Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराज अभंग गाथा १८०१ ते १९०० | Sant Tukaram Maharaj Abhang Gatha 1801 to 1900
संत तुकाराम महाराज अभंग गाथा १८०१ ते १९००
संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा / अभंग, मराठी अर्थासह
अभंग क्र.१८०१
म्हणसी होऊनी निश्चिंता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता
भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होईल तुझ्या ॥१॥
सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील भवडोहीं ॥ध्रु.॥
शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाहीं कदा अराणूक । करिती तडातोडी
आंत बाह्यात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥२॥
मोलाची घडी जाते वांयांविण । न मिळे मोल धन देतां कोंडी ।
जागा होई करीं हिताचा उपाय । तुका म्हणे हाय करिसी मग ॥३॥
अर्थ:-Tukaram Maharaj
मानवा तू असे म्हणशील की मी आता या संसारातून निश्चिंत होईल आणि संसाराची सर्व चिंता मी बाजूला सारीन, मग मी एकांतात जाईन व हरीचे भजन करीन. असे तू जर म्हटला तरच तुझा परमार्थ होईल, नाही तर तू जर संसार खरा मानला तर तो भ्रम तुझ्या पाठीमागे आशेच्या,इच्छेच्या रूपाने लागेल आणि त्यांच्या आशेच्या,इच्छेच्या पाठीमागे पळून पळून तुझ्या जीवनाचा अंत होईल. अरे शेवटी तु ह्या संसार भ्रमातच गुंतून राहशील. अरे तू विषया संगेच गुंतून राहसील आणि शेवटी या भवडोहात पडशील. अरे हे शरीर आणि सर्वकाही मायेचे स्वरूप आहे यामध्ये तुला कधीही विश्रांती मिळणार नाही. अरे तुझ्या आयुष्यात तुझ्या अंर्तबाह्य विकारच तुझी ताडातोड करतील आणि याच्यातच तुझे आयुष्याची चार दिवस वेगाने निघून जातील. तुकाराम महाराज म्हणतात अरे तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि तो व्यर्थ वाया जात आहे कितीही पैसे धन-दौलत दिले तरी गेलेला क्षण तुला परत मिळणार नाही. अरे तू जागा हो आणि स्वतःच्या हिताचा उपाय कर स्वत:च्या हितासाठी प्रयत्न कर एकदा की वेळ निघून गेली तर तू केवळ हाय हाय क
अभंग क्र.१८०२
पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥१॥
कनवाळू कृपाळू भक्तंलागीं मोही । गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाई ॥ध्रु.॥
भक्तंच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणें जन्म दाहा घेतले ॥२॥
प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥३॥
उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥४॥
कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी जाली माऊली ॥५॥
दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं शाखदेठ घेऊनि ॥६॥
कृपाळू माउली भुक्तीमुक्तीभांडार । करीं माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ॥७॥
अर्थ:-Tukaram Maharaj
हे जिवाच्या जिवलगा पांडुरंगा तु माझ्याकरता लवकर धावत यावे. हे विठाई तु कनवाळू कृपाळू आहेस भक्तासाठी तु लवकर मोहित होणारी आहेस त्यामुळेच गजेंद्राने तुला हाक मारली तर तु त्याच्या मदतीला लगेच धावत गेलीस. हे विठ्ठला तु भक्तांचा कैवार करण्यासाठी खूप कष्ट घेतोस अंबरिष राजा साठी तु दहा जन्म घेतलेस. देवा तु प्रल्हादासाठी स्तंभातून अवतार घेतलास आणि त्याच्या करता तु हिरण्यकश्यपु सारख्या दैत्याचा वध केला आणि भक्त प्रल्हादाला तु प्रेमाचा पान्हा पाजलास. देवा तु उपमन्यू करता कसा लवकर धावून आलास त्याला दुधाचा सागर देऊन तुझ्या प्रेमाचा पान्हा पाजलास. कौरवांच्या सभेमध्ये ज्यावेळी पांचाळीला ओढून आणले त्यावेळीला तिचे वस्त्रहरण करण्यात आले परंतु माझी विठाबाई माऊली तिची लज्जा रक्षण करण्याकरता स्वतः वस्र रूपाने तिच्या अंगावर येऊन राहिली. धर्मराजा वनवासात असताना दुर्वास ऋषी आपले
अभंग क्र.१८०३
कवणाचें कारण न लगेचि कांहीं ।सर्वी सर्वांठायीं तूं मज एक ।
कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आता उरलें काई न दिसे देवा ॥१॥
कवणा पाषाणासी धरूनिया भाव । कवणावरी पाव ठेवूं आतां ।
म्हणऊनि निश्चित राहिलों मनीं । तूं चि सर्वां खाणी देखोनियां ॥ध्रु.॥
जळें जळ काय धोविलें एक । कवण तें पातक हरलें तेथें ।
पापपुण्य हे वासना सकळ । ते तुज समूळ समर्पीली ॥२॥
पितरस्वरूपी तूं चि जनार्दन। सव्य तें कवण अपसव्य ।
तुका म्हणे जीत पिंड तुझे हातीं । देऊनि निंश्चिती मानियेली ॥३॥
अर्थ:-
देवा आता मला कोणाशी काय कारण व कोणाची मला काहीही गरज नाही कारण सर्व ठिकाणी तूच व्यापून उरलेला आहे याचा मला अनुभव आला आहे. देवा मी माझे काया-वाचा-मन हे तुझ्या पायी ठेवले आहे आता काही उरले आहे असे मला दिसत नाही. आता मी देव समजून कोणत्या पाषणाच्या ठिकाणी भक्तिभाव धरू, जर सर्व पाषाण देव ठरवावे तर मी पाय कुठे ठेवू? देवा सर्व ठिकाणी तुझेच स्वरूप आहे हे मी ओळखले आहे त्यामुळेच मी निश्चिंत मनाने समाधानी होऊन राहिलो आहे. हा देह पंचमहाभूतांचा आहे त्यामध्ये पाणी ही आहे मग या पाण्याला तीर्थाच्या ठिकाणी जाऊन तीर्थाच्या पाण्याने धुतले तर कोणते पातक जाणार आहे? मी पापपुण्य वासना हे सर्व काही अविद्ये सह तुला समर्पण केले आहे देवा. तीर्थ स्वरूप तुच आहेस जनार्धन तूच पिता आहेस मग मी सव्य अपसव्य कशासाठी करेन? तुकाराम महाराज म्हणतात मी हा माझा जीव रुपी पिंड तुझ्या हाती दिला आहे व निश्चिंत झालो व मी समाधान मानले आहे.
अभंग क्र.१८०४
सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥१॥
न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥
मायबापें माझीं जीवाचीं सांगाती । तीं देतील हातीं काळाचिया ॥२॥
पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनिया ॥३॥
पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां ॥४॥
जन साह्यभूत असे या सकळां । मी एक निराळा परदेशी ॥५॥
कोणा काकुलती नाहीं कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥६॥
तुका म्हणे मज तुझाची भरवसा । म्हणऊनि आशा मोकलिली ॥७॥
अर्थ:-
हे दातारा मी या जन्ममरणाच्या येरझारा करुन करुन फार शीणलो आहे आता मला तू या संसारापासून सोडव. माझ्या पूर्वच्या संचित कर्माचा झाडा पाडा काही होत नाही त्याची बाकीच राहते त्यामुळे माझ्या या देहाच्या हाडाला जन्ममरणाचा खोडा घातला आहे. माझे मायबाप हे माझ्या या जन्मीच्या जीवाचे सांगाती आहेत ते देखील मला काळाच्या हाती देतील. यम सुरी पाजळून आणि काळाचा फासा हातात घेऊन माझ्या शेजारीच बसला आहे. यम माझ्या शेजारीच बसला असल्यामुळे त्याने हातात घेतलेली सुरी माझ्या पाठीपोटी लागली आहे व त्याने घेतलेला काळाचा फासा मला ओढून मला नरकाकडे नेत आहे. आणि या सर्व गोष्टीला हे सर्व लोक देखील साहाय्य होत आहेत आणि या सर्वांमध्ये मीच एकटा निराळा परदेशी आहे येथे मी तरी काय करणार आहे ? हे हरी कृपाळूवा तुझ्यावाचून इतर कोणीही मला काकूळतीला येणार नाही. कोणीही माझ्यावर दया करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला तुझ्यावाचून कोणावरही भरवसा नाही त्यामुळेच मी सर्व लोकांवरची आशाच सोडून देतोय.”
अभंग क्र.१८०५Tukaram Maharaj
देवाचा भक्त तो देवासी गोड । आणिकांसी चाड नाहीं त्याची ।
कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघियां हातीं अंतरला ॥१॥
निष्काम वेडें म्हणतील बापुडे । अवघियां सांकडें जाला कैसा ।
माझें ऐसें तया न म्हणत कोणी । असे रानीं वनीं भलते ठायीं ॥ध्रु.॥
प्रातःस्नान करी विभूतिचर्चन । दखोनिया जन निंदा करी ।
कंठीं तुळसीमाळा बैसोनि निराळा । म्हणती या चांडाळा काय जालें ॥२॥
गातां शंका नाहीं बैसे भलते ठायीं । शिव्या देती आई बाप भाऊ ।
घरी बाइल म्हणे कोठें व्याली रांड । बरें होतें शंड मरता तरी ॥३॥
जन्मोनि जाला अवघियां वेगळा । म्हणोनि गोपाळा दुर्लभ तो ।
तुका म्हणे जो संसारा रुसला । तेणेचि ठाकिला सिद्धपंथ ॥४॥
अर्थ:-
जो देवाचा खरा भक्त आहे जो देवाशी एकरूप आहे त्याच भक्ताची देवाला आवड आहे देवाला इतरांची देवाला आवड नाही.कारण तो भक्त कोणाचाही सोयरा किंवा सांगाती म्हणजे सोबती नसतो तो सर्वांत पासूनच अंतरलेला असतो.तो भक्त वेडा आहे, निष्काम आहे, बापुडा आहे असे लोक म्हणत असतात आणि याच्या पासून आम्हाला संकट आहे असे देखील लोक म्हणतात.तो भक्त रानावनात कोठेही राहत असला तरी हा माझा कोणी नातेवाईक किंवा कोणी सखा सोबती आहे असेदेखील त्याच्याविषयी कोणीही म्हणत नाही.तो प्रातःकाळी स्नान करून अंगाला विभूती लावतो भस्म लावतो आणि हे पाहून सर्व लोक त्याची निंदा करतात.तो कंठा मध्ये तुळशी माळ घालून सर्वांपासून वेगळा बसलेला असतो तरीदेखील लोक म्हणतात की या चांडळाला नेमके काय झाले आहे?तो कोठे असला की हरीचे गीत गाताना त्याला भान राहत नाही व तो हरीचे गीत गाणं चालू करतो आणि ते पाहून त्याचे आई, बाप, भाऊ त्याला �
अभंग क्र.१८०६
कस्तुरी भिनली जये मृत्तिके । तयेसी आणिके कैसी सरी ॥१॥
लोखंडाचे अंगीं लागला परिस । तया आणिकास कैसी सरी ॥ध्रु.॥
तुका म्हणे मी न वजें यातीवरी । पूज्यमान करीं वैष्णवांसी ॥२॥
अर्थ:-
ज्या मातीमध्ये कस्तुरी मिसळलेली असेल त्या मातीची तुलना दुसऱ्या कोणत्याही मातीची कशी करता येईल? ज्या लोखंडाच्या अंगाला परिसाचा स्पर्श झाला असेल त्या लोखंडाची इतर धातूशी कशी बरोबरी करता येईल? तुकाराम महाराज म्हणतात मी वैष्णवांची केवळ भक्ती पाहतो मी त्यांच्या जातीकडे कधीही लक्ष देत नाही वैष्णव कोणत्याही जातीचा असो ते सर्वत्र पूज्यमान आहेत त्यामुळेच मी सर्व वैष्णवांचा आदर करतो.
अभंग क्र.१८०७Tukaram Maharaj
अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं । राम नाहीं तोंडीं कैसा तरे ॥१॥
सकळां जीवांमाजी देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे ॥ध्रु.॥
ज्ञान सकळांमाजी आहे हें साच । भक्तीविण तेंच ब्रम्ह नव्हे ॥२॥
काय मुद्रा कळल्या कराव्या सांगतां । दीप न लगतां उन्मनीचा ॥३॥
तुका म्हणे नका पिंडाचें पाळण । स्थापू नारायण आतुडेना ॥४॥
अर्थ:-Tukaram Maharaj
योगाभ्यासाने सर्व हृदयात अनाहत ध्वनी एकसारखा होत असला तरी ,”रामनाम “तोंडात नसेल तर तो कसा तरून जाईल ? सर्व जीवामध्ये परमेश्वराची व्याप्ती आहे ,ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा आपल्याशी तो अभिन्न आहे ,असे ज्ञान झाल्याशिवाय कोणीही कसा तरेल ?अर्थात अभेदाने साक्षात्कार झाल्यावाचून तरावयाचा नाही .सर्व लोकांत ज्ञान आहे ,हे खरे.परंतु सगुण भक्तीवाचून ते ज्ञान ‘ ब्रम्हज्ञान ‘ होत नाही .कदाचित ब्रम्हज्ञान झाले तरी ते ब्रम्हज्ञान ‘ ब्रम्हस्वरूप ‘ होत नाही .वृत्तीरूपाने राहते .खेचरी भूचरी मुद्रा स्वतःला कळल्या आणि कशा कराव्यात हेही लोकांना सांगता आले ,तरी पण उन्मनीचा दीप हृदयात उजळल्याशिवाय तो कसा तरेल ?तुकाराम महाराज म्हणतात ,देहाचे पोषण ज्यात आहे ,अशा चार्वाकमताची स्थापना करू नका ,कारण ,त्यामुळे नारायणाची प्राप्ती होणार नाही .
अभंग क्र.१८०८
नेणें अर्थ:- कांहीं नव्हती माझे बोल । विनवितों कोपाल संत झणी ॥१॥
नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगें व्यापूनिया ॥ध्रु.॥
मज मूढा शक्ती कैंचा हा विचार । निगमादिकां पार बोलावया ॥२॥
राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारि । बोबड्या उत्तरीं हेंचि ध्यान ॥३॥
तुका म्हणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगें भार घेतला माझा ॥४॥
अर्थ:-Tukaram MaharajTukaram Maharaj
हे संतजन हो मी जे काही बोलत आहे ते माझे शब्द नसून प्रत्यक्ष पांडुरंगाचे शब्द आहेत त्या शब्दाचा अर्थ:- देखील मला कळत नाही आणि जरी बोलताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही माझ्यावर रागवू नका ही विनंती मी तुम्हाला करत आहे. हे माझे शब्द नसून माझ्या संपूर्ण अंगामध्ये व्यापून उरलेला जो पांडुरंग आहे त्याचे हे शब्द आहेत. मी तर मुर्ख आहे आणि वेदाचा विचार करण्या एवढी शक्ती माझ्या मध्ये कशी असणार. मी तर माझ्या मुखाने केवळ राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी असे बोबडे शब्दाने बोलत असतो आणि त्याचे चिंतन मी नेहमी करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात मला तर केवळ गुरुकृपेचा आधार आहे आणि पांडुरंगाने माझा योगक्षेमाचा भार घेतला आहे.
अभंग क्र.१८०९Tukaram Maharaj
देवासी लागावे सकळांसी पोसावें । आम्हां न लगे खावें काय चिंता ॥१॥
देवा विचारावें लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥
देवासी उत्पत्ती लागला संहार । आम्हां नाहीं फार थोडें काहीं ॥२॥
देवासी काम लागला धंदा । आह्मासी ते सदा रिकामीक ॥३॥
तुका म्हणे आम्ही भले देवाहून । विचारितां गुण सर्वभावें ॥४॥
अर्थ:-
देवाला सगळ्यांचे पालन-पोषण करण्याची चिंता असते परंतु आम्हाला तर काय खावे ,काय नाही याची देखील चिंता करण्याची गरज नाही. देवाला तर सर्व लोकांचे पापपुण्य विचारात घ्यावे लागते परंतु आम्हाला तर सर्व लोक चांगले आहेत. देवाला तर संहार आणि उत्पत्ती हे काम मागे लागले आहेत परंतू आम्हाला तर थोडेफार देखील काहीच काम नाही. देवाच्या पाठीमागे तर चांगलांच काम धंदा लागलेला आहे परंतु आम्ही तर सदा सर्वदा रिकामेच आहोत. तुकाराम महाराज म्हणतात जर दोघांच्याही गुणांचा विचार केला तर देवापेक्षा आम्ही भले आहोत की.
अभंग क्र.१८१०
घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥
हरीनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥
आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आम्हां ॥२॥
आणीक सायास न करीं न धरीं आस । होईन उदास सर्व भावें ॥३॥
मोक्ष आम्हां घरीं कामारी ते दासी । होय सांगों ऐसी तुका म्हणे ॥४॥
अर्थ:-Tukaram Maharaj
देवा मी जन्म घेईन तर केवळ तुझी चरण सेवा साधण्याकरीताच. मग मी हरिनाम कीर्तन करीन संतांची पूजन करीन आणि महाद्वारात लोटांगण घालीन. आम्ही जिथे कुठे राहू तेथे आनंदाने समृद्ध राहु. सुख आणि दुख यांची आवड तर आम्हाला राहिलीच नाही. तुझी चरण सेवा करण्यावाचून इतर कोणतेही कष्ट मी करणार नाही आणि कशाचीही इच्छाही धरणार नाही आणि मग या संसारापासून मी सर्वभावे उदास होऊन राहील. तुकाराम महाराज म्हणतात अहो मोक्ष तर आमच्या घरी काम करणारी दासीच आहे तिला आम्ही जसे काम सांगू तसे काम ती करते.
