SANT TUKARAM | संत तुकाराम महाराज अभंग गाथा ८०१ ते ९०० | SANT TUKARAM Maharaj Abhang Gatha 801 to 900

संत तुकाराम महाराज अभंग गाथा ८०१ ते ९००

संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा / अभंग, मराठी अर्थासह

अभंग क्र.८०१

आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥१॥
सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥
लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥
निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥३॥
अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥४॥

अर्थ:-

आता पूर्ण पणे मी निर्धार केला आहे,मी कोणाचाही विचार करणार नाही फक्त तुझे नाम मी प्रेमाने व आवडीने गाईन हरीचे चरण हेच माझे ध्येय आहे.तुझ्या अंगणात मी लोटांगण घालीन आणि तुझे मुख डोळे भरून पाहीन.निर्लज्ज होऊन मी तुझ्या अंगणात नाचेल, मनात कुठल्याही प्रकारची शंका धरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी तुझा दास आहे तुझी आज्ञा पाळणारा सेवक आहे हाच संकल्प माझ्या मानत नांदत आहे.

अभंग क्र.८०२

जनीं जनार्दन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हां ॥१॥
जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ध्रु.॥
पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणें । हीं कोणांकारणें कवणें केलीं ॥२॥
आम्हां मरण नाश तूं तंव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥३॥
तुका म्हणे तूचि निवडीं हा गुढार । दाखवीं साचार तेंचि मज ॥४॥

अर्थ:-

जगात जनार्धन अंर्तबाह्यरूपाने भरला आहे हे आम्ही सर्वांनी एकले आहे पण खरे काय ते आम्हाला ठाउक नाही.मग असे अज्ञान असण्याचे कारण काय म्हातारा कोण होतो व मरते कोण?जन्म मरण सुख दुख ते कोण भोगतो?पाप पुण्य कर्म शुद्ध अशुद्ध आचरण हे कोणी कोणासाठी केले?आम्हा जर मरण आहे, मग तू अविनाशी आहे यावर आम्ही विश्वास कसा ठेवावा.तुकाराम महाराज म्हणतात याचे गुढ तूच उलगडावे ते कोडया सारखे आहे आणि खरे तत्वे काय ते आम्हाला दाखवावे.

अभंग क्र.८०३

यथार्थवाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥१॥
चोरा धरितां सांगे कुठोऱ्याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥२॥
तुका म्हणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥३॥

अर्थ:-

यथार्थवाद सोडून म्हणजे जे खरे आहे ते सोडून समोरच्याला जे आवडेल ते बोलून त्यांना खुश करणे किंवा खुश करण्याचा प्रयत्न जो करतो तो नरकात जातो.जर एखाद्या चोराला पकडले आणि त्याला चोरी कोणी करायला सांगितली त्याचे नाव त्यांने सांगितले तर दोघांच्याही हात पायात बेड्या पडतात.तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व म्हणजे मी जे काही सांगत आहे त्या सर्व गोष्टी पुराणात सांगितलेल्या आहे व तेच निर्णय मी सांगत आहे, माझे बोलणे काही वायफळ नव्हे.

अभंग क्र.८०४

धीर तो कारण । साह्य होतो नारायण । नेदी होऊं सीण । वाहों चिंता दासांसी ॥१॥
सुखें करावें कीर्तन । हर्षे गावे हरीचे गुण । वारी सुदर्शन । आपणचि कळिकाळा ॥ध्रु.॥
जीव वेची माता । बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता । प्राकृतां यां सारिखा ॥२॥
हें तों माझ्या अनुभवें । अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें । आहाच नये कारण ॥३॥

अर्थ:-

परमार्थात जो धीर धरून राहतो त्याला नारयण साह्य करतो.त्याला कुठल्याही प्रकारचे शीण येवू देत नाही तो आपल्या सर्व दासांची चिंता वाहून नेतो आपण सुखाने हरीचे कीर्तन करावे आनंदाने हरीचे गुणगान गावे म्हणजे देवाचे सुदर्शन चक्र काळाचे निवारण करते.लहान मुलाला दुखणे आले तर आई त्याला बरे वाटण्यासाठी आपला जीव देण्यास तयार होते हि संसारातील प्राकृत गोष्ट झाली पण नारायण हा दाता प्राकृत नाही.तुकाराम महाराज म्हणतात हि माझ्या अनुभवाची गोष्ठ आहे मात्र आपण खरी भक्ती केली पाहिजे.वर वर भक्ती काही उपयोगाची नाही.

अभंग क्र.८०५

पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥१॥
सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥
पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥२॥
तुका म्हणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥३॥

अर्थ:-

आता या पुढे संसार रुपी जन्म मृत्यूचे निवारण होण्यासाठी मनुष्याचा या पुढे जन्म कसा मिळेल?त्यामुळे मानव जन्म आपणास लाभला आहे व अशी सोय असताना इतर कुठेही फिरू नये पांडुरंगा सारखी नाव आपल्याला भक्ती भावाने या भावसागरातून तारणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे बाबांनो तुम्हाला पुढे प्राप्त होणार्‍या जन्म-मृत्यूच्या सर्व खेपा चुकतील फक्त तुम्ही एकनिष्ठ भक्तिभावाने पांडुरंगाची भक्ती करा.

अभंग क्र.८०६

दुध दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥१॥
हेचि वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥
लोह कफ गारा अग्नीचिया काजें । येऱ्हवी तें ओझें कोण वाहे ॥२॥
तुका म्हणे खोरीं पाहारा जतन । जोंवरी हें धन हातीं लागे ॥३॥

अर्थ:-

दूध दही ताक हे मिळावे यासाठी लोक गाई-म्हशी इत्यादी पशूंचे पालनपोषण करतात परंतु या सर्व म्हणजे दही दूध ताक या सर्वांचे सार तूप आहे.त्याप्रमाणेच परमार्थामध्ये अनेक साधने आहेत परंतु सर्वांचे मुख्य सार म्हणजे रामाची नाम आहे व तेच आम्हा भक्तांच्या हाती तूप सारखे सारभूत असलेले राम नाम लागले आहे.म्हणून आम्ही त्याला चित्तात धरले आहे.लोखंड,गारगोटी,कापूस अग्नी उत्पन्न करण्यासाठी जवळ ठेवाव्यात नाही तर इतर वेळेस त्यांचे ओझे कोण वागवित बसेल? तुकाराम महाराज म्हणतात जो पर्यंत भूमीतील धन हाती लागत नाही तो पर्यंत आपल्याला टिकाव,पहार,घमेले यांची मदत घ्यावी लागते.म्हणजे रामाच्या प्राप्ती साठी आपल्याला नाम,जप,कीर्तन या साधनांची गरज लागते वर्माची प्राप्ती झाली कि मग या साधनांची गरज लागत नाही.

अभंग क्र.८०७

वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पायां पडे ॥१॥
करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥
क्षमा दया शांति । बाण अभंग हे हातीं ॥२॥
तुका म्हणें बळी । तेचि एक भू मंडळीं ॥३॥

अर्थ:-

विठ्ठलाचे सेवक हे वीर आहेत त्यामुळे कळी काळ त्यांच्या पाया पडतो.ते नेहमी विठ्ठल नामाचा घोष करतात त्यामुळे त्याचे दोषांचे डोंगर जाळून जातात.दया क्षमा शांती नामक अभंग म्हणजे न भंगणारे बाण त्या सेवकांच्या हाती कायम असतात.तुकाराम महाराज म्हणतात या संपूर्ण पृथ्वीवर तेच खरे बलाढ्य व बलवान आहे.

अभंग क्र.८०८

ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥
मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि तीरी सरेल ॥ध्रु.॥
दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥
सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥
ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥
तुका म्हणे अनुभवें । आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें । सुख घेती भाविकें ॥५॥

अर्थ:-

हे लोकांनो तुमच्या स्वहिताची खूण तुम्हांला जाणायाची असेल तर त्या पांडुरंगाचे मनात स्मरण करत राहा.वाचेने तुम्ही जर कायम नारायणाचे गुणगान करात राहाल तर मग तुम्हाला कसले बंधन आले.भवसागर हा पैलतीरालाच नाहीसा होईल.सर्व काळी काळ तुमचे दास्यत्व करेल.मायाजळाचे तुमचे बंधन तुटेल,आणि रिद्धी सिद्धी तुमचे दास्यत्व करेल.विठ्ठलाचे नामस्मरण हे सर्व शास्त्रांचे सार आहे,आणि पुराणे देखील या नामस्मरणाचेच गुणगान गातात.नामस्मरण करण्याचा अधिकार हा सर्वांनाच असतो.मग तो ब्राम्हण असो,क्षत्रिय असो,वैश्य असो,शुद्र असो,चांडाळ किंवा बालक असो,नर असो,नारी असो एवढेच नाही वेश्यांना देखील या नामस्मरणाचा अधिकार आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आलेला अनुभव आम्ही तुम्हांला सांगत आहे,आणि जो कोणी दैववान भाग्यवान भाविक आहे तोच या नामस्मरणाचे सुख घेईल.

अभंग क्र.८०९

न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥१॥
अविनाश सुख देईल निर्वाणी । चुकतील खाणी चौऱ्यांशीच्या ॥ध्रु.॥
आणिकिया जीवां होईल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥२॥
आहिक्य परत्रीं होसील सरता । वाचे उच्चारींता रामराम ॥३॥
तुका म्हणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥४॥

अर्थ:-

हे मानवा तू कसल्याही प्रकारची तळमळ करू नकोस तू निश्चळ राहा.अहो आमचा स्वामी कृपाळू आहे दया घन आहे.आपले मन तू स्थिर ठेव.आमचा विठ्ठल परमात्मा हा अविनाशी सुख देणारा आहे.त्यामुळे तू त्याचे चिंतन करशील तर तो तुला चौऱ्यांशीच्या खाणीतून वाचवील.त्यामुळे तुझा तर उध्दार होईलच पण इतरही जीवांचा तुझ्यामुळे उद्धार होईल आणि कोट्यावधी जीवांवर तुझे उपकार होतील.तू जर तुझ्या मुखाने रामराम नामाचा उच्चार करशील तर तुझा ऐहिक आणि पारलौकिक उद्धार होईल.या करता तू रामराम मंत्राचा जप करत जा.तुकाराम महाराज म्हणतात या संसाराचा छंद तू सोडून दे मग तुला परमानंद नक्कीच मिळेल.

