संत तुकाराम महाराज अभंग गाथा २०१ ते ३०० | Sant Tukaram Maharaj Abhang Gatha 201 to 300
संत तुकाराम महाराज अभंग गाथा २०१ ते ३००
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र.201 Sant
सेवितों हा रस वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥१॥
विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तोचि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥२॥
तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥
अर्थ:- Sant
मी परमार्थामधुन निघणारा रस सेवन करतो आणि आणि तो मधुर रस इतरांनाही पण वाटतो, प्रपंच्याच्या रानावानात भटकू नका, माझ्याप्रमाणे हा ब्रम्हरस प्या आणि आनंदित व्हा .जो विटेवर समचरण ठेवून उभा आहे, तोच एक जगामध्ये शूर दाता आहे, त्यानेच हा रस मला दिला आहे .याच्या समचरणावर जर तुम्ही आपली देहबुद्धी ठेवून रहाल तर तुमचे सारे संकल्प पूर्ण होतील .तुकाराम महाराज म्हणतात , मी त्याचा निरोप्या आहे, तुम्हासाठी सोप्या मार्गाचा त्याचा निरोप घेऊन आलो आहे .
अभंग क्र.202 Sant
ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू ।
जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥१॥
भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु ।
भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ध्रु.॥
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं ।
लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥२॥
अर्थकामचाड नाहीं चिंता । मानामान मोह माया मिथ्या ।
वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥३॥
मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास ।
साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥
अर्थ:- Sant
जे आपल्या आनंदात निमग्न असतात, इश्वरचिंतनात ध्यानमग्न असतात त्यांच्या ठिकाणी नेहमीच सच्चिदानंद पद असते, त्यांच्या पायाशी सर्व तीर्थ व मोक्ष असतो अश्या साधुंच्या दर्शनाने सर्व पाप नाहीसे होतात व भव बंध तुटतात.त्यांच्या ठिकाणी तू एकनिष्ठ भक्तिभाव ठेव कारण,त्यांच्या ठिकाणी स्थीरबुद्धि , नास्तिक्यभेद करणारी बुद्धि आहे. भूतदया धर मनातील द्वेषाचा कांदा फोडून टाक, शत्रु, मित्र, पुत्र या सर्वां प्रती समभाव धरअरे तू सर्वभावे लहानपणाचा अंगीकार कर अरे तू मी तू पणा चा लहान मोठेपणा चा त्याग कर .शरीर, वाणी, मन आणि बृद्धि शुद्ध असावी.सर्वत्र विठ्ठालाचे स्वरुप पहावे , विनम्रता असावी, अहंकार नसावा .ज्याच्या मनी धन, कामवासना नाही, मान सन्मानाचा मोह नाही , जो समाधानी वृत्तीचा आहे, त्याला संतसज्जन आनंदाने भेटतात .तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये विठ्ठलाविषयी दृढ विश्वास धरा, आणि जो इतर कोणताही खटाटोप करीत नाही व जो प्रपंच्याला विटला आहे, ज्याने आवड निवड टाकून दिली आहे, त्याला संत सज्जन नित्य भेट देतात साधू दर्शन नित्य घडते .
अभंग क्र.203 Sant
भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥१॥
त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं । खांदां वाहे आपुल्या ॥ध्रु.॥
सुखें करावा संसार । न संडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥२॥
भुक्तिमुक्तिची चिंता । दैन्य नाहीं दरिद्रता । तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥३॥
अर्थ:- Sant
हे जनहो, हा भवसागर तरुण जाण्याची चिंता तुम्ही निष्कारण का करता ? तुम्हाला पार करणारा तो सर्वशक्तिमान विठ्ठल पैलतीरावर हात कटावर ठेऊन तत्परतेने उभा आहे .त्यासाठी त्याला कोणतेही मोल द्यावे लागत नाही, फक्त भक्तीभावाने त्याच्या पायी मीठी घाला, तो तुम्हाला विनामोबादला आपल्या खांद्यावर घेईल .त्याला फक्त तुम्ही भक्तीभाव व आपले चित्त अर्पण केले की मग खुशाल संसार सुखाने करा, दोन वारी(आषाढी व कार्तिकी) चुकवु नका.मग दया क्षमा चालत तुमच्या घरी येतील .तुकाराम महाराज म्हणतात, या पांडुरंगा दात्याची जर तुम्ही भक्ती कराल तर दारिद्रय येणार नाही, मुक्तीची चिंता तुम्हाला त्रास देणार नाही .
अभंग क्र.204 Sant
जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥ध्रु.॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥
ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि धरी जो हृदयीं ॥३॥
दया करणें जें पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥४॥
तुका म्हणे सांगूं किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥५॥
अर्थ:- Sant
जे दुःखी कष्टी, प्रपंचीक त्रासाने गांजले आहेत, त्यांना जो आपले म्हणतो .तोच खरा साधू म्हणून ओळखावा आणि त्याच्या ठिकाणी देव आहे असे समजावा .अश्या साधुंगे चित्त अंतरबाह्य लोण्यासारखे मऊ असते .ज्याला आधार नाही, जो निराधार आहे, त्याला आपल्या ह्रदयाशी जो धरतो .जे प्रेम आपण आपल्या पुत्रावरती करतो , तेच प्रेम तो आपल्या दास दासींवर करतो .तुकाराम महाराज म्हणतात, असे संतसज्जन म्हणजे साक्षात भगवंताची मुर्ति असते; यापेक्षा अधिक काय व किती सांगू ?
अभंग क्र.205
याजसाठीं भक्ति । जगीं रूढवावया ख्याति ॥१॥
नाहीं तरी कोठें दुजें । आहे बोलाया सहजें ॥ध्रु.॥
गौरव यासाठी । स्वामिसेवेची कसोटी ॥२॥
तुका म्हणे अळंकारा । देवभक्त लोकी खरा ॥३॥
अर्थ:-
या जगातील सामान्य जीवांना तारण्यासाठी साधा-सोपा भक्तीमार्ग दृढ करण्याची गरज आहे .नाही तरी या जगामध्ये एका विठ्ठला शिवाय दूसरे दैवत कोठे आहे ? या साध्या सोप्या भक्तीचा गौरव होण्यासाठी किर्तीसाठी स्वामीसेवेचि कसोटी आहे .तुकाराम महाराज म्हणतात , देव व भक्त हा समाजातील एक खरा अलंकार आहे .
अभंग क्र.206 Sant
अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानी ॥१॥
जो हे दूषी हरीची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ध्रु.॥
याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥२॥
तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥३॥
अर्थ:-
अमंगळ वाणी कानानि कधीही एकु नये .जो हरिकथेचा द्वेष करतो, त्याला क्षयरोगाची व्याधि होते .असा पुरुष उच्च जातीचा असला तरी तो पापी चांडाळ समजावा .तुकाराम महाराज म्हणतात, तो मनुष्य म्हणजे साक्षात पाप आहे, त्याला स्वतःचे मायबापही आवडत नाही .
अभंग क्र.207 Sant
कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥१॥
वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ध्रु.॥
कैसा निरयगांवा । जाऊं न पवे विसावा ॥२॥
तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥३॥
अर्थ:-
ज्याची वाणी अमंगळ आहे, तो निश्चितच जारिणीपोटि जन्माला आला आहे .तो नेहमी परनिंदा करतो, त्याची वाणी कधीही गोविंदाचे नामस्मरण करीत नाही .त्यामुळे तो अंती नरकाला जातो आणि तिथे गेल्यावर त्याला विश्रांती कशी मिळणार ? तुकाराम महाराज म्हणतात , असा तो धर्मद्वेशी यमाच्या दंडास पात्र ठरणाराच ना .
अभंग क्र.208 Sant
गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण ॥१॥
व्याली कुर्हाडीचा दांडा । वर न घालीच तोंडा ॥ध्रु.॥
उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥२॥
तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची माय ॥३॥
अर्थ:-
नास्तिकाचा गर्भ धारण करून त्याच्या मातेने निष्कारण कष्ट केले .तिने जणू काही कुर्हाडीच्या दांडयाला जन्म दिला आहे, जन्मल्या बरोबर तिने त्याला मारून का टाकले नाही? तिच्या पोटी जणूकाही काळ जन्माला आला आहे आणि त्याने कुळाला बट्टा लावला आहे .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या अभक्ताची आई नरकात जाते .
अभंग क्र.209
पतनासि नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥१॥
विधीपुरतें कारण । बहु वारावें वचन ॥ध्रु.॥
सर्वस्वासि नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥२॥
तुका म्हणे दुरी । राखतां हे तेचि बरी ॥३॥
अर्थ:-
एखादी स्त्री खोटा स्नेह व प्रितिचे सोंग करते आणि आपल्या पतीला अधोगतिला नेते .तिच्या बरोबर धर्मशास्त्रानुसार संबंध राखावा आणि कारणापुरतेच बोलावे .ती खोटे-खोटे गोड बोलते, लडिगोडी लावते, संसारात गुंतवते आणि सर्वस्व लूटते .तुकाराम महाराज म्हणतात , अशा दुराग्रह स्त्रीला दूर अंतरावर ठेवणेच सुखाचे आहे .
अभंग क्र.210
देव आड आला । तो मी भोगिता उगला । अवघा निवारला । शीण शुभ अशुभाचा ॥१॥
जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया कौतुकें । कैचीं येथें लोकें । हा आभास अनित्य ॥ध्रु.॥
विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वांटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ ॥२॥
अवघी एकाचीच वीण । तेथें कैचें भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ॥३॥
प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा ॥४॥
अर्थ:-
देवच आड होऊन सर्व भोग भोगत आहे आणि शुभ व अशुभाचा जो विचार आहे त्याचे निवारण झाले आहे.जीव व शिव यांचे भातुकली प्रमाणे क्रीडा करण्या करिताच देवाने लीलेने यांची निर्मिती केली आहे मग येथे हा सर्व आभास अनित्य आहे.खरे तर हे सर्व जग विष्णूमय आहे आणि वर्ण आणि धर्म हे वाटणी जी दिसते हा खेळ त्या देवाचाच आहे.आहो हे सर्व एका देवा पासूनच निर्माण झाले आहे मग तेथे भिन्नतेचा प्रश्नच कोठे?हा निर्णय वेद पुरुष नारायण यानेच केला आहे.तुकाराम महाराज म्हणतात प्रसाद रुपी आंनद मला लाभला असून मी या हरीच्या पायाशी निरंतर राहून तेथुन निराळा होणार नाही.
अभंग क्र.211
आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वतां भाव ॥१॥
करवी आणिकांचे घात । खोडी काढूनि पंडित ॥ध्रु.॥
श्वानाचियापरी । मिष्टान्नासि विटाळ करी ॥२॥
तुका म्हणे ऐसा । सटवेचि ना पांचा दिसां ॥३॥
अर्थ:-
ज्याचे आचरण शुद्ध नाही, ज्याच्या मनात देवाविषयी भक्ती-श्रद्धा नाही .असे मुर्ख पंडित इतरांच्या शुद्ध आचरणात दोष काढतात व त्यांचा घात करतात .ते मिष्टान्नाला शिवून विटाळ करणाऱ्या कुत्र्याप्रमाणे असतात .तुकाराम महाराज म्हणतात , असा पाखंडी इतके दिवस जिवंत कसा राहिला? पाच दिवसांतच कसा मेला नाही ?
अभंग क्र.212
ध्यानी योगीराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाटीं तयांचिया ॥१॥
तहान भुक त्यांचें राखे शीत उष्ण । झाले उदासीन देहभाव ॥ध्रु.॥
कोण तया सखें आणीक सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥२॥
कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥३॥
तुका म्हणे विषय अमृतासमान । कृपा नारायण करितां होय ॥४॥
अर्थ:-
योगी, तपस्वी, साधू ईश्वर चिंतन करीत डोंगरकपारित ध्यानस्त बसलेले आहेत, त्यांचे रक्षण सदैव तो परमेश्वर करीत आहे .त्यांची तहान-भूक भागऊन, त्यांचे चित्त देहभावाविषयी उदासीन करीत आहे .त्यांना हरी शिवाय कोणतेही सगे-सोयरे नाहीत .तेथे त्यांच्या जीवाला आनंद वाटत आहे, राज्याभिलाशा त्यांच्या मनात शिवतहि नाही .तुकाराम महाराज म्हणतात, त्या नारायणाची कृपा झाली म्हणजे विष अमृतासमान होते.