अभंग क्र.१८११
देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥१॥
तरी साच मी पतित । तूंच खोटा दिनानाथ ।
ग्वाही साधुसंत जन । करूनि अंगीं लावीन ॥ध्रु.॥
आम्ही धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छंद ॥२॥
न चले तुझे कांहीं त्यास । आम्ही बळकाविले दोष ॥३॥
दिशा भरल्या माझ्या मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥४॥
तुका म्हणे चित्त । करी तुझी माझी नीत ॥५॥
अर्थ:-
देवा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे ते पाहूया. देवा अरे मी तर खरोखर पतित आहे पण तू खोटा दीनानाथ आहेस. कारण या गोष्टीला स्वतः साधुसंत जनच साक्षी आहेत आणि त्यांच्याद्वारे मी हा दोष सिद्ध करून तुझ्या अंगी लगीन देवा. देवा आम्ही तर भेदाभेद धरला परंतु तुला तर त्याचा छंद नाही. अरे आमच्या मध्ये तर काम ,क्रोध असे अनेक दोष आहेत पण तझ्या पुढे त्याचे काहीही चालत नाही. माझे मन तर दाही दिशांकडे पाहत आहे आणि त्या मनाला आवरण्याच्या भीतीनेच तु कुठेतरी लपून बसला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे माझे चित्त तुझ्यातील व माझ्यातील नीतिचा विचार करीत आहे.
अभंग क्र.१८१२
लापणिक शब्दें नातुडे हा देव । मनिंचा गुह्य भाव शुद्ध बोला ॥१॥
अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥ध्रु.॥
तुका म्हणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चित्त शुद्ध भावें ॥२॥
अर्थ:-
अहो कपटी शब्दाने बोलून देवाचे प्राप्ती केव्हाही करून घेता येत नाही तर त्याकरता जो मनातील गोड भाव आहे तो शुद्ध चित्ताने बोलावा. संवाद करणाऱ्या व्यक्तीचे अंतरंगातील भेद परमानंद जाणत असतो. तुकाराम महाराज म्हणतात जर तुला आपले स्वतःचे हीत करून घ्यायचे असेल तर तुझे चित्त भक्तिभावपूर्वक शुद्ध कर.
अभंग क्र.१८१३
नव्हे ब्रम्हज्ञान बोलतां सिद्ध । जंव हा आत्मबोध नाहीं चित्तीं ॥१॥
काय करिसी वांयां लटिकाचि पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥ध्रु.॥
मीच देव ऐसें सांगसी या लोकां । विषयांच्या सुखा टोंकोनियां ॥२॥
अमृताची गोडी पुढिलां सांगसी । आपण उपवासी मरोनिया ॥३॥
तुका म्हणे जरि राहील तळमळ । ब्रम्ह तें केवळ सदोदित ॥४॥
अर्थ:-
केवळ भराभर बोलण्याने ब्रम्हज्ञान होत नाही ;जोपर्यंत वृत्तीत आत्म्याचा ब्रम्हरूपाने निःसंदिग्ध अपरोक्ष साक्षात्कार झाला नाही तोपर्यंत ‘ ब्रम्हज्ञान झाले ‘ असे म्हणता येत नाही .अनुभवावाचून खोटे पाल्हाळ काय करावयाचे आहे ?कारण ,आपली विद्वत्ता दाखविणे म्हणजे केवळ श्रम आहेत . वैषयिक सुखावर दृष्टी ठेवून ‘ मीच देव आहे ‘ असे खोटेच पुढे बसलेल्या या भोळ्या श्रोत्यांना सांगतोस ;आणि त्यांना फसवितोस . आपण उपवासी राहून दुसर्याला मात्र अमृताची गोडी सांगतोस ,हे आश्चर्य आहे . तुकाराम महाराज म्हणतात ,जर तुझ्या चित्तातील संसाराची तळमळ थांबली ,तर तू सर्वकाळ अखंड ब्रम्हरूप आहेसच .त्यासंबंधी व्यर्थ वाचाळपणा करण्याचे काय कारण आहे ?
अभंग क्र.१८१४
गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥१॥
रवि दीप काळिमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥
कर्पूरकांडणी काय कोंडा कणी । सिंधू मिळवणीं काय चाले ॥२॥
परिस चिंतामणि आणिकांचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥३॥
तुका म्हणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥४॥
अर्थ:-
गंगेच्या पाण्याला पाठ व पोट नाही ते सर्व दृष्टीने सारखेच आहे व पवित्र आहे त्याप्रमाणे अमृताच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अवगुण नाही. रवी ,दिपक आणि हिरा या तिघांनाही अंधाराची माहिती नाही या उलट ते सर्व अंधाराचा नाश करतात. कापराचे कितीही कांडन केले तरी त्यातून कधी कोंडा निघतो काय आणि सागरांमध्ये काहीही मिळवले तरीही त्याचा काही उपयोग होतो काय. परीस आणि चिंतामणी याला कशाचाही स्पर्श जरी झाला तरी त्यांच्यामध्ये बदल होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अगदी त्याप्रमाणेच संत आहेत ते सर्वत्र गगनाप्रमाने व्यापलेले आहेत असे जाणून घ्यावेत.
अभंग क्र.१८१५
परिस काय धातु सोने न करीतु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥१॥
काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥
कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥२॥
चंदनांच्या वासें वसतां चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥३॥
काय त्याचें उणें जालें त्यासी देतां । विचारीं अनंता तुका म्हणे ॥४॥
अर्थ:-
परीस लोखंडाला सोने करीत नाही काय? निश्चितच करतो तो लोखंडाचे लोखंड पण ही नाहीसे करतो. मग देवा तू त्याच्यापेक्षाही हिन झाला आहेस काय?मी तुला एखादे संकट सांगितले तर तु ते पूर्ण करत नाहीस. कल्पतरू आपल्या मनात जे असेल ती लगेच इच्छा पूर्ण करतो आणि चिंतामणी तर खडा आहे, आपण ज्याचे चिंतन करू ते लगेच तो पुरवतो. चंदनाच्या सहवासातच कोणतेही वृक्ष किंवा कोणतेही काष्ट राहिले तरी ते चंदनाप्रमाणे सुगंधित होते. तुकाराम महाराज म्हणतात देवा परीस, चंदन, चिंतामणी, कल्पतरू यांना स्वतःचे गुण दुसऱ्याला देताना त्यांचे स्वतःचे काही नुसकान झाले आहे काय, हे अनंता त्यांना तु विचारून पहा
अभंग क्र.१८१६
तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥१॥
कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काई ॥ध्रु.॥
धान्यें बीजें जेणें जाळोनि सकळें । पेरितो काऱ्हाळे जिरें बीज ॥२॥
मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेउनि लोकां ॥३॥
विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रम्हहत्या ॥४॥
तुका म्हणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥५॥
अर्थ:-
जो मूर्ख सुगंधी पुष्पवाटिका व मधुर फळांचे वृक्ष तोडून बाबळीचे रक्षण करतो, त्याने आपले हित कशात पाहिले आणि आपले सुखही त्याने कशात पाहिले आहे?जो सर्व प्रकारचे धान्याचे बीजे जाळून कार्हाळे आणि जीरे या बीजांची पेरणी करतो, मागे झालेल्या संतांनी जी परमार्थाची चांगली वाट निर्माण केली ती वाट सोडून देऊन जो लोकांना आड रानाने घेऊन जातो. आणि जो विषाचे नाम ‘अमृत’ आहे असे म्हणतो व ते घेऊन दुसऱ्याला देतो.तो ब्रम्ह हत्या सारखे पातक करतो असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात अशा मूर्ख मनुष्यला कितीही समजावून सांगितले चांगला उपदेश केला तरीही ते ऐकत नाही मग अशाची आपण कितीही फजिती केली कितीही हाल केले तरी त्यापासून पाप लागत नाही.
अभंग क्र.१८१७
न लाहेसें केलें ॥१॥
जेथें तेथें आपण आहे । आह्मीं करावें तें काये ॥ध्रु.॥
एकांतींसी ठाव । तिहीं लोकीं नाहीं वाव ॥२॥
गांवा जातों ऐसें । न लगे म्हणावें तें कैसें ॥३॥
स्वप्नाचीये परी । जागा राहे तंव घरीं ॥४॥
तुका म्हणे काये । तुझे घेतले म्यां आहे ॥५॥
अर्थ:-
देवाने, मी संसाराच्या भीतीने कोठे पळून जाऊ नये असे मला परिपूर्ण केले आहे. आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे तो हरीच व्यापून उरलेला असतो मग आता त्यामुळे आम्ही काय करावे? तिन्ही लोकांमध्ये जरी फिरून पाहिले तरीही एकांत आता कोठे ही राहिला नाही. मी गावाला जातो असे देखील म्हणता येत नाही व म्हणावे तरी कसे कारण सर्वत्र हा नारायणच आहे. स्वप्नामध्ये कितीही फिर फिर फिरलो तरी जाग आल्यावर घरीच असतो अगदि त्याप्रमाणे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझे काय घेतले आहे की मला तू तुझ्याच रूपाने नटवले व सर्वत्र मलाच केले आहेस.
अभंग क्र.१८१८
आपण काय सादर । विशीं आम्हां कां निष्ठुर ॥१॥
केलें भक्त तैसें देई । तुझें प्रेम माझ्याठायीं ॥ध्रु.॥
काय पंगतीस कोंडा । एकांतासी साकर मांडा ॥२॥
काय एकपण । पोतां घालूनि गांठी खूण ॥३॥
काय घ्यावें ऐसें । त्या आपण अनारिसें ॥४॥
तुका म्हणे मधी । आता तोडू भेद बुद्धी ॥५॥
अर्थ:-
देवा तुम्ही तुमच्या इतर भक्तांच्या उद्धारा बाबतीत किती उत्साही असता परंतु आमच्या बाबतीतच तुम्ही असेही निष्ठुर का आहात ? तु तुझ्या भक्तांच्या हृदयामध्ये जसे तुझे प्रेम दिले आहे त्याच प्रकारचे प्रेम माझ्या हृदयातही तु द्यावे. पंक्तीत बसून कोंडा वाढायचा आणि एकांतात बसून साखर मांडा खायचा हे तुमचे वागणे बरोबर आहे काय? एकीकडे तुमच्या पदरात असलेल्या धनाला तुम्ही गाठ मारायची आणि दुसरीकडे आपण एकच आहोत असे म्हणायचे हे तुमचे वागणे बरोबर आहे काय देवा?जसे तुम्ही भक्तांकडून प्रेम घेता तसेच तुम्हीही भक्तांना प्रेम दिले पाहिजे देवा. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता यामागे झाले ते झाले परंतु आता यापुढे आपल्या दोघांमधील भेद बुद्धी आपण तोडून टाकू.
अभंग क्र.१८१९
चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराई ॥१॥
परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ध्रु.॥
आम्ही सर्वस्वें उदार । तुज देऊनियां व्यवहार ॥२॥
इंद्रियांची होळी । संवसार दिला बळी ॥३॥
न पडे विसर । तुझा आम्हां निरंतर ॥४॥
प्रेम एकासाठी । तुका म्हणे न वेचे गांठी ॥५॥
अर्थ:-
देवा मी तुझ्या पायी माझे चित्त ठेवून तुझ्या उपकार उतराई झालो आहे. परंतू हे केशी राजा तू खोटा आहेस कारण मला तुझा अंतकाळ खरच कळतच नाही. आम्ही सर्वस्व उदार झालो आहोत आमचे सर्व व्यवहार आम्ही तुला दिले आहेत. आम्ही आमच्या इंद्रियांची होळी केली आणि तुझ्यासाठी संसारही बळी दिला आहे. देवा तुझा विसर आम्हाला केव्हाही पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही केवळ तुझ्यावरच प्रेम करतो बाकी कुठेही आम्ही पहात देखील नाही.
अभंग क्र.१८२०
आम्ही पतित म्हणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं ।
नाहीं तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्तीं ॥१॥
आम्हां न तारावें तुम्ही काय करावें । सांगीजोजी भावें नारायणा ॥ध्रु.॥
अन्याय कोणाचा अंगीकार करणें । तया हातीं देणें लाज तेचि ।
काय ते शूरत्व मिरवूनि बोलणें । जनामाजी दावणें बळरया ॥२॥
पोह्या अन्नछत्र घालूनियां घरीं । दंडितो बाहेरी आलियासी ।
नव्हे कीर्ती कांहीं न मानेचि लोकां । काय विटंबणा जैसी तैसी ॥३॥
प्रत्यक्षासी काय द्यावें गा प्रमाण । पाहातां दर्पण साक्ष काई ।
तुका म्हणे तरी आम्हां का न कळे । तरलों किंवा आम्ही नाहीं ॥४॥
अर्थ:-
देवा आम्ही पतित आहोत म्हणूनच तुला शरण आलो आहोत त्यामुळे आम्ही तुझे चिंतन रात्रंदिवस करीत आहोत. देवा जर आम्ही पतीत नसतो तर तुझी भिड आम्ही चित्तात का धरली असती? देवा हे नारायणा तुम्ही जर आमचा उद्धार करणार नाही तर मग तुम्ही आमचे काय करणार ते खरे सांगा. ज्याने आमचा अंगीकार करून दुसऱ्याच्या हाती आम्हाला दिले अशी ज्याची चूक आहे, त्याची ही लाजिरवाणी चूक त्यानेच स्वीकारावी. देवा अहो तुमची दीनानाथ ,पतितपावन म्हणून ब्रिदे आहे, केवळ त्याचेच तुम्ही भूषण जगामध्ये मिरवता शुर व्यक्तीने केव्हा ही शुरत्वाच्या गप्पा मारू नये त्याचे भुषण मिरवून उगाच बरळु नये. घराबाहेर पाणपोया अन्नछत्र घालतो आणि बाहेर आलेल्या भुकेल्यांना तहानलेल्यांना परत हाकलूनही लावतो याला काय अर्थ:- आहे काय? जर असे त्याने केले तर त्याची कीर्ती जगामध्ये होणार नाहीये लोकांना तो पटायचा नाही आणि त्याने असे करणे म्हणजे ती एक प्रकारची विटंबना नाही काय? तुकाराम म
अभंग क्र.१८२१
काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥१॥
तो मज दावा तो मज दावा । नंदनंदन जीवा आवडे तो ॥ध्रु.॥
गोवर्धन गिरी उचलिला करीं । गोकुळ भीतरी राखियेलें ॥२॥
वधुनि भौमासुरा आणिल्या गोपांगना । राज्य उग्रसेना मथुरेचें ॥३॥
पांडव जोहरीं राखिले कुसरी । विवरा भीतरीं चालविले॥४॥
तुका म्हणे हा भक्तंचा कृपाळ । दुष्टजना काळ नारायण ॥५॥
अर्थ:-
ज्याने बाळपणीच काग ,बग ,रिठासुर मारले आणि सर्व दैत्यांची खानच बुडून टाकली. तो नंदाचा नंदन मला दाखवा कारण तो मला फार आवडतो. ज्यावेळी इंद्राने अतिवृष्टी करून गोकुळात संकट निर्माण केले त्यावेळी या श्री कृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन गिरी पर्वत उचलून संपूर्ण गोकुळाचे रक्षण केले. ज्याने सोळा सहस्र राजकन्या पळवून नेल्या अशा भैमा सुराला या श्री कृष्णाने मारून टाकले व त्यां सोळा सहस्त्र राजकन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला व मथुरेचे राज्य त्याने उग्रसेनाला देऊन टाकले. ज्यावेळी पांडव लाक्षागृहात मध्ये झोपले होते त्यावेळी दुर्योधनाने त्या लाक्षागृहात आग लावली व या श्रीकृष्णाने कौशल्यतेने सर्व पांडवांना भुयारातून बाहेर काढून त्यांचे रक्षण केले . तुकाराम महाराज म्हणतात हा नारायण भक्तांचा कृपाळू आहे आणि दुष्टांचा काळ आहे
अभंग क्र.१८२२
तुजविण देवा । कोणा म्हणे माझी जिव्हा ॥१॥
तरि हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥
कांहीं इच्छेसाठी । करिल वळवळ करंटी ॥२॥
तुका म्हणे कर । कटीं तयाचा विसर ॥३॥
अर्थ:-
हे देवा हे पांडुरंगा माझी जिव्हा म्हणजेच जीभ तुझ्याशिवाय कोणाला आपली म्हणेल? तुझ्याशिवाय इतर कोणाचे नाव घेईल? परंतु तुझ्या शिवाय तिने जर इतर गोष्टी केल्या किंवा काही इच्छेसाठी तिने जर वळवळ केली तर ती करंटी आहे हे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात जो कटेवर कर ठेऊन उभा आहे अशा या श्रीहरीचा जर तिला विसर पडला तर या रांडेचे शत खंड होवोत, अशी ही करंटी जिव्हा झडून जावो हेच माझे तुझ्याकडे मागणे आहे
अभंग क्र.१८२३
आम्हां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम ॥१॥
न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां ॥ध्रु.॥
आसनीं भोजनीं शयनीं । दुजें नाहीं ध्यानीं मनीं ॥२॥
तुका म्हणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥३॥
अर्थ:-
आता आम्हांला एकच काम राहिले आहे आणि ते म्हणजे सर्वभावाने तुझे नाम घेणे आणि त्याचा कधीही विसर पडू न देणे.ते म्हणतात आता आम्हांला कसलीही चिंता करावी लागत नाही तसेच या भवसागरातून कसे तरुन जायचे किंवा त्यासाठी काय प्रयत्न करायचे याचा देखील विचार करावा लागत नाही.ते पुढे म्हणतात आम्हांला तर प्रत्येक समयी म्हणजेच आसनी, भजनी आणि शयनी देखील ध्यानी मनी तुझाच विचार असतो, तुझ्याच नामाचा जप चालू असतो, तुझ्या शिवाय इतर कोणताही विषय आमच्या मनाला शिवत देखील नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा, हे नारायणा तुझ्या नामाने किंबहुना तूच या संसारातील सर्व बंधनातून मला मोकळे केले आहेस, मला चिकटलेल्या सर्व उपाध्या तू तोडल्या आहेस
अभंग क्र.१८२४
नव्हें कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥१॥
म्हणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ध्रु.॥
शरीर जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥२॥
तुका म्हणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥३॥
अर्थ:-
या संसारामध्ये माझा कोणाशीही काहीही संबंध नाही हा सत्य भाव मला समजला आहे. म्हणूनच देवा मी तुझ्या पायी निश्चयाने जीव ठेवला आहे. शरीर हे एक प्रकारचे खोपटच आहे ते कधी ना कधी जाणार आहे मग त्याच्यासाठी एवढी खटपट करण्याची काय गरज आहे? तुकाराम महाराज म्हणतात हे देवा या संसारांमध्ये मी जे काही खटपट करत आहे ती व्यर्थ आहे हे मला चांगले कळून आले आहे
अभंग क्र.१८२५
नेघें तुझें नाम । न करीं सांगितलें काम ॥१॥
वाढे वचनें वचन । दोष उच्चारितां गुण ॥ध्रु.॥
आतां तुझ्या घरा । कोण करी येरझारा ॥२॥
तुका म्हणे ठायीं । मजपाशीं काय नाहीं ॥३॥
अर्थ:-
देवा मी आता मुक्त झालो आहे त्यामुळे मी तुझे नाम ही घेणार नाही व कोणतेही तुझे काम ही करणार नाही. देवा तूझे दोष आणि तुझे गुण जर तुझ्यासमोर सागितले तर उगाच आपले बोलण्याने बोलणे वाढेल दुसरे काही होणार नाही. आता तुझ्या घरी कोण येरझारा करणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी बसल्या जागी काय करू शकत नाही माझ्याजवळ काय म्हणून नाही?
