बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक ५-९) – शंभू राजे- Sanskrit Shlok
श्लोक क्र ५
या अवेक्षणचकोर चंद्रिका शाम्भवी निजजनस्य पालिका।
या तुषारगिरिराजकन्यका सा ममास्तु शुभकालमानिका।।
या श्लोकात माता पार्वती देवींची स्तुती केली आहे.
शंकरांचा नेत्ररूपी चंद्राच्या चांदण्यामुळे जिच्या नेत्ररूपी चकोराला आनंद मिळतो, जी शिवपत्नी असून सर्व भक्तगणांचे रक्षण करते, जी हिमालयाची म्हणजेच पर्वतराजाची कन्या आहे ती श्रीपार्वतीदेवी माझ्यासाठी कल्याणाची, शुभकाळाची मालिकाच बनून राहो (म्हणजेच श्रीपार्वतीमातेची कृपा सदैव माझ्यावर राहो).
या सर्व श्लोकांतून संभाजी महाराजांच्या ठायीं ईश्वराच्या प्रति दृढ श्रद्धा वसत होती हे प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्रातील सर्वच संतांनी अगदी अशाच प्रकारे त्यांच्या ग्रंथांच्या प्रारंभी भगवंताचे आशीर्वाद घेतलेले आहेत.
श्लोक क्र ६
सर्वदेवमयीमीशां नौमि भूषासमान्विताम्।
यस्याः कटाक्षमावेण जायन्ते विबुधा नरा ।।
अर्थ-जिच्या केवळ नेत्रकटाक्षानेच माणसे बुद्धिमान (सुज) होतात अशा सर्व देवतांमध्ये स्थित असणाऱ्या आणि विविध अलंकारांनी विभूषित अशा शक्तीस्वरूप दुर्गेला म्हणजेच श्रीशिवपत्नी ईशादेवींना) मी म्हणजेच छत्रपती श्रीशंभूराजे) वंदन करतो.
श्लोक क्र ७
ओसनेवंशजस्तुति भूशबलान्वयसिन्धुसुधाकरः प्रथितकीर्तिस्दारपराक्रमः।
अभवदर्थकलासु विशारदो जगति शाहनृपा शितिवासवः ।।
या श्लोकात संभाजी महाराजांनी आपल्या कुळाचे आणि पूर्वजांच्या पराक्रमाचे वर्णन केलेले आहे. ग्रंथकर्त्याने आपल्या कुळाचा आणि पूर्वजांचा परिचय ग्रंथाच्या आरंभी करण्याची पद्धतच आहे. त्याला अनुसरूनच संभाजी महाराजांनी या श्लोकात आपल्या भोसले घराण्याच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे.
अत्यंत सामर्थ्यवान आणि सेनापतित्वाचा वारसा लाभलेल्या भोसले घराण्यात महापराक्रमी असे शहाजी महाराज होऊन गेले. शहाजी महाराज हे जणू पृथ्वीवरील इंद्रच होते. त्यांचा पराक्रम, कीर्ति आणि उदारता सर्वत्र विख्यात झालेली होती. अर्थसंपादन आणि राजनीति यांसह ते अनेक कलांमध्ये पारंगत बनले होते.
श्लोक क्र ८
येनाकर्णविकृष्टकार्मुकचनत्कांडावनिकर्तित- प्रत्यर्थिक्षितिपानमौलिनिवडैरभ्यर्षि विश्वंभरा। यस्थानेकवसुंधरापरिवृद्धप्रोतुंगयुडामणे पुत्रत्वं समुपागतः शिव इति ख्यातः पुरणो विभु ।।
आकर्ण (म्हणजे कानापर्यंत) ताणलेल्या धनुष्यातून श्रीशहाजी महाराज हे बाणांचा वर्षाव करीत असत. शत्रुराजांच्या कापलेल्या मुंडक्यांच्या राशींनी पृथ्वीची पूजा केली होती. पृथ्वीवर राज्य केलेल्या अनेक राजांचे मुकुटमणी म्हणून शहाजीमहाराज शोभत होते. अशा शहाजीमहाराजांच्या पोटी, सर्वव्यापी परमेश्वराचे अवतार भासणारे असे महाकीर्तिमान पुत्र जन्माला आले. ते शिवाजी या नावाने जगात कीर्तिस प्राप्त झाले.
श्लोक क्र ९
कलिकानभुजंगावलीढं निखिलं धर्ममवेश्य विक्लवं यः।
जगतः पतिरंशतोवतापो (तीर्ण) स शिवच्छरपतिर्जयत्यजेयः ।।
या श्लोकात संभाजी महाराजांनी आपले वडीलांची म्हणजेच शिवाजी महाराजांची स्तुती केली आहे.
या पृथ्वीवर धर्माला कालिकालरूपी सर्पाने ग्रासलेले आहे. हे पाहून अत्यंत व्याकुळ झालेल्या जगदीश्वराने (म्हणजेच भगवान विष्णूने) पृथ्वीवर अवतार घेतला. तो अवतार म्हणजेच अजिंक्य असे श्रीशिवछत्रपती सदैव विजयी होवोत.
Pingback: Sanskrit Shlok-बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक ४) - शंभू राजे - संस्कृत श्लोक
Pingback: Sanskrit Shlok- बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक १०-१६) – शंभू राजे - संस्कृत श्लोक