अभंग क्र.213
न व्हावें तें जालें देखियेले पाय । आतां फिरूं काय मागें देवा ॥१॥
बहुत दिस होतों करीत हे आस । तें आलें सायासें फळ आजि ॥ध्रु.॥
कोठवरी जिणें संसाराच्या आशा । उगवो हा फांसा येथूनियां ॥२॥
बुडले तयांचा मूळ ना मारग । लागे तो लाग सांडूनियां ॥३॥
पुढें उल्लंघितां दुःखाचे डोंगर । नाहीं अंतपार गर्भवासा ॥४॥
तुका म्हणे कास धरीन पीतांबरीं । तूं भवसागरीं तारूं देवा ॥५॥
अर्थ:-
हे देवा तुमचे चरण दर्शन होणे फार दुर्मिळ ते होणे शक्य नव्हते पण आता ते दर्शन मला झाले मग मी मागे कसा फिरू?ज्या गोष्टीची मला आस होती इच्छा होती ती गोष्ट मला सायासाने मिळाली आहे.या संसाराची आशा किती दिवस धरावी तुमच्या दुर्मिळ चरणांचे दर्शन झाले या चरणांच्या आश्रयाने मी संसाराचा फासा तोडून टाकीन.या संसार रुपी सागरात बुडालेल्या लोकांचा मागमूस देखील नाही.या नर देहाला दुखाचे डोंगर गर्भवास भोगावे लागते.तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या पितांबराची कास धरीन कारण तुम्हीं मला या भाव सागरातून तरून नेणारे आहात.
अभंग क्र.214
वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नाश करणे बहु ॥१॥
तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथ्वीचा ॥२॥
तुका म्हणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥३॥
अर्थ:-
पूर्वी लोकास वैकुंठाला जाण्यासाठी तपश्चर्यासारखे कष्ट करावे लगत असत; त्यामध्ये जीवही गमवावा लगत असे .पण भक्त पुंडलिकाने भक्तांवर मोठा उपकार केला आहे; त्याने दाखविलेल्या भक्तीमार्गामुळे पृथ्वीवरच्या दुर्जनांचा भार कमी झाला .तुकाराम महाराज म्हणतात, की वैकुंठाची अवघड पायवाट सोपी झाली आहे, ही पायवाट म्हणजे पंढरीच्या रूपाने पृथ्वीतलावर वैकुंठ आले आहे .
अभंग क्र.215
शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥१॥
येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ध्रु.॥
करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥२॥
तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ॥३॥
अर्थ:-
एखाद्या गोष्टीचा शोक केला तर तो वाढतच जातो, त्याकारता धीर धरला पाहिजे, हिंमत ठेवली पाहिजे .हे माझ्या बंधुंनो या मानवी जीवनात कोणतीही गोष्ट न घडण्यासारखी नाही,येथे भित्रेपणा वाइट आहे .परमार्थ करण्यास तुम्ही सहाय्य कराल काय? हा प्रश्न मी कित्तेकांना विचारला असता ते म्हणतात, करू हो! असे केवळ हो म्हणणारे लोक खुप आहे ; पण प्रत्यक्ष मदतीला धाउन येणारे लोक कमी आहेत .तुकाराम महाराज म्हणतात, या क्षणभंगुर जीवनात भक्तीचा एक जरी क्षण साधला तरी जीवन सफल होईल .
अभंग क्र.216
म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥१॥
माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ध्रु.॥
करूनि ओळखी दिली एकसरें । न देखों दुसरें विषमासी ॥२॥
तुका म्हणे नाहीं काळापाशीं गोवा । स्थिति मति देवा वांचूनियां ॥३॥
अर्थ:-
परमार्थाच्या या मांडलेल्या खेळात कोणतीही दिशा मी वगळलेली नाही .माझ्या परमार्थाचे हे गणगोत विठोबा आहे, त्यामुळे तिथे विटाळाला, भेदभावाला थारा नाही .त्याने मला माझी खरी ओळख करुण दिली आहे, मी विठ्ठलस्वरूपच असल्यामुळे इतर काही पाहतच नाही .तुकाराम महाराज म्हणतात, मी विठ्ठालाशी बांधला गेल्यामुळे मला काळाची भीती नाही .
अभंग क्र.217
वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥१॥
नाहीं आणीक प्रमाण । तन धन तृण जन ॥ध्रु.॥
पडतां जड भारी । नेमा न टळे निर्धारीं ॥२॥
तुका म्हणे याती । हो का तयाची भलती ॥३॥
अर्थ:-
ज्याची पूर्ण श्रद्धा व प्रेम विठ्ठलावर (देवावर) आहे, इतर कोणत्याही वस्तुवर नाही, तोच खरा विष्णुभक्त होय .ज्याला तन, धन, जन हे विठ्ठलासमोर तृणासमान वाटतात, ज्याला केवळ एक भगवंत (विठ्ठल) देवच मान्य आहे कोणत्याही कठिण प्रसंगी जो आपली उपासना खंडित करत नाही, .तुकाराम महाराज म्हणतात, त्याची जात कोणतीही असो, तो वैष्णवच आहे .
अभंग क्र.218
करोत तपादि साधनें । कोणी साधो गोरांजनें ॥१॥
आम्ही न वजों तया वाटा । नाचूं पंढरीचोहटां ॥ध्रु.॥
पावोत आत्मिस्थिति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥२॥
तुका म्हणे छंद । आम्हां हरीच्या दासां निंद्य ॥३॥
अर्थ:-
परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी कोणी तपच्यर्या करतो, तर कोणी देह अग्नीला अर्पण करतो .आम्ही मात्र त्या वाटेला जाणार नाही ; तर पंढरीच्या वाटेवर भक्तीने, श्रध्देने नाचत जाऊ .कोणाला आत्मस्थिति प्राप्त होवो अथवा कुणाला मुक्ती मिळो .तुकाराम महाराज म्हणतात, हरिच्या नामस्मरणाशिवाय इतर छंद आम्हाला (हरिदासांना) वर्ज आहेत .
अभंग क्र.219
देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥१॥
ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ध्रु.॥
देवाची जतन । तया बाधूं न शके अग्न ॥२॥
तुका म्हणे हरी । प्रल्हादासी यत्न करी ॥३॥
अर्थ:-
देवा तू ज्यांचा सखा-सोयरा आहे, पाठिराखा आहे, त्यांच्यावर सर्व जग माया प्रेम करते .असा प्रत्यक्ष अनुभव येवून सुद्धा भगवंताची कृपा संपादन न करता काहींचा जिव संसारिक विषयांसाठी कासाविस होतो .ज्याचे रक्षण देव करतो, त्याला अग्निचेही भय नसते .तुकाराम महाराज म्हणतात, भक्त प्रल्हादा करता भगवंताने असेच् प्रयत्न केले होते .
अभंग क्र.220
भले म्हणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥१॥
ठसावितां बहु लागती सायास । चुकल्या घडे नाश अल्प वर्म ॥ध्रु.॥
पाकसिद्धी लागे संचित आइतें । घडतां सोई तें तेव्हां गोड ॥२॥
तुका म्हणे बर्या सांगतांचि गोष्टी । रणभूमि दृष्टी न पडता ॥३॥
अर्थ:-
आपण जर स्वतःला संतांचेसेवक म्हणावले तर त्यांच्या ज्ञानाची, तपाची, संचिताची शिदोरि आपोआप आपल्याकडे चालत येते एखादी परमार्थिक गोष्ट पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात त्यात थोडी जरी चूक झाली तर नाश होतो .पाकशुद्धी करण्यासाठी सर्व पदार्थ व्यवस्तीत व प्रमाणात असावे लागतात, त्यातून जेवण रुजकर बनेले तरच ती पाकशुद्धी सफल होते .तुकाराम महाराज म्हणतात ,जो पर्यंत रणभूमी दिसत नाही तो पर्यंतच युद्धकथा गोड वाटतात .
अभंग क्र.221
संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥१॥
तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ध्रु.॥
कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥२॥
तुका म्हणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संतांचिया ॥३॥
अर्थ:-
एखाद्या बरोबर राहून जर संतसहवास घडत असेल तर त्याच्या दारात इनामी कुत्र्याप्रामाने राहावे .जेथे राम नाम व संतवचन श्रवण करण्यास मिळेल येथील उष्टे भोजनहि करावे .अश्या संतांच्या घरी आपण सेवक बनून राहिलो असता आपले दैन्य निगुण जातील .तुकराम महाराज म्हणतात, संतांच्या सहवासात, पंगतित बसले असता जीवनातील सर्व सुखांचा लाभ होतो .
अभंग क्र.222
वाघाचा कलभूत दिसे वाघाऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं ॥१॥
बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणें भेटी आपेआप ॥ध्रु.॥
सिकविलें तैसें नाचावें माकडें । न चले त्यापुढें युक्ति कांहीं ॥२॥
तुका म्हणे करी लटिक्याचा सांटा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥३॥
अर्थ:-
वाघाचे नुसते कातडे घेऊन त्या मध्ये भुसा भरून उभे केले तर ते खरे वाटते पण वाघाच्या अंगी जे काही गुण असते ते त्या ठिकाणी नसते.मुलाम्यचे नाणे कसोटीला लावले म्हणजे त्याचा खरा रंग दिसतो म्हणजे एखाद्याचे जास्त संबंध झाले तर त्याचा स्वभाव लक्षात येतो.ज्या प्रमाणे माकडाला शिकविले तर त्याला तेवढेच नाचणे खेळ करणे तेवढेच त्याला येते पण त्या पुढे त्याला स्वतःच्या बुद्धीने काही जमत नाही.तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी खोट्याचा साठा केला आहे अश्यांची फजिती हि प्रसंगी होते.
अभंग क्र.223
सिंदळीचे सोयरे चोराचीया दया । ते ही जाणा तया संवसर्गी ॥१॥
फुकासाठी भोगे दुःखाचा वाटा । उभारोनी कांटा वाटेवरी ॥ध्रु.॥
सर्प पोसूनियां दुधाचा नास । केलें थीता विष अमृताचें ॥२॥
तुका म्हणे यासी न करितां दंडण । पुढिल खंडण नव्हे दोषा ॥३॥
अर्थ:-
एखाद्या व्यभिचारिण स्त्रीचे नातेवाईक आप्तेष्ट आणि चोराला दया दाखविणार माणूस हे सारखेच.असे माणसे फुकटच्या साठी दुखाचाही वाटा भोगायला तयार होतात कारण हे माणसे चांगल्या वाटेवर काटे पसरविणाऱ्या माणसासारखे असतात.आहो सापाला जरी दुध पाजले तरी त्याचे विष होते.तुकाराम महाराज म्हणतात दुष्ट लोकांना दंड केले नाही तर त्यांच्या पापाचे खंडन होत नाही.
अभंग क्र.224
तेणें सुखें माझें निवविलें अंग । विठ्ठल हें जग देखियेलें ॥१॥
कवतुकें करुणा भाकीतसें लाडें । आवडी बोबडें बोलोनियां ॥ध्रु.॥
मज नाहीं दशा अंतरीं दुःखाची । भावना भेदाची सर्व गेली ॥२॥
तुका म्हणे सुख झालें माझ्या जीवा । रंगलो केशवा तुझ्या रंगे ॥३॥
अर्थ:-
विठ्ठल रुपी जग पहिल्या नंतर व मी हि विठ्ठल रूप झाल्या नंतर मला अतिशय सुख झाले.मी या विठ्ठलाचे लाडाने आणि बोबड्या शब्दाने कवतुकाने करूणा करतो.आहो माझ्या अंतरंगात दुख:च राहिले नाही कारण माझी भावना समूळ गेली आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे केशवा माझ्या जीवाला अपार सुख झाले आहे कारण हरीच्या रंगात मी रंगलो आहे.
अभंग क्र.225
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥
सीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे ॥ध्रु.॥
माय माउलिया बंधुवर्गा जना । भाकीन करुणा सकिळकांसी ॥२॥
संत महंत सिद्ध महानुभाव मुनि । जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥३॥
माझिये माहेरीं सुखा काय उणें । न लगे येणें जाणें तुका म्हणे ॥४॥
अर्थ:-
हा विठ्ठल माझा सोयरा सज्जन व विसावा आहे त्याला भेटण्यासाठी मी त्याच्या गावाला जाईन.माझा भाग शिण सर्व काही मी त्या विठोबाला सांगेन कारण तो माझा बापूला आहे तो माझा सर्व जानतो.त्या ठिकाणी माझी माया बहिण बंधू हे सर्व आहेत व मी त्या ठिकाणी जाऊन सर्वांसमोर माझी करून भाकीन सांगेन.तेथे संत महंत सिद्ध मुनी महानुभाव आहेत आणि त्यांना मी माझ्या जीव भाव चे सर्व गोष्टी सांगेन.तुकाराम महाराज म्हणतात अहो हे माझे माहेर आहे तेथे सुखाला काय उणे आहे तेथे गेलो कि माझ्या जन्म मृत्युच्या फेऱ्या चुकतात.
अभंग क्र.226
ध्याइन तुझें रूप गाइन तुझें नाम । आन न करीं काम जिव्हामुखें ॥१॥
पाहिन तुझे पाय ठेविन तेथें मी डोई । पृथक तें कांही न करीं आन ॥ध्रु.॥
तुझेचि गुणवाद आइकेन कानीं । आणिकांची वाणी पुरे आतां ॥२॥
करिन सेवा करीं चालेन मी पायीं । आणीक न वजें ठायीं तुजविण ॥३॥
तुका म्हणे जीव ठेवीन मी पायी । आणीक ते काई देऊं कवणा ॥४॥
अर्थ:-
देवा मी तुझेच रूप ध्यानी ठेवीन तुझेच नाम गाईन आणि दुसरे कोणतेही काम माझी जीभ करणार नाही.हे देवा मी माझ्या डोळ्याने तुझेच पाय चरण पाहीन व माझे मस्तक त्या ठिकाणी ठेवीन त्याशिवाय दुसरे काही करणार नाही.तुझेच गुणगान मी गाईन व व्यर्थ बडबff9c00ड पुरे आता.मी पायी चलत येऊन तुझीच सेवा करीन व तुला सोडून दुसरे कोठेही मी जाणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात मी माझा जीव तुझ्या पायी ठेवीन आणि आता कोणालाही काही देण्या साठी माझ्या कडे काय आहे.