अभंग क्र.१८२६
रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी ॥१॥
तुम्हां आम्हां मध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव पाहों तरावया ॥ध्रु.॥
सरी चिताकभोंवरी । अळंकाराचिया परी । नामें जालीं दुरी । एक सोनें आटितां ॥२॥
पिसांचीं पारवीं । करोनि बाजेगिरी दावी । तुका म्हणे तेवीं । मज नको चाळवूं ॥३॥
अर्थ:-
एखाद्या मनुष्याने हातामध्ये दोरी धरली आणि लहान मुलांना सांगितले की हा साप आहे, आणि त्या लहान मुलांना नंतर समजले की ही दोरी आहे तर ती दोरी दोघांनाही सारखीच असते. त्याप्रमाणे हे हरी तुमच्या व आमच्यामध्ये ही असाच काही एक प्रकार निर्माण झाला होता. आणि आम्ही या भवसागराच्या मृगजळाच्या पुरातून कसे तरून जावे याविषयी विचार करीत बसलो होतो.ज्याप्रमाणे सोन्याचे सरी, चित्तांक आणि बुगडी असे अलंकार केले व नंतर ते सर्व अलंकार एका भांड्यात ठेवून त्योचे आळवण केले तर खाली केवळ सोने हाच धातू राहतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा जसा एखादा गारोडी पिसांचा पारवा तयार करतो आणि लोकांची दिशाभूल करतो, त्याप्रमाणे तुम्ही मला फसवू नका
अभंग क्र.१८२७
व्यवहार तो खोटा । आतां न वजों तुझ्या वाटा ॥१॥
एका नामा नाहीं ताळा । केली सहस्रांची माळा ॥ध्रु.॥
पाहों जाता ठायी । खेळसील लपंडायी ॥२॥
तुका म्हणे चार । बहु करितोसी फार ॥३॥
अर्थ:-
देवा तुझे सर्व प्रकारचे व्यवहार खोटे आहेत आता आम्ही तुझ्या वाटेला केव्हाच जाणार नाहीत. देवा तुला एक देखील निश्चित नाव नाही त्यामुळे तुझ्या नावाचा ताळमेळ लागत नाही हजारो नावांची माळ तू तुझ्या गळ्यात घातली आहे. तुला पाहण्यास जर गेलो तर तु आमच्याशीच लपंडाव खेळतोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझ्या विषयी फार चेष्टा करतोस
अभंग क्र.१८२८
लटिकाचि केला । सोंग पसारा दाविला ॥१॥
अवघा बुडालासी ॠणें । बहुतांचे देणें घेणें ॥ध्रु.॥
लावियेलीं चाळा । बहू दावूनि पुतळा ॥२॥
तुका म्हणे हात । आह्मी आवरीली मात ॥३॥
अर्थ:-
देवा तु आजपर्यंत जी तुझी पतितपावन, दीनानाथ वगैरे अशी ब्रीदे आहेत, ती सर्व तु खोटे करून दाखवले आहेत. देवा तु भक्तांकडून सेवा रूपी कर्ज घेतले आहेस आणि त्या ऋणानेच तु बुडाला आहेस बऱ्याचश्या भक्तांचे देणे घेणे तुझ्याकडे आहे. देवा तु अनेक प्रकारची रूपे धारण केलेली आहेस आणि तुझ्या रूपाचा चाळा भक्तांना लावला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता आम्ही तुझ्याशी कोणताही व्यवहार करण्याविषयी आमचा हात आवरला आहे आणि तुझ्याशी बोलणे ही कमी केले आहे.
अभंग क्र.१८२९
दाखवूनि आस । केला बहुतांचा नास ॥१॥
थोटा झोंडा शिरोमणी । भेटलासी नागवणी ॥ध्रु.॥
सुखाचें उत्तर । नाहीं मुदलासी थार ॥२॥
तुका म्हणे काय । तुझे घ्यावें उरे हाय ॥३॥
अर्थ:-
देवा भरपूर भक्तांना तु तुझ्या प्राप्तीची आशा दाखवली परंतु शेवटी त्यांचा नाश केलास. देवा तु असा थोटा आहे ,झोंडा आहे असा आम्हाला नागवा करणारा तु भेटला आहेस की सर्व लबाडांचाचाही तु शिरोमणी आहेस.देवा आमचे सेवा रूपी ऋण तुझ्याकडे आहे आणि त्याची मुद्दल देण्याचे तर जाऊ दे परंतु तु आमच्याशी सुखाचे दोन शब्दही बोलत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा तुझ्या नागव्या कडून आम्ही काय घ्यावे आम्हा भक्तांना केवळ हाय हाय करणे शिल्लक आहे.
अभंग क्र.१८३०
ठाव नाहीं बुड । घरें वसविसी कुड ॥१॥
भलते ठायीं तुझा वास । सदा एरवी उदास ॥ध्रु.॥
जागा ना निजला । होसी धाला ना भुकेला ॥२॥
न पुसतां भलें । तुका म्हणे तुझें बोलें ॥३॥
अर्थ:-
देवा तू अनेक ठिकाणी अनेक घर बसविले आहेत परंतु तुझा शोध घेण्यास गेले तर तुझा कोठेही ठावठिकाणा लागत नाही. देवा तू कुठे ही राहतो परंतु कायमस्वरूपी त्या ठिकाणा विषयी तु उदास असतोस. तु जागाही नाहीस आणि झोपलेला ही नाहीस तू जेवलेलाही नाहीस आणि भुकेलाही नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला कोणी काही जरी विचारले नाही तरी तु त्या भक्तांचे सर्व दुःख जाणतो आणि तु जे वेद गीतामध्ये तुझे वचन सांगितलेले आहे त्या बोलण्याने लोकांचे कल्याण होत आहे
अभंग क्र.१८३१
लाज ना विचार । बाजारी तूं भांडखोर ॥१॥
ऐसें ज्याणें व्हावें । त्याची गांठी तुजसवें ॥ध्रु.॥
फेडिसी लंगोटी । घेसी सकळांसी तुटी ॥२॥
तुका म्हणे चोरा । तुला आप ना दुसरा ॥३॥
अर्थ:-
देवा तुला कोणत्याही प्रकारची लाज नाही कोणत्याही गोष्टीचा तु विचार करत नाहीस भर बाजारात तु भांडतोस. आणि देवा जो तुझ्या सारखाच झाला आहे बरोबर त्याच्या सोबत तुझी गाठ पडत असते. तु स्वतःची लंगोटी देखील फेडून देण्यास तयार होतोस परंतु दुसऱ्याचे सर्वस्व घेतो. तुकाराम महाराज म्हणतात हे चोरा तुला आपले आणि दुसरे असे काहीच नाही
अभंग क्र.१८३२
श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोंवे ॥१॥
तैसी जाली मज परी । वसे निकट सेजारीं ॥ध्रु.॥
जेवितां जवळी । येऊनियां पुंस घोळी ॥२॥
कोपेल तो धणी । तुका म्हणे नेणें मनीं ॥३॥
अर्थ:-
एखाद्या कुत्र्याला जर खुप लळा लावला तर ते नेहमी आपल्या पायाभोवती घोटाळत असतो. त्याप्रमाणे हे देवा तू मला लळा लावला आहेस आणि त्या कुत्र्याप्रमाणेच मी तुझ्या पायाजवळ राहत आहे. लळा लावलेला कुत्रा आपण जेवत असलो की आपल्या शेजारी येऊन त्याची शेपटी घोळत असतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा मालक जेवत असताना आपण तेथे गेलो तर मालक आपल्यावर रागवेल असे कुत्र्याच्या मनात सुद्धा येत नाही
अभंग क्र.१८३३
वटवट केली । न विचारितां मना आली ॥१॥
मज कराल तें क्षमा । कैसें नेणों पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥
उचित न कळे । जिव्हा भलतेंचि बरळे ॥२॥
तुका म्हणे कांहीं । लौकिकाची चाड नाहीं ॥३॥
अर्थ:-
देवा मी मनात कोणत्याही प्रकारचा विचार न करता जसे मनाला येईल तसे तुमच्यासमोर बडबड केली आहे. आणि हे पुरुषोत्तमा मी केलेल्या अपराधाबद्दल तुम्ही मला कशाप्रकारे क्षमा कराल ते मला काहीच कळत नाही. माझ्या जिभेला उचित काय अनुचित काय हे काहीच कळत नाही ती भलतेच काहीतरी बडबड करत असते. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मला लौकिकाची चाड किंवा लाज अजिबात राहिलेली नाही.
अभंग क्र.१८३४
जीवें व्हावें साटी । पडे संवसारें तुटी ॥१॥
ऐशीं बोलिलों वचनें । सवें घेउनि नारायणे ॥ध्रु.॥
येणे नाही जाणें । केले कोणां न मागणें ॥२॥
नाहीं जन्मा आलों । करील ऐसें नेदीं बोलों ॥३॥
ठाव पुसी सेणें । तुका म्हणे खुंटी येणें ॥४॥
अर्थ:-
परमार्थ करण्यासाठी जीवावर उदार व्हावे तरच जन्ममरण रुपी संसारातून आपली सुटका होत असते. नारायणाने गीते मध्ये जो उपदेश सांगितला आहे तोच मी उपदेश, वचन बोलत आहे आणि तोच माझ्या सोबत घेऊन मी सर्वांना सांगत आहे. यापुढे मी जन्मालाच आलो नाही असेच नारायण करील आणि हे पुन्हापुन्हा देखील तो मला सांगायला लावणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात अज्ञान रुपी ठिकाण ज्ञानरूपी शेणाने पुसून टाकलं त्यामुळे जन्म-मरण खुंटले आहे.
अभंग क्र.१८३५
आता पंढरीराया । माझ्या निरसावें भया ॥१॥
मनीं राहिली आशंका । स्वामी भयाची सेवका ॥ध्रु.॥
ठेवा माथां हात । कांहीं बोला अभयमात ॥२॥
तुका म्हणे लाडें । खेळें ऐसें करा पुढें ॥३॥
अर्थ:-
पंढरीराया ,माझ्या संसारभयाचे निरसन करा .हे स्वामी ,तुमच्या या सेवकाच्या मनामध्ये जी भयाची शंका राहिली आहे ;तिचे निरसन करा .देवा ,माझ्या डोक्यावर अभयहस्त ठेवा ;व माझ्याशी काहीतरी अभयदानाच्या गोष्टी बोलून माझ्या मनाचे समाधान करा .तुकाराम महाराज म्हणतात ,देवा ,यापुढे मला लेकराला निर्भय करून ते लडिवाळपणाने या संसारात हसत खेळत राहील ,असे करा
अभंग क्र.१८३६
कवतुकवाणें । बोलों बोबड्या वचनें ॥१॥
हें तों नसावें अंतरीं । आम्हां धरायाचें दुरी ॥ध्रु.॥
स्तुति तैसी निंदा । माना समचि गोविंदा ॥२॥
तुका म्हणे बोलें । मज तुह्मी शिकविलें ॥३॥
अर्थ:-
अर्थ:- : – देवा ,मी तुमच्याशी कौतुकाने व बोबड्या शब्दाने बोलत आहे .तरी माझ्यावर रागावून मला पायापासून दूर करण्याचे तुमच्या मनात येऊ देऊ नये ;हीच माझी विनंती आहे .गोविंदा ,माझ्या बोलण्यात स्तुती अथवा निंदा जरी घडली ,तरी ती तुम्ही सारखीच माना .तुकाराम महाराज म्हणतात ,देवा ,मी तरी आपल्या पदरचे कोठे बोलतो !तुम्ही जसे शिकविले तसे मी बोलत आहे
अभंग क्र.१८३७
असो मागे जाले । पुढे गोड ते चांगले ॥१॥
आतां माझे मनी । काहीं अपराध न मनी ॥ध्रु.॥
नेदी अवसान । करी नामचें चिंतन ॥२॥
तुका म्हणे बोले । तुज आधीच गोविलें ॥३॥
अर्थ:-
देवा ,मागे जे झाले ते असो ,आता यापुढे तरी माझ्या सेवेचा शेवट गोड झाला तर ते चांगले होईल ,आजवर जे माझ्याकडून अपराध घडले ,ते यापुढे मनात आणू नका . नामाचे चिंतन करीत असता मध्येच त्या चिंतनाला विराम देऊ नका . तुकाराम महाराज म्हणतात ,देवा ,या वचनाने तुला अगोदरच बांधून टाकीत आहे .याचे कारण ,यापुढे तरी तू माझ्या चांगल्या वर्तनाविषयी काळजी घेशील
अभंग क्र.१८३८
मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥१॥
तैसें जालें माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥ध्रु.॥
वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिसा सिंधू ॥२॥
सारसांसी निशीं । ध्यान रवीच्या प्रकाशीं ॥३॥
जीवनाविण मत्स्य । जैसें धेनूलागीं वत्स ॥४॥
पतिव्रते जिणें । भ्रताराच्या वर्त्तमानें ॥५॥
कृपणाचें धन । लोभ्या लागीं जैसें मन ॥६॥
तुका म्हणे काय । तुजविण प्राण राहे ॥७॥
अर्थ:-
आई जर जवळ नसेल तर बालकाला कोणताही सुख सोहळा असेल तरी तो आवडत नाही. हे पंढरीनाथा तुझ्या वाचून अगदी माझ्या चित्तातही तसेच झाले आहे. चातक पक्षी पावसाच्या एका थेंबाची वाट पाहत असतो. त्याच्या समोर सागर किंवा नद्या जरी भरून वाहत असल्या तरीही त्याला त्याची आवड नसते. सारस पक्षाला रात्रीच्या वेळी असे वाटते की, केव्हा एकदा सूर्य प्रकाश पडेल याचेच ध्यान लागत रहात असते. पाण्यावाचून मासा जगू शकत नाही आणि गाय आपल्या वासराकडे ज्याप्रमाणे ओढ घेते अगदी त्याप्रमाणेच देवा मला तुझी ओढ लागली आहे. पतिव्रता स्त्रीला आपला पती आपल्या बरोबर असल्यावरच ज्या प्रमाणेच सुखं वाटते, कृपण माणसाचे म्हणजे कंजूस माणसाचे मन जसे धना वाचून तरफडत असते. तुकाराम महाराज म्हणतात देवा अगदी त्या प्रमाणे माझे झाले आहे तुझ्या वाचून माझे प्राण राहणार आहेत काय?