अभंग क्र.८१०

कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥१॥
मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरीं । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥ध्रु.॥
आणीक ही भोग आणिकां इंद्रियांचे। नाहीं ऐसे साचे जवळी कांहीं ॥२॥
रूप दृष्टि धाय पाहातां पाहातां । न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥३॥
तुका म्हणे कां रे नाशिवंतासाठी । देवासवें तुटी करितोसी ॥४॥

अर्थ:-

अरे गाढवा तू संसाराचा दास का होत आहे.त्या संसाराचे दास्यत्व पत्करल्यामुळे तुला दुःखाचे डोंगर भोगावे लागत आहे.जिभेच्या शेंड्यावर आपल्याला मिष्टांन्नाची गोडी कळत असते पण एकदा कि पोट भरले तर मग आपल्याला स्वाद कळत नाही.एका इंद्रियाचे भोग दुसऱ्या इंद्रियांना भोगता येत नाही.आणि सुखही भोगता येत नाही.हरी रूप आपण वारंवार पहिले तर दृष्टी तृप्त होते.आणि दुसरी कुठलीही तृष्णा राहत नाही.तुकाराम महाराज म्हणतात अरे या संसारासाठी देवा पासून का दूर गेलास?

अभंग क्र.८११

बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देईल तो अन्न वस्त्रदाता ॥१॥
काय आम्हां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥
दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥२॥
न लगे सांगणें मागणें तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥३॥
तुका म्हणे लेई अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूंचि होसी ॥४॥

अर्थ:-

तू एका जागेवर बसून देवाचे चिंतन करत रहा निश्चिंत राहा तो ईश्वर तूला अन्न वस्त्र बसल्या जागेवर देईल.आम्हाला उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या गोष्टी अधिक साचवून काय करायचे आहे.सर्व काही पुरविणार तो देवच आमचा ऋणी झाला आहे त्यामुळे आम्हाला कसली कमतरता नाही.तो मोठा दयाळू आहे, मयाळू आहे,जो कोणी त्याला अनन्य भावाने शरण जातो त्याचे सर्व लाड तो पुरवितो.त्याला काही सांगावेही लागत नाही काही मागवेही लागत नाही कारण ज्याची मनात जशी इच्छा आहे त्याची ती इच्छा तो हरी पुरवितो.तुकाराम महाराज म्हणतात तू आपल्या अंगी विठ्ठल रुपी अलंकार परिधान कर म्हणजे तू देखील विठ्ठल मयच होऊन जाशील.

अभंग क्र.८१२

सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥१॥
काय करावें प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ध्रु.॥
मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा साठ ॥२॥
तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥३॥

अर्थ:-

हे संत जनहो जर सोन्याच्या पत्रात दारू भरली तर ते सोन्याचे पात्र कितीहि चांगले असले तरी त्या सोन्याच्या पत्राला काही किंमत आहे का?.त्या प्रमाणे मातीच्या मडक्यात अमृताचा साठा केला तर त्या अमृताला मडक्यामुळे काही दोष लागेल का किंवा ते अमृत अपवित्र होईल का?तुकाराम महाराज म्हणतात आता माझे हित ज्याच्या मध्ये आहे ते कृपा करून लवकरात लवकर हे संत जनहो तुम्ही मला सांगा.

अभंग क्र.८१३

सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥१॥
नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा ।
सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु.॥
जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥२॥
कर्म कुळवणी । न लगे धर्मपाळी दोन्ही ॥३॥
ज्ञानपाभारी तीफणी । न लगे करावी पेरणी ॥४॥
बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचे ॥५॥
नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागोऱ्याच्या नेटें ॥६॥
पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥७॥
सराई सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥८॥
प्रेम पिकलें अपार । नाहीं सांठावावया थार ॥९॥
ऐसीये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥१०॥

अभंग क्र.८१४

वोणव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥१॥
तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ध्रु.॥
चोरासवें वाट । चालोनि केलें तळपट ॥२॥
डोळे झांकुनि राती । कूपी पडे दिवसा जोती ॥३॥
पोसी वांज गाय । तेथें कैची दुध साय ॥४॥
फुटकी सांगडी । तुका म्हणे न पवे थडी ॥५॥

अर्थ:-

शेती कडे दुर्लक्ष केले तर त्या मालकाचे शेतातील धान्य पाखरे खातात.त्या प्रमाणे हे मानवा तू पर्माथाच्या ठिकाणी जागा राहा,तेथे तू दगा खाऊ नकोस.चोरांच्या संगतीत राहून ज्यांनी ज्यांनी आपले वाटोळे करून घेतले,व जे डोळे झाकून भर दिवसा आपल्या जीवनात अंधार करून घेतात,म्हणजे कर्तव्याकडे दुर्लक्ष करता.ते पापाच्या कुपीत पडतात म्हणजे विहिरीत पडतात.या संसार रुपी वांज गाईचे जे पोषण करतात त्यांना दुधाची व साय याची प्राप्ती कशी होईल?तुकाराम महाराज म्हणतात फुटक्या नावेच्या सहाय्याने पैलतीराकडे जाणे शक्य होणार नाही.त्या प्रमाणे च संसाराच्या नादी लागून जमणार नाही.

अभंग क्र.८१५

सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिक आलें परी केलें पाहिजे जतन ॥१॥
सोंकरीं सोंकरीं सोहंकरी । विसावा तों वरी नको उभें आहे तों ॥ध्रु.॥
गोफणेसी गुंडा घालीं पागोऱ्याच्या नेटें । पळती आहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥२॥
पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मानी बळ बुद्धी व्हावीं दोनी ॥३॥
खळे दातें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्यांचे भाग देई त्यासी ॥४॥
तुका म्हणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥५॥

अर्थ:-

आपले देह हे शेत आहे हे सुगीला आले असून त्याचे जे चार कोपरे आहेत ते म्हणजे इंद्रिय,प्राण,मन,बुद्धी हे सांभाळावे. पिक आले आहे तरी ते चांगल्या प्रकारे जतन केले पाहिजे.त्याला तू चांगल्या प्रकारे सांभाळ, तू चांगल्या प्रकारे सांभाळ, तू चांगल्या प्रकारे सांभाळ.गोफण म्हणजे मुखात तू हरी नामचे गोफण गुंडा घालून तू फेक जेणे करू तुझ्या या शेतातील म्हणजे शरीरातील काम क्रोध रुपी पाखरे उडून जातील.तू तुझ्यातील आगटी पेटवून जागा सोडून दुसरीकडे म्हणजे देहबुद्धीची जागा सोडू दुसरीकडे राहा,तू तुझ्यातील अभिमानाचा हल्ला परतवण्यासाठी बळ व बुद्धी यांचे सहाय्य घ्यावे.या पिकाच्या खळ्यावर तू सर्वांना उपदेश रुप दान देऊन सुखी कर.तू तुझा सारा भरून ज्याचा त्याचा भाग त्याला देऊन टाक.तुकाराम महाराज म्हणतात असे जर तू केलेस तर मग तुला काहीच कर्तव्य राहणार नाही,व तुझ्या हातातील संसार रुपी भूस सांडून फक्त नीज स्वरूप प्राप्त होईल.

अभंग क्र.८१६

नका घालूं दुध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥
नेदा तरी हे हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥२॥
तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥३॥

अर्थ:-

तुम्हाला दुध (त्या मध्ये सर्व सार आहे) असे दुध नसेल द्यायचे तर नका देऊ ,पण निदान ताक देऊन तरी थोडे उपकार करा.अहो अन्न नसेल देत तर नका देऊ पण निदान पाणी तरी पाजा.तुकाराम महाराज म्हणतात मला या सगुण रुपाची चाड म्हणजेच आवड आहे,तरी मला कोणी तरी त्या हरीचे दर्शन घडवा एवढे कोणी तरी माझी दुर्बळाची इच्छा पूर्ण करा.

अभंग क्र.८१७

म्हणसी नाहींरे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥१॥
लाहो घेई हरीनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ध्रु.॥
गळां पडेल यमफासा । मग कैचा हरी म्हणसी ॥२॥
पुरलासाठी देहाडा । ऐसें न म्हणे मूढा ॥३॥
नरदेह दुबळा । ऐसें न म्हणें रे चांडाळा ॥४॥
तुका म्हणे सांगों किती । सेखी तोंडीं पडेल माती ॥५॥

अर्थ:-

देवाचे भजन हे माझ्या संचितात नाही असे तू म्हणू नकोस रे,म्हणू नकोस.तू घाई कर आणि हरी नाम घे तू तुझा जन्म वाया जाऊ देऊ नकोस.अंतः काळी यमाचा फासा गळ्याला लागल्यावर मग हरीनाम कसा घेशील?हे मुर्खा आपला हा देह हा भोग पुरविण्यासाठी आहे असे म्हणू नकोस.हे चांडाळा हा नर देह दुबळा आहे असे हि तू मानू नकोस.तुकाराम महाराज म्हणतात यांना किती सांगावे नाही ऐकले तर यांच्या तोंडात माती पडेल.