अभंग क्र.227
माझें चित्त तुझे पायीं । राहें ऐसें करीं कांहीं । धरोनियां बाहीं । भव हा तारीं दातारा ॥१॥
चतुर तूं शिरोमणि । गुणलावण्याची खाणी । मुगुट सकळं मणि । धन्य तूंचि विठोबा ॥ध्रु.॥
करीं त्रिमिराचा नाश । उदयो होउनि प्रकाश । तोडीं आशापाश । करीं वास हृदयीं ॥२॥
पाहें गुंतलों नेणतां । माझी असो तुम्हां चिंता । तुका ठेवी माथा । पायीं आतां राखावें ॥३॥
अर्थ:-
हे दातारा दयाघना माझे चित्त तुझ्या पायी राहीन असा काही तरी उपाय कर आणि माझे बाही म्हणजे हात धरून हा भवसागर तार.हे नारायण तू चतुर शिरोमणी आहेस व लावण्याची खाण आहेस सर्वांचा मुकुट मनी आहेस हे विठोबा तू धन्य आहेस.तू सर्व तीमिरांचा म्हणजे माझ्या अज्ञान रुपी अंधकाराचा नाश कर व माझ्या हृदयातच प्रकट हो प्रकाशित हो व तेथील आशा पाश तोडून टाकून तू तेथेच म्हणजे माझ्या हृदयात वास कर.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी या प्रपंचात गुंतलो आहे तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागेल मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो आहे तुम्ही मला तुमच्या चरणाशी आश्रय द्या.
अभंग क्र.228
आमुचें उचित हेचि उपकार । आपलाचि भार घालूं तुज ॥१॥
भूक लागलिया भोजनाची आळी । पांघुरणें काळीं शीताचिये ॥ध्रु.॥
जेणें काळें उठी मनाची आवडी । तेचि मागों घडी आवडे तें ॥२॥
दुःख येऊं नेदी आमचिया घरा । चक्र करी फेरा भोंवताला ॥३॥
तुका म्हणे नाहीं मुक्तीसवें चाड । हेंचि आम्हां गोड जन्म घेतां ॥४॥
अर्थ:-
हे पांडुरंगा आम्हां भक्तांचे योग क्षेमाचा भार तुमच्यावर घालून स्वस्त बसावे एवढेच काम आमचे हेच तुझ्यावर उपकार आहेत. हे पांडुरंगा भूक लागली कि आम्ही तुलाच आळवणार व थंडी लागली कि आम्हीं पांघरून तुझ्या जवळच मागणार.आम्हाला मनाने ज्या वेळी जे आवडेल ते तुमच्या जवळ त्या वेळी आम्हीं तुला मोठ्या प्रेमाने मागु.तुझे सुदर्शन चक्र हे देवा आमच्या घरा मध्ये व मना मध्येही दुखला येऊ देत नाही.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मुक्तीची चाढ नाही कारण सारखे सारखे जन्म घेऊन तुझ नाम घेणे त्यातच गोडी वाटते.
अभंग क्र.229
मी दास तयाचा जया चाड नाहीं । सुख दुःख दोहाविरहित जो ॥१॥
राहिलासे उभा भिवरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥
नवल काई तरी पाचारितां पावे । न त्वरित धांवे भक्तीकाजें ॥२॥
सर्व भार माझा त्यासी आहें चिंता । तोंचि माझा दाता स्वहिताचा ॥३॥
तुका म्हणे त्यास गाईन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥४॥
अर्थ:-
मी त्याचा दास झालो आहे ज्याला कसलीही इच्छा नाही सुख व दुख या दोन्हींच्या पलीकडे आहे अशाचा मी दास झालो म्हणजे देवाचा.असा तो देव भिवरे च्या तीरी कमरेवर हात ठेऊन उभा आहे.आहो हा देव हाक मारली कि लगेच धावतो आणि भक्तांचे कार्य करण्या करिता तो त्वरेने येतो.माझा सर्व भार त्याच्या वर आहे व माझी सर्व चिंताही तोच करतो व तोच माझ्या स्वहिताचा विचार करणारा आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी त्याच विठोबाचे गीत माझ्या मुखाने गाईन व त्या वाचून दुसरे काही चित्तात येऊ देणार नाही.
अभंग क्र.230
यासी कोणी म्हणे निंदेचीं उत्तरें । नागवला खरें तोचि एक ॥१॥
आड वाटे जातां लावी नीट सोई । धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥ध्रु.॥
नाइकता सुखें करावें ताडण । पाप नाहीं पुण्य असे फार ॥२॥
जन्म व्याधि फार चुकतील दुःखें । खंडावा हा सुखें मान त्याचा ॥३॥
तुका म्हणे निंब दिधल्यावांचून । अंतरींचा शीण कैसा जाय ॥४॥
अर्थ:–
मी जे काही बोलणार आहे याला कोणी जर निंदेचे भाषण म्हंटले तर तो फसला जाईल.कोणी जर अधार्मा कडे जात असला त्याला निट सोईला लावणे हि धर्म नीती आहे.व आपण जर चांगले सांगत असतांना कोणी ऐकले नाही तर त्याच्याशी सुखाने भांडावे व त्याला मारही द्यावा यात कसलेही पाप नसून उलट आधी पुण्याच आहे जर आपण असे केले तर त्याची जन्म व्याधी व दुखे यातून खंडन होईल म्हणून त्याची मान खंडना सुखाने करावी.तुकाराम महाराज म्हणतात कडू लिंबासारखे कडू औषध असल्याशिवाय त्याचा ताप कसा जाईल दुर्जनालाही शिक्षा केल्याशिवाय तो कसा नीट होईल?
अभंग क्र.231
निवडे जेवण सेवटींच्या घांसें । होय त्याच्या ऐसें सकळ ही ॥१॥
न पाहिजे झाला बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वांयां ॥ध्रु.॥
संपादिलें व्हावे धरिलें तें सोंग । विटंबणा व्यंग पडियाली ॥२॥
तुका म्हणे वर्म नेणतां जें रांधी । पाववी ते बुद्धी अवकळा ॥३॥
अर्थ:-
एखाद्या गोष्टीचे मर्म जाणणे किती अवश्यक आहे हे सांगण्या साठी महाराज म्हणतात संपूर्ण जेवण झाले आणि शेवटचा घास जर गोड लागला तर जेवण चांगले लागते.आपली सद्बुद्धी हिचा पालट कधीही होऊ देवू नये कारण असे झाल्यास सर्व खटपट व्यर्थ ठरते.जे सत्कार्य हाती घेतले ते सत्कार्य पूर्ण पणे तडीस नेले पाहिजे नाही तर फजिती होते.तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याला जर स्वयंपाक येत नसेल आणि त्याने जर स्वयंपाक करण्याचा शहाण पण केला तर त्याची शेवटी फजित होते त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे मर्म हे माहित पाहिजे.
अभंग क्र.232
दिली हाक मनें नव्हे ती जतन । वेगाळले गुणें धांव घेती ॥१॥
काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा हिंसा फार माया तृष्णा ॥ध्रु.॥
इंद्रियांचे भार फिरतील चोर । खाणे घ्यावया घर फोडूं पाहे ॥२॥
माझा येथें कांहीं न चले पराक्रम । आहे त्याचें वर्म तुझे हातीं ॥३॥
तुका म्हणे आतां करितों उपाय । जेणें तुझे पाय आतुडती ॥४॥
अर्थ:-
देवा तुला हाक देण्याचे कारण म्हणजे मनाने हरी चिंतन हरी जतन होत नाही मन ज्या गुणाने भरलेले आहे वृत्ती त्याच दिशेने धावा घेते.हे देवा माझ्या मना मध्ये काम क्रोध मद मत्सर अहंकार निंदा हिंसा माया तृष्ण फार बळावले आहेत.इंद्रिय रुपी चोर हे देह रूपातील घर फोडू पाहत आहे व जे काही परमार्थरूप धन येथे आहे ते धन चोरून नेण्यास हे चोर फिरत आहे.हे देवा या ठिकाणी माझे काहीही पराक्रम चालत नाही याचे वर्म तुझ्या हातात आहे हे मला माहित आहे.तुकाराम महाराज म्हणतात आता मी तोच उपाय करणार आहे जेणे तुझे या पायाचे दर्शन घडेल.
अभंग क्र.233
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीचा ॥ध्रु.॥
कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥२॥
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥३॥
अर्थ:-
कृष्ण माझी माता पिता बहिण बंधू चुलता आहे.कृष्ण माझा गुरु तारू आणि भाव नदीच्या पलीकडे नेणारी नौका कृष्णच आहे.कृष्ण माझे मन आहे कृष्ण माझे जन आहे कृष्ण माझा सोईरा सज्जन आहे.तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण माझा विसावा म्हणजे विश्रांतीचे ठिकाण आहे व याला माझ्या पासून वेगळे करावे असे मला वाटत नाही.
अभंग क्र.234
जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैसी ॥१॥
गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य मानावा रे भरवसा ॥ध्रु.॥
नका काढूं माझीं पेवें । तुम्हीं वरळा भूस खावें ॥२॥
भिकारियाचे पाठीं । तुम्ही घेउनि लागा काठी ॥३॥
सांगाल जेवाया ब्राम्हण । तरी कापाल माझी मान ॥४॥
वोकलिया वोका । म्यां खर्चिला नाहीं रुका ॥५॥
तुम्हीं खावें ताकपाणी । जतन करा माझे लोणी ॥६॥
नाहीं माझें मनीं । पोरें रांडा नागवणी ॥७॥
तुका म्हणे नष्ट । होतें तैसें बोले स्पष्ट ॥८॥
अर्थ:-
एखादा मनुष्य काशीस निघाला आणि तो घरच्यांना सांगतो कि माझे गाई घोडे म्हैसी सांभाळा.असे म्हणून तो म्हणतो कि तुम्ही काळजी करू नका मी असा जातो आणि असा येतो काळजी करू नका.अरे माझ्या पेवेतील धान्य खाण्या करिता काढू नका तुम्ही भुसा मिश्रित फोलपट खावे.जर कोणी भिक मागण्या साठी भिकारी दारात आला तर तुम्हीं त्याच्या मागे काठी घेऊन लागा व त्याला हाकलून द्या.तुम्ही जर जेवणा साठी एखादा ब्राम्हण घरी बोलावला तर तुम्हाला माझी मान कापल्याचे पाप लागेल.अरे मला कधी ओकारी आली तरी मी त्याच्या साठी कधी एक रुपयाही खर्च केला नाही.तुम्ही पातळ पाण्या सारखे जे दही ताक आहे ते घ्या पण माझे लोणी जतन करा.माझ्या मनात बायका पोरे या विषयी प्रेमच नाही कारण ते मला लुटणारी आहे.तुकाराम महाराज म्हणतात असा हा माणूस जे मनात येईल ते स्पष्ट बोलतो मग तो जरी बाहेर(काशीस) गेला तरी देवा कडे काय लक्ष असणार?
अभंग क्र.235
कास घालोनी बळकट । झालों कळिकाळावरी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१॥
या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ध्रु.॥
कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथें जमे । लाविले दमामे । मुक्ता आणि मुमुक्षा ॥२॥
एकंदर शिक्का । पाठविला इहलोका । आलों म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥३॥
अर्थ:-
मी कास बळकट करून काळीकाळाशीही लढण्या करिता पाय वाट बळकट केले आहे मी.आहो लहान मोठे भलत्या जातीचे पुरुष स्त्रिया या हो या येथे कोणाचाही विचार करायला नको.आहो येथे कामात गुंतलेले जपी तपी मुक्त झालेले मोक्षाची वाट पाहणारे सगळे या सर्वांना समजण्या साठी दमामे नौबती लावले आहेत.तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाचा शिक्का या इहलोक मध्ये सरसकट पाठविला आहे आणि हेच सांगण्यासाठी मी नामाचा धारक येथे आलो आहे.
अभंग क्र.236
आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताया ॥१॥
झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥
अर्थे लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी मन । साधन हे बुडविलीं ॥२॥
पिटूं भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जय जयकार आनंदें ॥३॥
अर्थ:-
आहो आम्हीं वैकुंठाचे वासी आहोत परंतु आम्हीं या भूतलावर पुराणातीला ऋषी मुनींनी जे वचन सांगितलेले आहेत भक्ती आचरण कसे करावे त्याचे प्रत्येक्ष अचारण करून दाखविणे यासाठी आलो आहोत.संतांचे मार्ग आम्हीं झाडू अज्ञानरूपी जे जंगल आहे आम्हीं ते साफ करू संतांचे उच्छिष्ट जे राहील ते आम्हीं अतिशय आदराने सेवन ग्रहण करू.पुराणात जे अर्थे सांगितले आहेत त्याचा या शब्द ज्ञानी लोकांनी नाश केला आहे विषय लोभी झालेले माणसांनी पारमार्थिक साधने नष्ट केली आहेत.तुकाराम महाराज म्हणतात आम्हीं भक्तीचा डांगोरा पिटू व त्यामुळे काळी काळास हि दरारा सुटतो व या कारण मुळे च हरी नामाचा आंनदाने जयजय कर करा.