अभंग क्र.१८३९
तुजऐसा कोणी न देखें उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥१॥
शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ देसी ॥ध्रु.॥
धांवसी आडणी ऐकोनियां धांवा । कइवारें देवा भक्तांचिया ॥२॥
दोष त्यांचे जाळी कल्पकोटिवरी । नामासाठी हरी आपुलिया ॥३॥
तुका म्हणे तुज वाणूं कैशा परी । एक मुख हरी आयुष्य थोडें ॥४॥
अर्थ:-
पांडुरंगा ,अभय दान देण्यात तुझ्यासारखा उदार आणि शूर कोणीही पाहिला नाही .जे तुला शरण येतात तु त्यांच्या गुणदोषांचा विचार करीत नाहीस ;आणि काहीही न मागता सढळ हाताने त्यांना तू अढळपद देतोस . संकटप्रसंगी भक्तांचा धावा ऐकून ,त्यांचा कैवार घेऊन धाव घेतोस . हे हरी ,आपल्या नामाचे महत्व राखण्याच्या अभिमानाने कोट्यावधी कल्पपर्यंतही भोगून न संपणा-या भक्तांच्या पापांना जाळून टाकतोस . तुकाराम महाराज म्हणतात ,हरी ,तुझ्या अनंत गुणांचे वर्णन कसे बरे करू !कारण ,मला एक मुख आहे ;आणि आयुष्य थोडे आहे
अभंग क्र.१८४०
काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगों मी या जगामाजी आतां ॥१॥
जतन हें माझें करूनि संचित । दिलें अवचित आणूनियां ॥ध्रु.॥
घडल्या दोषांचें न घली च भरी । आली यास थोरी कृपा देवा ॥२॥
नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं । न मगतां पाहीं दान दिलें ॥३॥
तुका म्हणे याच्या उपकारासाठी । नाहीं माझें गाठीं कांहीं एंक ॥४॥
अर्थ:-
हे पांडुरंगा तुझे माझ्यावर उपकार आहेत हे जगाला मी सांगू तरी कसे? तू आज पर्यंत माझे पूर्व पुण्याचे संचित जतन करून ठेवले आणि अवचितच माझ्या हातात आणून दिले आहे. माझ्याकुन घडलेल्या दोषांच्या भरिला तू माझे पुर्वपुण्य घातले नाहीस त्यामुळेच माझे पूर्वपुण्य जसेच्या तसे राहून मी मनुष्य देहाला आलो हिच तुझी माझ्यावर खूप मोठी कृपा आहे देवा. देवा मला जे दान कधी माहीत नव्हते, कधी जे दान मी ऐकलेही नाही, कधी जे दान मी पाहिले नाही ते दान तु मला दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझ्यावर एवढा मोठा उपकार केला परंतु त्या बदल्यात तुला देण्यासाठी माझ्या पदरात काहीच नाही
अभंग क्र.१८४१
वाळूनियां जन सांडी मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं ॥१॥
आठवीन पाय धरूनि अनुताप । वाहे जळ झोंप नाहीं डोळां ॥ध्रु.॥
नावडती जीवा आणीक प्रकार । आवडी ते फार एकांताची ॥२॥
तुका म्हणे ऐसी धरितों वासना । होई नारायणा साह्य मज ॥३॥
अर्थ:-
हे हरी लोक माझा तिरस्कार करून मला एकांतात दूर कधी लोटून देतील व अशी परिस्थिती तु माझी कधी करणार आहेस? एकदा की मला या लोकांनी दूर लोटून दिले की मी अनुताप करून तुझ्या पायाचे सतत चिंतन करीन आणि या कारणामुळे माझ्या डोळ्याला झोपही लागत नाही व सारखे त्या डोळ्यातून अश्रु वाहत आहेत. माझ्या जीवाला तर इतर कोणतेही प्रकार आवडत नाही केवळ एकांताची आवड माझ्या जीवाला फार आहे . तुकाराम महाराज म्हणतात देवा नारायणा मी अशीच वासना माझ्या मनात धरली आहे आणि ती वासना पूर्ण करण्यासाठी तू मला साह्य व्हावे
अभंग क्र.१८४२
सांगतों या मना तें माझें नाइके । घातावरी टेंके चांडाळ हें ॥१॥
म्हणऊनि पाहे तरतें बुडतें । न ल्हाये पुरतें बळ करूं ॥ध्रु.॥
काय तें संचित न कळे पाहातां । मतिमंद चिंत्ता उपजतें ॥२॥
तुका म्हणे ऐसें बळ नाहीं अंगी । पाहोनियां वेगीं पार ठाकीं ॥३॥
अर्थ:-
माझ्या मनाला मी चांगला उपदेश करण्याचा प्रयत्न करतो परंतु ते काही माझे ऐकत नाही या उलट हे चांडाळ मन माझ्या घाता वर टपलेले आहे. म्हणून मी या संसार डोहामध्ये तरेल की बुडेल हेच पाहत आहे कारण मनावर मी ताबा ठेवू शकेल एवढे तरी बळ अजून माझ्यात नाही. मी माझे पूर्व संचित पाहतो तर ते मला काही कळत नाही आणि विद्या ग्रहण करावे म्हटले तर माझी बुद्धी मंद आहे त्यामुळे या संसार डोहातून मी कसा तरुन जाईल याविषयी चिंता माझ्या मनामध्ये उत्पन्न होते. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या अंगी असे बळ नाही की मी वेगाने हा संसार डोह पार करून तुझ्या ठिकाणी येऊन पोहोचेल
अभंग क्र.१८४३
आतां नको चुकों आपुल्या उचिता । कृपाळुवा कांता रखुमाईच्या ॥१॥
आचरावे दोष हें आम्हां उचित । तारावे पतित तुमचें तें ॥ध्रु.॥
आह्मी तों आपुलें केलेसें जतन । घडो तुम्हांकून घडेल ते ॥२॥
तुका म्हणे विठो चतुराच्या राया । आहे ते कासया मोडों देसी ॥३॥
अर्थ:-
हे रुक्मिणीच्या कांता कृपाळू तू आपले कर्तव्य करण्यास आता चुकू नकोस. अहो आम्ही दोष करावे आणि आमच्याकडून त्याचे कदाचित आचारणही व्हावे असे होऊ शकते परंतु तुम्ही पतितपावन आहात तुम्ही पतीतांनां तारावे हे तुमचे कर्तव्यच आहे देवा. आम्ही आमचे कार्य केले आहे आता तुमच्याकडून काय घडेल ते घडो. तुकाराम महाराज म्हणतात हे विठोबा राया तू चतुरांचाही राजा आहेस तुझे जे कर्तव्य आहे त्याची परंपरा तु का मोडू देतोस
अभंग क्र.१८४४
मुखें बोलावें तें जीविंचें जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे ॥१॥
आतां हेंचि भलें भाकावी करुणा । विनियोग तो जाणां तुह्मी याचा ॥ध्रु.॥
आपलें तों येथें केलें नव्हे कांहीं । साधनाचा वांहीं पडों नये ॥२॥
तुका म्हणे देह दिला पिंडदान । वेळोवेळां कोण चिंता करी ॥३॥
अर्थ:-
आम्ही मुखाने काय बोलणार आहोत हे आमच्या अंतकरणातील तुम्ही आधीच जाणता देवा आणि त्या विषयी सर्व माहिती मी तुमच्या पाया पाशी विदीत केली आहे . आता हेच चांगले की तुमची करुणा भाकावी आणि त्याचा पुढे काय विनियोग आहे हे तर तुम्ही जाणता आहात. आम्ही काही करावे तर करूनही न केल्यासारखेच आहे त्यामुळे मी आता कोणत्याही साधनाच्या प्रवाहामध्ये पडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही हा देहरूपी पिंड तुला केव्हाच अर्पण केला आहे त्यामुळे त्याची आता वेळोवेळी कोण चिंता करते आहे
अभंग क्र.१८४५
कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥१॥
नवल हे लीळा कर्त्याचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले ॥ध्रु.॥
लोभालोभ एका धनाचिये ठायीं । आणिकांची सोई चाड नाहीं ॥२॥
तुका म्हणे भूक न विचारी प्रकार । योजे तें चि सार यथाकाळें ॥३॥
अर्थ:-
प्रेरणादायक संस्कृत श्लोक
कामातूर व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे भय किंवा लाज वाटत नाही तो कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही शरीर सुखापुढे तो आपले शरीर देखील तृणाप्रमाणे मानतो. त्याचे हे असे चाळे पाहून खरे तर नवल वाटते परंतु त्याच्या प्रारब्धाने त्याच्या ठिकाणी कामभाव उत्पन्न केलेला असतो. कामातूर झालेला माणूस जसा भोग सुखासाठी तरफडतो आणि जसा धनासाठी आसुसलेला मनुष्य वेडा होतो त्या दोघांचेही सामानच कार्य असते त्यांना इतरांची काहीच चिंता वाटत नाही.तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याला भूक लागल्यामुळे त्या मणुष्याला अन्न चांगले आहे की खराब आहे याचा काहीच विचार येत नाही त्यावेळी ते अन्न चांगलेच आहे असे समजून तो अन्न खात असतो
अभंग क्र.१८४६
बांधी सोडी हें तों धन्याचिये हातीं । हेंकडें गोविती आपणां बळें ॥१॥
भुललियासी नाहीं देहाचा आठव । धोतऱ्यानें भाव पालटिला ॥ध्रु.॥
घरांत रिघावें दाराचिये सोई । भिंतीसवें डोई घेऊनि फोडी ॥२॥
तुका म्हणे देवा गेलीं विसरोन । आतां वर्म कोण दावी यांसी ॥३॥
अर्थ:-
बंधनात पडणे किंवा त्यातून सुटका करून घेणे हे ब्रह्मांडाचा जो धणी आहे त्याच्या हातात आहे परंतु हेक्कड मनुष्याला हे कळत नाही त्यामुळे तो स्वतः अडचणीत पडतो. जो धोत्र्याची बी खातो त्याला त्याच्या देहाचे देखील भान राहत नाही तो भ्रमिष्ट होतो त्यामुळे त्याच्या मनाचा भाव पलटतो. तो भ्रमिष्ट झालेल्या मनुष्य भिंतीला दरवाजा आहे असे समजून तेथून घरात प्रवेश करण्यास जातो परंतु तेथे भिंत असल्यामुळे त्या भिंतीला धडकून स्वतःचे डोके फोडून घेतो. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे भ्रमिष्ट झालेली काही मनुष्य देवाला विसरून गेले आहेत आता त्यामुळे त्यांना परमार्थातील खरे रहस्य कोण दाखवील
अभंग क्र.१८४७
कवण जन्मता कवण जन्मविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥१॥
कवण हा दाता कवण हा मागता । न कळे कृपावंता माव तुझी ॥ध्रु.॥
कवण भोगिता कवण भोगविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥२॥
कवण ते रूप कवण अरूपता । न कळे कृपावंता माव तुझी ॥३॥
सर्वां ठायीं तूंचि सर्व ही जालासी । तुका म्हणे यासी दुजें नाही ॥४॥
अर्थ:-
हे कृपावंता या जगामध्ये कोण जन्म घेणारा आहे आणि कोण जन्म देणारा आहे ही काही तुझी माया मला कळत नाही.हे कृपावंता या जगामध्ये कोण दाता आहे आणि कोण मागणार आहे ही तुझी माया मला काही कळत नाही.हे कृपावंता या जगामध्ये कोण बघणार आहे आणि कोण भागविणारा आहे ही तुझी माया मला काही कळत नाहीहे कृपावंता या जगामध्ये कोणाला रूप आहे आणि कोण अरूप आहे ही तुझी माया मला काही कळत नाही.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी माया जर बाजूला काढून सारली तर जगामध्ये सर्व ठिकाणी तूच आहेस असेच लक्षात येते तुझ्या वाचून येते दुसरे कोणीही नाही हे कळून येते
अभंग क्र.१८४८
जेथें देखें तेथें तुझीच पाउलें । विश्व अवघें कोंदाटलें ।
रूप गुण नाम अवघा मेघश्याम । वेगळें तें काय उरलें ।
जातां लोटांगणीं अवघीच मेदिनी । सकळ देव पाट जालें ।
सदा पर्वकाळ सुदिन सुवेळ । चित्त प्रेमें असे धालें ॥१॥
अवघा आम्हां तूंच जालासी देवा । संसार हेवा कामधंदा ।
न लगे जाणें कोठें कांहींच करणें । मुखीं नाम ध्यान सदा ॥ध्रु.॥
वाचा बोले ते तुझेचि गुणवाद। मंत्रजप कथा स्तुति ।
भोजन सारूं ठायीं फल तांबुल कांहीं । पूजा नैवेद्य तुज होती ।
चालतां प्रदक्षणा निद्रा लोटांगण । दंडवत तुजप्रति ।
देखोन दृष्टी परस्परें गोष्टी । अवघ्या तुझ्या मूर्ती ॥२॥
जाल्या तीर्थरूप वावी नदी कूप । अवघें गंगाजळ जालें ।
महाल मंदिरें माड्या तनघरें । झोपड्या अवघीं देव देवाइलें ।
ऐकें कानीं त्या हरीनाम ध्वनी । नाना शब्द होत जाले ।
तुका म्हणे या विठोबाचे दास । सदा प्रेमसुखें धालो रे ॥३॥
अर्थ:-
देवा मी जिकडे पाहतो तिकडे तुझीच पावले आहे व अवगे विश्वच त्याने कोंडले आहे. सर्व रूप गुण नाम हे मेघ श्याम रूपच आहेत या वाचून दुसरे काय उरले आहे. मी ज्या धरती वरून चालतो ,लोटांगण घालतो ती सर्व देवाला बसायचा पाठच आहे. सदासर्वकाळ मला सुदिन सोहळा झाला आहे असेच वाटते कारण माझे चित्त हरी प्रेमाने भरून गेले आहे तृप्त झाले आहे. देवा आम्हाला संसारातील सर्व काम धंदा हेवा तूच झाला आहेस. त्यामुळे आम्हाला कुठे जावा लागत नाही किंवा काही करावे लागत नाही आमच्या मुखामध्ये तुझे नाम आणि तुझे ध्यान आमच्या चित्तामध्ये सर्व काळ चालू असते. मी वाचेणे जे काही बोलत आहे ते तुझे पूर्णवाद मंत्र जप कथा स्तुतीच होत असते. मी ज्या ठ
अभंग क्र.१८४९
जे दोष घडले न फिटे करितां कांहीं । सरते तुझ्या पायीं जाले तैसे ॥१॥
माझा कां हो करूं नये अंगीकार । जालेती निष्ठुर पांडुरंगा ॥ध्रु.॥
यातिहीन नये ऐकों ज्यां वेद । तयां दिलें पद वैकुंठींचें ॥२॥
तुका म्हणे कां रे एकाचा आभार । घेसी माथां भार वाहोनियां ॥३॥
अर्थ:-
देवा भयंकर महादोष ज्यांच्या हातून घडले की त्याचे कितीही प्रायचित्त घेतले तरी ते फिटत नाही परंतु ते तुला श्रद्धायुक्त शरण आले तर त्यांनाही तु तुझ्या पायाच्या ठिकाणी आश्रय दिला आहेस. मग हे पांडुरंगा तुम्ही माझा अंगिकार का करू नये माझ्याविषयी तुम्ही इतके निष्ठुर का झाले आहात? असे तुझे काही हिन जातीचे भक्त आहेत की ज्यांना वेद देखील ऐकण्याची परवानगी नाही मग त्यांनाही तू वैकुंठीचे पद दिले आहे . तुकाराम महाराज म्हणतात देवा अरे तू कित्येक भक्तांचा भार आपल्या माथ्यावर वाहत आहेत परंतु मग माझा एकट्याचाच भार तु का घेत नाहीस?
