Sanskrit Shlok- बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक १०-१६) – शंभू राजे

श्लोक क्र १० (Sanskrit Shlok)

येन क्षोणितले कलावविकले बुद्धावतारं गते।

गोपालेखिलवर्णधर्मनिचये म्लेंच्छे समासादिते।

 भूयस्तत्परिपालनाय सकलांजित्वा सुरद्वेषिणाः

 स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णाः क्रमात्।।

या अवनीवर कलियुग पूर्णतः अवतरले होते. बुद्धावतार समाप्त झाला होता. सर्व धर्माचा स्वामी असणारे भगवान श्रीकृष्णांनी देखील त्यांचा अवतार संपवला होता. म्लेंच्छानी सर्वत्र काहूर माजवले होते. अशा भीषण परिस्थितीमध्ये देवाधर्माचा द्वेष करणाऱ्या सर्व शत्रूना जिंकून पृथ्वीवर पुन्हा धर्माचे रक्षण करण्याच्या हेतूने त्यांनी (म्हणजे श्रीशिवछत्रपतींनी) विद्वज्जनांसह सर्व लोकांना आपापल्या कर्तव्यपूर्तीच्या मार्गाला लावले.

शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात धर्मरक्षणाचे महान कार्य केले असे खुद्द त्यांचेच सुपुत्र श्रीशंभूराजे आपल्या बुधभूषण या ग्रंथात लिहितात.

श्लोक क्र ११ (Sanskrit Shlok)

आकर्णाटकदेशतो गिरिवरे सह्योपसये परै-

दुर्गाणि क्षितिपालनाय नृपतेर्यो बागलाणावधि।

 आकृष्णातटमासमुद्रमभितः कृत्वा कृती दुर्गमे

दुर्गे रायरिसंज्ञकेविजयते भूमीभृतामग्रणीः ।।

कर्नाटक देशापासून ते बागलाण देशापर्यंत पसरलेल्या सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगांमध्ये शत्रूना जिंकायला अभेद्य असे अनेक दुर्ग त्यांनी (शिवाजी महाराजांनी) बांधले. पृथ्वीचे रक्षण करणे हाच यामागील उ‌द्देश होता. त्यांनी कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्रापर्यंत अनेक जलदुर्ग देखील बांधले. सदैव विजयी होणारे आणि अनेक राज्यांमध्ये अग्रेसर असणारे असे छत्रपती शिवाजी महाराज रायरीच्या गडावर (रायगडावर) राहिले.

श्लोक क्र १२ (Sanskrit Shlok)

आपूर्वाचलपश्चिमाम्बुधिमथाप्यासेतुशीताचलं

निर्जित्यावनिमंडलं च करदीकृत्याखिलांभूमिपान्।

 श्रीतं धर्ममवाप्य स‌द्भिरुदितं राजाभिषेके परं

छत्रा‌यैर्नृपलक्षणैरनुदिनं सिंहासने राजते ।।

पूर्वेकडील पर्वतांपासून ते पश्चिमेकडच्या समुद्रापर्यंत, तसेच रामेश्वरच्या सेतूपासून ते हिमालयापर्यंत असलेल्या अनेक राजांना त्यांनी (शिवाजी महाराजांनी) जिंकले. या सर्व राजांकडून त्यांनी खंडणी घेतली. सज्जनांनी घालून दिलेल्या श्रौत (श्रुति म्हणजे वेद… अर्थात श्रौत म्हणजे वैदिक) धर्माचा अवलंब करून शिवाजी महाराजांनी स्वतःचा राजाभिषेक करवून घेतला. छत्र-चामरांकित सुवर्ण सिंहासनावर ते प्रतिदिन शोभून दिसू लागले.

हे दोन्ही श्लोक संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या म्हणजेच शिवाजी महाराजांच्या स्तुतिपर लिहिले आहेत. या श्लोकात शिवाजी महाराज हे वेदप्रणित हिंदू धर्माचा अवलंब करत होते असे स्पष्ट प्रतिपादन संभाजीमहाराजांनी केले आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःचा राजाभिषेक देखील वैदिक पद्धतीने केला हे सुद्धा यातून स्पष्ट होते. तसेच बुधभूषण हा ग्रंथ राजाभिषेकाच्या नंतर लिहिला गेला आहे हे सुद्धा या श्लोकाद्वारे सिद्ध होते. राजाभिषेक समयी संभाजी महाराजांचे वय सोळा वर्षे होते.

श्लोक क्र १३ (Sanskrit Shlok)

नानादेशसमागतान् द्विजवरान्येनाभिषेकोत्सवे।

संतर्ज्यातुलतोलितैर्बहुधनैर्वस्त्रैर्गजैर्वाजिभिः

कीर्तिः सर्वदिगंतरेषु जयिना विस्तारिता भूभृता ।।

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राजाभिषेक समयीं वेगवेगळ्या अनेक देशांतून (प्रांतांतून) जे विद्वान लोक आलेले होते त्यांना वजन, माप अथवा मोजदाद न करताच विपुल धन देऊन, तसेच वस्त्रे, हत्ती, घोडे यांचेही दान करून श्रीशिवछत्रपतींनी संतुष्ट केले. चंद्रबिंबापासून विमल आणि शुभ अशा चांदण्याचा प्रसार सर्व भूतलावर व्हावा त्याप्रमाणे त्या विजयी शिवरायांनी चतुर भाटगणांकडून (शाहिरांकडून) आपल्या कीर्तिचा सर्व दिशांना विस्तार करविला.