अभंग क्र.237
बळियाचे अंकित । आम्ही झालों बळिवंत ॥१॥
लाताळीता संसारा । केला षड ऊर्मीचा मारा ॥ध्रु.॥
जन धन तन । केलें तृणाही समान ॥२॥
तुका म्हणे आतां । आम्ही मुक्तीचिया माथां ॥३॥
अर्थ:-
सर्व जगात जो स्वामी बळीवंत आहे त्याचे आम्ही अंकित झालो त्यामुळे आम्हीही बळीवंत झालो आहोत.त्यामुळे आम्ही या संसाराला लाथ मारून सहा उर्मींचा नाश केला आहे.जन धन व तन या सर्वांना आम्ही तृण म्हणजे कसपटा समान मानले आहे.तुकाराम महाराज म्हणतात आता तर आम्ही मुक्तीच्याही माथ्यावर बसलो आहोत.
अभंग क्र.238
मृत्युलोकीं आम्हां आवडती परी । नाहीं एका हरीनामें विण ॥१॥
विटलें हें चित्त प्रपंचापासूनि । वमन तें मनीं बैसलेंसे ॥ध्रु.॥
सोनें रूपें आम्हां मृत्तिके समान । माणिकें पाषाण खडे जैसे ॥२॥
तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हांपुढें ॥३॥
अर्थ:-
हे मृत्यु लोक आम्हाला आवडते पण या मृत्यु लोकात हरी नामावाचुंन दुसरे काहीही आम्हाला आवडत नाही.आता आमचे चित्त प्रपंचा पासून विटले(ओकलेल्या अन्ना प्रमाणे)आहे मणि फक्त हरिनाम आहे.सोने रुपे आम्हाला माती प्रमाने तर माणिक हीरे आम्हाला हे दगडा प्रमाणे आहेत.तुकाराम महाराज म्हणतात ज्या सुंदर नारी आहेत त्या आम्हला अस्वाला प्रमाणे दिसतात.
अभंग क्र.239
स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥
नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥
दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें । लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥
तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु । परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥
अर्थ:-
महाराज म्हणतात देवा मला स्त्रियांचा संग नको आहे मग त्या लाकडी किंवा पाषाण मातीच्या असतील तरी नको.कारण त्यांच्या मुळे देवाचे भजन व देव हि आठवत नाही कारण मन हे त्यांच्या ठिकाणी लांचावलेले असते त्यामुळे ते आवरत नाही.आहो दृष्टीने त्यांच्या कडे पहिले तरी मरण ओढवते व त्यांचे लावण्या हे खरे दुखाचे मुळ आहे.तुकाराम महाराज म्हणतात अग्नी हा उपकरी असला तरी पण त्याच्याशी संबंध आला कि तो आपल्यालाही बाधतो म्हणजे नष्ट करतो.
अभंग क्र.240
पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचेंचि ॥१॥
जाई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥ध्रु.॥
न साहावें मज तुझें हें पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥२॥
तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे झाले ॥३॥
अर्थ:-
परनारी हि रखुमाई समान मानल्याने काही वाईट आहे काय?एका बाईला उद्देशून महाराज म्हणतात कि हे माते तू येथून जा आम्ही विष्णु दास आहोत आम्ही तुला जसे वाटतो आहोत आम्ही तसे नाही.तुझे हे चाललेले पतन मला सहन होत नाही तू दुष्ट वचन वदत जाऊ नकोस.तुकाराम महाराज म्हणतात अरे तुला पती पाहिजेच असेल तर या जगात पुरुष भरपुर आहेत.
अभंग क्र.241
भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥१॥
पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥२॥
तुका म्हणे माझें जाळूनि संचित । करीं वो उचित भेट देई ॥३॥
अर्थ:-
भक्ती प्रतिपाळे म्हणजे भक्तांचे रक्षण करणारी विठाबाई तू कृपाळू माऊली आहेस.हे विठ्ठला तुला माझा विसर तरी कसा पडला?अरे माझे कपाळच फुटके त्याला मी तरी काय करू?तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तू माझे संचित जाळूण तू मला भेट दे हे उचित कर्म तू कर हि माझी विनंती तुझ्या पाशी आहे.
अभंग क्र.242
तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥१॥
लागलीसे आस पाहातसे वास । रात्री वो दिवस लेखीं बोटी ॥२॥
काम गोड मज न लगे हो धंदा । तुका म्हणे सदा हेचि ध्यान ॥३॥
अर्थ:-
हे पांडुरंगा तुझ्या वाचून मला या जगामध्ये दुसरे कोण सोयरे आहे.देवा तुझी मी अहोरात्र तुझी वाट पाहत आहे मला तुझ्या भक्तीची आस लागली आहे रात्र गेली दिवस गेला कि मी बोटाने मोजत आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझे कामात गोडी लागत नाही धंद्यात लक्ष लागत नाही सदा सर्वकाळ तुझेच ध्यान लागले आहे..
अभंग क्र.243
पढियंतें आम्ही तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावें हितगुज ॥१॥
पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥ध्रु.॥
जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूंचि सर्वा ठायीं एक आम्हां ॥२॥
दुजियाचा संग लागों नेदी वारा । नाहीं जात घरा आणिकांच्या ॥३॥
सर्वसत्ता एकी आहे तुजपाशीं । ठावें आहे देसी मागेन तें ॥४॥
म्हणउनि पुढें मांडियेली आळी । थिंकोनियां चोळी डोळे तुका ॥५॥
अर्थ:-
हे पांडुरंग आम्हाला जे आवडते ते आम्ही तुझ्या पाशी मागू व आमचे जीवाचे जे हित गुज आहे ते आम्हीं तुला सांगू.हे विठ्ठला तू आमचा सांभाळ आवडीने लाडाने व वात्सल्य भावनेने करशील.हे दिन वत्सला विठ्ठला तू या जगाची कृपाळू जननी आहेस.आम्हीं आमचा जीव भाव सर्व तुझ्या पायी ठेवला आहे सर्व ठिकाणी तूच आम्हला तारणारा आहे.आम्हांला दुसर्याच्या संगतीचा वाराही लागू देऊ नकोस आणि मी अणिकांच्या घरी सुद्धा जाता नाही.अरे पांडुरंगा मी जे काही मागेन ते तू मला नक्की देणार कारण सर्व सत्ता तुझ्या पाशी आहे हे मला माहित आहे.तुकाराम महाराज म्हणतात आणि म्हणूनच तर देवा मी तुझ्या पुढे आळी(हट्ट)मांडला आहे आणि डोळे चोळीत तुझ्या पुढे रडत आहे.
अभंग क्र.244
कोण पर्वकाळ पहासील तीथ । होतें माझें चित्त कासावीस ॥१॥
पाठवीं भातुकें प्रेरीं झडकरी । नको राखों उरी पांडुरंगा ॥ध्रु.॥
न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥२॥
काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥३॥
काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥४॥
तुका म्हणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥५॥
अर्थ:-
हे देवा अरे मला भेटण्यासाठी तू कोणत्या तिथीची पर्वकाळाची वाट पाहत आहे इकडे माझा जीव कासावीस होत आहे.अरे पांडुरंगा लवकर ये उशीर लावू नकोस.देवा मी अवगुणी अन्यायी आहे म्हणून तू माझ्यावर कोप करू नको माझा त्याग करू नको.अरे अज्ञानी मुलाला काय रडवतो?तू सर्व जाणता असून तू थोर आहे तरी असे का वागतो हे मला समजेना.अरे कर कटेवर ठेऊन काय उभा आहेस?आम्हा लहान लाडाची मुलांची तू समजूत काढ.तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही तूझ्या पदारालाच पीळ घालणार मग मी तुझ्या पेक्षा निराळाच नाही होणार?
अभंग क्र.245
कां हो देवा कांहीं न बोलाचि गोष्टी । कां मज हिंपुटी करीतसा ॥१॥
कंठीं प्राण पाहें वचनाची वास । तों दिसे उदास धरिलें ऐसें ॥ध्रु.॥
येणें काळें बुंथी घेतलीसे खोळ । कां नये विटाळ होऊं माझा ॥२॥
लाज वाटे मज म्हणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥३॥
अर्थ:-
हे देवा तुम्हीं माझ्याशी काही का बोलत नाही का मला हिंपुटी म्हणजे कष्टी करता.माझा प्राण कंठात आला आहे तुझ्या शब्दाचा वसा व्हावा असे मला वाटते पण तुम्ही माझ्या भक्तीत उदासीन झाला आहात असे मला वाटते.आहो देवा तुम्ही खोळ पांघरून अलग वेगळे बसला आहात काय?माझा विटाळ तुम्हाला होऊ नये असे तुम्हाला वाटते काय?तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुमचा म्हणण्याची लाज वाटते कारण तुम्ही मला फुकटचेही विचारत नाही?
अभंग क्र.246
उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा ॥१॥
देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ध्रु.॥
आलिया अतीता शब्दे समाधान । करितां वचन कायवेंचे ॥२॥
तुका म्हणे तुम्हां साजे हें श्रीहरी । आम्ही निलाजिरीं नाहीं ऐसीं ॥३॥
अर्थ:-
परमार्थात उचित काय आहे हे मी दुबळा काय जाणार?पण ऐवढे मात्र मी जाणतो जो कोणी परमार्थात गर्व करतो त्याचे तोड काळे होते.जसे एखाद्या घरी कोणी नसते व आपण द्वारातून ओ दिली कि कोणीही ऐकत नाही तसे मी तुम्हाला हाक देऊनही तुम्ही काहीच बोलत नाही.आहो देवा आहो दारात आलेल्या पाहुण्याचे गोड शब्दाने समाधान केले तर काय खर्च आहे काय.तुकाराम महाराज म्हणतात आहो देवा तुमच्या थोर पणाच्या मानाने ते तुम्हाला साजेसे आहे ते तुम्हाला शोभातेही पण आम्ही पण एवढे निलाजिरी नाहीत.
अभंग क्र.247
आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरीं तूं भितोसि पांडुरंगा ॥१॥
पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आम्ही धालों नावें तुझ्या एका ॥ध्रु.॥
ॠद्धिसिद्धि तुझें मुख्य भांडवल । हें तों आम्हां फोल भक्तीपुढें ॥२॥
तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निवांत सुख भोगूं ॥३॥
अर्थ:-
हे पांडुरंगा आम्ही जे काही मागत आहे ते तुझ्या पाशी नाही म्हणून तू आमच्याशी बोलण्यास भीत आहे.देवा तू विचार करून पहा हे तुला पण माहित आहे आम्ही तुझ्या नामानेच तृप्त झालो आहोत.देवा तुझ्या भक्ताला देण्यासाठी तुझ्याकडे रिद्धी सिद्धी हे एवढेच मुख्य भांडवल आहे पण ते आम्हास तुझ्या भक्ती पुढे निष्काम फोल वाटते.तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्ही चालत वैकुंठाला जाऊ आणि निवांत सुख भोगू.
अभंग क्र.248
न लगे हें मज तुझें ब्रम्हज्ञान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥१॥
लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या ॥ध्रु.॥
जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं हें ॥२॥
तुका म्हणे नको रागेजु विठ्ठला । उठीं देई मला भेटी आतां ॥३॥
अर्थ:-
देवा मला तुझे ब्रम्ह ज्ञान नको तुझे गोजिरे सगुण रूपच मला पुरे आहे.अरे देवा मला भेट देण्या करीता तू उशीर केला म्हणजे मी पतित पावन आहे या वचनाला तू विसरला आहे.अरे मी संसार जाळून अंगणात बसलो आहे.तुकाराम महाराज म्हणतात अरे विठ्ठला तू असा माझ्या वर रागावू नकोस उठ आता तू मला लवकर भेट दे.
अभंग क्र.249
कुमुदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥
तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥
माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥२॥
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥३॥
अर्थ:-
कमळ(कुमुदिनी)ला स्वतःचा परीमळ(सुगंध)समजतो काय पण भ्रमर(भुंगा)च त्याचे सुख भोगतो.अरे विठ्ठला तसेच तुझे नाम आहे ते किती गोड आहे ते तुला ठाऊक नाही पण त्या नामाचे भोग गोडी प्रेम सुख आम्ही जाणतो.गाय तृण(गवत)खाते आणि त्या गवताचे जे दुध तयार होते त्याची गोडी हि वासारालाच माहित आहे.पण ज्याची कमाई त्याच्या कामास येत नाही.तुकाराम महाराज म्हणतात शिंपल्याच्या पोटात मोती जन्माला येतो पण ते का एकदा बाहेर आले परत त्या शिपंल्याला मोतीची भेट त्या मोतीचा आंनद मिळत नाही.