अभंग क्र.१८५०
हरीकथेची आवडी देवा । करितो सेवा दासांची ॥१॥
म्हणोनि हिंडे मागें मागें । घरटी जागे घालितसे ॥ध्रु.॥
निर्लज्ज भोजें नाचे रंगीं । भरतें अंगीं प्रेमाचें ॥२॥
तुका म्हणे विकलें देवें । आपण भावें संवसाटी ॥३॥
अर्थ:-
देवाला हरिकथेची फार आवड आहे ;म्हणून तो हरिकथा करणा-या भक्तांची सेवा करतो .एवढेच नव्हे ,तर ते भक्त जिकडे जातील ,त्यांच्या मागे मागे हिंडत राहतो ;व ते ज्या जागी बसतील ,त्यांच्याभोवती घिरट्या घालतो ,किंवा रात्री ज्या भक्तांच्या घरी हरिनामकीर्तन चालू असते .त्या प्रत्येकाच्या घरी जागता पहारा घालीत फिरतो . हरिकथा चालू असते तेव्हा देव निर्लज्ज होऊन त्या रंगात नाचतो ;व त्या वेळी त्याच्या अंगात प्रेमाचे भरते येते . तुकाराम महाराज म्हणतात ,हरिभक्तांच्या निःसीम व अनन्य प्रेमाच्या बदली स्वतःला देवाने विकून टाकले आहे
अभंग क्र.१८५१
साधन संपत्ती हेंचि माझें धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥
शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळीच नीट सुखरूप ॥ध्रु.॥
वैष्णवांचा संग राम नाम गाणें । मंडित भूषणे अळंकार ॥२॥
भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडीच चाली जावें पायी ॥३॥
मायबाप दोघें पाहातील वाट । ठेवूनिया कटीं कर उभी ॥४॥
तुका म्हणे केव्हां देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥५॥
अर्थ:-
विठोबाचे चरण हीच आमची योगयोगादी आणि विवेकवैराग्यादी साधनसंपत्ती आहे ;व हेच आमचे धनही आहे .पंढरीची वाट म्हणजेच माझ्या माहेरची वाट आहे .ही वाट शांत ,जवळची ,सरळ आणि सुखाची आहे . वैष्णवांची संगती आणि त्यांच्या संगतीत ‘ राम ‘ नामांचे गीत गाणे हीच आमची भूषणे आणि अलंकार आहेत ,आणि या अलंकार- भूषणांनी आम्ही सुशोभित झालो आहोत . ही भवनदी कधीच आड आली नाही ;किंबहुना ती नव्हतीच असे झाले आहे ;आणि कोरड्या पायाने चालत जावे ,अशी स्थिती झाली आहे . माझे मायबाप श्रीरूक्मिणी-पांडुरंग ,ही दोघे कटावर हात ठेऊन उभी असलेली माझी निरंतर वाट पाहात असतील . तुकाराम महाराज म्हणतात ,मी पंढरीला जाऊन केव्हा श्रीपंढरीरायाचा कळस बघेन ,असे मला झाले आहे ;आणि त्यामुळे आळस ,निद्रा ,भूक ही सारी पळाली आहेत
अभंग क्र.१८५२
यथार्थवादें तुज न वर्णवे कदा । बोलतों ते निंदा करितों तुझी ।
वेदश्रुति तुज नेणती कोणी । चोवीस ठेंगणीं धांडोळितां ॥१॥
आतां मज क्षमा करावें देवा । सलगी ते केशवा बोलियेलों ॥ध्रु.॥
सगुण कीं साकार निर्गुण कीं निराकार । न कळे हा पार वेद श्रुतीं ।
तो आह्मी भावें केलासी लहान । ठेवूनियां नांवें पाचारितों ॥२॥
सहस्रमुखें शेष सीणला स्तवितां । पार न कळतां ब्रह्मा ठेला ।
तेथें माझी देहबुद्धी तें काई । थोर मी अन्यायी तुका म्हणे ॥३॥
अर्थ:-
देवा मी यथार्थ वादाने तुझे वर्णन करायला गेलो होतो ते मला कदापि शक्य नाही परंतु आता मी तुझ्या विषयी स्तुती रुपी जे काही शब्द बोलत आहे ती एक प्रकारची निंदाच आहे. वेद उपनिषदे तुला जाणत नाहीत आणि चोवीस शास्त्र म्हणजे आठरा पुराणं व सहा शास्त्र तुझा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनाही तु सापडला नाही. त्यामुळे हे देवा तुम्ही आता मला क्षमा करावी हे केशवा मी जे काही तुमच्या विषयी स्तुतीरूप शब्द बोलत आहे ते सलगीने बोलत आहे. देवा तु सगुण-साकार आहेस की निर्गुण निराकार आहेस हे वेद-उपनिषदांना देखील कळत नाही. अशा या देवाला आम्ही आमच्या भक्तिभावाने लहान केले आहे आणि त्याला विविध प्रकारचे नावे ठेवून बोलवत आहोत. असा हा हरी आहे याच्याविषयी हजारो मुख असलेला शेष देखील त्याचे वर्णन करता करता शिणला आणि ब्रम्हदेवाला याचा अंतपार न लागल्यामुळे तोही शांत झाला. तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना देखील तुमचे वर्णन करणे जमले नाही तेथे माझ्या बुद्धी ने तुमचे वर्णन करणे म्हणजे एक प्रकारचा अपराध आहे अन्यायच आहे
अभंग क्र.१८५३
कृष्ण ध्यातां चित्तीं कृष्ण गातां गीतीं । ते ही कृष्ण होती कृष्णध्यानें ॥१॥
आसनीं शयनीं भोजनीं जेवितां । म्हणारे भोगिता नारायण ॥ध्रु.॥
ओविया दळणीं गावा नारायण । कांडितां कांडण करितां काम ॥२॥
नर नारी याति हो कोणी भलतीं । भावें एका प्रीती नारायणा ॥३॥
तुका म्हणे एका भावें भजा हरी । कांति ते दुसरी रूप एक ॥४॥
अर्थ:-
जो कृष्णा चे ध्यान करतो जो कृष्णाचे गीत गातो, तो ध्यान करणारा आणि गीत गाणारा कृष्णासारखा होतो. त्यामुळे हे जण हो तुम्ही झोपलेले असताना बसलेले असताना जेवण जेवत असताना एवढेच नाही तर कोणतेही भोग भोगत असताना नारायण नारायण म्हणत रहा. हे स्त्रियांनो तुम्ही देखील दळण दळत असताना कांडण करीत असताना आणि कोणतेही काम करत असताना नारायणाच्याच ओव्या गात रहा. कोणत्याही जातीचा पुरुष असो किवा स्त्री असो त्या सर्वांनी एकनिष्ठ भक्ती भावाने नारायणाचे गुणगान ऐकावे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एकनिष्ठेने हरीला भजा, जसे सूर्य आणि त्याची कांती ही वेगवेगळी असते परंतु दोघांचे ही रूप एकच असते तसे तुमचे व हरीचे एकरूप होईल.
अभंग क्र.१८५४
डोळियां पाझर कंठ माझा दाटे । येऊं देई भेटे पांडुरंगे ॥१॥
बहु दिस टाकिले कां निरास केलें । कोठें वो गुंतलें चित्त तुझें ॥ध्रु.॥
बहु धंदा तुज नाहीं वो आठव । राहिलासे जीव माझा कंठीं ॥२॥
पंढरीस जाती वारकरी संतां । निरोप बहुतां हातीं धाडीं ॥३॥
तुजविण कोण सांवा धांवा करी । ये वो झडकरी पांडुरंगे ॥४॥
काय तुझी वाट पाहों कोठवरी । कृपाळु कांपरी विसरलासी ॥५॥
एक वेळे माझा धरूनि आठव । तुका म्हणे ये वो न्यावयासी ॥६॥
अर्थ:-
हे पांडुरंगा तुझ्या वियोगाणे आता माझ्या डोळ्यांना पाझर फुटला आहे माझा कंठ दाटून आला आहे त्यामुळे लवकर यावे आणि मला भेट द्यावी. देवा तू माझा त्याग करून बरेच दिवस झाले आहेत माझी निराशा केली आहेस माझ्यापासून तुझे चित्त इतर कोणत्या कामात गुंतले आहे की काय?देवा मला माहित आहे तुझ्या पाठीमागे खूप उद्योग धंदा आहे त्यामुळे तुला माझी आठवण येत नाही परंतु तुझ्या वियोगाने माझा जीव कंठात आला आहे. मी पंढरपूरला जे वारकरी संत जातात त्यांच्या कडे खूप वेळा माझा निरोप पाठवला आहे. हे पांडुरंगा तुझ्या वाचुन कोण मला सहाय्य करेल त्यामुळे हे पांडुरंगा तु लवकर धावत माझ्याकडे यावे. हे कृपाळू देवा मी तुझी वाट कुठपर्यंत पाहू तू मला विसरला आहेस की काय? तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तु एकदा तरी माझी आठवण काढ आणि मला तु घ्यायला ये.
अभंग क्र.१८५५
काय करूं या मना आतां । का विसरातें पंढरिनाथा ।
करी संसाराची चिंता । वेळोवेळां मागुती ॥१॥
अधिक कोंडितां चरफडी । भलतीकडे घाली उडी ॥ध्रु.॥
भजन नावडे श्रवण । धांवे विषय अवलोकून ॥२॥
बहुत चंचळ चपळ । जातां येतां न लगे वेळ॥३॥
किती राखों दोनी काळ । निजलिया जागे वेळे ॥४॥
मज राखें आतां । तुका म्हणे पंढरिनाथा ॥५॥
अर्थ:-
आता या मनाला काय करावे हे पंढरीनाथाला का विसरत असेल बरे? हे मन मात्र संसाराची चिंता वेळोवेळा करीत असते. हे मन विचित्र आहे याला कोंडून ठेवले की ते तरफडते मग ते भलत्याच ठिकाणी उडी घालत असते. या मनाला हरी भजन हरी कथा श्रवण करणे आवडत नाही पण ते विषयाकडे आवर्जून धाव घेत असते. हे मन अतिशय चंचल व चपळ आहे त्याला कोठेही जाऊन येण्यास अधिक वेळ लागत नाही.झोपलेले असताना व जागे असताना या मनाचे रक्षण दोन्ही काळात कोठ पर्यंत करावा? तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा आता तुम्हीच माझे रक्षण करावे.
अभंग क्र.१८५६
कंथा प्रावर्ण । नव्हे भिक्षेचे ते अन्न ॥१॥
करीं यापरी स्वहित । विचारूनि धर्म नीत ॥ध्रु.॥
देऊळ नव्हे घर । प्रपचं परउपकार ॥२॥
विधी सेवन काम । नव्हे शब्द रामराम ॥३॥
हत्या क्षात्रधर्म । नव्हे निष्काम ते कर्म ॥४॥
तुका म्हणे संतीं । करूनि ठेविली आइती ॥५॥
अर्थ:-
संन्याशांची कथा अशी आहे की त्यांच्या अंगावरील वस्त्र हे साधारण वस्त्राप्रमाणे समजू नये आणि भिक्षेत आलेले पवित्र अन्न त्याची तुलना इतर अन्ना शी करू नये. याप्रमाणे धर्मनीती आहे व त्याप्रमाणे तू विचार करून आपले हित करून घ्यावे. देवळाला घर म्हणू नये आणि परोउपकार करणे याला प्रपंच म्हणू नये. विधिपूर्वक शास्त्रशुद्ध मार्गाने केलेले विषय व भोग याला काम म्हणजे वासना म्हणू नये आणि राम राम हे साधे शब्द आहेत असे म्हणू नये. क्षत्रिय धर्मानुसार युद्धांमध्ये शत्रूला मारले तर त्याला हत्या म्हणू नये आणि निष्काम कर्म असेल तर त्याला कर्म मुळीच म्हणू नये. तुकाराम महाराज म्हणतात अशी धर्मनीती संतांनी करून ठेवली आहे त्याप्रमाणे आपण वागावे.
अभंग क्र.१८५७
पडोनियां राहीं । उगाच संतांचिये पायीं ॥१॥
न लगे पुसणें सांगावें । चित्त शुद्ध करीं भावें ॥ध्रु.॥
सहज ते स्थिति । उपदेश पर युक्ती ॥२॥
तुका म्हणे भाव । जवळी धरूनि आणी देव ॥३॥
अर्थ:-
अरे नरा ,संतांच्या पायाजवळ उगाच पडून राहा .त्यांना ज्ञानासंबंधी काही पुसावे ,सांगावे लागत नाही संतांचे ठिकाणी निष्ठा ठेवून प्रथम चित्ताची शुध्दता कर . ते संत तुझा उत्कृष्ट अधिकार पाहून आपोआप ब्रम्हज्ञानाचा उपदेश अनेक युक्ति – प्रयुक्तींनी करतील . तुकाराम महाराज म्हणतात ,याप्रमाणे संतांवर विश्वास ठेवला तर तो भक्तीभाव देवालाही जवळ आणतो .
अभंग क्र.१८५८
देवाचे घरीं देवें केले चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ॥१॥
धांवणियां धांवा धांवणियां धांवा । मागचि नाहीं जावें कवणिया गांवा ॥ध्रु.॥
सवेंचि होता चोर घरिचिया घरीं । अवघें केलें वाटोळें फावलिया वरी ॥२॥
तुका म्हणे येथें कोणीच नाहीं । नागवलें कोण गेलें कोणाचें काई ॥३॥
अर्थ:-
जीवरूपी देवाच्या घरी ईश्वररूपी देवाने काम – कर्म अविद्येची चोरी केली ;आणि अशा रीतीने देवानेच जीवरूपी देवाला लुटून त्याला भिकारी – असंग करून टाकले आहे .याकरिता धावणारे लोकहो ,धावा धावा ;पण ज्याने आपल्या शोधाचे साधनच ठेवले नाही .ज्याने कार्य-कारणांचा अत्यंत भावरूप बाध केला आहे ,त्या अव्यक्त ,निराकार चोर देवाचा शोध करण्याकरिता कोण्या गावाला जावे ? ते मात्र कळत नाही हो ! तो चोर देव इतके दिवस अंतःकरणरूपी घरातच आमच्या बरोबरच राहात होता ;आणि चित्तशुध्दीची संधी सापडताच त्याने जीवाचे वाटोळे केले .देहादी उपाधींचा निरास केला . तुकाराम महाराज म्हणतात ,जेव्हा जीवरूपी देवाची ईश्वररूपी देवाने चोरी केली ,त्या अवस्थेत जीवेश्वराचे परम ऐक्य झाल्यामुळे दोघांपैकी भिन्न असा कोणीच राहिला नाही ;तर मग त्या अद्वैतस्थितीत कोणी कोणाला लुटले ;आणि कोणाचे काय गेले ? अर्थात सारेच मिथ्या आहे .
अभंग क्र.१८५९
जतन करा रे जतन करा । घालूं पाहे घरावरी घाला चोरटें ॥१॥
अवघेचि निजों नका अवघिये ठायीं । वेळ अवेळ तरी सांभाळावी कांहीं ॥ध्रु.॥
सीतरिलीं फार खाती भोंवताले फेरे । गेलें नये हातां सेकीं तळमळ उरे ॥२॥
तुका म्हणे आह्मी करूं आपलें जतन । न लगे कांहीं कोणां घावें उघडारे कान ॥३॥
अर्थ:-
लोकहो ,परमार्थरूपी धनाचे रक्षण करा .कारण ,देहरूपी घरावर काळरूपी चोरटे घाला घालू पाहात आहे .तुम्ही सर्वजण सर्वकाळ निजू नका .वेळ – अवेळ काहीतरी बघत जा ;व प्रसंगी विशेषी सावध राहा . मायिक विषयांनी ठकविलेली माणसे अनेक योनींच्या भोवती मरणाचे फेरे घालतात .मनुष्य देहरूपी निधान एकदा का गेले ;म्हणजे पुनः ते हाताशी येत नाही ,व शेवटी तळमळ करणे तेवढे उरते . तुकाराम महाराज म्हणतात ,आम्ही आपले परमार्थ धन जतन करू .या परमार्थ धनाचे रक्षण करण्याकरिता कोण्या रखवालदार शिपायाला पगार द्यावा लागत नाही .लोकहो ,तुम्हीदेखील माझा हा उपदेश कान उघडे ठेवून ऐका .व परमार्थ धनाचे रक्षण करा .
अभंग क्र.१८६०
काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हितें जाले जनामध्यें शूर ॥१॥
कां रें तुह्मी नेणां कां रे तुह्मी नेणां । अल्प सुखासाठी पडशी विपत्तीचे घाणां ॥ध्रु.॥
नाहीं ऐसी लाज काय तयांपें आगळें । काय नव्हे केलें आपुलिया बळें ॥२॥
तुका म्हणे तरी सुख अवघेंचि बरें । जतन करून हे आपुलालीं ढोरें ॥३॥
अर्थ:-
अर्थ:-:–ज्या संतांनी साधकावस्थेत असताना मोठ्या धैर्याने परमार्थासंबंधी अनेक युक्त्या लढवून हरीविषयी अज्ञान दूर केले ;व आपले हित साधले ,ते संत या जनामध्ये मोठे शूर झाले आहेत .लोकहो ,हे तुमच्या लक्षात का येत नाही ? विषयाच्या अल्प सुखासाठी अनेक विपत्तींच्या घाण्यात निष्कारण का पडता ? संतांप्रमाणे तुम्हीदेखील परमार्थाचा पक्ष घेऊन व अज्ञान नष्ट करून हित साधा .परमार्थ करण्याकरिता तुमच्यापेक्षा संतांमध्ये कोणता विशेष गुण होता ;आणि तुमच्यात त्यांच्यापेक्षा कोणती न्यूनता आहे .सांगा ! दोघांनाही मनुष्यदेह तर सारखाच आहे ,मग संतांनी मुक्त होऊन सुखी व्हावे ;आणि तुम्ही मात्र मनुष्यदेह असून बध्द दुःखी राहावे ,याची तुम्हाला लाज वाटू नये काय ? अरे ,आपल्या प्रयत्नबळाने केले तर काय एक होत नाही ? तुकाराम महाराज म्हणतात ,लोकहो ,संतांप्रमाणे तुम्ही परमार्थ केला ,तर तुमचे सर्वतोपरी कल्याण होऊन सुखप्राप्ती होईल ; पण त्याकरिता प्रथम इंद्रियरूपी पशूंचे रक्षण करा .
अभंग क्र.१८६१
जाय परते काय आणिला कांटाळा । बोला एक वेळा ऐसे तरी ॥१॥
कां हो केली तुम्ही निष्ठुरता देवा । मानेना हे सेवा करितों ते ॥ध्रु.॥
भाग्यवंता त्यांसी सांगितल्या गोष्टी । ते नाहीं अदृष्टी आमुचिया ॥२॥
तुका म्हणे तुम्हा पासूनि अंतर । न पडे नाहीं स्थिर बुध्दी माझी ॥३॥
अर्थ:-
देवा ,तुम्ही माझा कंटाळा का धरला आहे ? खरेच तुम्हाला माझा कंटाळा आला असेल, तर “तू येथून चालता हो ” असे तरी एकदाचे सांगा .पण देवा ,माझ्याविषयी इतकी निष्ठुरता का केली आहे ? मी जी सेवा करतो ; ती तुम्हाला पटत नाही काय ? जे भाग्यवान भक्त होते ,त्यांच्याशी तुम्ही गोड गोड बोलला ; व त्यांना उपदेश केला ; पण माझ्या अदृष्टात ते सुख दिसत नाही . तुकाराम महाराज म्हणतात ,देवा ,तुमची माझ्यावर कृपा होत नाही ,याला कारण, तुमच्याकडून माझ्यामध्ये अंतर पडले असे नाही ,तर माझी बुध्दी स्थिर होत नाही ; यात तुमचा तरी काय दोष आहे ?