श्लोक क्र १४ (रायगडवर्णन) (Sanskrit Shlok)

सोयं यस्य गडो नरेन्द्रवहितैः प्रासादहम्यैरट्टे

म्यरापपा (रम्यैरापण) चत्वरैश्च परितः पूर्णः सरोभिर्नवैः ।

विद्वद्वैदिकवैद्रद्यवर्यगणकै रायैश्च सन्मन्त्रिभिः।

सैन्यैश्चापि चतुर्विधैरगणितैर्भाति प्रतापान्वितैः ।।

या श्लोकात शंभूराजांनी रायगडाचे वर्णन केले आहे.

ग्रंथकर्ता ज्या स्थानी ग्रंथरचना करतो त्या स्थानाचे वर्णन करण्याचा प्रघात पूर्वीपासून चालत आलेला आहे.

अर्थ-अशा त्या श्रीशिवछत्रपतींच्या दुर्गाभोवती राजप्रासाद, राजमहाल आणि राजभवने आहेत, ज्यांत राजे लोक राहतात. तेथे उत्तुंग भवने (वास्तू) आणि सुंदर बाजारपेठा असणारे चौक आहेत. सभोवती नवीन बांधलेली आणि पाण्याने तुडुंब भरलेली तळी-सरोवरे आहेत. त्या गडावर (रायगडावर) विद्वान, पंडित, वैदिक (वेदांचे जाणकार), श्रेष्ठ वैद्य, उत्कृष्ठ दर्जाचे आणि पूर्वापार काम करणारे (अनुभवी) हुशार मंत्री, चतुरंग दले (चार प्रकारची दले- रथदल, गजदल, अश्वदल आणि पायदळ) आणि ज्यांच्या पराक्रमाला सीमा नाही असे अनेक वीर वास्तव्य करतात. या लोकांच्या वास्तव्याने हा रायगड शोभायमान झाला आहे.

संभाजी महाराजांनी केलेले दुर्गराज श्रीरायगडाचे हे वर्णन वाचताना प्रत्यक्ष रायगड डोळ्यासमोर उभा राहिला नाही तरच नवल!

श्लोक क्र १५ (Sanskrit Shlok)

 आत्मगौरव

 तस्यात्मजः शंभुरिति प्रसिध्दः समस्तसामंतशिरोवसंतः ।

यः काव्यसाहित्यपुराणगीतकोदंडविद्यार्णवपारगामी ।।

या श्लोकात संभाजी महाराजांनी स्वतःचा परिचय करून दिला आहे.

त्यांना (म्हणजे शिवाजी महाराजांना) “शंभू” नावाचे, आपल्या कीर्तीने विख्यात झालेले एक सुपुत्र आहेत. ते सर्व सामंतांच्या (राजांच्या) मस्तकावरील अलंकार (तुरा) आहेत (जसा वसंत ऋतू हा सर्व ऋतूंत श्रेष्ठ आहे तसेच शंभूराजे या सर्व सामंतांचे मुकुटमणी आहेत). काव्य, साहित्य, पुराणे, संगीत, धनुर्विद्या या सर्व विद्या त्यांनी उत्तमरीत्या आत्मसात केलेल्या आहेत.

श्लोक क्र १६ (Sanskrit Shlok)

विविच्य शास्त्राणि पुरतनानामादाय तेभ्यः खलु सोयमर्थम् ।

करोति सद्‌ग्रंथममुं नृपालः स शम्भुवर्मा बुधभूषणाख्यम् ।।

प्राचीन विद्वानांनी, जाणकारांनी अनुभवांती सिद्ध केलेल्या शास्त्रांचे विवेचन करून, त्यातून योग्य तो अर्थबोध घेऊन आम्ही (श्रीशम्भुवर्मा म्हणजे संभाजी महाराज) हा बुधभूषण नावाचा प्रस्तुत महत्वाचा ग्रंथ लिहिला आहे.

बुध म्हणजे देव अथवा क्षत्रिय राजा. पूर्वीच्या काळी राजाला ईश्वराचा अवतार मानायची पद्धत होती. “बुधभूषण” म्हणजे “क्षत्रिय राजांचे भूषण”. क्षत्रिय राजांना राजनीति या शास्त्राची माहिती देणारा ग्रंथ म्हणजे बुधभूषण.

Instagram वरून पैसे कसे कमवायचे (7 सोपे मार्ग)

1 thought on “Sanskrit Shlok- बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक १०-१६) – शंभू राजे”

  1. Pingback: Sanskrit Shlok- बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक १७-३८) – शंभू राजे 2024 - संस्कृत श्लोक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top