अभंग क्र.८१८

संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें ॥१॥
बहु दुधड जरी जाली म्‍हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥
तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरीच महिमान येईल कळों ॥३॥

अर्थ:-

संतांचा महिमा समजण्यास फार कठीण आहे शब्दाने त्यांची थोरवी सांगता येणार नाही.कोरडी बडबड करणाऱ्यांचा येथे काही उपयोग नाही.म्हैस अथवा गाय हि मोठी चांगली व पुष्कळ दुध देणारी असली तरी ती काय कामधेनु होईल? म्हणूनच आपण स्वतःसंत झालो तरच आपल्याला संतांचा मोठेपणा कळू शकेल

अभंग क्र.८१९

नाहीं संतपण मिळत ते हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥१॥
नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥१॥
तुका म्हणे मिळे जिवाचिये साठी । नाहीं तरी गोष्टी सांगो नये ॥३॥

अर्थ:-

संतपणा बाजारात विकत मिळत नाही,किंवा रानात,वनात,गीरीकापाटात हिंडण्याने मिळत नाही संतपणा कितीही मोठी किंमत दिली ,पैसा ओतली तरी मिळत नाही.तो आकाशात किंवा पाताळात कोठेही मिळत नाही.हरीला आपला जीव अर्पण करण्यातच संतपणा मिळत असतोअशी स्थिती जर नसेल,तर संतपणाची गोष्ठच काढू नये.

अभंग क्र.८२०

नामाची आवडी तोचि जाणा देव । न धरी संदेह कांहीं मनीं ॥१॥
ऐसें मी हें नाहीं बोलत नेणता । आणोनि संमता संतांचिया ॥ध्रु.॥
नाम म्हणे तया आणीक साधन । ऐसें हें वचन बोलो नये ॥२॥
तुका म्हणे सुख पावे या वचनीं । ज्याचीं शुद्ध दोन्ही मायबापें ॥३॥

अर्थ:-

ज्याला देवाचे नाव आवडते,तोही देव आहे असे समजा.याविषयी मनामध्ये काही संशय धरू नका.हि माझी मूर्खपणा बडबड नाही.संतांचेही असेच मत आहे.जो हरीनाम घेतो,त्याला इतर साधने करण्याची आवश्यकता आहेअसे समजू नये कारण ते एकच साधन पुरेसे आहे.मी जे काही म्हणतो,ते माझे बोलणे त्यानांच गोड वाटेल कि,जे शुद्ध वंशात जन्माला आले आहेत.

अभंग क्र.८२१

सुखें होतो कोठे घेतली सुती । बांधविला गळा आपुले हातीं ॥१॥
काय करूं बहु गुंतलों आतां । नयेचि सरतां मागें पुढें ॥ध्रु.॥
होते गांठी तें सरलें आतां । आणीक माथां ऋण जालें ॥२॥
सोंकरोलियाविण गमाविलें पिक । रांडापोरें भिके लावियेलीं ॥३॥
बहुतांचीं बहु घेतलीं घरें । न पडे पुरें कांहीं केल्या ॥४॥
तुका म्हणे काही न धरावी आस । जावे हे सर्वस्व टाकुनीयां ॥५॥

अर्थ:-

मुळात मी सुखी होतो.पण देहादी प्रपंचाचा लोभ धरून मी माझा गळा उगाच अडकवून घेतला असे झाले आहे.काय करू? मी ह्या प्रपंचात इतका काही गुंतून गेलो आहे किजरासुद्धा मागे-पुढे हलता येत नाही.माझ्या पदरी जी काही संचित पुंजी होती, ती प्रपंच अंगावर येताच सरली, आणि डोक्यवर आणखी कर्ज झाले.शेत होते,त्याची राखण करता आली नाही,पिक गमविले,बायकोमुळे भिकेस लागली.व्यवहारामध्ये अनेकांची घरे लटपटी करून घेतली.पण संसारात काहीच पुरे पडले नाही.आता असे वाटते कि, या सर्वस्वाचा त्याग करून हरीला शरण जावे.

अभंग क्र.८२२

न मनावे तैसे गुरूचे वचन । जेणें नारायण अंतरे ते ।
आड आला म्हणूनि फोडियेला डोळा । बळिनें आंधळा शुक्र केला ॥१॥
करी देव तरी काय नव्हे एक । कां तुम्ही पृथक सिणा वांयां ॥ध्रु.॥
उलंघुनि भ्रताराची आज्ञा । अन्न ॠषिपत्न्या घेउनि गेल्या ।
अवघेचि त्यांचें देवें केलें काज । धर्म आणि लाज राखियेली ॥२॥
पितयासी पुत्रें केला वैराकार । प्रल्हादें असुर मारविला ।
बहुत विघ्नें केलीं तया आड । परि नाहीं कैवाड सांडियेला ॥३॥
गौळणी करिती देवाशीं व्यभिचार । सांडुनी आचार भ्रष्ट होती ।
तया दिले ते कवणासी नाही । अवघा अंतर्बाही तोचि जाला ॥४॥
देव जोडे ते करावे अधर्म । अंतरे तें कर्म नाचरावें ।
तुका म्हणे हा जाणतो कळवळा । म्हणोनि अजामेळा उद्धरिलें ॥५॥

अर्थ:-

ज्या वचना मुळे नारायण आपल्यापासून अंतरेल ते वाचन गुरुचे जरी असेल तरी ते वचन ऐकू नये.चांगले कर्म कारायला जाणार तर वामनाच्या हातातील झारीने दानाचे बळी राजा पाणी सोडणार तेवढ्यात शुक्राचार्य झारीच्या तोटीत सूक्ष्म रूपाने जावून बसले.तर बळीराज्याने तोटीत काही गुतले आहे हे समजून तोटीत काडी घातली व आपले गुरु शुक्राचार्य यांचा एक डोळा फुटला.देवाला अशक्य असे काहीच नाही मग तुम्ही भगवंताला सोडून इतर साधनांच्या मागे का फिरता?आपल्या भ्राताराची(पतीची)आज्ञा उल्लंघून ऋषींच्या पत्नी कृष्णाकडे अन्न घेवून गेल्या देवाने हि त्यांचे धर्म आणि लाज यांचे रक्षण केले.पिता आणि पुत्र यांच्यात वैर(प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप)तेव्हा त्याला भगवंताकडून मारविले,कारण त्या पित्याने हरीकार्‍यात अनेक विघ्न्य आणली पण प्रल्हादाने आपला निर्धार सोडला नाही गवळणीने कृष्णाशी व्याभिचार केला.स्वतःचा आचार धर्म सोडला व त्या देवाशी एकरूप झाल्या त्यांना जे भागवंताने देलेते कोणालाही दिले नाही तो त्यांच्याशी अंतबाह्य एक झाला.देवाच्या प्राप्तीसाठी अधर्म करावा लागला तरी करावा हरीचे व आपले अंतर पडेल असे कर्म करू नये.तुकाराम महाराज म्हणतात हाच भगवंताविषयी असलेलेला कळवळा तो हरी जाणतो म्हणूनच तर पापी अजामेळ त्याने त्याचा उद्धार केला.

अभंग क्र.८२३

अरे गिळिले हो संसारें । कांहीं तरि राखा खरें । दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग ॥१॥
येथें न घलीं न घलीं आड । संचितसा शब्द नाड । उठाउठीं गोड । बीजें बीज वाढवी ॥ध्रु.॥
केलें ते क्रियमाण । झालें तें संचित म्हण । प्रारब्ध जाण । उरवरीत उरले तें ॥२॥
चित्त खोटें चालीवरी । रोग भोगाचे अंतरीं । रसना अनावरी । तुका म्हणे ढुंग वाहे ॥३॥

अर्थ:-

अरे तुम्हाला संसाराने गिळले हो काही तरी सत्तेचे रक्षण करा कारण तो हरी का दयावंत आहे त्याने तुम्हाला मनुष्य देह व सत्संगत दिला आहे.हरिभजन परमार्थ हा माझ्या प्रारब्धात नाही असे काही आड घालू नकोस घालू नकोस.ज्याप्रमाणे बिजने बीज वाढवतात त्याप्रमाने उठता बसता हरिभजन करा जे काही कर्म घडत आहे ते क्रियामान आहे व जे घडले ते संचित समज.पुढे ज्याचा भोग अटळ आहे ते प्रारब्ध आहे असे समजतुकाराम महाराज म्हणतात चित्त जेव्हा भरकटते तेव्हा भोगाचे अंतरात लपलेले रोग उत्त्पन्न होतात.अति सेवन करशील तर ते अपचन होवून त्याचा अतिसार होईल.

अभंग क्र.८२४

अग्नि तापलिया काया चि होमे । तापत्रयें संतप्त होती । संचित क्रियमाण प्रारब्ध तेथें ।
न चुके संसारस्थिति । राहाटघटिका जैसी फिरतां चि राहिली । भरली जाली होती एके रितीं ।
साधीं हा प्रपंच पंचाय अग्न । तेणें पावसील निजशांती रे ॥१॥
नारायण नाम नारायण नाम । नित्य करीं काम जिव्हामुखें ।
जन्म जरा व्याधि पापपुण्य तेथें । नासती सकळ ही दुःखें रे ॥ध्रु.॥
शीत उष्ण वन सेवितां कपाट । आसनसमाधी साधीं । तप तीर्थ व्रत दान आचरण।
यज्ञा नाना मन बुद्धी । भोगा भोग तेथें न चुकती प्रकार । जन्मजरादुःखव्याधि ।
साहोनि काम क्रोध अहंकार । आश्रमीं अविनाश साधीं रे ॥२॥
घोकितां अक्षर अभिमानविधि । निषेध लागला पाठी । वाद करितां निंदा घडती दोष । होय वज्रलेपो भविष्यति ।
दूषणाचें मूळ भूषण तुका म्हणे । सांडीं मिथ्या खंती । रिघोनि संतां शरण सर्वभावें । राहें भलतिया स्थिती रे ॥३॥

अर्थ:-

मृत्युं नंतर कायला या देहाला अग्नीने जळतात हे खरे आहे परंतु जिवंत पणे मनुष्य देह नव्हे तर मन व बुद्धी हे त्रिविध तापाने तप्त होतात.संसारता संचित,प्रारब्ध,क्रियमाण,हे चुकत नाहि.रहाटाच्या माळेत मडके फिरत असते,पण त्यात एक मडके फिरत असते आणि दुसरे मडके रिकामे होत असते.प्रपांच्याचे हि तसेच आहे.तू प्रपंच रुपी पंचाग्नी सध्या करून घे म्हणजे तुला शांती मिळेल.तुझ्या जीव्हाने नित्य नारायण नाम स्मरण करत राहा.म्हणजे तुझी जन्म जरा व्याधी पाप पुण्य या सर्वांचा नाश होईल.तुझे दुःख नाश पावतील.शीत उष्ण सेवन केलेस आसना पासून समाधी पर्यंत योग साधना केली ताप तीर्थ योग दान आचरण या सर्वांचे तू अंगीकार केलेस तरी तुझे भोग सुटणार नाही त्या मुळे तू जन्म जरा व्याधी सहन करून काम क्रोध सहन करून अविनाशी आत्मसुख प्राप्त करून घे.तू कितीही वेद पठन केले तरी तुझ्या मागे अभिमान अहंकार हे मागे लागतात आणि शास्त्र विषयी वाद करण्यात कायम निंदा घडत असते,म्हणून हि जी भूषणे आहेत ती दुशानांची करणे आहेत.तुकाराम महाराज म्हणतात तू संतांना सर्व भावे शरण जा आणि ज्या स्थितीत तुला सहज राहत येईल त्या स्थितीत तू राहा.