अभंग क्र.१८६२
अनुभवें कळो येते पांडुरंगा । रुसावे ते कां गा तुम्हांवरी ॥१॥
आवरीता चित्त नावरे दुर्जन । घात करी मन माझे मज ॥२॥
अंतरी संसार भक्ति बाह्यात्कार । म्हणोनी अंतर तुझ्या पायी ॥३॥
तुका म्हणे काय करूं नेणें वर्म । आले तैसे कर्म सोसूं पुढे ॥४॥
अर्थ:-
हे पांडुरंगा आम्हाला तुमची प्राप्ती का होत नाही आता हे मला चांगले अनुभवाने कळून आले आहे उगाच तुमच्यावर आम्ही का रुसावे? माझे चित्त दुर्जन झाले आहे त्याला कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी तर ते आवरत नाही आणि माझे मनच माझा घात करण्याचा प्रयत्न करीत आहे. देवा माझ्या अंतरंगामध्ये संसार आहे आणि वरवर फक्त मी बाह्य अंगाने भक्ती करतो असे दाखवतो आहे म्हणूनच तुझ्या भक्तीमध्ये माझे अंतर पडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मी काय करू मला तुझी भक्ती कशी करावी याचे वर्म काही कळत नाही त्यामुळे आता जसे कर्म होईल तसे चांगले कर्म करू आणि यापुढे त्याचे भोग ही आम्ही सोसु.
अभंग क्र.१८६३
तुजकरितां होतें आनाचें आन । तारिले पाषाण उदकीं देवा ॥१॥
कां नये कैवार करूं अंगीकार । माझा बहु भार जड जाला ॥ध्रु.॥
चुकलासी म्हणों तरी जीवांचाही जीव । रिता नाहीं ठाव उरों दिला ॥२॥
तुका म्हणे ऐसें काय सत्ताबळ । माझे परी कृपाळ आहां तुह्मी ॥३॥
अर्थ:-
देवा ,तू सर्वशक्तीमान असल्यामुळे मनात आणले तर तुला एका वस्तूला दुस-या वस्तूचे रूप किंवा त्यात वाटेल तसा बदल करता येणे शक्य आहे ;म्हणून तर तू पाण्यावर दगड तारले ,देवा ,तू एवढा शक्तिमान असताना माझा कैवार का घेत नाहीस ! माझा अंगीकार का करीत नाहीस ;ते सांग ? तुला वाटेल ते करता येते ;आणि माझेच तेवढे ओझे तुला फार जड झाले काय ? बरे ,मला विसरलास म्हणावे ,तर तू माझ्या जीवाचाही अधिष्ठानभूत जीव आहेस ;आणि तुझी एवढी व्याप्ती आहे की ,जगातील कोणतेही ठिकाण तू आपल्यावाचून रिकामे ठेवले नाही . तुकाराम महाराज म्हणतात ,देवा ,तुम्ही माझा अंगीकार केलाच पाहिजे ,अशी सत्ता गाजविण्यासारखे माझ्याजवळ कोणते असे बळ आहे ? पण तुम्ही कृपाळू आहात त्यामुळे अंगीकार करालच ,यात संशय नाही .
अभंग क्र.१८६४
फळ देंठींहून झडे । मग मागुतें न जोडे ॥१॥
म्हणोनि तांतडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥ध्रु.॥
पुढें चढे जरी हात । त्याग मागिलां उचित ॥२॥
तुका म्हणे रणीं । नये पाहों परतोनि ॥३॥
अर्थ:-
एकदा फळ देठापासून तुटले तर ते पुन्हा झाडाला जोडले जात नाही. त्यामुळे अध्यात्म करताना तातडी करणे हे चुकीचे आहे कोणतेही योग्य कर्म करण्यासाठी पुर्ण विचार केल्यानंतरच ते योग्य कर्म जन्मला येते. जर पुढे चांगल्या प्रकारचा लाभ होत असेल व त्या लाभा करता हात पुढे सरकत असेल तर मग मागे झालेल्या कनिष्ठ लाभाचा त्याग करणे उचित ठरते म्हणजे एखादे साधनाचे आपल्याला पूर्णपणे ज्ञान झाले की मग त्याला सोडून पुढील साधनाकडे सरकावे. तुकाराम महाराज म्हणतात रणांगणा मध्ये युद्ध करण्यासाठी योद्धा गेला तर त्याने मागे वळून पाहू नये त्याचप्रमाणे परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये आपण आलो की पुन्हा मागे केलेले साधने पाहू नये तर अध्यात्मामध्ये नवीन साधने प्राप्त करून घ्यावे यामुळे आपला फायदा होईल.
अभंग क्र.१८६५
अगी देखोनियां सती । अंगीं रोमांच उठती ॥१॥
हा तो नव्हे उपदेश । सुख अंतरीं उल्हास ॥ध्रु.॥
वित्त गोतांकडे । चित्त न घाली न रडे ॥२॥
आठवूनि एका । उडी घाली म्हणे तुका ॥३॥
अर्थ:-
सती सारखी खरी पतिव्रता स्त्री आपल्या पतीची चीता अग्नी पाहून आनंदित होते व तिच्या अंगावर त्या आनंदाने रोमांच उठतात. अशी निष्ठा असे धैर्य केवळ उपदेश केल्याने प्राप्त होत नाही तर त्यासाठी अंतकरणातून सुख आणि उल्हास तयार झाला पाहिजे.ती सती जाणारी स्री आपले चित्त धनाकडे व गणगोताकडे जाऊ देत नाही आणि सती जाणार आहे म्हणून रडत ही नाही. तुकाराम महाराज म्हणतात ती सती जाणारी स्त्री केवळ आपल्या पतीची आठवण करून त्या चितेत उडी मारते त्याप्रमाणेच भक्ताने ही अध्यात्मामध्ये भगवंतासाठी असे प्रेम ठेवले पाहिजे.
अभंग क्र.१८६६
फळ पिके देंठीं । निमित्य वारियाची भेटी ॥१॥
हा तों अनुभव रोकडा । कळों येतो खरा कुडा ॥ध्रु.॥
तोडिलिया बळें। वांयां जाती काचीं फळें ॥२॥
तुका म्हणे मन । तेथे सकळ कारण ॥३॥
अर्थ:-
पूर्णपणे पिकलेले फळ त्याला केवळ वाऱ्याची एक झुळुक लागली तर ते खाली पडते. हा अनुभव तर प्रत्यक्ष कोणीही पाहू शकेल आणि जो पाहील त्यालाच त्याचा अनुभव येईल. आणि जर कच्चे फळ आपण बळाने तोडले तर ते वाया जाते तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपले मनही त्या फळाप्रमाणे आहे ते परिपूर्ण झाले की परमार्थाची केवळ एक जरी झुळुक लागली तरी ते परमार्थामध्ये टपकन पडते आणि तेच आपण बळजबरीने ओढण्याचा प्रयत्न केला तर वाया जाते म्हणूनच आपले मन सर्व कार्य सिद्धीस मुख्य कारण आहे.
अभंग क्र.१८६७
हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट ॥१॥
मग तयाच्या आधारें । करणें ते अवघेंचि बरें ॥ध्रु.॥
सुखदुःख साहे । हर्षोमर्षी भंगा नये ॥२॥
तुका म्हणे जीवें । आधीं मरोनि राहावें ॥३॥
अर्थ:-
ज्या खुंटा च्या आधारे आपल्याला काम करायचा आहे तो अगोदर हलवून पहावा आणि हलत असेल तर त्याला ठोकून ठोकून बळकट करावा. मग तो खुंट बळकट झाला तर त्यावर कार्य करणे चांगले होईल.त्या खुंटा प्रमाणेच आपले मन आहे ते मन इतके बळकट असावे एखाद्या सुखापासून होणारा आनंद आणि दुःख झाल्यावर होणारा क्रोध यांनी आपले मन भंग पावले नाही पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात असेच आपले मन बळकट झाले तर आपण जीव दशेने आधी मरून जावे मग या जगामध्ये ब्रम्हरूपानेच राहावे.
अभंग क्र.१८६८
धांवे माते सोई । बाळ न विचारितां कांहीं ॥१॥
मग त्याचें जाणें निकें । अंग वोडवी कौतुकें ॥ध्रु.॥
नेणे सर्प दोरी । अगी भलतें हातीं धरी ॥२॥
ताविणे तें नेणें । आणीक कांहीं तुका म्हणे ॥३॥
अर्थ:-
लहान बाळ ज्याप्रमाणे इकडे तिकडे पळते, त्याच्या सोबत आई आहे हे जाणून आणि बाकी कसलाही विचार न करता चोहोंकडे धाव घेते आणि मग त्याची आईदेखील त्याच्यासाठी काय योग्य आहे ते पाहते आणि त्याने केलेल्या लहान अंग चाळ्यांचे आणि तोंड वेडावण्याचे देखील कौतुक करते, तसेच असे हा लहानगा सर्प आणि दोरी ह्यातला फरक न कळल्यामुळे ते हाती धरण्याचा प्रयत्न करतो, इतकेच काय परंतु आगीला देखील मुठीत घ्येण्याचा प्रयत्न करतो, परंतु ह्या सर्वांतून आई त्याचा पदोपदी सांभाळ करते, त्याला वाढविते. तुकाराम महाराज म्हणतात कारण एका आपल्या आईशिवाय त्याला इतर काहीही कळत नसते, तो आई व्यतिरिक्त इतर काहीही जाणत नाही, हे पांडुरंगा तुम्ही देखील माझा असाच अंगीकार करा कारण आता मी तुमच्या शिवाय इतर काहीही जाणत नाही, एवढेच काय स्वतःची काळजी घेणे देखील मला आता अवघड होऊन बसले आहे त्यामुळे तुम्हीच काय तो माझा आता योग्य तो सांभाळ करा.
अभंग क्र.१८६९
भोग द्यावे देवा । त्याग भोगींच बरवा ॥१॥
आपण व्हावें एकीकडे । देव कळेवरी जोडे ॥ध्रु.॥
योजे यथाकाळें । उत्तम पाला कंदें मूळें ॥२॥
वंचकासी दोष । तुका म्हणे मिथ्या सोस ॥३॥
अर्थ:-
अर्थ:-:–कोणतेही भोग प्रथम देवाला समर्पण करावेत ,नंतर आपण भोगावेत ;म्हणजे त्या भोगातच उत्तम रीतीने त्याग घडतो ,आपण त्या भोगापासून अलिप्त राहावे आणि देवाला त्याचा भोक्ता करावे .म्हणजे या देहातच देवाची प्राप्ती होते . ज्या ऋतूमध्ये जी कंदमुळे आणि जो पाला आपल्याला मिळत असेल ,ते सर्व उत्तम मानून त्याचा देवाला समर्पण करण्याकडे विनियोग करावा . तुकाराम महाराज म्हणतात ,जो मनुष्य देवाला समर्पण न करता भोग भोगतो ,तो वंचक असून त्याला पाप लागते ;म्हणून त्याचा देवाला समर्पण न करण्याचा आग्रह वाईट आहे .
अभंग क्र.१८७०
पायांच्या प्रसादें । कांहीं बोलिलों विनोदें ॥१॥
मज क्षमा करणें संतीं । नव्हे अंगभूत युक्ती ॥ध्रु.॥
नव्हे हा उपदेश । तुमचें बडबडिलों शेष ॥२॥
तुमचे कृपेचें पोसणें । जन्मोजन्मीं तुका म्हणे ॥३॥
अर्थ:-
अर्थ:-:–संत हो ,तुमच्या पायांच्या कृपेने मी जे काही लडिवाळपणाने बोललो आहे ; याबद्दल तुम्ही संतांनी मला क्षमा करावी .मी जे काही बोललो ,त्यात माझ्या अंगचा शहाणपणा नाही ,तर तो तुमचा आहे . हा माझा उपदेश नसून तुमच्यापासून जे काही ऐकिले ; तेच उच्छिष्ट शब्द मी कसेतरी बडबडलो आहे . तुकाराम महाराज म्हणतात ,संतहो ,मी जन्मोजन्मी तुमच्या कृपेचे पोसले जाणारे मूल आहे .
अभंग क्र.१८७१
जयांचें अंगलें लेतां नाहीं मान । शोभा नेदी जन हांसविलें ॥१॥
घुसिळतां ताक कांडितां भूस । साध्य नाहीं क्लेश जाती वांयां ॥२॥
तुका म्हणे नाहीं स्व:ता भांडवल । भिकेचें तें फोल बीज नव्हे ॥३॥
अर्थ:-
दुसऱ्याचे तात्पुरते मागून आणलेले दागिने चढवून कितीही मिरविले तरी मान मिळत नाही, उलट लोकांमध्ये शोभा होऊन ते हसतात.कारण ते म्हणतात कितीही ताक घुसळिले किंवा भूस कांडीला तरीही त्याचा काहीएक फायदा नाही कारण ताकातून लोणी मिळत नाही आणि भुसातून धान्य, त्यामुळे शेवटी साध्य काहीच न होता घेतलेले श्रम देखील वाया जातात आणि जीवाला उगीच क्लेश होतात. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच स्वतःचे हित साधायचे असल्यास भक्तीचे भांडवल स्वतःचेच हवे, दुसऱ्याच्या जीवावर ते साधता येत नाही आणि भीक देखील मागून आणता येत नाही किंबहुना कितीही तसा प्रयत्न केला तरी ते फोल ठरते कारण त्याने आपल्या मनात काही भक्तीचे बीज निर्माण होत नाही.
अभंग क्र.१८७२
न बोलावें परी पडिला प्रसंग । हाकलितें जग तुझ्या नामें ॥१॥
लटिकेंचि सोंग मांडिला पसारा । भिकारी तूं खरा कळों आलें ॥ध्रु.॥
निलाजिरीं आह्मी करोनियां धीर । राहिलों आधार धरूनियां ॥२॥
कैसा नेणों आतां करिसी शेवट । केली कटकट त्याची पुढें ॥३॥
तुका म्हणे कांहीं न बोलसी देवा । उचित हे सेवा घेसी माझी ॥४॥
अर्थ:-
मी कितीही स्वतःला आवरले तरी आता गप्प बसवत नाही, कारण प्रसंगच असा आला आहे त्यामुळे बोलावेच लागत आहे. हे नारायणा, हे पांडुरंगा हे जग तुझ्या नावाने हाकलत आहे, तू आहेस आणि कधीतरी येशील या भरवशावर सगळेजण विसंबून आहेत परंतु आम्हांला मात्र कळून चुकले आहे की तू काही तसा नाहीस, तू तर भिकारी आहेस आणि उगीचच तू तुझ्या नावाचा गवगवा करून ठेवला आहेस, तू कोणीतरी मोठा आहेस आणि विलक्षण शक्ती तुझ्याकडे असून तू काहीही करू शकतोस असा खोट्याचा पसारा मांडून ठेवला आहे. त्यात भर म्हणजे हे सर्व ठाऊक असून देखील आम्ही निर्लज्जपणे तुझाच आधार असल्यासारखे वागत राहतो, तुझ्यावर श्रद्धा आणि अजूनही धीर धरून आहोत.परंतु मनात एक धाकधूक कायम असते की एवढे करून सुद्धा म्हणजेच तुझ्या पुढ्यात एवढी कटकट करून सुद्धा तू आम्हाला साथ देशील की नाही आणि कसा आमचा शेवट घडवून आणशील किंबहुना शेवटच्या क्षणी आमच्याजवळ असशील की नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा कितीही काही केले तरी तू बोलत काहीच नाही, एक शब्द मुखातून काढत नाहीस परंतु आमच्याकडून तुला हवी तशी, पाहिजे तशी आणि पाहिजे तेव्हा सेवा मात्र करवून घेतोस.
अभंग क्र.१८७३
नाहीं जालें मोल कळे देतां काळीं । कोण पाहों बळी दोघांमध्यें ॥१॥
आह्मी तरी जालों जीवासी उदार । कैंचा हा धीर तुजपाशीं ॥ध्रु.॥
बहु चाळविलें मागें आजिवरी । आतां पुढें हरी जाऊं नेदीं ॥२॥
नव्हती जों भेटी नामाची ओळखी । म्हणऊनि दुःखी बहु जालो ॥३॥
तुका म्हणे कांहीं राहों नेदीं बाकी । एकवेळां चुकी जाली आतां ॥४॥
अर्थ:-
देवा आमच्या सेवेचे कर्ज तुझ्याकडे पुष्कळ झाले आहे, किंवा नाही हे तुला त्याची परतफेड करते वेळी कळून येईल आणि त्याच वेळी आपणा दोघांमध्ये आम्ही भक्त बलवान आहोत का तू बलवान आहेस हेही आपण पाहू आम्ही तर तुझ्या सेवेकरिता जीवावर उदार झालो आहोत आता तुझ्याजवळ या सेवेचा मोबदला देण्याचे किती धैर्य व किती उदारपणा आहे.देवा तू आता व मागेही पुष्कळ भक्तांना कोरड्या थापा दिल्या आहेत पण हे हरी आता मात्र माझे मला दिल्याशिवाय तुला एक पाऊल देखील पुढे सरकू देणार नाही.इतके दिवस तुझ्या हरी नावाची ओळख नव्हती म्हणून मी फार दुःखी झालो.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याविषयी माझी चूक झाली ती झाली पण आता मात्र माझ्या सेवेची बाकी थोडीसुध्दा तुझ्याकडे राहू देणार नाही.
