Sanskrit Shlok- बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक १७-३८) – शंभू राजे
- (अध्याय १) श्लोक क्र १७
- (अध्याय १) श्लोक क्र १८
- श्लोक क्र १९
- (अध्याय १) श्लोक क्र २२
- श्लोक क्र २८
- अध्याय १ श्लोक क्र ३७
- श्लोक क्र ३८
(अध्याय १) श्लोक क्र १७ (Sanskrit Shlok)
विविच्य संतः कृतिमस्मदीयां गृह्णन्तु सच्चासदसच्च त्यजन्तु।
क्षीरावियुक्तं परिहृत्य नीरं क्षीरं भजन्ते खलु राजहंसाः ।।
(संभाजी महाराज या प्रस्तावनेत म्हणतात,) आमच्या या ग्रंथाचे परिशीलन करून जाणत्या लोकांनी म्हणजेच विद्वज्जनांनी त्यातील सत् अंश स्वीकारावा आणि असत् अंशाचा त्याग करावा. राजहंस जसे दूध आणि पाणी एकत्र केले असेल तर त्यातील पाणी वेगळे करून दूध तेवढे ग्रहण करतो त्याप्रमाणे सर्व विद्वाजनांना संभाजी महाराज सांगत आहेत की नीर-क्षीर विवेक न्यायाला अनुसरून या ग्रंथाचे अध्ययन करावे.
(अध्याय १) श्लोक क्र १८ (Sanskrit Shlok)
भवान्याः स्तुतिः
(निर्विघ्नसमाप्तये श्रीभवान्याः स्तुतिं स्वकृतामाह )
या बुधभूषणं ग्रंथाची रचना निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी यासाठी आम्ही (संभाजी महाराज) श्रीभवानीमातेचे स्तवन करीत आहोत.
स्फटिकरचितपीठे श्यामलाङगी भवानी।
मरुणचरणकांतिं भासयन्तीं स्वरूपम्।
नखमणिगुणतयुक्ता अडगुलीर्भासयन्ती।
विजितसितगरुद्भिर्नूपुरैर्गुल्फयुग्मम् ।।
भवानी मातेची ही स्तुती म्हणजे संभाजी महाराजांच्या उत्तुंग प्रतिभेचा विलक्षण अविष्कार आहे.
अर्थ-श्यामलवर्णीय श्रीभवानीदेवी आपल्या स्फटिकाने बनविलेल्या पादपीठावर आपले लालसर चरण असलेले स्वरूप प्रकट केले आहे. नखरूपी मणि आणि रत्नांच्या गुणांनी युक्त असलेल्या तिच्या पायाच्या बोटांनी, अत्यंत पांढरेशुभ्र पंख असणाऱ्या हंस पक्ष्यांना सुद्धा पराभूत केले आहे. या दैदीप्यमान अशा नुपूरांनी तिच्या दोन्ही पायांचे घोटे प्रकाशित झाला आहेत.
श्लोक क्र १९ (Sanskrit Shlok)
पद्मरागारुणश्रीकशिरः पुष्पेण शोभिताम् ।
इतशीतांशुतेजस्कमुक्ताचंद्रोपशोभिताम् ।।
अर्थ-पद्मराग मण्याच्या कांतीप्रमाणे लालसर रंग असलेली तांबूस केशरपुष्पे तिने (श्रीभवानीदेवीने) आपल्या विपुल केशसंभारात खोचल्यामुळे ती (श्रीभवानीदेवी) अत्यंत सुंदर दिसत आहे. चंद्राची कांती ज्यांनी हरण केली आहे अशा त्या मोती आणि मण्यांमुळे तसेच श्रीमहादेवांच्या मस्तकी विराजमान असणाऱ्या चंद्रामुळे ती श्रीभवानीदेवी शोभून दिसते आहे.
(अध्याय १) श्लोक क्र २२ (Sanskrit Shlok)
विलसद्भालतिलकां मुक्तागुणसमान्विताम् ।
विभासद्रत्नसंयुक्तां कर्णभूषणशोभिताम् ।।
बुधभूषण ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील श्लोक क्र १८ ते २८ हे अकरा श्लोक म्हणजे संभाजी महाराजांनी रचलेले भवानी स्तोत्र आहे. या अकरा श्लोकांमधून शंभूराजांनी श्रीभवानीमातेची मनोभावे स्तुती केलेली आहे. यातून त्यांच्या मनातील भवानीमातेविषयी असलेली दृढ भक्ती प्रतीत होते.
वर दिलेल्या श्लोकांत संभाजी महाराज भवानीमातेच्या अत्यंत मोहक रूपाचे वर्णन करत आहेत.