अभंग क्र.८२५

नव्हे गुरुदास्य संसारियां । वैराग्य तरी भेणें कांपे विषयां । तैसें नाम नव्हे पंढरीराया । जया सायास न लगती ॥१॥
म्हणोनि गोड सर्वभावें । आंघोळी न लगे तोंड धुवावें । अर्थ:-चाड जीवें । न लगे भ्यावें संसारा ॥ध्रु.॥
कर्मा तंव न पुरे संसारिक । धर्म तंव फळदायक । नाम विठ्ठलाचें एक । नाशी दुःख भवाचें ॥२॥
न लगे सांडणें मांडणें । आगमनिगमाचें देखणें । अवघें तुका म्हणे। विठ्ठलनामें आटलें ॥३॥

अर्थ:-

गुरुदास्य कारणे हे संसारीकांना करणे फार कठीण आहे,कारण अंगी वैराग्य येत नाही आणि आले तरी संसारात तो पडत नाही.विषयांना पाहू थरथर कापतो.पण या पंढरीरायाचे नाम तसे नाही येथे कसलेही प्रकारचे कष्ट लागत नाही.हे विठ्ठल परमात्म्याचे नाम सर्व भावे गोड आहे.त्या साठी तुम्हाला अंघोळ करणे किंवा तोंड धुणे या कशाची गरज लागत नाही.ते नाम आपण केंव्हाही घेऊ शकतो.याला कुठल्याही प्रकारची चाड लागत नाही संसारिक लोकही हे नाम घेण्यास भीत नाही.संसारिक लोकांनी कितीही कर्म केले तरी ते पूर्ण होतच नाही.पण धर्म हे फळदायक आहे आणि धर्म म्हणजे विठ्ठलाचे नामस्मरण आहे,त्याने संपूर्ण भाव दुखाच नाश होतो.तुकाराम महाराज म्हणतात येथे कसलीही खटाटोप करण्याची आटाआटी करण्याची गरज नाही.विठ्ठल हे आगम निगमचे स्थान आहे कि ज्या नामा मध्ये सर्व रस अतीव झाले आहे त्या नामात सर्व काही सामावलेले आहे.

अभंग क्र.८२६

नये इच्छूं सेवा स्वइच्छा जगाची । अवज्ञा देवाची घडे तेणें ॥१॥
देहाच्या निग्रही त्याचा तो सांभाळी । मग नये कळि अंगावरी ॥ध्रु.॥
आपुलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणें क्षोभें ॥२॥
तुका म्हणे सांडा देखीचा दिमाख । मोडसीचें दुःख गांड फाडो ॥३॥

अर्थ:-

जगातील लोकांची सेवा करावी हि इच्छा धरू नये कारण त्या मुळे आपले देवाकडे लक्ष लागत नाही.या देहाचा सांभाळ हा तोच करत असतो,जर हा देह त्याच्या स्वाधीन केला तर कोणतीही कटकट आपल्यावर येत नाही.स्वतःच्या इच्छेने आई पुत्राची सेवा करत असते,परंतु तिचा हा मोठे पण तिला बाधक होत नाही.तुकाराम महाराज म्हणतात वरवरचे दिमाखदार वागणे सोडून द्या कारण मोडसीचे दुखणे झाले तर दुन्गांचे स्नायू फाटतात.

अभंग क्र.८२७

सत्य सत्य देततो फळ । नाहीं लागतचि बळ ॥१॥
ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ध्रु.॥
करावीच चिंता । नाहीं लागत तत्वतां ॥२॥
तुका म्हणे भावें । होते सकळ बरवें ॥३॥

अर्थ:-

सत्य हेच सत्याने फळ देत असते.त्यसाठी इतर बळाची जरुरी लागत नाही.देवाच्या चरणाचे स्मरण हे धैर्‍याने करावे हाच सर्वोत्तम उपाय आहे.मग कोणत्याही प्रकारची चिंता करवी लागत नाही.तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या चरण जवळ श्रद्धा ठेवली कि सर्व चांगलेच होते.

अभंग क्र.८२८

साधक जाले कळी । गुरुगुडीची लांब नळी ॥१॥
पचीं पडे मद्यपान । भांगभुर्का हें साधन ॥ध्रु.॥
अभेदाचें पाठांतर । अति विषयीं पडिभर ॥२॥
चेल्यांचा सुकाळ । पिंड दंड भगपाळ ॥३॥
सेवा मानधन । बरे इच्छेनें संपन्न ॥४॥
सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनियां सोडी ॥५॥

अर्थ:-

कलीयुगामध्ये असे काही ढोंगी साधू आहेत कि ते गुरगुडी ओढतात.मध्यपान भांग दारू इत्यादी मद्यापांचे सेवन करतात.अद्वैताचे वर्णन मोठ्या नाटकी स्वरूपाने सांगतात,पण खरे तर तेच विषयांच्या मध्ये पडलेले असतात.अश्या या साधुंचे शिष्य हि खूप असतात पण ते आडदांड असतात,काहीगुरू शिष्यांकडू मान आणि धन मिळवतात,तुकाराम महाराज म्हणतात असे सोंग आणणारे साधू नरकात नक्कीच जातात आणि हा तुकाराम त्यांची फजिती करतो.

अभंग क्र.८२९

मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥१॥
कोणाचा कोणासीं न धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ध्रु.॥
काढा जी मोह बुंथी जाळे । नका लावूं बळें वेड आम्हां ॥२॥
जीव शिव कांही ठेवियेलीं नांवें । सत्य तुम्हां ठावें असोनियां ॥३॥
सेवेच्या अभिळासें न धराचि विचार । आम्हां दारोदार हिंडविलें ॥४॥
आहे तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दुरी दुजेपण ॥५॥
तुका म्हणे काय छायेचा अभिळासे । हंस पावे नाश तारागणीं ॥६॥

अर्थ:-

हे देवा मि जे काही पाहिले आहे ते मला आता सगळे खोटे आहे हे माहित झाले आहे.आता मला तुमचे मायाजाळ दाखवा.ह्या जगामध्ये कोणाचा ही कोणाशी ही काहीही संबंध नाही.सर्व जग हे शुद्ध बुद्धिचेच स्वरुप आहे हे मला आता माहित झाले आहे.तुम्ही आमच्यावर जे मोह रूपी पांघरूंन घातले आहे ते तू काढून टाका.आता उगाच आम्हाला या मोहाने वेड लावू नका.तुम्ही एकच स्वरुप आहात मग जिव अणि शिव ही दोन नावे का पडली आहेत तुम्ही सर्व जाणता आहात.हे देवा तुम्हाला आमच्याकडून सेवेची अपेक्षा आहे म्हणून तुम्ही याचा विचार करत नाही आम्हाला तुम्ही दारोदार हिंड़ायला लावले आहे दारोदार म्हणजे जन्म मृत्युच्या फेरयात.आता आम्हाला वास्तविक स्थिती कळली आहे त्यामुळे तुम्ही आता जो तुमचा खोटा द्वैतभाव आहे तो तुम्ही बाजूला सारा.तुकाराम महाराज म्हणतात थोड्याश्या पाण्याचे प्रतिबिंब पडले की ते मोत्यासारखे दिसते आणि त्या लालसेने हंसाला ते मोती वाटते हंस त्या मोत्या जवळ गेला की ते नाश पावते आणि त्याने त्याची फसगत होते.

अभंग क्र.८३०

अर्थ:-

पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥
तेथें काय मी तें माझें । कोण वागवी ते ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥ध्रु.॥
जीव न देखे मरण । धरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोग शुभा अशुभासी ॥२॥
इच्छा वाढवी ते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकलें तें पावेल ॥३॥

पंचमहाभुतांचा एकत्रित मिळून हा देह तयार झाला आणि तो देह म्हणजे मीच आहे हा अहंकार त्या जिवाला लागला.तसे पाहिले येथे माझे काय आहे जीवचा देहाशी काय संबंध आहे?देह हा काळाचे भातुके खादय आहे तरी पण जीव मोह का धरतो?जिव हा अमर आहे ज्याप्रमाणे आपण जुने वस्र टाकून नवे वस्र धारण करतो त्या प्रमाने हा देह टाकून नवीन जीव म्हणजे आत्मा नविन देह आपल्या संचिताप्रमाणे धारण करतो.आपल्या कर्माचे भोग भोगन्यासाठीच तो नविन जिव धारण करतो.आणि शेवटीतुकाराम महाराज म्हणतात इच्छाचा वेल वाढत जातो त्यामुळे जसे कर्म तशी इच्छा करुन तसेच कर्म आपल्याला भोगवे लागतात म्हणून मी खरे सांगतो त्या इच्छेला आपण खुंटित केले पाहिजे आपली इच्छा नाहिशी जो कोणी करेल तोच ब्रम्हस्थितिला प्राप्त होईल.