अभंग क्र.250
काय सांगों तुझ्या चरणीच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥१॥
बोलतां हें वाटे कैसें खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥
आम्ही एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निरुतें सुख दोघें ॥२॥
तुका म्हणे आम्हां मोक्षाचा कंटाळा । कां तुम्ही गोपाळा नेणां ऐसें ॥३॥
अर्थ:-
आहो देवा तुमच्या चरणाचे सुख काय सांगावे?कारण तुम्हाला त्या चरण सुखाचा अनुभव नाही.आम्ही तुला ते सांगितले तर तुला ते खरे वाटणार नाही कसे वाटेल कारण अमृताचे गुण अमृताला कळत नाही.त्या सुखाची ग्वाही फक्त आम्ही माया लेकरे जाणतो माता लक्ष्मी व आम्ही तिचे मुले आहोत ते सुख आम्ही दोघेच जाणतो.तुकाराम महाराज म्हणतात हे गोपाळा आहो आम्हाला मोक्षाचा कंटाळा आहे हे तुम्ही का जाणत नाहीत.
अभंग क्र.251
देखोनियां तुझा सगुण आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥
तेणें माझ्या चित्ता झाले समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ध्रु.॥
मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥२॥
तुका म्हणे केले तुझ्या नामापुढें । तुच्छ हें बापुडें सकळही ॥३॥
अर्थ:-
हे विठ्ठला तुझा सगुण आकार जो कर कटेवर ठेऊन विटे वर उभा आहे ते रूप पाहून माझ्या चित्ताला समाधान झाले आहे असे वाटते कि तुझे चरण कधीच सोडू नये.मी मुखाने तुझे गुणगान गात हाताने ताळी वाजवीत प्रेम सुखाने नाचतो.तुकाराम महाराज म्हणतात अरे विठ्ठला तुझ्या नामाच्या पुढे मला सर्व तुच्छ वाटते.
अभंग क्र.252
आतां येणेंविण नाहीं मज चाड । कोण बडबड करील वांयां ॥१॥
सुख तेंचि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळों आलें ॥ध्रु.॥
तुका म्हणे वाचा वाहिली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥३॥
अर्थ:-
तुझे नाम घेणे या व्यतिरिक्त मला काहीही आवडत नाही उगाच व्यर्थ बडबड कोण करील.संसारातील जे सुख आहे खरे तर ते दुखच आणि जे आपण पुण्य म्हणतो ते नश्वर असल्यामुळे ते पापच होय कारण ते बंधन कारक असते हे आम्हला चांगले कळून आले आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर आमची वाचा हि अनंताला वाहिली आहे त्यामुळे आणिक काही बोलायचे कामच उरले नाही.
अभंग क्र.253
बोलों अबोलणें मरोनियां जिणें । असोनि नसणें जने आम्हां ॥१॥
भोगीं त्याग जाला संगींच असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥२॥
तुका म्हणे नव्हें दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा ॥३॥
अर्थ:-
आम्ही बोललो तरी आम्हीं अबोलण्या सारखे आहे देह बुद्धीने जरी मेलो असलो पण आत्म बुद्धीने जिवंत आहोत.व देह भाव नष्ट झाला म्हणजे मी मेलो असलो तरी आत्म रूपाने जिवंत आहे.आम्ही विषय भोगाचा त्याग केला आहे आमच्या भोवताली जरी सर्वांचा संग असला तरी आम्हीं असंग आहोत.आहो देह बुद्धीने जरी संसारात असलो तरी माझा आत्मा असंग आहे संगा मध्ये गुंतवणारी जी देह बुद्धी आहे ती आम्ही उरू दिली नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे जन हो मी तुम्हाला ज्या प्रमाणे दिसतो तसा मी नाही आणि तुम्हाला जाणवायचे असेल तर तुम्हीं त्या हरीला विचारा.
अभंग क्र.254
अधिकार तैसा दावियेला मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥१॥
जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥
तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥३॥
अर्थ:-
संतानी ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला मार्ग दाखविला आहे त्या त्या मार्गाने तो गेला तर त्याला फायदाच होईल.नौकेच्या सहाय्याने आपण पैला तीरावर गेलो म्हणून काम झाले म्हणून त्या नौकेला जाळू नये करणे मागे ती नौका अनेक जनांच्या कामी येणार आहे म्हणजे आत्म स्वरूप समजले असता त्याचे आचरण करावे व जे अज्ञानी असतात त्याना मार्गदर्शन करावे.तुकाराम महाराज म्हणतात वैद्याच्या अंगी रोग नसतो पण तो इतरांचे रोग बरे करण्या करता औषधे जवळ बाळगतो.
अभंग क्र.255
संसार तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥१॥
शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगीं होउनि ठेला ॥२॥
तुका म्हणे देहें दिला एकसरें । जयासि दुसरें नाहीं मग ॥३॥
अर्थ:-
ज्याच्या चित्तात मनात द्रव्य संसार नसतो त्याने संसाराला पाठीमागे टाकले समजावे.चांगल्या वाईट गोष्टी शुभ अशुभ या विषयी आंनद खेद ज्याच्या मनात नसतो तो या जगात जनार्धन रूप होऊन राहिलेला असतो.तुकाराम महाराज म्हणतात आपला देह देवाला अर्पण केला त्याला या जगाशी काहीही कर्तव्य नसते.
अभंग क्र.256
देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं । आपुलें जाणती परावें जे ॥१॥
तयासि चालतां पाहिजे सिदोरी । दुःख पावे करी असत्य तो ॥२॥
तुका म्हणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हें तापला तो ॥३॥
अर्थ:-
जो देह मीच आहे असे मानतो त्याच्या चित्त लोभ वसलेला असतो आणि जो “हा आपला तो परका” असे मानतो.त्याला या भू लोकात जन्म मृत्यूची वाटचाल करण्या करता पाप पुण्याची शिदोरी बरोबर घ्यावी लागते आणि तो जर सारखा सारखाअधर्मच करत राहिला तर त्याला दुखच प्राप्त होते.तुकाराम महाराज म्हणतात उन्हात तापलेल्या मनुष्याला जसे छाया मिळावी असे वाटते तसे तुम्ही धर्म रक्षण करण्या करता प्रयत्न करा.
अभंग क्र.257
काळें खादला हा अवघा आकार । उत्पत्ती संहार घडामोडी ॥१॥
बीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता सेवटीं एकाचिया ॥२॥
तुका म्हणे शब्दें व्यापिलें आकाश । गुढार हें तैसें कळों नये ॥३॥
अर्थ:-
या जगाचा आकार काळाने खाल्लेला आहे त्यामुळे कधी प्रलय तर कधी उत्पत्ती हे चालू असतात. ज्याप्रमाणे बीजापासून अंकुराची उत्पत्ती होते आणि पुन्हा ते अंकुर बिजामाध्येच लय पावते त्याप्रमाणे या जगताचा निर्माता, तो हरी आहे व हे जगही त्याच्यातच सामावले जाते. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे आकाशामध्ये सर्व शब्दच व्यापलेले आहेत हे गूढार म्हणजे रहस्य कसे बरे कळत नाही? (शब्द म्हणजे नाम आहे आणि हे नामच सर्व आकाशात व्यापून उरलेले आहे व त्याच्या साह्याने हरीची प्राप्ती होते.
अभंग क्र.258
आणीक या काळें न चले उपाय । धरावे ते पाय विठोबाचे ॥१॥
अवघेचि पुण्य असे तया पोटीं । अवघिया तुटी होय पापा ॥ध्रु.॥
अवघें मोकळें अवघिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥२॥
काळ वेळ नाहीं गर्भवासदुःखें । उच्चारितां मुखें नाम एक ॥३॥
तुका म्हणे कांहीं न लगे सांडावें । सांगतसें भावें घेती तयां ॥४॥
अर्थ:-
या कलियुगामध्ये जर आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर दुसरा कोणताही उपाय चालत नाही फक्त एक विठोबाचे पाय चित्तात साठवून ठेवावे.या जगतामध्ये जे काही पुण्य आहे ते सर्व या विठ्ठलाच्या पायामध्ये चरणांमध्ये आहे आणि त्याच्यानाम चिंतनाने च पापाचा नाश होतो.या विठोबाचे नामचिंतन कोणत्याही काळात करता येते आणि जे कोणी नरनारी या विठोबाचे नाम चिंतन करतात त्यांची सर्व कुळे उद्धरली जातात. या विठोबाचे नाम चिंतन करण्यासाठी कोणताही वेळकाळ पाहण्याची गरज नसते पहावा लागत नाही विठोबाचे नाम एकदा जरी घेतले तरी गर्भवासादि दुखे नाहीशी होतात.तुकाराम महाराज म्हणतात हे हरिनाम घेण्याकरता कशाचाही त्याग करायचा नाही आणि जे हरीचे नाम अगदी श्रध्देने घेतात त्यांनाच मी या हरिनामाचे महत्व सांगतो.
अभंग क्र.259
न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१॥
ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हेचि सांगे ॥ध्रु.॥
विटंबो शरीर होत कां विपत्ती । परि राहो चित्तीं नारायण ॥२॥
तुका म्हणे नासिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तेचि हित ॥३॥
अर्थ:-
मला खायला नाही मिळाले तरी चालेल, पोटी संतान नाही झाले तरी चालेल परंतु नारायणाने माझ्यावर सतत कृपा करत राहावी. असाच उपदेश सतत माझी वाणी मला करत असते व लोकांना देखील हेच सांगत असते. माझ्या शरीराची कितीही विटंबना होवाे किंवा माझ्यावर कशीही विपत्ती येवाे तरी चालेल परंतु माझ्या चित्तामध्ये सतत नारायणच रहावे. तुकाराम महाराज म्हणतात अरे हे सर्वकाही नाशवंत आहे त्यामुळे तो सतत गोपाळाची चिंतन करत राहा यातच तुझे हित आहे.
अभंग क्र.260
पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करूनियां ॥१॥
शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ध्रु.॥
क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळि सत्ता नाहीं हातीं ॥२॥
कर्वतिलीं देहें कापियेलें मांस । गेले वनवासा शुकादिक ॥३॥
तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाव जळे ॥४॥
अर्थ:-
चांगले गोड-धोड अन्न खाऊन हे शरीर पुष्ट बनवावे असे तत्त्वज्ञान, अधम लोकांचे असते. शरीर रक्षण करावे हे असे त्यांचे म्हणणे असते परंतु शरीराचे रक्षण करणे हे त्यांच्या हातात असते काय? हे शरीर क्षणातच लय पावेल आणि हातात आपण घेतलेला घास गिळू असेसुद्धा आपण म्हणु शकत नाही कारण तेवढी सत्ता ही आपल्या हातात नाही. असे महान मुनि आहेत की ज्यांनी या देवा करतात आपल्या शरीरावर करवत चालविले आहे उदाहरणार्थ (शिबी राजा) आणि शुकमुनि तर या देहाविषयी उदास होऊन वनात राहण्यास गेले. तुकाराम महाराज म्हणतात जनक राजा राज्य करत असताना त्याचा एक पाय अग्नीत जळत होता परंतु त्याचा त्याच्या शरीराकडे लक्ष देखील नव्हते इतका तो हरिचिंतनात रममाण झालेला होता.
अभंग क्र.261
जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदों जिव्हे ॥१॥
सकळां इंद्रियां हे माझी विनंती । नका होऊं परतीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
आणिकांची मात नाइकावी कानीं । आणीक नयनीं न पाहावें ॥२॥
चित्ता तुवां पायीं रहावें अखंडित । होउनी निश्चित एकविध ॥३॥
चला पाय हात हेचि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबासी ॥४॥
तुका म्हणे तुम्हां भय काय करी । आमुचा कैवारी नारायण ॥५॥
अर्थ:-
हे जिव्हे पांडुरंगा वाचून दुसरे कोणतीही नाम घेण्यासाठी कोणीही मला जबरदस्ती केली किंवा माझी मान जरी कापली तरी तू पांडुरंगा वाचून दुसरे काहिहि उच्चार करू नकोस.सर्व इंदियांना माझी विनंती आहे कि तुम्ही पांडुरंगाविषयी विन्मुख होऊ नका.माझ्या कानांनी या हरिनामा वाचूनच दुसरे काहीही ऐकू नये व माझ्या डोळ्यांनीही या पांडुरंग वाचून दुसरे काहिहि पाहू नये.हे माझ्या “चित्ता” तू सर्व काही चिंता टाकून एकविध मनाने एकनिष्ठ भावनेने या पांडुरंगाच्या चरणी अखंड राहा.हे माझ्या पायानो तुम्ही या विठोबाकडे चालत राहा आणि हे माझ्या हातांना तुम्ही या विठोबाला कायमस्वरूपी नमस्कार करत राहा.तुकाराम महाराज म्हणतात मग तुम्हाला कसलेही भय काय करणार आहे कारण आमचा कैवारी नारायण आहे.