अभंग क्र.१८७४
कैसा कृपाळु हें न कळसी देवा । न बोलसी सेवा घेसी माझी ॥१॥
काय ऐसें बळ आहे तुजपाशीं । पाहों हरी घेसी कोण आड ॥ध्रु.॥
पाडियेला ठायीं तुझा थारा मारा । अवघा दातारा लपसी तो ॥२॥
आतां तुम्हां आम्हां उरी तोंचि बरें । काय हें उत्तरें वाढवूनि ॥३॥
तुका म्हणे मज साह्य झाले संत । म्हणऊनि मात फावली हे ॥४॥
अर्थ:-
देवा तू माझ्याकडून सेवा करून घेतो परंतु माझ्याशी बोलत देखील नाही मग तू कृपाळू कसा आहेस मला हे काही कळत नाही. हे देवा मी जर तुझ्याशी भांडायला लागलो ना तर तुझ्यात किती बळ आहे हे त्यावेळी पाहू आणि हे हरी आम्ही भांडायला लागलो तर तु कोणा आड लपशील ते ही आम्ही पाहू.हे दातारा जरी तू कुठे लपून बसला तरीही तुला कोण थारा देणार हे मला पूर्णपणे माहित आहे. हे देवा आता तुमच्यात आणि आमच्यात थोडे अंतर आहे ते चांगले आहे नाहीतर मी जर तुमच्यापाशी बोलायला आलो तर शब्दाने शब्द वाढतील अन मग त्याला काय उपयोग आहे काय? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याशी भडण्याकरीता मला संत सहाय्य झाले आहेत म्हणून तर बोलण्याची संधी मी साधली आहे.
अभंग क्र.१८७५
चुकलिया आम्हां करितसां दंड । हाकासी कां खंड पांडुरंगा ॥१॥
चाळविलीं एकें रिद्धीसिद्धीवरी । तैसा मी भिकारी नव्हें देवा ॥ध्रु.॥
कां मी येथें गुंतों मांडूनि पसारा । मागुता दातारा दंभासाठी ॥२॥
केलें म्यां जतन आपुलें वचन । ठायींचें धरून होतों पोटीं ॥३॥
तुका म्हणे ताळा घातला आडाखीं । ठावें होतें सेकीं आडविसी ॥४॥
अर्थ:-
हे पांडुरंगा आमच्या कडून काही चूक झाली तर तुम्ही आम्हाला लगेच दंड करता आणि मग आमच्या हक्काचा ठेवा दूर तुमच्या जवळ आहे तो देण्यास तुम्ही खंड का करता? देवा तुमच्याकडे अनेक भक्त आले असतील त्यांना तुम्ही रिद्धी सिद्धी देऊन नादविले आहे परंतु मी असा रिद्धी सिद्धी घेणारा भिकारी नव्हे बरे. हे दातरा मी तुमच्याकडून रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेऊन त्याचे प्रयोग लोकांमध्ये दाखवून दंभासाठी त्यामध्ये का बरे गुंतुन राहू? देवा तुम्ही जे काही वचन मला सांगितले आहे ते मी माझ्या चित्तात साठवून ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा शेवटी तू आम्हाला म्हणशील भक्ती सकाम आहे तर मुळीच नाही हे मलाही माहित होते त्यामुळे मी भक्तिमार्गात निष्काम भक्ती करत आहे.
अभंग क्र.१८७६
कृपावंत कोप न धरावा । चित्ती छळू विक्रोक्ति स्तुती करू ॥१॥
आम्ही तुझा पार काय जाणो देवा । नेणो कैसी सेवा करावी ते ॥ध्रु.॥
अनंत अरुपा अलक्षा अच्युता । निर्गुणा सचिता सर्वोत्तमा ॥२॥
चांगली हि नामे घेतली ठेवुन । जालासी लहान भक्तीकाजा ॥३॥
तुका म्हणे तुझ्या पायावरी सदा । मस्तक गोविंदा असो माझे ॥४॥
अर्थ:-
अर्थ:-:–देवा ,आम्ही एखादेवेळी चांगल्या शब्दाने तुमची स्तुती करू ,काही वेळा वाकड्या शब्दाने तुम्हाला छळू ;काही प्रसंगी तुमचे वर्म उघड करून तुमची निंदाही करू ,परंतु हे कृपावंता ,आमच्या अपराधाबद्दल मनात राग मानू नका .देवा ,आम्हा अज्ञानी जीवांना तुझा अंत काय कळणार आहे ;आणि तुझी भक्ती कशी करावी ,हे तरी आम्हास काय कळते ? हे अनंता ,अरूपा ,अलक्ष्या ,अच्युता ,निर्गुणा ,सच्चिदानंदा ,सर्वोत्तमा .देवा ,ही चांगली नावे भक्तांच्या उध्दारार्थ तू स्वतःला ठेवून घेतली आहेत ,आणि भक्तांना भक्ती करता यावी ,म्हणून व्यापकाचा लहान झाला आहेस .तुकाराम महाराज म्हणतात ,हे गोविंदा ,असा तुझा महिमा अगाध असल्यामुळे माझे मस्तक तुझ्या पायांवर अखंड असो .
अभंग क्र.१८७७
आतां तुझा भाव कळों आला देवा । ठकूनियां सेवा घेसी माझी ॥१॥
टाकूनि सांकडें आपुलिये माथां । घातला या संतावरी भार ॥ध्रु.॥
स्तुती करवूनि पिटिला डांगोरा । तें कोण दातारा साच करी ॥२॥
जातीचें वाणी मी पोटींचे कुडें । नका मजपुढें ठकाठकी ॥३॥
तुका म्हणे नाहीं आलें अनुभवा । आधींच मी देवा कैचा नाचूं ॥४॥
अर्थ:-
अर्थ:-:–देवा ,आता मात्र तुझ्या मनातील अभिप्राय मला कळला आहे .तू मला काही न देता केवळ थापा मारून माझ्याकडून सेवा करून घेतोस आणि आपल्या डोक्यावर असलेली भक्तोध्दाराची जबाबदारी पार पाडणे कठीण आहे ,असे पाहून ती टाकून देतोस ,आणि संतावर सर्व भार घालतोस ; हे दातारा ,भक्तांकडून आजवर तू पुष्कळच स्तुती करवून घेतली , आणि “पतितपावन ,दीननाथ ,भक्तवत्सल ” इत्यादी ब्रीदांचा जगात डांगोरा पिटवून घेतला ; पण हे सर्व करवून घेताना गोड वाटले .आता ही ब्रीदवचने कोण सत्य करून दाखविणार आहे ,ते सांग ना ? देवा ,मी जातीचा व्यापारी असल्यामुळे कोणताही माल चांगला पारखून घ्यावा ,हे माझ्या मनात माप असणारच ;त्यामुळे माझ्यापुढे अशी फसवाफसवी करू नका .तुकाराम महाराज म्हणतात ,देवा ,तुमच्या ब्रीदवचनांचा अनुभव येणार नाही ,तोपर्यंत अनुभव येण्याच्या आधीच ” देव फार चांगला आहे .” अशी व्यर्थ कल्पना करून कशाकरता नाचत बसू .
अभंग क्र.१८७८
जन पूजी याचा मज कां आभार । हा तुह्मी विचार जाणां देवा ॥१॥
पत्र कोण मानी वंदितील शिक्का । गौरव सेवका याचि मुळें ॥ध्रु.॥
मी मीपणें होतों जनामधीं आधीं । कोणें दिलें कधीं काय तेव्हां ॥२॥
आतां तूं भोगिता सर्व नारायणा । नको आम्हां दीनां पीडा करूं ॥३॥
आपुलिया हातें देसील मुशारा । तुका म्हणे खरा तोचि आम्हां ॥४॥
अर्थ:-
देवा लोक माझी पूजा करतात याचा भार उगाच माझ्या माथ्यावर कशाला पाहिजे. लोक माझी पुजा करतात याचे खरे कारण कोण आहे ? तुम्हीच आहात ना! याविषयी तुम्हीच विचार करा. नुसताच पत्रावर मजकूर लिहून आणला तर त्याचा उपयोग नाही परंतु त्यावर जर राजमुद्रेचा शिक्का असेल तर सर्व लोक त्याला वंदन करतात आणि एखाद्या सामान्य शिपायाला देखील त्या रजमुद्रेमुळेच किंमत असते. देवा या जन मानसामध्ये मी आधी मी पणाने वागत होतो त्याआधी मला कोणी काही दिले आहे का? त्यामुळे हे नारायणा या सर्व मान सन्मान पूजेचा भोक्ता तूच हो तुच त्याचा अधिकारी आहेस आम्हां गरिबांना निष्कारण हा मान सन्मान पूजेचा अधिकार देऊन पिडा देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या सेवेची जी मंजुरी तु आम्हाला देशील तीच आमच्यासाठी खरी आहे.
अभंग क्र.१८७९
आमची कां नये तुह्मासी करुणा । किती नारायणा आळवावें ॥१॥
काय जाणां तुह्मी दुर्बळाचें जिणें । वैभवाच्या गुणें आपुलिया ॥ध्रु.॥
देती घेती करिती खटापटा आणिकें । निराळा कौतुकें पाहोनियां ॥२॥
दिवस बोटीं आह्मीं धरियेलें माप । वाहातों संकल्प स्वहिताचा ॥३॥
तुका म्हणे मग देसी कोण्या काळें । चुकुर दुर्बळें होतों आह्मी ॥४॥
अर्थ:-
हे नारायणा तुम्हाला आमची करुणा का बरं येत नाही?अहो देवा आम्ही तर दुर्बल आहोत आमचे जगणे किती कष्टदायक आहे हे तुम्हाला कसे कळणार कारण तुम्ही वैभवसंपन्न आहात तुमच्या या गुणामुळे तुम्हाला आमचे कष्ट तरी कसे कळेल.देवा दुबळ्या मनुष्याला व्यवहारांमध्ये किती खटपटी कराव्या लागतात देवाण-घेवाण करावे लागतात परंतु श्रीमंत मनुष्य त्या दुबळ्या माणसाची गंमत उभे राहून कौतुकाने पाहतो. अहो आम्ही दुबळे भक्त केवळ हा दिवस गेला तो दिवस गेला असे बोटाने माप मोजत आहोत व स्व:हिताचे संकल्प करतो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुझी सेवा करतो त्याचे मोल तु आम्हाला केव्हा देणार त्याचे मोल जर आम्हाला तू दिले नाही तर आम्ही दुबळे राहू व तुझी सेवा करण्यामध्ये चुकारपणा करू.
अभंग क्र.१८८०
तुम्हां आम्हां तुटी होईल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे ॥१॥
वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ध्रु.॥
सारिलें संचित होतें गांठी कांहीं । पुढें ॠण तें ही नेदी कोणी ॥२॥
जावेंचि न लगे कोणांचिया घरा । उडाला पातेरा तुझ्या संगें ॥३॥
तुका म्हणे आम्हां हाचि लाभ जाला । मनुष्यधर्म गेला पांडुरंगा ॥४॥
अर्थ:-
हे हरी तुम्ही जर आमच्या सेवेचे मोल आम्हाला दिले नाही तर आपली ताटातूट होईल असेच मला दिसत आहे. देवा आम्ही तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही काही त्याला प्रत्युत्तर देत नाही मग तुमच्या बोलण्याचा तरी आधार कोठ पर्यंत धरावा आणि आम्ही आमचा धीर कुठ पर्यंत धरावा ते तुम्ही सांगा. माझ्या पदरात जेवढे पूर्व पुण्याचे संचीत धन होते ते सर्व संपले आता यापुढे मला कोणी ऋण देणार नाही. देवा आता आम्हाला कोणाच्या घरी जाण्याची सुद्धा मुबा राहिली नाही कारण मी तुमच्या नादाला लागलो आणि आमचा सगळा पातेरा म्हणजे इज्जतीचा बोजावारा उडाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या नादी लागून आम्हाला हाच लाभ झाला की आता आमचा मनुष्यधर्म गेला म्हणजे आम्ही ब्रम्हरूपच झालो पांडुरंगा.(या अभंगात तुकाराम महाराजांनी देवाची स्तुतीच केलेली आहे.)
अभंग क्र.१८८१
देव मजुर देव मजुर । नाहीं उजुर सेवेपुढें ॥१॥
देव गांढ्याळ देव गांढ्याळ । देखोनियां बळ लपतसे ॥२॥
देव वर काई देवतर काई । तुका म्हणे राई तरी मोठी ॥३॥
अर्थ:-
अर्थ:-:–देव भक्तांचा मजूर आहे .त्याने भक्तांकडून सेवारूपी वेतन घेतले असल्यामुळे त्याला भक्तांची सेवा करण्याविषयी ‘ हो , नाही ‘ अशी कोणतीच सबब सांगता येत नाही .देव ,मोठा भित्रा व नामर्द आहे .कारण ,भक्तांचे भावबळ पाहून तो लपून बसतो . तुकाराम महाराज म्हणतात ,देव केवढा आहे म्हणता ! एखादी मोहरी तरी मोठी असेल इतका तो सूक्ष्म आहे .
अभंग क्र.१८८२
देव दयाळ देव दयाळ । साहे कोल्होळ बहुतांचा ॥१॥
देव उदार देव उदार । थोड्यासाठी फार देऊं जाणे ॥२॥
देव चांगला देव चांगला । तुका लागला चरणीं ॥३॥
अर्थ:-
देव फार दयाळू आहे फारच दयाळू आहे कारण तो पुष्कळ भक्तांचा कोल्हाळ घराणे सहन करतो.देव उदार आहे फारच उदार आहे त्याची थोडी जरी सेवा केली तर जास्तीत जास्त भक्तांना कसे दान द्यावे हे त्याला समजते.तुकाराम महाराज म्हणतात देव फारच चांगला अगदीच फार चांगला आहे म्हणूनच मी त्याच्या चरणाला लागलो आहे
अभंग क्र.१८८३
देव बासर देव बासर । असे निरंतर जेथें तेथें ॥१॥
देव खोळंबा देव खोळंबा । मज झळंबा म्हूण कोंडी ॥ध्रु.॥
देव लागट देव लागट । लाविलिया चट जीवीं जडे ॥२॥
देव बावळा देव बावळा । भावें जवळा लुडबुडी ॥३॥
देव न व्हावा देव न व्हावा । तुका म्हणे गोवा करी कामी ॥४॥
अर्थ:-
देव बासर आहे म्हणजे देव कोणत्याही प्रकारची मर्यादा धरून राहत नाही तो जिथे आपण पाहू तेथे नेहमी वास करत असतो. देव स्वतः तर काही करत नाही परंतु त्याने आम्हाला खोळंबा निर्माण केला तो म्हणजे त्याच्या नामाचा छंद लावुन, त्यामुळे आम्हाला त्रास होतो त्यामुळे आम्ही त्याला आमच्या हृदयातच कोंडून ठेवले आहे. देव फार लोचट आहे फारच लोचट आहे कारण एकदा भक्तांनी त्यांच्या भक्तीची सवय,चटक, आवड या देवाला लावली की तो त्यांच्या हृदयातच वास्तव्य करतो. देव फार बावळा आहे फारच बावळा आहे कारण भक्तांची भक्ती भाव बघून त्यांच्याजवळ उगाच लुडबुड करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात मला देव नको कारण हा देव त्याचेच वेड लावतो आणि त्याच्या छंदात आम्हाला रहावसे वाटते त्यामुळे आम्हाला संसारात कोणत्याही प्रकारचे लक्ष देता येत नाही.
अभंग क्र.१८८४
देव निढळ देव निढळ । मूळ नाहीं डाळ परदेशी ॥१॥
देव अकुळी देव अकुळी । भलते स्थळी सोयरीक ॥२॥
देव लिगाड्या देव लिगाड्या । तुका म्हणे भाड्या दंभें ठकी ॥३॥
अर्थ:-
देव फुटक्या कपाळाचा आहे याला कोणत्याही प्रकारचे मुळ नाही हा परदेशीच आहे. देव अकुळी आहे म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचे कुळ नाही त्यामुळे त्याची कोणत्याही भक्तांशी सोयरिक होते. तुकाराम महाराज म्हणतात देव मोठे लचांड घेणारा आहे तो भक्तांकडून सेवा रुपी भाडे घेतो आणि त्याचा दंभ दाखवून भक्तांना फसवतो.
अभंग क्र.१८८५
देव बराडी देव बराडी । घाली देंठासाठी उडी ॥१॥
देव भ्याड देव भ्याड । राखे बळीचें कवाड ॥ध्रु.॥
देव भाविक देव भाविक । होय दासाचें सेवक ॥२॥
देव होया देव होया । जैसा म्हणे तैसा तया ॥३॥
देव लहान देव लहान । तुका म्हणे अनुरेण ॥४॥
अर्थ:-
देव भिकारी आहे कारण तो केवळ भाजीच्या देठा करता देखील भक्ताकडे उडी घालतो. देव फार भ्याड आहे फार भ्याड आहे कारण तो बळीच्या दाराचे रक्षण करतो आहे. देव फार भाविक आहे फार भाविक आहे तो त्याचा दासाचा ही सेवक होतो. देव भक्त जसे सांगतील तसे रूप धारण करतो व तसाच होतो. तुकाराम महाराज म्हणतात देव खुप लहान आहे खूपच लहान आहे अनु रेणू पेक्षाही लहान आहे.
अभंग क्र.१८८६
देव भला देव भला । मिळोनि जाय जैसा त्याला ॥१॥
देव उदार देव उदार । देतां नाहीं थोडें फार ॥ध्रु.॥
देव बळी देव बळी । जोडा नाहीं भूमंडळीं ॥२॥
देव व्हावा देव व्हावा । आवडे तो सर्वां जीवां ॥३॥
देव चांगला देव चांगला । तुका चरणीं लागला ॥४॥
अर्थ:-
देव भला आहे फारच भला आहे कारण तो जसा भक्त मिळेल तसाच त्याच्या रुपाशी तो एकरूप होतो. देव फार उदार आहे फारच उदार आहे कारण तो भक्तांना काही देण्यास लागला की थोडे आहे की फार आहे याचा विचारच करत नाही.देव फार बलवान आहे फारच बलवान आहे आणि त्याला पुर्ण भु-मंडळांमध्ये कोणता जोडच नाही. देव मला पाहिजे देव मला पाहिजे असे तर सर्वांनाच वाटते कारण तो आनंदरूप असल्यामुळे सर्व जीवांना आवडतो. तुकाराम तुकाराम महाराज म्हणतात देव फार चांगला आहे फारच चांगला आहे म्हणून तर मी त्याच्या चरणी लागलो आहे.