अभंग क्र.८३१

पुसावेंसें हेचि वाटे । जें जें भेटे तयासी ॥१॥
देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥ध्रु.॥
अवघियांचा विसर जाला । हा राहिला उद्योग ॥२॥
तुका म्हणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसें ॥३॥

अर्थ:-

मला जे जे कोणी भेटेल त्यांना मला एवढेच विचारवेसे वाटते की देव माझ्यावर कृपा करील काय तो माझी लाज राखिल काय आता मला साऱ्या गोष्टींचा विसर पडला असून एवढा एकच उदयोग मला लागला आहे.तुकाराम महाराज म्हणतात मला एवढीच एक चिंता लागली आहे माझ्या प्रश्नाचे उत्तर देणारा असा मला कोणी भेटेल का?

अभंग क्र.८३२

जाळा तुम्ही माझें जाणतें मीपण । येणें माझा खुण मांडियेला ॥१॥
खादलें पचे तरिच तें हित । ओकलिया थीत पिंड पीडी ॥ध्रु.॥
तरि भलें भोगे जोडिलें तें धन । पडिलिया खानें जीवनासी ॥२॥
तुका म्हणे मज तारीं गा विठ्ठला । नेणताचि भला दास तुझा ॥३॥

अर्थ:-

हे देवा माझे मोठेपण माझा अभिमान झाला आहे तो माझा खून म्हणजे माझा घात करेल.त्याकरता तुम्ही माझा मोठेपणा जाळून टाका.एखादा पदार्थ जर आपण खाल्ला तो पदार्ध आपल्याला पचला तर ठीक आहे नाही तर तो पदार्थ पचला नाही तर तो शरीराला त्रास होतो.त्याप्रमाणे आपण साचवलेल धन या धनाचा चांगला उपयोग केला तर ठीक नाही तर ते चोरी होवून आपल्या जिवाला त्रास होईल.ते चोरी होवून उपाशी मरण्याची वेळ येईल.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुम्ही सर्व खरे जाणत आहात तुम्ही मला या सर्व रोगांणपसून तारा मी तुमचा अज्ञानी दास आहे.

अभंग क्र.८३३

याती मतिहीन रूपें लीन दीन । आणीक अवगुण जाणोनियां ॥१॥
केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ध्रु.॥
जें कांहीं करितों तें माझे स्वहित । आली हे प्रचित कळों चित्ता ॥२॥
जालें सुख जीवा आनंद अपार । परमानंदें भार घेतला माझा ॥३॥
तुका म्हणे यासी नामाचा अभिमान । म्हणोनि शरण तारी बळें ॥४॥

अर्थ:-

हे देवा मि शुद्र जातीचा मतिमंद बुद्धिचा रूपाने कुरूप दीन लीन आहे.असे अनेक अवगुण माझ्या मध्ये आहेत.हे तुम्ही जाणता तरीही या विठ्ठलाने माझा अंगीकार केला.पांडुरंग जे काही करीत आहे त्यात माझे स्वहितच आहे आता याची खात्री मला आली आहे.या परमानदंने माझा भार आपल्या माथी घेतला आहे याचा मला अपार आनंद झाला आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जिवाला याचे सुख वाटते आहे देवाला स्वःताच्या नावाचा अभिमान आहे त्याचे नामस्मरण जो कोणी करतो म्हणून तो शरनागताना तारतो.

अभंग क्र.८३४

बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥१॥
तुझ्या पायीं मज जालासे विश्वास । म्हणोनियां आस मोकलिली ॥ध्रु.॥
ॠषि मुनि सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥२॥
नाहीं नास तें सुख दिलें तयांस । जाले जे उदास सर्वभावें ॥३॥
तुका म्हणे सुख न माये मानसीं । धरिले जीवेंसी पाय तुझे ॥४॥

अर्थ:-

हे केशव राजा हे मायबापा तू भक्तांचे काम करण्यासाठी बहुउताविळच असतोस.तूझ्या पायी आता मला पूर्ण विश्वास आहे त्यामुळे मी सर्व आशा टाकून दिलेली आहे.ऋषीमुनी सिद्ध साधक असे अपार जन यांना तुझे स्वरूप समजले आहे.जे सर्व भावे देहाविषयी उदास झालेले त्यांना तू अपार असे सुख अविनाशी सुख दिलेले आहे.तुकाराम महाराज म्हणतात देवा त्या साधू संतां प्रमाणे मी ही तुझे चरण आता माझ्या जीवाशी हृदयाशी घट्ट धरून राहिलो आहे त्यामुळे माझ्या मनामध्ये सुख मावेनसे झाले आहे.

अभंग क्र.८३५

माया मोहोजाळीं होतों सांपडला । परि या विठ्ठला कृपा आली ॥१॥
काढूनि बाहेरि ठेविलों निराळा । कवतुक डोळां दाखविलें ॥ध्रु.॥
नाचे उडे माया करी कवतुक । नाशवंत सुखें साच केलीं ॥२॥
रडे फुंदे दुःखें कुटितील माथा । एकासी रडतां तें ही मरे ॥३॥
तुका म्हणे मज वाटतें नवल । मी माझे बोल ऐकोनियां ॥४॥

अर्थ:-

मी मोह जाळामध्ये सापडलो होतो पण या पांडुरंगाला माझी दया आली.त्याने मला यातून बाहेर काढले आणि इतर जन या जाळ्यात कसे अडकलेले आहेत याचे आश्चर्य दाखवले.या संसारातील लोक मायेने नाचतात उड्या मारतात व नाशिवंत जे सुख आहे त्यालाच ते खरे मानतात.त्या योगाने हे रडतात दुःख मानतात आणि दुसरा एखादा मेला की त्याविषयी चर्चा करतात पण नंतरही तसेच मरतात हे त्यांना समजत नाही.तुकाराम महाराज म्हणतात या मायेच्या जाळ्यात अडकलेला जीव मी आणि माझे म्हणतो हे बोल ऐकून मला नवल वाटते.

अभंग क्र.८३६

देहभाव आम्ही राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥१॥
आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तोचि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥
म्हणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥२॥
जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥३॥
तुका म्हणे जालों जयाचा अंकित । तोचि माझें हित सर्व जाणे ॥४॥

अर्थ:-

आम्ही विठोबाचे चरणी देहभाव अर्पण केलेला आहे त्यामुळे आम्ही निवांत राहिलो आहोत.आमच्या हिताचा उपाय देवच जाणत आहे ते पुढचेही देवच करत आहे.हे वचन आम्ही संतांचे मुखातून ऐकलेले आहे त्यामुळे सुखदुःख मी जाणत नाही.मी माझा सर्व भार त्या विठ्ठलावर घालूनच निसंग निवांत एकटा राहिलो आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी ज्याचा सर्वभावे सेवक झालेलो आहे तोच माझे सर्व हित जाणत आहे.

अभंग क्र.८३७

आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरी तें जतन होय देंठीं ॥१॥
नामेचि सिद्धी नामेचि सिद्धी । व्यभिचारबुद्धी न पवतां ॥ध्रु.॥
चालिला पंथ तो पाववील ठाया । जरि आड तया नये कांहीं ॥२॥
तुका म्हणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हाणी लाभ ॥३॥

अर्थ:-

एखाद्या वृक्षाला फळ आले आणि ते देठाला चिटकून राहिले तर ते चांगल्या प्रकारे पीकेल.नामाने सर्व काही सिद्ध होते पण दुसरीकडे कोठेही मन जाऊ देऊ नये.तुला ज्या मार्गाने मुक्कामाला जेथे जायचे असेल तेथे जाण्यासाठी तू त्या मार्गाने चालला आहे त्या मार्गाने चालत राहा जरी तुला काही प्रतिबंध होत असेल तरीही तू त्या मार्गाने चालत रहा म्हणजे मुक्कामाला पोहोचशील.तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ मार्गांमध्ये अडचण येत असतात कोणत्याही प्रकारचा लाभ आणि याचा विचार करू नये.

अभंग क्र.८३८

विरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासावीस ॥१॥
म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ध्रु.॥
देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥२॥
तुका म्हणे देव अंतरे यामुळें । आशामोहोजाळें दुःख वाढे ॥३॥

अर्थ:-

परमार्थाच्या विरोधामध्ये कोणीही काहीही बोलले मला ते बोलणे सहन होत नाही ते शब्द ऐकून माझे मन कासावीस होते.या कारणामुळे मला कोणाचीही संगती आवडत नाही मला एकांतच गोड वाटतो.मला देहाची भावना वासनेचा संग हे काहीही आवडत नाहीत मला त्याचा अगदी कंटाळा आलेला आहे.तुकाराम महाराज म्हणतात या कारणामुळे देह मोहजाळात अडकतो आणि देव आपल्यापासून अंतरतो व आपल्याला दुःख वाढते.

अभंग क्र.८३९

तुजशीं संबंध खोटा । परता परता रे तू थोंटा ॥१॥
देवा तुझें काय घ्यावें । आप आपणां ठकावें ॥ध्रु.॥
जेथें मुद्दल न ये हातां । व्याज मरावें लेखितां ॥२॥
तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं तुझा ठसा ॥३॥

अर्थ:-

अरे थोटा लबाडा तुझ्याशी संबंध नसलेला बरा आमच्यापासून दूर राहिलेला बरा.देवा तुझ्या पासून आम्ही काय घ्यावे तुझ्या पासून मी काही घ्यावे तरते आपणच आपल्याला फसविल्या सारखे होते.जेथे कुळाकडून मुद्दलच हाताला येत नाही पण व्याजाचाहिशोब करता करताच मरण येण्याचा प्रसंग येतो.तुकाराम महाराज म्हणतात देवा भक्तजनांना तू फासावितोस अशी कीर्ती तुझी त्रिभुवनात झालेली आहे.

अभंग क्र.८४०

याचि हाका तुझे द्वारीं । सदा देखों ऋणकरी ॥१॥
सदा करिसी खंड दंड । देवा बहु गा तूं लंड ॥ध्रु.॥
सुखें गोविसी भोजना । लपवूनियां आपणां ॥२॥
एकें एक बुझाविसी । तुका म्हणे ठक होसी ॥३॥

अर्थ:-

देवा तुझ्या द्वारा मध्ये ऋण करी भक्त आरोळ्या देत असतात आणि तू त्यांना आषाढी वारीला या कार्तिकी वारीला या असे सांगतो असा तो लंड म्हणजे लबाड आहे.कोणी भक्त तुझ्याकडे त्याची इच्छित वस्तू मागण्यास आला तर त्याला तू भोग रूप जेवणात गुंतवितो आणि स्वतः माया रूप आवरणात लपून बसतोस.तुकाराम महाराज म्हणतात अशाप्रकारे तू तुझ्या भक्तांना काहीतरी देऊन त्यांचीसमजूत काढतो आणि त्यांना वाटे लावतो असा तू ठक आहेस म्हणजे लबाड आहेस.