अभंग क्र.262
करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न म्हणें संत ॥१॥
जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ध्रु.॥
जगदेव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भारवाही ॥२॥
तुका म्हणे भय न धरीं मानसीं । ऐसियाचे विशीं करितां दंड ॥३॥
अर्थ:-
हे देवा तुला माझे काय करायचे असेल ते कर पण माझ्या मुखाने मी त्यांना संत म्हणणार नाही.जे लोक राज्य द्रव्य इत्यादीं विषयी हाव धरतात इत्यादी विषयी मिळावेत यासाठी प्रयत्न करतात आणि जे लोकं दांभिक आहेत त्यांना आपल्याला लोकांमध्ये मान सन्मान मिळावा असे वाटते अशा लोकांना मी संत म्हणणार नाही.देव जरी सर्व जगामध्ये भरलेला आहे असे असेल तरीदेखील सुद्धा मी अशा लोकांना निवडून वेगळेच काढिन कारण हे लोक यांना ब्रम्हज्ञानाचा काहीही अनुभव नाही तरी फक्त शब्द ज्ञानाचे भार वाहणारे आहेत.तुकाराम महाराज म्हणतात अशा दांभिक लोकांना दंड करण्याविषयी मी माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय धरणार नाही.
अभंग क्र.263
म्हणविती ऐसे आइकतों संत । न देखीजे होत डोळां कोणीं ॥१॥
ऐसियांचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाईडाई ॥ध्रु.॥
पर्जन्याचे काळीं वोहाळाचे नद । ओसरतां बुंद न थारेचि ॥२॥
हिऱ्याऐशा गारा दिसती दूरोन । तुका म्हणे घन न भेटे तों ॥३॥
अर्थ:-
असे कित्येक लोक आहेत की जे स्वतःला दुसऱ्याकडून त्यांना स्वतःला संत म्हणवून घेतात परंतु मी माझ्या डोळ्यांनी आज पर्यंत असे संत पाहिले नाही. अशांचा कोण विश्वास ठेवतो जगाच्या सुखदुःखांमध्ये घावाडवा मध्ये ज्याची शांती ढळत नाही तोच खरा संत ओळखला जातो. जसे पर्जन्य कालामध्ये एखाद्या ओहोळांमध्ये नदीप्रमाणे पाणी वाहते म्हणजे ते ओहळ नदी आहे काय तर नाही पर्जन्य संपले की त्या ओहाळा मध्येही थेंब पाणी सुद्धा राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात गारगोटीला दुरून जर पाहिले तर अगदी हिर्याप्रमाणे दिसते परंतु कुठपर्यंत दिसते तर जोपर्यंत त्याची आणि घनाची भेट होत नाही तोपर्यंत म्हणजे कठीण प्रसंगी संत कोणते खरे आहेत हे लक्षात येते.
अभंग क्र.264
अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी ॥१॥
त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ध्रु.॥
प्रतिपादी वाळी । एक पुजी एका छळी ॥२॥
तुका म्हणे नाहीं । भूतदया ज्याचे ठायीं ॥३॥
अर्थ:-
काही लोक कपाळाला गोपीचंदन लावतात आणि ते स्वतः वैष्णव आहेत असे सोंग आणत असतात,त्याचा वेष हा बहुरूपी नटाप्रमाणे असतो कारण तो खरा वैष्णव नसून खोटारडा असतो. तो एकचि स्तुती करतो तर दुसऱ्याचा तिरस्कार करतो एकाची पूजा करतो तर दुसऱ्याला छळतो.तुकाराम महाराज म्हणतात भूतदया ज्याच्या ठिकाणी असते तोच खरा वैष्णव आहे.
अभंग क्र.265
पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ॥१॥
अर्थी परमार्थ कैसा घडों सके । चित्त लोभी भीके सोंग वांयां ॥ध्रु.॥
देवाचीं चरित्रें दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥२॥
तुका म्हणे चित्तीं राहे अभिळास । दोघां नरकवास सारिखाचि ॥३॥
अर्थ:-
नाटकामध्ये लोक स्त्री किंवा पुरूष या पात्राची सोंग घेतात परंतु ते विषय असून विषयाचेच प्रकार आहेत त्यामुळे ते पाहू नये.पैसे कमावण्याकरता धन कमविण्याकरता जर परमार्थ केला जात असेल तर मग तो परमार्थ कसा होऊ शकेल आणि नट धनाच्या लोभाने देवाचे सोंग घेत असेल तर ते व्यर्थच आहे.कथेमध्ये हे असे लोक देवाने लीला कसे केले हे दाखवण्या करिता लोकांना मोहित करण्याकरता सोंग धारण करतात पण त्यांचे ते चातुर्य व्यर्थ असते.तुकाराम महाराज म्हणतात चित्तामध्ये पैसे अभिलाषा ठेवून कथा सांगणारे आणि पैसे देऊन ती पहाणारे दोघेही नरकवासाच भोगतात.
अभंग क्र.266
भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥
भाविकांनीं दुर्जनाचें । कांहीं मानूं नये साचें ॥ध्रु.॥
होईल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥२॥
तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥३॥
अर्थ:-
काही दुर्जन लोक असे असतात की ते कुत्र्यासारखे सारखे भुंकत असतात त्यांना भुंकू द्यावे व त्यांचे काहीही बोलण्या पण मनाला लावून घेऊ नये.भाविकांनी दुर्जनांचे कोणतेही बोलणे मनावर घेऊ नये.अशा खळांची आपल्या बलाने जितकी फजित करता येईल तितकी करावे.तुकाराम महाराज म्हणतात या दुर्जनांना आपण ताडण केले म्हणजे कठोर शिक्षा दिली तरीही आपल्याला पाप लागत नाही.
अभंग क्र.267
जप करितां राग । आला जवळी तो मांग ॥१॥
नको भोंवतालें जगीं । पाहों जवळी राख अंगीं ॥ध्रु.॥
कुड्याची संगती । सदा भोजन पंगती ॥२॥
n तुका म्हणे ब्रम्ह । साधी विरहित कर्म ॥३॥
अर्थ:-
हरी भजन करताना राग आला तर समजावे आपल्याजवळ अस्पृश्य असा मांगच आलेला आहे त्यामुळे देवाचे जप करताना कधीही राग येऊ देऊ नये.अरे तू या भोवतालच्या लोकांचे वर्तन पाहू नकोस आणि तुझ्या अंतःकरणामध्ये जो राग राहतो त्याला तुला स्पर्शही होऊ देऊ नकोस.राग रूप जो मांग आहे तू त्याच्या पंगतीत बसून भोजन करू नकोस.तुकाराम महाराज म्हणतात अरे तू कर्म अकर्म बाजूला ठेव आणि खर्या ब्रह्माची प्राप्ती करून घे.
अभंग क्र.268
कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥१ ॥
अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ध्रु.॥
कां हें चित्त नाहीं पावत विश्रांती । इंद्रियांची गति खुंटेचि ना ॥२॥
तुका म्हणे कां हो धरियला कोप । सरलें नेणों पाप पांडुरंगा ॥३॥
अर्थ:-
हे हृदयस्था नारायणा तू माझ्या इतक्या जवळ आहेस तरीही तुला माझा कळवळा का बरे येत नाही?हे निर्गुणा नारायणा निष्ठुरा अरे तुझ्या प्राप्तीकरता मी कंठ शोक कुठेपर्यंत केला तरी तुला कसे समजत नाही?माझ्या इंद्रियांना विषयाकडे धावण्याची गती लागलेली आहे ती अजूनही का थांबत नाही आणि माझ्या चित्ताला अजूनही विश्रांती म्हणजे समाधान का मिळत नाही?तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू माझ्यावर एवढा राग का धरलेला आहे माझे पाप अजूनही संपलेली नाही की काय?
अभंग क्र.269
दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥१॥
पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ध्रु.॥
आपुल्या दासांचें न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥२॥
चक्र गदा हातीं आयुधें अपारें । न्यून तेथें पुरें करूं धावें ॥३॥
तुका म्हणे तुज भक्तीचें कारण । करावया पूर्ण अवतारा ॥४॥
अर्थ:-
हे देवा तुझी या जगामध्ये अनेक ब्रीदे आहेत ते म्हणजे तू दिनानाथ आहेस कृपा घन आहेस कृपा वत्सल आहेस आणि तू शरणागत आलेल्या तुझ्या भक्तांना तारणारा आहेस तू त्यांची बाजू घेणारा आहे हे मात्र निश्चित आहे.पुराणामध्ये तुझी कीर्ती वाखाणलेली आहे आता त्याचा मला अनुभव आलेला आहे.आणि भक्तांचे कार्य तत्परतेणे करता यावे यासाठी तुम्ही विटेवर उभे आहात.तुमच्या हातामध्ये चक्र गदा असे अपार आयुधे आहेत आणि भक्तांना काहीही न्यून म्हणजे कमी पडले तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही लगेच धाव घेतात.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला अवतार घेण्याकरता भक्तांची भक्ती हे कारणच पुरे आहे.
अभंग क्र.270
वर्णु महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥१॥
ठायींची हे काया ठेविली चरणीं । आतां ओवाळुनि काय सांडूं ॥ध्रु.॥
नाहीं भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥२॥
मज माझें कांहीं न दिसे पाहातां । जें तुज अनंता समर्पावें ॥३॥
तुका म्हणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥४॥
अर्थ:-
देवा तुझा महिमा वर्णन करू शकेल अशी माझी वाणी समर्थ नाही आणि तुझ्या स्वरूपाचा अंतपार माझ्या वाणीला सांगता येणार नाही.देवा तुझ्या चरणांवर तर मी आधीच माझा देह ओवाळून टाकलेला आहे आता तुझ्यावर मी काय ओवाळून टाकू? देवा माझा भक्तीभाव हि असा नाही की मी तुमची सेवा करू शकेल आणि तुमच्या वरून जीव ओवाळून टाकावा तर तो मुळातच तुमचा आहे.देवा पाहिले गेलं तर माझे माझ्याकडे काहीच नाही जे तुला मी अर्पण करावे.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझे उपकार फेडण्याकरीता माझ्याकडे माझे काहीच नाही.
अभंग क्र.271
नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हें जन काय करूं ॥१॥
देहउपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ध्रु.॥
नाइकवे स्तुति वाणितां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥२॥
तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥३॥
तुका म्हणे आतां करीं माझें हित । काढावें जळत आगींतूनि ॥४॥
अर्थ:-
देवा मला कोणत्याही प्रकारचे सुख किंवा या लोकांकडून मान सन्मान मिळावा अशी इच्छा नाही पण हे लोक मला मान दिल्याशिवाय राहत नाहीत त्याला मी काय करू?हे लोक माझ्या देहाला सुख होईल असे उपचार करतात पण त्यामुळे माझे शरीर पोळते आणि कोणी मला जर मिष्टान्न खायला दिले तर ते मला विषाप्रमाणे कडू वाटते.कोणीही माझी स्तुती केली तर ती मला आहे ऐकावीशी वाटत नाही त्यामुळे माझा जीव कासावीस होतो.देवा मला तुझी प्राप्ती कशी होईल याबद्दल मला उपायसांग पण मृगजळाप्रमाणे असलेल्या या संसारात मला गुंतवून नकोस.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही माझे आता एवढेच हित करावे या त्रिविध तापाच्या अग्नीतून मला बाहेर काढावे.
अभंग क्र.272
फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणामोल ॥१॥
पायरी प्रतिमा एकचि पाषाण । परि तें महिमान वेगळेचि ॥२॥
तुका म्हणे तैसा नव्हतील परी । संतजना सरी सारिखिया ॥३॥
अर्थ:-
तलवार वस्तारा आणि विळा हे सर्वकाही लोखंडापासून तयार झालेले असतात परंतु प्रत्येकाचे गुण हे भिन्न भिन्न असल्यामुळे मोलही भिन्नभिन्न आहेत.पायरी आणि देवाची प्रतिमा ही एकाच दगडापासून बनलेली असते परंतु देवाची प्रतिमा ही पायरीपेक्षा अधिक श्रेष्ठ आणि त्याचा महिमा हि अधिक श्रेष्ठ असतो.तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच संत आणि सामान्य माणसे ही दिसण्यास जरी सारखी असली तरी संतांचा महिमा हा सामान्य माणसापेक्षा श्रेष्ठ असतो.
अभंग क्र.273
कांहींच मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक ॥१॥
नाहीं जात कोठें येत फिरोनियां । अवघेंचि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥
नाहीं मज कोणी आपुलें दुसरें । कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥२॥
नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत । आहों अखंडित जैसे तैसे ॥३॥
तुका म्हणे नांमरूप नाहीं आम्हां । वेगळा या कर्मा अकर्मासी ॥४॥
अर्थ:-
मी काहीही नाही मी कोणत्याही गावाचा नाही मी एकटाच आहे जे ठायीच्या ठायी म्हणजे सर्वत्र आहे असे ब्रम्ह ते मी आहे.मी कोठे जातही नाही आणि फिरुन परत येत नाही मी जे काही बोलतो आहे ते सर्व व्यर्थ आहे.माझे या जगतामध्ये कोणी आपले नाही कोणीही परके नाही व खरोखर पाहायला गेले तर मीही कोणाचा नाही.आम्हाला कधी जगावे किंवा मरावे लागत नाही आणि अखंड जसे आहोत तसेच राहतो.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला नांवही नाही व रूपही नाही आम्ही या कर्म अकर्मापासून वेगळे आहोत.
