Anjanichya Suta Tula | अंजनीच्या सुता तुला रामाचं

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान ।
एक मुखानं बोला, बोला जय जय हनुमान ।। ध्रु. ।।
दिव्य तुझी रामभक्ति, भव्य तुझी काया ।
बालपणीं गेलासी तू सूर्याला धराया ऽऽ ।
हादरली हि धरणी, थरथरले आसमान …..।
एक मुखानं बोला, बोला जय जय हनुमान ।।१ ।।
लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण ।
द्रोणागिरीसाठी राया केले तूं उड्डाण ।।
तळहातावरी आला घेऊनी पंचप्राण ….. ।
एक मुखानं बोला, बोला जय जय हनुमान ।।२।।
सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका ।
तिथे रामनामाचा तू, वाजविला डंका ।।
दैत्य खवळले सारे, परी हसले बिभीषण ।।
एक मुखानं बोला, बोला जय जय हनुमान ।।३ ।।
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला ।
पाहिलेस फोडुनी मोती राम कुठे आतंला ।।
उघडुनी आपुली छाती दाविले प्रभु भगवान ….।
एक मुखानं बोला, बोला जय जय हनुमान ।।४ ।।