अभंग क्र.८४१

आम्ही जाणों तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥१॥
फांकुं नेदूं चुकावितां । नेघों थोडें बहु देतां ॥ध्रु.॥
बहुता दिसाचें लिगाड । आलें होत होत जड ॥२॥
तुका म्हणे आतां । नेघो सर्वस्व ही देतां ॥३॥

अर्थ:-

देवा आम्हाला तुझा फसविण्याचा हेतू माहीत आहेत त्यामुळे आम्ही तुझे पाय घट्ट धरलेले आहे.देवातू आम्हाला काहीतरी उगाच थोडेफार देऊन आमची एक चुकवाचूक करू लागला तर आम्ही तुला हालू देणार नाही.हे हरी आम्ही तुझी सेवा फार दिवसापासून करत आहोत आता त्या कर्जाचे लिगाड फार जड झालेले आहे.तुकाराम महाराज म्हणतात तू ते कर्ज फेडण्या करण्याकरिता आम्हाला सर्वस्व दिले सर्व काही जरी दिले तरी ते आम्ही घेणार नाही.

अभंग क्र.८४२

ऋण वैर हत्या । हें तों न सुटे नेंदितां ॥१॥
हें कां नेणां पांडुरंगा । तुम्ही सांगतसां जगा ॥ध्रु.॥
माझा संबंध तो किती । चुकवा लोकाची फजिती ॥२॥
तुका म्हणे याचि साठीं । मज न घेतां नये तुटी ॥३॥

अर्थ:-

देवा एखाद्याचे घेतलेले ऋण म्हणजे कर्ज एखाद्याशी घेतलेले वैर आणि एखाद्या जीवाची केलेली हत्या हे या जन्मी जरी नाही तरी कोणत्यातरी जन्मी भोगावेच लागते.हे पांडुरंगा हे तुम्हाला माहित नाही का हे शास्त्र तर तुम्हीच लोकांना सांगताना?देवा माझा तुमच्याशी संबंध तरी किती आहेपण लोकांमध्ये तुमची जी फजितीहोणार आहे ती फजिती तुम्ही चुकवा.तुकाराम महाराज म्हणतात याच कारणासाठी मला तुमच्याकडून कोणतेही नुसकानीचे घेणे परवडत नाही.

अभंग क्र.८४३

नाहीं मागितला । तुम्हां मान म्यां विठ्ठला ॥१॥
जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ध्रु.॥
नाहीं केला पोट । पुढें घालूनि बोभाट ॥२॥
तुका म्हणे धरूनि हात । नाहीं नेले दिवाणांत ॥३॥

अर्थ:-

हे विठ्ठला मी तुमच्याकडे काही मान मागितला नव्हता.असे असूनदेखील मला लोकांकाडून सन्मान मिळतो आहे तो देऊन माझी तुम्ही फजिती का करतात?माझे पोट भरत नाही म्हणून मी तुमच्या नावाचा बोभाटा कधीही या जनमानसात केलेला नाही.तुकाराम महाराज म्हणतात असे असूनदेखील मी कधीही तुमचा हात धरून संतांच्या कचेरीत मी तुम्हाला कधी नेले नाही.

अभंग क्र.८४४

तूं पांढरा स्पटिक मणी । करिसी आणिकां त्याहुनि ॥१॥
म्हणोनि तुझ्या दारा । न येती ठकती दातारा ॥ध्रु.॥
तुझी ठावी नांदणूक । अवघा बुडविला लौकीक ॥२॥
तुका म्हणे ज्याचें घेसी । त्यास हेचि दाखविसी ॥३॥

अर्थ:-

देवा तू त्या पांढऱ्या स्फटिक मन्याप्रमाणे आहेस आणि तुझ्याकडे जो कोणी येईल तुम्ही त्यालाही तू तुझ्याप्रमाणेच त्या पांढऱ्या स्फटिक मन्याप्रमाणे करतोस.तू मोठा दातारा आहेस पण ठकविणारा आहे त्यामुळे तुझ्या दारात कोणी येत नाही.देवातुझी वागणूक आम्हाला चांगलीच माहित आहे तुझ्या अशा वागण्यामुळे तुझा लौकिक तू बुडविला आहे.तुकाराम महाराज म्हणतात देवा तू ज्याच्याकडून सेवा रुपी कर्ज घेतो त्याला ही माझ्याकडे काही नाही असे दाखवितोस.

अभंग क्र.८४५

बोलतों निकुरें । नव्हती सलगीचीं उत्तरें ॥१॥
मागे संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ध्रु.॥
अंगावरी आलें । तोंवरी जाईल सोसिलें ॥२॥
तुज भक्तांची आण देवा । जरि तुका येथें ठेवा ॥३॥

अर्थ:-

देवा मी तुझ्याजवळ आता अतिशय निकराने म्हणजे तळमळीने बोलत आहे माझे हे बोलणे सलगीचे म्हणजे प्रेमाचे बोलणे नाही.कारण तू तुझ्या भक्तांशी ज्या प्रमाणे वागत आहे ते एकूण माझे मन संतापले आहेत.देवा माझ्यावर संकट आले जोपर्यंत मला सहन होईल तोपर्यंत मी ते सहन करीन पण दुसऱ्याला होत असलेले दुःख मला सहन होत नाही आहे.तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुझ्या दाराशी येथेच ओरडत तुला ठेवायचे असेल तर तुला तुझ्या भक्ताची ज्ञानदेवाची शपत आहे.

अभंग क्र.८४६

बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठवितां चित्तीं काय नव्हे ॥१॥
आणिकां उपायां कोण वांटी मन । सुखाचें निधान पांडुरंग ॥ध्रु.॥
गीत गावों नाचों छंदें वावों टाळी । वैष्णवांचे मेळीं सुखरूप ॥२॥
अनंत ब्रम्हांडें एके रोमावळी । आम्ही केला भोळीं भावें उभा ॥३॥
लटिका हा केला संवसारसिंधु । मोक्ष खरा बंधु नाहीं पुढें ॥४॥
तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलों निंश्चित त्याच्या बळें ॥५॥

अर्थ:-

लक्ष्मीचा पती हा बुद्धीचा जनिता आहे मग त्याला जर चित्ता आठविले तर मग काय साध्य होणार नाही?पांडुरंग हाच सर्व सुखाचे निदान आहे त्यामुळे त्याच्यावाचून दुसर्‍या ठिकाणीं आम्ही आमच्या मनाची वाटणी का व कोणी करावी?आम्ही वैष्णवांच्या मेळ्यांमध्ये सुखाने या हरीचे गीत गाऊ आनंदाने नाचू आणि त्या सुख छंदांमध्ये ताली वाजवू.ज्याच्या एका रोमा वर अनंत ब्रह्मांड आहेत असा हा आमचा विठ्ठल परमात्मा त्याला आम्ही आमच्या भक्तिभावाच्या जोरावर विटेवर उभा केलेला आहे.आम्ही आमच्या भक्तीच्या जोरावर हा संसार सिंधू व्यर्थ ठरविला आहे त्यामुळे आम्हाला मोक्ष आणि बंध राहिलाच नाही.तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे आम्ही अंकित म्हणजे दास झालेलो आहोत त्याच्याच बळावर आम्ही निश्चिंत झालो आहोत.

अभंग क्र.८४७

न लगे मायेसी बाळें निरवावें । आपुल्या स्वभावें ओढे त्यासी ॥१॥
मज कां लागला करणें विचार । ज्याचा जार भार त्याचे माथा ॥ध्रु.॥
गोड धड त्यासी ठेवी न मगतां । समाधान खातां नेदी मना ॥२॥
खेळतां गुंतलें उमगूनी आणी । बैसोनियां स्तनीं लावी बळें ॥३॥
त्याच्या दुःखेंपणें आपणा खापरीं । लाही तळीं वरी होय जैसी ॥४॥
तुका म्हणे देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागों नेदी ॥५॥

अर्थ:-

मुलाचे रक्षण करावे असे आईला कधीही सांगावे लागत नाही तिचा स्वभावच प्रेमाचा असल्याने ती आपोआपच बाळांचे रक्षण करते बाळाचे रक्षण करण्यास ओढ घेते.जो विश्वाचा जनिता ज्याने मला जन्माला घातले त्याच्याच माथ्यावर माझे सर्व जड भार आहे,मग मला कुठलाही विचार करण्याची काहीही गरज नाही.जर घरात आईने गोड धोड पदार्थ केले तर ते पदार्थ आई मुलासाठी जतन करून ठेवते मुलाला सोडून खाणे हे आई समाधानकारक नसते त्यात आईचे समाधानही होत नाही.बालक जर खेळात गुंतलेले असेल तर आई त्याला शोधून आणते आणि आई त्याला खाऊ घालते.जर मुलाला दुःख झाले तर आई त्यांच्या दुखत असते तर जर एखाद्या खापरीत जश्या लाह्या तडतडत असतात,त्या प्रमाणे आईचे चित्त त्या मुला बद्दल तडफडत असते.तुकाराम महाराज म्हणतात मुलांना कसल्याही प्रकारचे आघात त्रास होऊ नये या साठी ती माऊली आपला देह भाव विसरत असते आणि त्या मुलांना जपत असते.