अभंग क्र.274
न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होतें ॥१॥
काय तुम्ही येथें नसालसें झालें । आम्हीं न देखिलें पाहिजे हें ॥ध्रु.॥
परचक्र कोठें हरीदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ॥२॥
तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणें झालें ॥३॥
अर्थ:-
हे देवा माझ्या डोळ्याने मला लोकांचे दुःख पाहवत नाही माझे चित्त त्यांच्या दुखाने दुखी होत आहे.हे देवा अरे तुम्ही येथे नाही की काय कारण तुम्ही असताना आम्हाला हे दुःख दिसले नाही पाहिजे.आहो देवा हरिदासांवर असे परचक्र येणे हे बरोबर नाही एवढेच काय जेथे हरी दास राहतात तेथे कुठल्याही प्रकारचे आक्रमण होणे हे बरोबर नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा इतके दिवस मी तुझी भक्ती करून देखील संकटकाळी तू मदतीला येत नाहीस याचा अर्थ:- माझ्या भक्तीला तू लाजविले आहेस म्हणजेच माझे जगणे ही हिनच आहे.
अभंग क्र.275
काय म्यां मानावें हरीकथेचें फळ । तरिजे सकळ जनीं ऐसें ॥१॥
उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ॥ध्रु.॥
पापाविण नाहीं पाप येत पुढें । साक्षसी रोकडें साक्ष आलें ॥२॥
तुका म्हणे जेथें वसतील दास । तेथें तुझा वास कैसा आतां ॥३॥
अर्थ:-
हे देवा हरीकीर्तन केल्याने सर्व जण तरतात असे मी मानावे का?हे देवा आमच्यावर संकट येणे म्हणजे सरळसरळ परमार्थाचा उच्छेद चालू आहे असे वाटते.पूर्व जन्मातील पाप असल्याशिवाय असे पाप पुढे येत नाही याचा प्रत्यय प्रसंगाने समोर येत आहे.तुकाराम महाराज म्हणतात जेथे तुझे भक्त राहतात तेथे तुमचा वास आहे हे तुमचे म्हणणे आम्ही खरे कसे मानावे?
अभंग क्र.276
भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना न देखवे ॥१॥
आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुम्ही दातारा नेणां ऐसें ॥ध्रु.॥
भजनीं विक्षेप तेचि पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ॥२॥
तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ॥३॥
अर्थ:-
मी आता माझ्या मरणाला भीत नाही पण परंतु या लोकांचे दुःख पाहून मला त्यांचे दुःख सहन होत नाही.व देवा आम्हा हरिदासांची अशी परंपरा आहे कि कितीही संकट आले तरीही भ्यायचे नाही हे देवा तुम्हाला हे कसे समजत नाही? भजनांमध्येविक्षेप येणे हेच खरे मरण आहे तुझ्या नामचिंतणा वाचून एक क्षणही वाया जाऊ नये.तुकाराम महाराज म्हणतात देवा मला असे निर्भय स्थान दे कि ज्या ठिकाणी तुझ्या भजनात कुठल्याही प्रकारचा विक्षेप होणार नाही कुठल्याही प्रकारचे भय राहणार नाही व आता जे संकट आले आहे त्याचे तू निवारण कर.
अभंग क्र.277
कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥१॥
आतां माझा श्रोता वक्ता तूंची देवा । करावी ते सेवा तुझीच म्या ॥ध्रु.॥
कुशळ चतुर येथें न पवती । करितील रिते तर्क मतें ॥२॥
तुका म्हणे केणें जालें एके घरीं । मज आणि हरी तुम्हां गांठी ॥३॥
अर्थ:-
देवा कोण जाणे तुझी उपासना कोणाला घडेल आणि जरी उपासना कोणाला घडलीच त्याला जरी भक्ती ज्ञानाचे वेड लागले तरी त्याला भक्ती ज्ञान सांगणारा चांगला कोण भेटेल हे कोण जाणू शकते. देवा आता तुला ज्ञान सांगणारा वक्ता मीच आणि तुझ्याकडून ज्ञान प्राप्त करून घेणारा श्रोता देखील मीच तूच माझा श्रोता आणि वक्ता आहेस आणि तुझी मी सेवा करावी हेच बरे. जगामध्ये कुशल आणि चतुर व्यक्ती श्रोता आणि वक्ता हे खूप आहेत ते भक्ती आणि ज्ञानाच्या गोष्टी ऐकण्यासाठी येथे येणार नाहीत आणि समजा जरी आले तरी आपल्या बोलण्यामध्ये काहीतरी तर्क-वितर्क काढून आपले बोलले ते मान्य करणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा हरी आपण दोघांनीही श्रवण करावे आणि एकमेकांना प्रवचन करून भक्ती व ज्ञानाच्या गोष्टी सांगावे अशा पद्धतीने हरी तुझी व माझी गाठ पडत आहे.
अभंग क्र.278
आमुचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण देखोवेखीं ॥१॥
न कळे सतत हिताचा विचार । ते ही दारोदार खाती फेरे ॥ध्रु.॥
वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याचि वाटा ॥२॥
तुका म्हणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥३॥
अर्थ:-
आमचा परमार्थ म्हणजे एक विनोद झाला आहे परंतु त्या विनोदाने या जगाचे मरण आहे आमचा पारमार्थिक भाव समजून न घेता फक्त त्याचा देखावा करणारे लोक या जगामध्ये आहेत.स्वतःच्या हिताचाविचार कशात आहे हे समजत नाही ते जन्म मृत्यूच्या दारात कायम ये-जा करत राहतील.जे लोक आमचे अनुकरण करतात ते एखाद्याला वंदन केले तर तेही त्याला वंदन करतात व एखाद्याने निंदिले तर त्यांची निंदा करतात एखादा जर त्या वाटेने पुढे गेला तर त्याच्या मागे तेही जातात.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कितीही सांगितले तरी ते लोक ऐकत नाही म्हणून ते यमदुतांच्या हाती जातात.
अभंग क्र.279
दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥१॥
विष्णुदास आम्ही न भिओ कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ध्रु.॥
उधळितां माती रविकळा मळे । हें कैसें न कळे भाग्यहीना ॥२॥
तुका म्हणे तृणें झांके हुताशन । हें तंव वचन वाउगेचि ॥३॥
अर्थ:-
हातात दिवा घेऊन अंधार शोधण्यासाठी जाणे हे अघटीत आहे कारण अंधार दिव्याला फार भितो.आम्ही विष्णू दास कधीही कळीकाळाला भिणार नाही आणि या मृगजळ रूपी प्रपंचाला कधीही भुलणार नाही.हातात माती घेऊन वर उधळली म्हणजे सूर्य मलीन होईल काय? तसेच आम्ही विष्णुदास या संसाराला भुलु काय?भक्ती न करणाऱ्या भाग्याहीनांना हे काय कळणार?तुकाराम महाराज म्हणतात गवत टाकल्यावर हुताशान म्हणजे अग्नीझाकला जाईल हे म्हणणे व्यर्थ आहे.
अभंग क्र.280
नटनाट्य अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥१॥
मांडियेला खेळ कौतुक बहुरूपा । आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥
स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥
तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ॥३॥
अर्थ:-
आम्ही जरी नट स्वरूप धारण केले तरीही आमची आत्मस्थिती बदलत नाही.आम्ही बहुरुप्याचे जरी सोंग घेतले असले तरी आम्ही आमचे खरे स्वरूप जाणतो.स्फटिकाचा दगड रंगाच्या संगतीने अनेक प्रकारचे रंग दाखवितो तो कोणताही रंग धारण करत नाही कारण तो कोणत्याही रंगाचा नसतो.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आत्म बोधाने इतर लोकांपेक्षा वेगळे राहून निश्चिंतपणे संसार करू संसाररूपी खेळ खेळू.
अभंग क्र.281
तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥
तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ध्रु.॥
नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु तेचि घडी चांडाळ हे ॥२॥
कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥३॥
तुका म्हणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥४॥
अर्थ:-
हे हरी तुझ्यावाचून माझी वाणी जर इतरांची स्तुती करील तर माझी जिव्हा झडो.देवा माझ्या चित्ताला जर तुझ्या वाचून दुसरे काही आवडत असेल तर माझे मस्तक फूठून जावो.तुझ्या वाचून जर माझ्या या डोळ्यांनी दुसऱ्या कोणाला आवडीने पाहिल तर त्याचवेळेला माझे चांडाळ डोळे आंधळे होवो.माझ्या कानांनी तुझी कथा श्रवण केले नाही तर मग त्या कानांचा काय उपयोग आहे?तुकाराम महाराज म्हणतात तुला मी एक क्षणभर जरी विसरलो तरीही देवा तश्या जगण्याला काय अर्थ:- आहे.
अभंग क्र.282
भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥१॥
करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुंस । खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥
निंबाचिया झाडा साखरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ॥२॥
तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥३॥
अर्थ:-
ज्याच्या मनात खरा भाव असेल तर त्याला दगडही तारू शकेल पण दुर्जनाला वळविणे सज्जनाला शक्य नाही.कुत्र्याचे शेपूट कितीही सरळ केले तरीही ते सरळ होत नाही आणि खापरा पुढे परिस काय करू शकेल.कडू लिंबाच्या झाडाला जरी साखरेचे आळे केले तरी जसे बीज असेल तसेच फळ येणार.तुकाराम महाराज म्हणतात एक वेळेस वज्राचे ही तुकडे करता येतील पण दुर्जनांचे मन अतिशय कठीण आहे.
अभंग क्र.283
इच्छावे ते जवळी आलें । काय बोलें कारण ॥१॥
नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ध्रु.॥
मुकियाचे परी जीवीं । साकर जेवों खादली ॥२॥
तुका म्हणे काय बोलें । आतां भलें मौन्यची ॥३॥
अर्थ:-
ज्याची इच्छा होती तेच जवळ आले आहे मग आता बोलायचे काही कारणच राहिले नाही.हरी नामरूपी गाठ पडली आहे त्यामुळे आता काही मिळवायचे किंवा कमवायचे या गोष्टी सगळ्या सरल्या आहेत.एखाद्या मुक्या व्यक्तीने साखर खाल्ली तर त्या साखरेची गोडी त्याला सांगता येणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाच्या सानिध्याने सर्व सुख मिळाले आहे आता मौन धारण करणे बरे आहे.
अभंग क्र.284
साधनें तरी हींच दोन्ही । जरी कोणी साधील ॥१॥
परद्रव्य परनारी । याचा धरीं विटाळ ॥ध्रु.॥
देवभाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥२॥
तुका म्हणे तें शरीर । घर भांडार देवाचें ॥३॥
अर्थ:-
जर परमार्थात यश प्राप्त करून घ्यायचे असेल तर एवढीच दोन साधने करा ती म्हणजे परद्रव्यआणि परनारी यांचा तु विटाळ कर.ही दोन साधने केले तर देव भाग्य हे दोन्ही तुझ्या घरी तसेच सर्व प्रकारची संपत्ती तुझ्या घरी येईल.तुकाराम महाराज म्हणतात ही दोन साधने करणार्याचे शरीर म्हणजे देवाचे घर आणि संपत्तीचे संपूर्ण देवाचे भांडार होय.
अभंग क्र.285
आम्हासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥१॥
मोहें धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ध्रु.॥
कोठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ॥२॥
सुख ठेवी आम्हासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥३॥
आम्हां घाली पाठीकडे । पुढें कळिकाळाशीं भिडे ॥४॥
तुका म्हणे कृपानीधी । आम्हां उतरीं नांवेमधीं ॥५॥
अर्थ:-
मत्स्य कूर्म वराह हे देवाचे अवतार आम्हां भक्तांसाठी देवाने धारण केले आहे.मोहाने या देवाला हाका मारली की तो लगेच धावत येतो आणि प्रितीचा पान्हा सोडतो.कोठे पाहिले तर दिसत नाही पण भक्तांवर संकट आले की तो लगेच अवचितपणे धावं घेऊन भक्तांचे संकट दूर करतो.आमच्यासाठी सुख ठेवतो आणि तो मात्र दुखाचे घोट घेतो.तो आम्हाला पाठीशी येतो आणि स्वतः मात्र कळीकाळाशी लढतो.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला तो कृपानिधी नामरूपी नौकेत बसून भवसागरातून तारून नेतो.
अभंग क्र.286
रवि रश्मीकळा । नये काढितां निराळा ॥१॥
तैसा आम्हां जाला भाव । अंगीं जडोनि ठेला देव ॥ध्रु.॥
गोडी साकरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥२॥
तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥३॥
अर्थ:-
जसे सूर्यापासून सूर्याची किरणे वेगळी करता येत नाही.तसेच आमचा देवाविषयी असलेला भाव आहे त्याचप्रमाणे देव आमच्या सर्वांगात वसलेला आहे.साखर आणि गूळ हे दोन्ही एकच आहेत त्यांना वेगवेगळे करता येईल काय?तुकाराम महाराज म्हणतात उत्पन्न झालेला शब्द जसा आकाशात विलय पावतो तसेच देव आणि आमचे आहे.