अभंग क्र.१८८७
देव पाहों देव पाहों । उंचे ठायीं उभे राहों ॥१॥
देव देखिला देव देखिला । तो नाहीं कोणां भ्याला ॥ध्रु.॥
देवासी कांहीं मागों मागों । जीव भाव त्यासी सांगों ॥२॥
देव जाणे देव जाणे । पुरवी मनींचिये खुणे ॥३॥
देव कातर देव कातर । तुका म्हणे अभ्यंतर ॥४॥
अर्थ:-
अर्थ:-:–आपण देव पाहू ,आणि देव पाहण्याकरिता निष्काम कर्म ,निष्काम भक्ती ,विवेक ,वैराग्य ,शमादिषटक ,जिज्ञासुत्व ,गुरुशरणागती आणि महावाक्यश्रवण अशा क्रमाने अधिकाराची उंची वाढवून त्यावर आपण उभे राहू .ज्याने आत्मत्वाने देव बघितला ,तो कोणालाही भीत नाही .कारण ,त्याच्या दृष्टीने स्वभिन्न ,स्वविरोधी ,स्वपेक्षा बलवान कोणी राहात नाही . देवाला आपण काहीतरी मागावे ,आणि आपल्या मनातील भाव त्याला सांगावा . देव भक्तांच्या मनांतील जाणतो ;आणि गूढ इच्छा पूर्ण करतो . तुकाराम महाराज म्हणतात ,देव हा मायेत लपून अंगचोरपणा करतो .म्हणून त्याचे अभ्यंतर कोणाला कळत नाही .
अभंग क्र.१८८८
देव आमचा देव आमचा । जीव सकळ जीवांचा ॥१॥
देव आहे देव आहे । जवळीं आम्हां अंतरबाहे ॥ध्रु.॥
देव गोड देव गोड । पुरवी कोडाचें ही कोड ॥२॥
देव आम्हां राखे राखे । घाली कळिकाळासी काखे ॥३॥
देव दयाळ देव दयाळ । करी तुकयाचा सांभाळ ॥४॥
अर्थ:-
अर्थ:-:–देव आमचा आहे .तो सकळ जीवांचा अधिष्ठानभूत जीव आहे .देव आमच्याजवळ आहे .तसाच तो अंतर्बाह्य व्यापकही आहे . देव स्वभावाने गोड आहे ;म्हणून भक्तांच्या मनोरथचेही पूर्ण करतो . देव भक्तांचे सर्व भयांपासून रक्षण करतो .कारण ,तो कळिकाळालादेखील काखेत मारतो . तुकाराम महाराज म्हणतात ,देव फार दयाळू आहे ;म्हणून तो माझा सांभाळ करतो .
अभंग क्र.१८८९
जाऊं देवाचिया गांवां । देव देईल विसांवा ॥१॥
देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥ध्रु.॥
घालूं देवासीच भार। देव सुखाचा सागर ॥२॥
राहों जवळी देवापाशीं । आतां जडोनि पायांसी ॥३॥
तुका म्हणे आम्हीं बाळें । या देवाचीं लडिवाळें॥४॥
अर्थ:-
चला ,आपण देवाच्या गावाला – पंढरीला जाऊ ;तो आपल्याला विश्रांती देईल .देवाजवळ आपली सुखदुःखे सांगू ;म्हणजे तो आपली तळमळ दूर करील . देवावरच संसाराचा भार घालू ,कारण देव सुखाचा सागर आहे . याकरिताच देवाच्या पायाशी जडून राहू . तुकाराम महाराज म्हणतात ,आम्ही देवाची लडिवाळ मुले आहोत .
अभंग क्र.१८९०
प्रेम तेथें वास करी । मुखीं उच्चारितां हरी ॥१॥
प्रेमे यावें तया गांवा । चोजवी तया वैष्णवां ॥ध्रु.॥
प्रेमें पाठी लागे बळें । भक्त देखोनियां भोळे ॥२॥
प्रेम न वजे दवडितां । शिरे बळें जेथें कथा ॥३॥
तुका म्हणे थोर आशा । प्रेमा घरीं विष्णुदासां ॥४॥
अर्थ:-
अर्थ:-:–जेथे मुखाने हरिनामाचा अखंड उच्चार केला जातो ,तेथे हरीविषयक प्रेम वास्तव्य करते .कारण ,प्रेम हे हरिभक्त जेथे राहतात ,त्या गावांचा शोध काढीत तेथे येऊन राहते , आणि भाविक भक्त पाहून त्यांच्या पाठीशी बळेच लागते .जेथे हरिकथा चालू असते ,तेथे ते प्रेम बळेच प्रवेश करते ; आणि त्याला बाहेर घालविले तरी ते जात नाही .असे ते निलाजरे आहे .तुकाराम महाराज म्हणतात ,हरिभक्तांच्या घरी आपल्याला आश्रय मिळेल अशी त्या प्रेमाला फार आशा वाटते ;म्हणून प्रेम त्यांच्या घरी आपण होऊन येते .
अभंग क्र.१८९१
संत मानितील मज । तेणें वाटतसे लाज ॥१॥
तुह्मी कृपा केली नाहीं । चित्त माझें मज ग्वाही ॥ध्रु.॥
गोविलों थोरिवां । दुःख वाटतसे जीवा ॥२॥
तुका म्हणे माया । अवरा हे पंढरिराया ॥३॥
अर्थ:-
देवा संत मला मानसन्मान देतात त्यामुळे मला लाज वाटते. कारण तुम्ही अजूनही माझ्यावर कृपा केले नाही याबद्दल माझे चित्तच मला साक्ष देत आहे.मी उगाच मोठेपणा मध्ये गुंतलो त्यामुळे आता माझ्या जीवाला दुःख वाटते आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरी राया आता तुम्ही तुमची माया आवरा.
अभंग क्र.१८९२
नाहीं तुह्मी केला । अंगीकार तो विठ्ठला ॥१॥
सोंगें न पावीजे थडी । माजी फुटकी सांगडी ॥ध्रु.॥
प्रेम नाही अंगीं । भले म्हणविलें जगीं ॥२॥
तुका म्हणे देवा । मज वांयां कां चाळवा ॥३॥
अर्थ:-
हे विठ्ठला जोपर्यंत तुम्ही माझा अंगिकार केला नाही,तोपर्यंत मी केवळ तुझा भक्त आहे हा दंभ रोवित आहे परंतु ही भव नदी मी त्याच्या जीवावर तरु शकत नाही कारण माझी सांगडी मध्येच फुटली आहे. अंगांमध्ये हरी विषयी प्रेमच नाही आणि नुसतं चांगला भक्त आहे असे म्हणून घेतले तर काय उपयोग आहे काय? तुकाराम महाराज म्हणतात अहो मला केवळ भक्तीचा मोठेपण देऊन चांगला भक्त म्हणण्याचा मोठेपणा देऊन देवा असे का फसवत आहात?
अभंग क्र.१८९३
आतां चक्रधरा । झणी आह्मांस अव्हेरा ॥१॥
तुमचीं म्हणविल्यावरी । जैसीं तैसीं तरी हरी ॥ध्रु.॥
काळ आह्मां खाय । तरी तुझें नांव जाय ॥२॥
तुका म्हणे देवा । आतां पण सिद्धी न्यावा ॥३॥
अर्थ:-
हे चक्रधरा तुम्ही माझा अव्हेर करू नका.अहो देवा चक्रधरा आम्ही एकदा तुमचे आहोत असे म्हटल्यावर आम्ही जसे असु तसे, मग आम्ही कसे का असेना तुम्ही आम्हाला या भव नदितुन तारलेच पाहिजे. जर काळाने आम्हाला खाल्ले तर तुझ्याच नावाची बदनामी होईल. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही जो भक्तांचे रक्षण करण्याचा पण घेतला आहे तो माझे रक्षण करून सिद्धीस न्यावा.
अभंग क्र.१८९४
मज ऐसें कोण उद्धरिलें सांगा । ब्रीदें पांडुरंगा बोलतसां ॥१॥
हातींच्या कांकणां कासया आरिसा । उरलों मी जैसा तैसा आहें ॥ध्रु.॥
धनवंतरी हरी रोग्याचिये व्यथे । तें तों कांहीं येथें न देखिजे ॥२॥
तुका म्हणे नाहीं अनुभव अंगें । वचन वाउगें कोण मानी ॥३॥
अर्थ:-
पांडुरंगा तुम्ही स्वतःला दीनानाथ पतितपावन अशी ब्रिदे लावून सर्व जगतामध्ये मिरवित असता मग माझ्यासारख्या एखाद्या पतित भक्ताचा तुम्ही केव्हा उध्दार केला आहे हे सांगा तुम्हीच? अहो हाताच्या कंकण पहाण्यासाठी आरसा कशासाठी पाहिजे म्हणजेच मी जसा पूर्वी पापी होतो तसाच आताही आहे. देवा अहो धन्वंतरीने रोगाची रोग व्यथा ही दूर केली पाहिजे परंतु धन्वंतरीच्या औषधाने देखील रोगाची व्यथा जर थांबली नाही तर मग त्याचा काही उपयोग आहे का हे तुम्हीच सांगा. तुकाराम महाराज म्हणतात देवा जर एखाद्या व्यक्तीने आपणास काही सांगितले आणि त्याच्या बोलण्याचा खरोखर अनुभव आला तर ठीक आहे परंतु केवळ कोरडे वचनच एखादा मनुष्य बोलू लागला आणि त्याचा काही अनुभव आला नाही तर त्या मनुष्याच्या बोलण्याला कोण मान देत असेल?
अभंग क्र.१८९५
काय तें सामर्थ्य न चले या काळें । काय जालीं बळ शक्तीहीण ॥१॥
माझिया संचितें आणिलासी हरी । जालें तुजवरी वरीष्ठ तें ॥ध्रु.॥
काय गमाविली सुदर्शन गदा । त्या भेणे गोविंदा लाजतसां ॥२॥
तुका म्हणे काय ब्रिदाचें तें काम । सांडा परतें नाम दिनानाथ ॥३॥
अर्थ:-
देवा या कलियुगामध्ये तुझे सामर्थ्य चालेना असे का झाले आहे का तुझे बळ जाऊन तु शक्तिहीन झाला आहेस? देवा मला असे वाटते माझे संचित तुझ्यापेक्षाही वरिष्ठ झाले आहेत कारण त्यांनी तुझा पराभव केला आहे.हे गोविंदा अहो तुम्ही तुमची सुदर्शन आणि गदा गामवली आहे ती काय आणि माझे संचित तुम्ही नाहीसे करू शकत नाही त्या भीतीने तुम्ही माझ्या समोर येण्यास लाजत आहात की काय? तुकाराम महाराज म्हणतात देवा असे जर असेल तर तुमच्या ब्रिदाचे तरी काय काम उरले आहे तुमचे ते दीनानाथ नाम सोडून द्यावे
अभंग क्र.१८९६
बळ बुद्धी वेचुनियां शक्ती । उदक चालावें युक्ती ॥१॥
नाहीं चळण तया अंगीं । धांवें लवणामागें वेगीं ॥ध्रु.॥
पाट मोट कळा । भरित पखाला सागळा ॥२॥
बीजा ज्यासी घ्यावें । तुका म्हणे तैसें व्हावें ॥३॥
अर्थ:-
बळ बुद्धी आणि शक्ती खर्च करून आपल्याला उदक म्हणजे पाणी आपल्या युक्तीने चालवावे लागते.कारण पाणी आपण हून कुठे जात नसते जिथे लवण असते तिथे ते तीव्र गतीने वाहत असते. पाण्याला आपण पाटाणे किंवा मोटाने जेथे पाहिजे तेथे नेउ शकतो किंवा आपल्याला झारीने अथवा पालखीने देखील नेता येते. तुकाराम महाराज म्हणतात पाणी आपण ज्याला देऊ म्हणजे मिरचीला देवु तर तिखट आणि ऊसाला देऊ तर गोड होते म्हणजे जसे बीज असेल तसे पाणी आपले रूप धारण करते.
अभंग क्र.१८९७
न म्हणे साना थोर । दृष्ट पापी अथवा चोर ॥१॥
सकळा द्यावी एकी चवी । तहान हरूनि निववी ॥ध्रु.॥
न म्हणे दिवस राती । सर्व काल सर्वां भूतीं ॥२॥
तुका म्हणे झारी । घेतां तांब्यानें खापरी ॥३॥
अर्थ:-
पाणी पिण्यासाठी जर कोणी पाण्याजवळ गेले तर पाणी हा लहान-मोठा दुष्ट पापी अथवा कोणी चोर आहे असे तो कधीच म्हणत नाही ते सर्वांना एक सारखीच चव देते आणि सर्वांची तहान भागवते व सगळ्यांना तृप्त करते. तहानलेला व्यक्ती पाण्याजवळ पाणी पिण्यासाठी गेला तर पाणी म्हणत नाही की रात्र आहे किंवा दिवस आहे ते सर्वांसाठी सर्वकाळ सारखेच असते. तुकाराम महाराज गाणी झारीने किंवा थांबणे अथवा मातीचे खापर आणि तुकाराम महाराज म्हणतात पाणी झारीने किंवा तांब्याने अथवा मातीच्या खापराणे घेऊन जरी प्यायले तरी ते सर्वांना सारखीच गोडी देत असते.
अभंग क्र.१८९८
इच्छा चाड नाहीं । न धरी संकोच ही कांहीं ॥१॥
उदका नेले तिकडे जावे । केले तैसै सहज व्हावे ॥ध्रु.॥
मोहरी कांदा ऊंस । एक वाफा भिन्न रस ॥२॥
तुका म्हणे सुख । पीडा इच्छा पावे दुःख ॥३॥
अर्थ:-
पाण्याला कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा आवड नसते आणि ते कोणाबद्दल संकोच ही धरीत नाही.पाण्याला ज्याने जिकडे न्यावे तिकडे ते पाणी जाते आणि जसा तो वापर करील त्यात त्याचप्रकारे ते पाणी होते. मोहरी कांदा ऊस जरी एकाच वाफ्यात लावलेले असले आणि त्या वाफ्यात पाणी सोडले तरी पाणी ज्याच्या त्याच्या चवीनुसार आपली ही चव बदलते. तुकाराम महाराज म्हणतात ज्या व्यक्तीच्या ठिकाणी सुख आणि दुखः हे विकार आहेत त्याला काही गोष्टींपासून सुख होते तर काही गोष्टी पासून दुख होते परंतु संतांच्या ठिकाणी असा भाव नसतो संत हे पाण्याप्रमाणेच आहेत ते जिकडे जावे तिकडे तसेच होतात त्यामुळे त्यांना सुख आणि दुखः बाधत नाही.
अभंग क्र.१८९९
तरले ते मागें आपुलिया सत्ता । कमाई अनंता करूनियां ॥१॥
उसनें फेडितां धर्म तेथें कोण । ते तुज अनन तुह्मी त्यांसी ॥ध्रु.॥
मज ऐसा कोण सांगा वांयां गेला । तो तुह्मी तारिला पांडुरंगा ॥२॥
तुका म्हणे नामासारिखी करणी । न देखें हें मनीं समजावें ॥३॥
अर्थ:-
हे अनंता मागे अनेक भक्त आपल्या सत्तेने मोक्ष रुपी कमाई करून तरलेत. उसने फेडणे म्हणजे तो धर्म होत नाही भक्त तुझी अनन्य भक्तीने भक्ती करतात आणि त्या बदल्यात तु त्यांना मोक्ष देतोस त्यांचा उद्धार करतोस हे केवळ उसने फेडल्या सारखेच होते मग त्यामध्ये धर्म आला ते कोठून ते सांगा? हे पांडुरंगा माझ्यासारखा पतीत वाया गेलेला आहे आणि त्याला तुम्ही तारले आहे असे कोणी आहे का ते सांगा? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमचे नाव पतितपावन आहे पण त्याप्रमाणे तुम्ही कृती करत नाही आणि ही गोष्ट तुम्ही देखील मनात समजून घ्यावे.
अभंग क्र.१९००
कवणांशीं भांडों कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण ॥१॥
धरिलें उदास दुरदुरांतरें । सांडी एकसरें केली माझी ॥ध्रु.॥
आइकोन माझे नाइकसी बोल । देखोनियां खोळबुंथी घेसी ॥२॥
तुका म्हणे एके गांवींची वसती । म्हणऊनि खंती वाटे देवा ॥३॥
अर्थ:-
देवा मी तरी कोणाशी भांडू मला तरी तुझ्यावाचून कोण सह्य करणार आहे आणि तुझ्या वाचून माझे कोणी आहे का? आणि तुही माझ्या विषयी उदासीनता धरून मला अत्यंत दूर लोटून माझा त्याग केला आहेस. देवा माझे बोल ऐकूनही तू नाही ऐकल्यासारखा करतोस आणि मला पाहिले की लगेच मायेचा खुळ अंगावर पांघरून घेतोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा आपण दोघेही एकाच गावचे वस्तीत राहणारे आहोत तरी तुम्ही माझा असा त्याग करतात त्यामुळे मला खुप खंत वाटते आहे.