अभंग क्र.८४८

ब्राम्हण तो नव्हे ऐसी ज्यासी बुद्धी । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥१॥
जयासी नावडे हरीनाम कीर्तन । आणीक नर्तन वैष्णवांचें ॥ध्रु.॥
सत्य त्याचे वेळे घडीला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥२॥
तुका म्हणे येथें मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें कुष्ट होय ॥३॥

अभंग क्र.८४९

ब्राम्हण तो याती अंत्यज असतां । मानावा तत्वता निश्चयेसी ॥१॥
रामकृष्णनामें उच्चारी सरळें । आठवी सांवळें रूप मनीं ॥ध्रु.॥
शांति क्षमा दया अळंकार अंगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥२॥
तुका म्हणे गेल्या षडऊर्मी अंगें । सांडुनियां मग ब्राम्‍हण तो ॥३॥

अर्थ:-

एखाद्या नीच जातीच्या अंत्यजाचा व्यक्ती असेल व तो शुध्द मनाने राम नाम हरीनाम उच्चारीत असेल त्या सावळ्या हरीचे रूप मनात स्मरण करीत असेल तर त्याला नीच कुळातील न मानता त्यालाही उच्च कुळातील समजावे.शांती,क्षमा,दया हे अळंकार त्याच्या जवळ असतात म्हणून तो कोणत्याही प्रसंगी भंगत नाही कोणत्याही प्रसंगाला धैर्‍याने सामोरे जातो.तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या अंगातून गर्व गेला असेल मग तो ब्रम्ह्न उच्च कुळी समजावा.

अभंग क्र.८५०

एक करिती गुरु गुरु । भोंवता भारु शिष्यांचा ॥१॥
पुंस नाहीं पाय चारी । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ध्रु.॥
परस्त्री मद्यपान । पेंडखान माजविलें ॥२॥
तुका म्हणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥३॥

अर्थ:-

असी कित्येक लोक आहेत कि जे आपल्या भोवती शिष्यांचा समुदाय गोळा करतात व स्वतःला गुरु गुरु असे म्हन्विण्यात धन्यता मानतात अश्या या खोटे पणाने भरलेल्या माणसांना मनुष्य न मानता शेपूट नसलेले चार पायाचे कुत्रे समजावे.असेहे कुत्रे परस्त्री गमन मद्य पान खाणे पसंद करतात.तुकाराम महाराज म्हणतात या अश्या माणसांना आपण पुढे अधोगतीला जाणर आहोत यांची काळजी वाटत नाही.

अभंग क्र.८५१

एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥१॥
पाप न लगे धुंडावें । लागेल तेणें तेथें जावें ॥ध्रु.॥
कांहीं दुसरा विचार । न लगे करावाचि फार ॥२॥
असत्य जे वाणी । तेथें पापाचीच खाणी ॥३॥
सत्य बोले मुखें । तेथें उचंबळती सुखें ॥४॥
तुका म्हणे दोन्ही । जवळीच लाभहानी ॥५॥

अर्थ:-

एका पुरुषाला दोन बायका असतील तर त्याच्या घरामध्ये पाप वसत असते.पाप कोठेही शोधायची गरज नाही.ज्याला पाप शोधायचे असेल त्याने तेथे जावे.या संबंधीत दुसरे काही करायची गरज नाही.नेहमी जो खोटे बोलतो त्याच्या मुखात पाप निर्माण करणारी खाण आहे.जे नेहमी सत्य बोलतात त्यांच्या ठिकाणी सुख हे उचंबळून राहत असते.तुकाराम महाराज म्हणतात सत्य आणि असत्य हे दोन्ही आपल्या जवळ असते सत्याने वागले तर लाभ होतो आणि असत्याने वागले तर हानी होते.

अभंग क्र.८५२

जळतें संचित । ऐसी आहे धर्म नीत ॥१॥
माझ्या विठोबाचे पाय । वेळोवेळां मनीं ध्याय ॥ध्रु.॥
नेदी कर्म घडों । कोडे आडराणें पडों ॥२॥
तुका म्हणे मळ । राहों नेदी ताप जाळ ॥३॥

अर्थ:-

धर्म नीती मध्ये असे सांगितले आहे कि देवाच्या चिंतनाने सर्व संचित कर्म जाळून जाते.म्हणून माझ्या विठोबाचे चरणकमल नित्य स्मरावे.असे केले तर त्यामुळे तुमच्या हातून कोणतेही पाप कर्म होणार नाही.कोणत्याही प्रकारे तुम्ही कुमार्गाला जाणार नाहीत.तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या अंतःकरणात कुठल्याही अविद्येचा मळ राहणार नाहीत,कुठल्याही प्रकारचे त्रिविध ताप राहणार नाहीत,फक्त तुम्ही माझ्या विठोबाचे चरण कमल स्मरण करत जा.

अभंग क्र.८५३

संतापाशीं बहु असावें मर्‍यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥१॥
बासर तो भुंके गाढवाचेपरी । उठे पाठीवरी यम दंड तेणें ॥ध्रु.॥
समयो नेणें तें वेडें चाहाटळ । अवगुणाचा ओंगळ मान पावे ॥२॥
तुका म्हणे काय वांयां चाळवणी । पिटपिटघाणी हागवणीची ॥३॥

अर्थ:-

संतांपाशी असताना मर्‍यादा धरून वागावे,जर आपण वाईट पणाने वागलो तर आपला घात होण्याचि संभावना असते.वाईट बोलणारा माणूस हा भुंकणारा गाढवच आहे.म्हणून त्याच्या पाठीवर मार खाल्लेले वळ उठत असतात.वेळ समय न समजणाऱ्या व्यक्तीला चहाटळ व मूर्ख म्हणावे त्यास ओंगळ हि पदवी प्राप्त होते.तुकाराम महाराज म्हणतात अश्या या मूर्ख माणसांचे बोलणे व ते मनुष्य हे घाण हगवणी सारखे आहेत.

अभंग क्र.८५४

पोटापुरतें काम । परि अगत्य तो राम ॥१॥
कारण तें हें चि करीं । चित्तीं पांडुरंग धरीं ॥ध्रु.॥
प्रारब्धी हेवा । जोडी देवाची ते सेवा ॥२॥
तुका म्हणे बळ । बुद्धी वेचूनि सकळ ॥३॥

अर्थ:-

पोटापुरते काम करावे परंतु काम करत करता राम नाम स्मरावे.तू कार्य हि हेच कर की आपल्या चित्तात हरी नामचे साठवण व्हावे.देवाचि सेवा करून प्रारब्धा प्रमाणे इच्छा तयार करावी.तुकाराम महाराज म्हणतात हरी प्राप्ती साठी तू तुझे बळ बुद्धी सर्व काही खर्च कर.

अभंग क्र.८५५

घेसी तरी घेई संताची हे भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥१॥
सर्वभावें त्यांचें देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ध्रु.॥
करिसील तो करीं संतांचा सांगात । आणीक ते मात नको मना ॥२॥
बैससील तरी बैस संतांमधीं । आणीक ते बुद्धी नको मना ॥३॥
जासी तरि जाई संतांचिया गांवां । होईल विसावा तेथें मना ॥४॥
तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेई ॥५॥

अर्थ:-

हे मना अरे तुला भेट घ्यायचीच असेल तर संतांची घे इतरांच्या गोष्टी तू करू नकोस.संतांचे सर्व बोल सर्व भाव हे देवाचे भांडवल असते ते देवाशिवाय इतर गोष्टी बोलत नाही.हे मना अरे तुला संग जर कोणाचा करायचा असेल तर तो संतांचा कर इतरांकडे तू जाऊ नको,तुला बसायचे असेल तर संतान मध्ये बस आणिकांची संगत तुझ्या बुद्धीत येऊ देऊ नकोस.तुला कोठे बाहेर जावयास वाटत असेल तर तू संतांच्या गावाला जा तेथे तुझ्या मनाला विश्रांती मिळेल.तुकाराम महाराज म्हणतात हे मना संत हे सुखाचे सागर आहेत म्हणून तू निरंतर सुखाची तृप्ती करू घे.

अभंग क्र.८५६

संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥१॥
तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक तेचि मज ॥ध्रु.॥
संतांचिये गांवीं वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥२॥
संतांचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥३॥
संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साठी घेती देती ॥४॥
तुका म्हणे तेथे आणिक नाहीं परी । म्हणोनि भिकारी झालों त्यांचा ॥५॥

अर्थ:-

संतांच्या गावाला प्रेमाचा सुकाळ असतो तेथे कसल्याही प्रकारचे तळमळ दुःख नसते.म्हणून मी तेथे त्यांचा याचक म्हणून राहीन आणि ते हि मला प्रेमरूपी भिक्षा घालतील.संतांच्या गावाला श्री विठ्ठ्लाचेच भांडवल आहे.त्यांचे सर्व धन वित्त हे श्री विठ्ठलच आहे संताचे भोजन हे हरीनाम रुपी अमृताचे सेवन असते ते सदैव हरी कीर्तनात रंगलेले असतात.संतांचा उदीम(व्यापार)हा सदाचाराचाच उपदेश असतो ते नेहमी प्रेम सुखासाठी या उपदेशाचे घेणे देणे देवाण घेवाण करतात.तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या घरी दुसरे कोणतेही विचार नसतात म्हणून मी त्यांचा भिकारी म्हणून राहिलो आहे.

अभंग क्र.८५७

बहुतां जन्मां अंतीं । जोडी लागली हे हातीं ॥१॥
मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरीं पांडुरंगीं भाव ॥ध्रु.॥
बहु केला फेरा । येथें सांपडला थारा ॥२॥
तुका म्हणे जाणे । ऐसे दुर्लभ ते शाहाणे ॥३॥

अर्थ:-

भरपूर जन्म नंतर तुला मनुष्य देह हाती लागला आहे.म्हणून तू पांडुरंगाच्या ठिकाणी दृढ भाव ठेव.अरे अनेक फेरे मारल्यानंतर आता आपल्याला खरे विश्रांतीचे स्थान लाभले आहे.तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य देह हा दुर्लभ आहे असे जाणणारा हा सुद्न्य होय.

