीं लोकीं ॥ १५८ ॥
दिवसाच सूर्य थांबला व प्रलयकाळ सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडाला. ॥१-१५८॥

तें देखोनि आदिपुरुषु विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु ।मग लोपिला अद्भुतु । संभ्रमु तो ॥ १५९ ॥
ते पाहून परमात्मा विस्मित झाला व मनात म्हणाला, न जाणो, सृष्टीचा अंत होईल. (तो चुकवावा म्हणून) मग त्याने विलक्षण गोंधळ एकदम शांत केला. ॥१-१५९॥

म्हणौनि विश्व सांवरलें । एर्‍हवीं युगांत होतें वोडवलें ।जैं महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं ॥ १६० ॥
त्यामुळे जग सावरले. नाहीतर ज्यावेळी कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजवले त्यावेळीच युगांत होण्याची वेळ आली होती. ॥१-१६०॥

तो घोष तरी उपसंहरला । परि पडिसाद होता राहिला ।तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥ १६१ ॥
तो घोष तर शांत झाला. पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्ल्क राहिला होता त्यामुळेच सर्व कौरवांच्या सैन्याची दाणादाण उडाली. ॥१-१६१॥

जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु ।तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया ॥ १६२ ॥
हत्तींच्या कळपाची सिंह लीलेनेच जशी फाकाफाक करतो, तशी कौरवांची अंत:करणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली. ॥१-१६२॥

तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती ।एकमेकांतें म्हणती । सावध रे सावध ॥ १६३ ॥
तो प्रतिध्वनी दुमदुमत असतांना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळाजाने ठाव सोडला. त्यातले त्यात ते एकमेकांना ‘अरे सावध रे सावध’ म्हणू लागले; ॥१-१६३॥

तेथ बळें प्रौढीपुरतें । महारथी वीर होते ।तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ॥ १६४ ॥
त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरले. ॥१-१६४॥

मग सरिसेपणें उठावले । दुणवटोनि उचलले ।तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ॥ १६५ ॥
मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झालेले व दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले. ॥१-१६५॥

तेथ बाणवरी धर्नुधर । वर्षताती निरंतर ।जैसे प्रळयांत जलधर । अनिवार कां ॥ १६६ ॥
त्यावेळी प्रलयकाली मेघ ज्याप्रमाणे अनिवार वर्षाव करतात, त्याप्रमाणे धनुष्य धारण करणारे योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले. ॥१-१६६॥

ते देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मनें ।मग संभ्रमें दिठी सेने । घालीतसे ॥ १६७ ॥
अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली. ॥१-१६७॥

तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले ।तंव लीलाधनुष्य उचललें । पंडुकुमरें ॥ १६८ ॥
तेव्हा युद्धाला तयार असलेले सर्व कौरव त्याने पाहिले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले. ॥१-१६८॥

ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथु पेलावा ।नेऊनि मध्यें घालावा । दोहीं दळां ॥ १६९ ॥
त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा आता चटकन रथ हाकावा व तो तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. ॥१-१६९॥

जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक ।न्याहाळीन अशेख । झुंजते ते ॥ १७० ॥
जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहीन (तोपर्यंत रथ उभा कर). ॥१-१७०॥

येथ आले असती आघवें । परी कवणेंसीं म्यां झुंजावें ।हे रणीं लागे पहावें । म्हणौनियां ॥ १७१ ॥
येथे सर्व आले आहेत. पण मी रणात कोणाबरोबर लढावे, याचा विचार करणे जरुर आहे. (म्हणून मी पहातो). ॥१-१७१॥

बहुतकरूनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव ।वांटिवेवीण हांव । बांधिती झुंजीं ॥ १७२ ॥
फार करून हे कौरव उतावीळ व दुष्ट बुद्धीचे असून पुरुषार्थावाचून युद्धाची हाव धरतात. ॥१-१७२

झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती ।हें सांगोनि रायाप्रती । काय संजयो म्हणे ॥ १७३ ॥
ते लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला ॥१-१७३॥

आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव श्रीकृष्णें रथु पेलिला ।दोही सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ॥ १७४ ॥
ऐका. अर्जुन एवढे बोलला. इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला व त्याने तो दोन्ही सैन्यांमधे उभा केला. ॥१-१७४॥

जेथ भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख ।पृथिवीपति आणिक । बहुत आहाती ॥१७५ ॥
ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण आदिकरून आप्तसंबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते ॥१-१७५॥

तेथ स्थिर करूनियां रथु । अर्जुन असे पाहातु ।तो दळभार समस्तु । संभ्रमेंसीं ॥ १७६ ॥
त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन तो सर्व सैन्यसमुदाय उत्सुकतेने पाहू लागला. ॥१-१७६॥

मग देवा म्हणे देख देख । हे गुरुगोत्र अशेख ।तंव कृष्णमनीं नावेक । विस्मो जाहला ॥ ७७ ॥
मग म्हणाला, देवा पहा, पहा. हे सगळे भाऊबंद व गुरु आहेत. तेव्हा ते ऐकून श्रीकृष्णाच्या मनाला अचंबा वाटला. ॥१-१७७॥

तो आपणयां आपण म्हणे । एथ कायी कवण जाणे ।हें मनीं धरलें येणें । परि कांहीं आश्चर्य असे ॥ १७८ ॥
तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच म्हणाला, ह्याने ह्या वेळी हे काय मनात आणले आहे कुणास ठाऊक ? पण काहीतरी विलक्षणच असावे. ॥१-१७८॥

ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणें हृदयस्थु ।परि उगा असे निवांतु । तिये वेळीं ॥ १७९ ॥
याप्रमाणे पुढचे त्याने अनुमान बांधले. तो सर्वांच्या हृदयात रहाणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले. परंतु त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध राहिला. ॥१-१७९॥

तंव तेथ पार्थु सकळ । पितृ पितामह केवळ ।गुरु बंधु मातुळ । देखता जाहला ॥ १८० ॥
तो तेथे केवळ आपले चुलते, आजे, गुरु, भाऊ, मामा यासर्वांसच अर्जुनाने पाहिले. ॥१-१८०॥

इष्ट मित्र आपुले । कुमरजन देखिले ।हे सकळ असती आले । तयांमाजी ॥ १८१ ॥
आपले इष्टमित्र, मुलेबाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्याने पाहिले. ॥१-१८१॥

सुहृज्जन सासरे । आणीकही सखे सोइरे ।कुमर पौत्र धर्नुर्धरें । देखिले तेथ ॥ १८२ ॥
जिवलग मित्र, सासरे, आणखी सगेसोयरे, पुत्र, नातु, असे अर्जुनाने तेथे पाहिले. ॥१-१८२॥

जयां उपकार होते केले । कीं आपदीं जे रक्षिले ।हे असो वडील धाकुले । आदिकरूनि ॥ १८३ ॥
ज्यांच्यावर त्याने उपकार केले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केले होते, फार काय लहानमोठे आदिकरून – ॥१-१८३॥

ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळीं ।हे अर्जुनें तिये वेळीं । अवलोकिलें ॥ १८४ ॥
असे हे सर्व कूळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले. ॥१-१८४॥

तेथ मनीं गजबज जाहली । आणि आपैसी कृपा आली ।तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति ॥ १८५ ॥
त्याप्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि (त्यामुळे त्याच्या मनात) सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. ॥१-१८५॥

जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी ।तिया आणिकीतें न साहती । सुतेजपणें ॥ १८६ ॥
ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण व रूप यांनी संपन्न असतात त्यांना आपल्या अंगच्या पाणिदारपणामुळे दुसर्‍या स्त्रीचे (सवतीचे) वर्चस्व सहन होत नाही. ॥१-१८६॥

नविये आवडीचेनि भरें । कामुक निजवनिता विसरे ।मग पाडेंवीण अनुसरे । भ्रमला जैसा ॥ १८७ ॥
नवीन स्त्रीच्या (जारिणीच्या) आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या बायकोला विसरतो आणि मग वेडावल्यासारखा (तिची) योग्यता न पहाता तिच्या नादी लागतो ॥१-१८७॥

कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी ।मग तया विरक्तता सिद्धी । आठवेना ॥ १८८ ॥
किंवा तपोबलाने ऋद्धी (ऐश्वर्य) प्राप्त झाली असता (वैराग्यशाली पुरुषाची) बुद्धी भ्रम पावते आणी मग त्याला वैराग्यसिद्धीची आठवण रहात नाही ॥१-१८८॥

तैसें अर्जुना तेथ जाहलें । असतें पुरुषत्व गेलें ।जे अंतःकरण दिधलें । कारुण्यासी ॥ १८९ ॥
त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली. त्याची असलेली वीरवृत्ती गेली. कारण त्याने आपले अंत:करण करुणेला वाहिले. ॥१-१८९॥

देखा मंत्रज्ञु बरळु जाय । मग तेथ कां जैसा संचारु होय ।तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला ॥ १९० ॥
पहा, मांत्रिक चाचरला (मंत्रोच्चारात चुकला) असता जशी त्याला बाधा होते तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला. ॥१-१९०॥

म्हणौनि असतां धीरु गेला । हृदया द्रावो आला ।जैसा चंद्रकळीं शिवतला । सोमकांतु ॥ १९१ ॥
म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा वर्षाव झाल्यामुळे चंद्रकांतमणी पाझरू लागतो ॥१-१९१॥

तयापरी पार्थु । अतिस्नेहें मोहितु ।मग सखेद असे बोलतु । श्रीअच्युतेसीं ॥ १९२ ॥
त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला. आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला ॥१-१९२॥

तो म्हणे अवधारी देवा । म्यां पाहिला हा मेळावा ।तंव गोत्र वर्गु आघवा । देखिला एथ ॥ १९३ ॥
तो म्हणाला देवा, ऐका. मी हा सर्व जमाव पाहिला. इथे तर सर्व आप्तसंबंधीच दिसतात. ॥१-१९३॥

हें संग्रामीं उदित । जहाले असती कीर समस्त ।पण आपणपेयां उचित । केवीं होय ॥ १९४ ॥
हे सर्व लढाईत उन्मत्त झाले आहेत, हे खरे. पण ते (त्यांच्याशी लढणे) आपल्याला योग्य कसे होईल ? ॥१-१९४॥

येणें नांवेचि नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं । मन बुद्धि ठायीं । स्थिर नोहे ॥ १९५ ॥
या नातलगांशी युद्ध करायच्या विचाराने मला कसेसेच होत आहे. माझे मला मुळीच भान राहिले नाही. ते नाहीसे झाले आहे. माझे मन व बुद्धी सुद्धा स्थिर नाही. ॥१-१९५॥

देखे देह कांपत । तोंड असे कोरडें होत ।विकळता उपजत । गात्रांसीही ॥ १९६ ॥
पहा, माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे. ॥१-१९६॥

सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला ।तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ॥ १९७ ॥
सर्वांगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनात अतिशय यातना होत आहेत. आणि गांडीव धनुष्य धरायचा हात लुळा पडला आहे. ॥१-१९७॥

तें न धरतचि निष्टलें । परि नेणेंचि हातोनि पडिलें ।ऐसें हृदय असे व्यापिलें । मोहें येणें ॥ १९८ ॥
ते धरले न जाता निसटले, परंतु हातातून केव्हा गळून पडले याची मलाच दाद नाही. या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. ॥१-१९८॥

जें वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण ।तयाहून असाधारण । हें स्नेह नवल ॥ १९९ ॥
(हे अर्जुनाचे अंत:करण) व्रज्राहूनही कठिण, दुसर्‍यास दाद न देणारे अति खंबीर आहे; पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे. ही मोठी नवलाची गोष्ट आहे. ॥१-१९९॥

जेणें संग्रामीं हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला ।तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजीं ॥ २०० ॥
ज्याने युद्धात शंकरास जिंकले, व निवात-कवच नावाच्या राक्षसांना बेपत्ता केले त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले. ॥१-२००॥

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला पुढील 201-275 साठी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top