अर्थ-तिच्या (म्हणजेच श्रीभवानीमातेच्या) कपाळावरील रक्तिम (लालबुंद) कुंकुमतिलक शोभून दिसत आहे. या भवानीने मोत्यांची माळ गळ्यात परिधान केलेली आहे. तिचे शरीर चमचमणाऱ्या आणि तेजाने झळाळणाऱ्या रत्नांनी अलंकृत झालेले आहे. तिच्या कानाची पाळी कर्णभूषणांनी सुशोभित झालेली आहेत.
श्लोक क्र २८ (Sanskrit Shlok)
इति चन्द्रचूडरमणीस्तुतिमेणा-
धरणीशशम्भुरचितामतिभक्त्या ।
मनुजः पठेदनुदिनं स किलोच्चै-
भुवि भारतीजलधिजानिलयं स्यात् ।।
अर्थ-चंद्रचूड म्हणजे शिव. चंद्रचूडरमणी म्हणजे शिवपत्नी म्हणजेच श्रीभवानी. या भवानीचे हे स्तोत्र या
धरणीचे भूपाल (म्हणजे छत्रपती) श्रीशंभुराजे यांनी टोकाच्या भक्तीभावनेने लिहिले आहे. जो कोणी हे
श्रीभवानीस्तोत्र नित्यनेमाने (प्रतिदिन) पठण करील, त्याला जलधि-जा म्हणजेच समुद्राची कन्या अर्थात
श्रीलक्ष्मीदेवी आणि श्रीभारती म्हणजेच सरस्वतीदेवी या दोघींच्या दरबारात (निलय) उच्च स्थान प्राप्त होईल.
शंभुराजांनी या श्लोकांत माता श्रीसरस्वतीदेवींना भारती या नावाने संबोधले आहे. भा म्हणचे प्रकाश. अर्थातच
ज्ञानाचा प्रकाश. भारती म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशात आकंठ बुडालेली. आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने सर्व भूमंडळ
तेजाने उजळून टाकणारी देवी म्हणजे भारती अर्थात सरस्वती.
हा श्लोक म्हणजे धर्मवीर शंभुराजांनी लिहिलेल्या श्रीभवानीस्तुतीची फलश्रुतीच आहे. स्तोत्राच्या अखेरच्या श्लोकांत फलश्रुती लिहिण्याचा प्रघात हिन्दु धर्मातील स्तोत्रवाङमयात नेहमी आढळतो. इथेही त्याचेच प्रत्यंतर येते.
अध्याय १ श्लोक क्र ३७ (Sanskrit Shlok)
नवनीलमेघरुचिरः पुरः पुमान्।
अवनीमवाप्य धृतगोपविग्रहः ।।
नवनीतकीर्तिरमरैरपि स्वयं।
नवनीतभिक्षुरधुना स चिन्त्यते ।।
या श्लोकात धर्मवीर श्रीसंभाजी महाराजांनी भगवान श्रीकृष्णांची स्तुती केलेली आहे. अर्थ-ते सर्वश्रेष्ठ पुरुष (श्रीकृष्ण) नव्याने आकाशात आलेल्या निळ्या मेघाप्रमाणे (कृष्णवर्ण, नवनील) शोभून दिसतात. पृथ्वीवर येऊन त्यांनी गोपालाचे (गायी पाळणाऱ्याचे) रूप धारण केलेले आहे. त्यांची स्वतःची ख्याती नवनीताप्रमाणे नवनीत म्हणजे लोणी, लोण्याप्रमाणे स्निग्ध, शुभ्र आणि शुद्ध अशी कीर्ति) सर्वत्र आणि चिरंतन पसरलेली आहे. या लोणी मागणाऱ्याचे (म्हणजेच श्रीकृष्णाचे) चिंतन तर देव सुद्धा करतात.
श्लोक क्र ३८ (Sanskrit Shlok)
अतिविपुलं कुचयुगलं रहसि करैरामृशन्मुहुर्लक्ष्म्या।
तदपि हृतं निजहृदयं जगति हरिर्मृगयमाण इव।।
हा श्लोक भगवान श्रीविष्णूंच्या जयजयकार करण्यासाठी लिहिला आहे.
अर्थ-आपले हृदय चोरीला गेलेले आहे, लक्ष्मीमातेच्याच ठायीं ते आहे आणि आपण त्याचा शोध घेत आहोत अशा अविर्भावात श्रीलक्ष्मीमातेकडे त्याचा शोध घेण्यासाठी आलेल्या श्रीविष्णुदेवांचा जयजयकार असो, ते सदैव विजयी होवोत.
या श्लोकांत हरि हा शब्द विष्णू या अर्थाने वापरला आहे. हरि या शब्दाचा आणखी एक अर्थ सिंह असाही आहे. एका शब्दाला अनेक अर्थ आणि अनेक अर्थाचा एकच शब्द हे संस्कृत भाषेचे वैशिष्ठ्य आहे.
महाराष्ट्रातील ५ धबधबे | 5 waterfalls in maharashtra | summer location 2024