अभंग क्र.287
थोडें परी निरें । अविट तें घ्यावें खरें ॥१॥
घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥ध्रु.॥
चित्त ठेवीं ग्वाही । उपचारें चाड नाहीं ॥२॥
आपलें तें हित फार । तुका म्हणे खरें सार ॥३॥
अर्थ:-
आपणास व्यवहारात जे काही हवे असेल तेवढेच घ्यावे जे अवीट आहे जे घ्यावे खरे आहे ते घ्यावे.असे काही घ्यावे त्यापासून नुकसान होणार नाही आणि एका बीजापासून अनेकांची उत्पत्ती होईल असे घ्यावे.काहीही घेताना निरीक्षण करून आपल्या चित्ताला साक्षी ठेवून घ्यावे तेवढेच खूप आहे.तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मध्ये आपले हित आहे तेच घ्यावे तेच खरे आणि ते चांगले.
अभंग क्र.288
अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध ॥१॥
म्हणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ध्रु.॥
ऊंस कांदा एक आळां । स्वाद गोडीचा निराळा ॥२॥
तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥३॥
अर्थ:-
सगळे देव साध्य करता येतील पण जर नीट पाहिले तर आपलेच अवगुण आपल्याला आडवे येतात.त्यामुळे कोणीही कोणाची बरोबरी करू शकत नाही ते एकमेकापासून वेगळे वेगळे राहतात.ऊस आणि कांदा एकाच आळीत लावले तरी त्या दोघांची चव वेगळी आहे.तुकाराम महाराज म्हणतात विष आणि अमृत हे दोन्ही जरी पाण्यापासून बनले असले तरीही त्या दोघांचे व्यवहार भिन्न आहेत.
अभंग क्र.289
शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दुःख ॥१॥
म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥
खवळलिया कामक्रोधीं । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥
तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेआप ॥३॥
अर्थ:-
चित्तात शांती असेल तर सुख प्राप्त होते बाकी सर्वत्र दुखच आहे.म्हणून तुम्ही चित्तात शांती धारण करा मग तुम्ही भवसागर तरून जाताल.चित्तात काम क्रोध जर खवळले तर शरीरात व्याधी निर्माण होतात.तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही चित्तात शांती धारण करा मग तुमचे त्रिविध ताप आपोआप नाहीसे होतील.
अभंग क्र.290
गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥
आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥
उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥
हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥
अर्थ:-
जसा गुळामध्ये सर्वत्र गोडपणा असतो तसाच देव आमच्यासाठी सर्वत्र झाला आहे.आता मी देवाचे भजन कसे करु कारण देवच माझ्या संपूर्ण शरीरामध्ये व्यापक आहे आत आणि बाहेर तोच आहे.पाण्याहून वेगळे पाण्याचे उठणारे तरंग नसतात.तुकाराम महाराज म्हणतात तसेच सोने आणि अलंकार हे जरी वेगळे वेगळे आहेत पण आहेत ते एकच तसेच देव आणि भक्त हे जरी वेगवेगळे असले तरी ते एकच आहेत.
अभंग क्र.291
परमेष्ठिपदा । तुच्छ मानिती सर्वदा ॥१॥
हेंचि ज्यांचें धन । सदा हरीचें स्मरण ॥ध्रु.॥
इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥२॥
सार्वभौमराज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ॥३॥
पाताळींचें आधिपत्य । ते तों मानिती विपत्य ॥४॥
योगसिद्धिसार । ज्यासि वाटे तें असार ॥५॥
मोक्षायेवढें सुख । सुख नव्हेचि तें दुःख ॥६॥
तुका म्हणे हरीविण । त्यासि अवघा वाटे सिण ॥७॥
अर्थ:-
परमपदाला देखील हरिभक्त तुच्छ मानतात.त्यांचे धन म्हणजे सदा सर्वकाळ हरीचे चिंतन करणे होय.त्यांना इंद्रपद म्हणजे भोग नाही तर भवरोग वाटते.सार्वभौम राज्य जरी असले तरी त्यांना त्याच्याशी काहीही कर्तव्य नसते.पाताळातील अधिपत्य म्हणजे अंगावर आपत्ती ओढून घेणे असे ते मानतात.योग केल्यावर त्यात सिद्धी प्राप्त होतात त्या सिद्धी तर भक्तांना असार वाटतात.मोक्षा सारखे सुख देखील त्यांना दुख वाटते.तुकाराम महाराज म्हणतात हरी वाचून त्यांना सर्व शीण वाटतो.
अभंग क्र.292
मोहीऱ्याच्या संगें । सुत नव्हे आंगीजोगें ॥१॥
नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ध्रु.॥
स्वामीचिया अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥२॥
तुका म्हणे खोडी । देवमणी नेदिती दडी ॥३॥
अर्थ:-
मोहरा नावाच्या मण्याला दोरा सुत गुंडाळले तर ते अग्नीत जरी टाकले तरी ते जळत नाही.नाहीतर सुताला जर अग्नीत टाकले तर ते जळणारच हे सांगायला कोणाची साक्ष जरुरी नाही.तसेच त्या मण्याप्रमाणे माझा स्वामी म्हणजे विठ्ठल परमात्मा याचा माझ्याशी संग असला कि मला कसलीही भीती नाही.तुकाराम महाराज म्हणतात घोड्याच्या गळ्यात जर देव मणी घातला तर तो घोडा कितीही खट्याळ असला तरी त्याचा तो दोष लपून जातो.
अभंग क्र.293
मजसवें नको चेष्टा । नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥१॥
बैस सांडोनि दिमाख । जाय काळें करीं मुख ॥ध्रु.॥
येथें न सरे चार । हीण आणीक व्यापार ॥२॥
तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥३॥
अर्थ:-
भजनात व्यत्यय आणणाऱ्या दुर्जनाला महाराज म्हणतात अरे तु माझी चेष्टा करू नकोस मी काही साळी किंवा कोष्टी सामान्य नाही.तुझ्या मोठेपणाचा दिमाख सोडून इथे उगाच बस नाहीतर येथून चालता हो तुझे तोंड काळे कर.तुझा हा व्यापार वाईट वागणे हे माझे जवळ चालायचे नाही.तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्हाला सरस काय आणि निरास काय हे चांगले माहीत आहे.
अभंग क्र.294
भाव देवाचें उचित । भाव तोचि भगवंत ॥१॥
धन्यधन्य शुद्ध जाती । संदेह कैंचा तेथें चित्तीं ॥ध्रु.॥
बहुत बराडी । देवा वरी आवडी ॥२॥
तुका म्हणे हें रोकडें । लाभ अधिकारी चोखडे ॥३॥
अर्थ:-
भगवंत भक्तीमध्ये भावच सर्वश्रेष्ठ आहे किंबहुना भक्तीभावच देव आहे.शुद्ध भाव असणारे भक्त खरोखर धन्य धन्य आहेत कारण त्यांच्या मनात भगवंताविषयी संदेह कसा असू शकतो.जे खरे भक्त असतात ते वाच्या प्रेमा विषयी हावरे असतात त्यांचे देवांवर अतिशय प्रेम असते.तुकाराम महाराज म्हणतात असेच भक्त भगवंत प्राप्तीचे खरे अधिकारी आहेत हे उघड आहे.
अभंग क्र.295
गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे संकल्प ॥१॥
कठिण योगाहुनि क्षेम । ओकलिया होतो श्रम ॥ध्रु.॥
पावलें मरें सिवेपाशीं । क्लेश उरतती क्लेशीं ॥२॥
तुका म्हणे बहु आणी । कठिण निघालिया रणीं ॥३॥
अर्थ:-
मान सन्मान हा त्यावेळी गौरवा पुरता असतो पण खरे फळ म्हणजे सत्यसंकल्प करणे म्हणजे हरी नाम घेणे यातच आहे.प्राप्तीपेक्षा प्राप्त झालेली कोणतीही गोष्ट असेल तर त्याचे रक्षण करणे अवघड आहे जसे एखाद्याने सुग्रास जेवण केले पण त्याला ते पचन न होता वांती झाली तर ते व्यर्थ श्रम होय.एखादा मनुष्य वनातून जात असताना त्याच्या मागेच चोर लागले म्हणून धावत सुटतो आणि गावाच्या शिवा जवळ जाऊन मरण पावतो म्हणजे त्याने सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला पण त्याच्या पदरात शेवटी श्रममिळून तो शेवटी मरण पावतो.तुकाराम महाराज म्हणतात शूर पणाचा आव आणणारे लोक हे प्रत्यक्ष रणांगणात गेले तर त्यांना कठीण वाटते.
अभंग क्र.296
न संडी अवगुण । वर्में मानीतसे सिण ॥१॥
भोग देतां करिती काई । फुटतां यमदंडें डोई ॥ध्रु.॥
पापपुण्यझाडा । देतां तेथें मोठी पीडा ॥२॥
तुका म्हणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥३॥
अर्थ:-
दुष्ट माणसे कधी ही आपला अवगुण टाकीत नाहीत पण त्यांचा दोष त्यांना दाखवला कि मग त्यांना राग येतो.साधे त्यांनां दोष जरी सांगितले तरी त्यांना सहन होत नाही पण पुढे मात्र यमाच्या स्वाधीन झाल्यावर डोक्यात यम दंड पडल्यावर हे काय करणार आहेत.यमलोकात पाप-पुण्याचा झाडा करताना फार मोठे दुख भोगावे लागते.तुकाराम महाराज म्हणतात मी अशा लोकांना बोललोतर हे कष्टी होतात पण हे विठ्ठला मी हे त्यांच्या भल्या करतात बोलतो आहे.
अभंग क्र.297
पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥१॥
अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ध्रु.॥
आइताच पाक । संयोगाचा सकळिक ॥२॥
तुका म्हणे धणी । सीमा राहिली होऊनी ॥३॥
अर्थ:-
मीआता पर्यंत कोणाला जर त्रास दिला असेल तर त्याचा आता नाश होईल ,ते अशा प्रकारे म्हणजे मला जे त्रास होणार आहेत ते त्रास सर्व तो विठ्ठलच भोगत आहे कारण तो अवीट आहे.त्या पांडुरंग संग केल्यामुळे आमचा सर्वांशी संबंध आला आहे व त्या योगाने प्रेमसंबंधाचा स्वयंपाक मला खाण्यास मिळाला आहे.तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे मला मिळालेल्या तृप्तीची काही सीमाच नाही.
हनुमंताची आरती | Aarti of Hanuman
अभंग क्र.298
दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख ॥१॥
सांडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ध्रु.॥
सिदोरी तें पापपुण्य । सवेंसिण भिकेचा ॥२॥
तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥३॥
अर्थ:-
सर्व लोक या नारायणाच्या ठिकाणी विन्मुख झाले आहेत त्यामुळे ते दुर्बळ आहेत.या मृत्यू लोकांमध्ये स्वतःचे स्वहित न जाणता मरण पावतात व नंतर यम दंडास पात्र होतात.नंतरच त्यांच्याबरोबर पापपुण्याची शिदोरी असल्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या योनीत फिरण्याचे दुःख प्राप्त होते.तुकाराम महाराज म्हणतात खोट्याचा प्रवाह या जगामध्ये कसा वाहत आहेत ते पहा.
अभंग क्र.299
वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥१॥
जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ध्रु.॥
काळा नाहीं वाव । परिश्रमा कोठें ठाव ॥२॥
तुका म्हणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥३॥
अर्थ:-
मला हरिप्राप्ती झाली आहे त्यामुळे मी आनंदाने मोठ्या गजराने नगारे वाजवीत आहे.मी अहंकाराला जिंकले आहे व त्या अहंकाराचा डोक्याची पायरी केले आहे व ती चढुन मी वर गेलो आहे.या ठिकाणी जर काळालाच वाव नाही तर जन्ममरणाच्या परिश्रमाला कोठे ठाव असणार आहे?तुकाराम महाराज म्हणतात जर अहंकारच राहिला नाही मग आता आम्हाला वैकुंठाला जाण्यास कसलीही भीती नाही.
अभंग क्र.300
झाड कल्पतरू । न करी याचकीं आव्हेरू ॥१॥
तुम्ही सर्वी सर्वोत्तम । ऐसे विसरतां धर्म ॥ध्रु.॥
परिसा तुमचें देणें । तो त्या जागे अभिमानें ॥२॥
गाऱ्हाण्यानें तुका । गर्जे मारुनियां हांका ॥३॥
अर्थ:-
कल्पतरू हे झाड असून ते कोणत्याही याचकाचा कधीही अव्हेर करीत नाही.आणि देवा तुम्ही तर सर्वोत्तम असूनही याचिका ची इच्छा पूर्ण करत नाहीत याला काय म्हणावे? लोखंडाला सोने बनवणे हे परिसाचे अंगी तुम्ही गुण दिला आहे तो बिचारा त्याचे काम करतो आहे तेही न विसरता व अभिमानाने करतो.तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्यापुढे गाह्रणे मोठ्या आवाजात गर्जुन पुढे मांडत आहे.