अभंग क्र.८५८

लेकराची आळी न पुरवावी कैसी । काय तयापाशीं उणें जालें ॥१॥
आम्हां लडिवाळां नाहीं तें प्रमाण । कांहीं ब्रम्हज्ञान आत्मस्थिती ॥ध्रु.॥
वचनाचा घेईन अनुभव पदरीं । जें हें जनाचारीं मिरविलें ॥२॥
तुका म्हणे माझी भोळिवेची आटी । दावीन शेवटीं कौतुक हे ॥३॥

अर्थ:-

विठाबाई माऊली लेकराचा हट्ट का पूर्ण करत नाही?तिच्या पाशी काय उणे आहे?या विठाईच्या भक्तांना ब्रम्हज्ञान किंवा आत्मस्थिती भाव आवडत नाही.विठाई हि पतितांना पावन करणारी आहे याचा अनुभव मी घेणार आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझा हा भोळे पणाचा प्रयत्न आहे पण याचे खरे कवतुक मी तुम्हांला शेवटी दाखवीन.

अभंग क्र.८५९

रूप नांव माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयापरि ॥१॥
सींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवीं समजती ॥ध्रु.॥
पोटा आलें तिच्या लोळे मांडिवरी । पारखी न करी खंतीं चित्ती ॥२॥
तुका म्हणे भक्तीसाठी हरीहर । अरूपीचें क्षरविभाग हे ॥३॥

अर्थ:-

देवाला या परब्रम्हाला नाव व रूप नाही परंतु ब्रम्ह हे सगुण रूपाने आले म्हणून आम्हा भक्तांची हि उत्तम सोय झाली त्या ब्रम्हाच्या ठिकाणी आमचा सद्भाव ठेवणे आणि त्याच्या बरोबर बोलावयास आधार मिळाला.पुथ्वीवरती अनेक ठिकाणी शिव म्हणजे कुंपणे घातली हि मर्‍यादित लोकांची कल्पना आहे परंतु शहाण्या विचारवंत लोकांना पृथ्वी हि अखंड आहे हे सहज समजते.आईच्या मांडीवर बालके लोळतात कावतुकाने खेळतात त्या विषयी लोकांना कोणत्याही प्रकारचा संशय येत नाही अर्थात त्या बालकांचा भाव निरागस आहे हे लोक जाणत असतात.तुकाराम महाराज म्हणतात देवाची भक्ती करता यावी म्हणून हा ब्रम्ह हरी आणि हर हे या पृथ्वीवर सगुण रूपाने साकार झाले आहेत.

अभंग क्र.८६०

आर्तभूतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शक्ती ॥१॥
फळ आणि समाधान । तेथें उत्तम कारण ॥ध्रु.॥
अल्प तो संतोषी। स्थळीं सांपडे उद्देसीं ॥२॥
सहज संगम । तुका म्हणे तो उत्तम ॥३॥

अर्थ:-

एखाद्या पीडितांना अन्न पैसे वगैरे देऊन आपल्या शक्तीचा योग्य तो उपयोग करावा.त्यामुळे आपल्याला समाधान मिळते,त्याचे फळही मिळते त्या पिडीताला मदतही होते यामुळे उत्तम कार्य हि घडते.एक अल्प संतुष्ट माणसाला एखाद्याने दान दिले तर आणि सत्पात्र मनुष्य भेटला तर तुकाराम महाराज म्हणतात तो सहज आणि उत्तम तऱ्हेचा योगायोगच होय.

अभंग क्र.८६१

मुळाचिया मुळें । दुःखें वाढती सकळे ॥१॥
ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ध्रु.॥
न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥२॥
तुका म्हणे थीतें । दुःख पाववावें चित्ते ॥३॥

अर्थ:-

योग मार्गात अनेक वर चढ पायऱ्या असतात त्यात श्रम जास्त असतात असा योग मार्गाचा धर्म आहे मग तो योग मार्ग श्रम वाढविणारा नाही काय?कोणती वेळ कशी येते हे आसक्तीच्या भरात समजत नाही.व नको त्या भानगडीत गुंतण्याचा प्रसंग येतो. तुकाराम महाराज म्हणतात या योग मार्गात चित्ताला मात्र दुःख भोगावे लागते.

अभंग क्र.८६२

भाग्यवंतां हेचि काम । मापी नाम वैखरी ॥१॥
आनंदाची पुष्टि अंगीं । श्रोते संगीं उद्धरती ॥ध्रु.॥
पिकलें तया खाणें किती । पंगतीस सुकाळ ॥२॥
तुका करी प्रणिपात । दंडवत आचारियां ॥३॥

अर्थ:-

भाग्यवंत लोकांना आपल्या वैखरीने आपल्या वाणीने हरीनाम उच्चारणे हरीनाम रुपी माप मोजत बसने ऐवढेच काम असते.त्यांच्या अंगी आंनदाची पुष्टी असते आणि त्यांच्या संगतीत असणारे श्रोते त्यांच्यामुळे यांचाही उद्धार होतो.ज्याने धन्य पिकविले तो किती खाणार आहे?खरा फायदा तर त्याच्या पंगतीत बसलेल्या लोकांचा.तुकाराम महाराज म्हणतात अश्या महंतांना माझा साष्टांग नमस्कार आहे.

अभंग क्र.८६३

लटिकें तें रुचे । साच कोणाही न पचे ॥१॥
ऐसा माजल्याचा गुण । भोगें कळों येईल सीण ॥ध्रु.॥
वाढवी ममता । नाहीं वरपडला तो दूतां ॥२॥
न मनी माकड । कांहीं तुका उपदेश हेकड ॥३॥

अर्थ:-

खोटे सर्वांना आवडते कारण याला फक्त मस्ती कारण आहे.अश्या या व्यक्तींना भोग भोगण्याची वेळ आली कि मग शीण येतो.अश्या माजलेल्या लोकांचे आहे तो पर्यंत देहावर ममता असते मग यम दूतांच्या तडाख्यात सापडला कि त्याला समजते.तुकाराम महाराज म्हणतात अश्या या हेकड(हट्टी)माकडाला किती हि उपदेश केला तरी ते ऐकत नाही.

अभंग क्र.८६४

कौतुकाची सृष्टी । कौतुकेचि केलें कष्टी ॥१॥
मोडे तरी भले खेळ । फांके फांकिल्या कोल्हाळ ॥ध्रु.॥
जाणणियासाटी। भय सामावले पोटी ॥२॥
तुका म्हणे चेता । होणें तें तूच आयता ॥३॥

अर्थ:-

या सृष्टीची निर्मिती माये पासून झाली आहे.व या मायेच्या कवतुकाने जीव कष्टी होतो.हा मायेचा खेळ दृढ निश्चयाने मोडला तर मोडतो.अहंकारामुळे द्वैत भाव निर्माण होऊन त्यामुळेच भय निर्माण होते.तुकाराम महाराज म्हणतात ज्या आत्म जागृतीच्या स्थितीत तुला यायचे आहे ती स्थिती तुझ्या ठिकाणी आहे तूच ब्रम्ह आहे तूच चेता आहे.

अभंग क्र.८६५

भोवंडीसरिसें । अवघें भोंवतचि दिसे ॥१॥
ठायीं राहिल्या निश्चळ । आहे अचळीं अचळ ॥ध्रु.॥
एके हाकेचा कपाटीं । तेथें आणीक नाद उठी ॥२॥
अभ्र धांवे शशी । असे ते तें दुसरें भासी ॥३॥

अर्थ:-

जर भोवळ आली म्हणजे चक्कर आली तर असे भासते की आपल्या भोवतालचे सर्व काही फिरू लागले आहे.आणि आपली भोवळ राहिली कि सर्व स्थिर असल्याचे दिसते.पर्वता खाली उभा राहुन मोठ्याने हाक मारली तर आपल्याला आपला प्रती ध्वनी ऐकू येतो.तुकाराम महाराज म्हणतात जेंव्हा आकाशाती ढग धावू लागतात तेंव्हा आपल्याला चंद्रच धावतो असे भासते.

अभंग क्र.८६६

नव्हों आम्ही आजिकाळीचीं । काचीं कुचीं चाळवणी ॥१॥
एके ठायीं मूळडाळ । ठावा सकळ आहेसी ॥ध्रु.॥
तुमचें आमचेंसें कांहीं । भिन्न नाहीं वांटलें ॥२॥
तुका म्हणे जेथें असें । तेथें दिसें तुमचासा ॥३॥

अभंग क्र.८६७

योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभय लोकीं कीर्ती सोहळा मान ॥१॥
येर येरांवरी जायांचें उसणें । भाग्यस्थळीं देणें झाडा वेसीं ॥ध्रु.॥
केलिया फावला ठायींचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काहवितो ॥२॥
तुका म्हणे लाभ अकर्तव्या नांवें । शिवपद जीवें भोगिजेल ॥३॥

अभंग क्र.८६८

मरणाहातीं सुटली काया । विचारें या निश्चयें ॥१॥
नासोनियां गेली खंती । सहजिस्थति भोगाचे ॥ध्रु.॥
न देखें सें जालें श्रम । आलें वर्म हाता हें ॥२॥
तुका म्हणे कैची कींव । कोठें जीव निराळा ॥३॥

अर्थ:-

अहंम ब्रम्हास्मि या महा वाक्याचा मला बोध झाला त्यामुळे माझा जीव जन्म मरणाच्या चक्रातून सुटला आहे.त्यामुळे माझी सर्व प्रकारची तळमळ नष्ट झाली आहे व मी ब्रम्ह पदाचा आंनद भोगत आहे.ब्रम्ह पदाचा आंनद घेतल्यामुळे हे मी ब्रम्ह आहे हे वर्म हाती लागल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास मला दिसत नाही.तुकाराम महाराज म्हणतात आता कोणत्याही प्रकारचे मागणे शिल्लक राहिले नाही कारण जीव हा शिव रूप झाला आहे.यांची जाणीव मला झाली आहे.

अभंग क्र.८६९

नव्हे ब्रम्हचर्य बाइलेंच्या त्यागें । वैराग्य वाउगें देशत्यागें ॥१॥
काम वाढे भय वासनेच्या द्वारें । सांडारे तें धीरें आचावाच ॥ध्रु.॥
कांपवूनि टिरी शूरत्वाची मात । केलें वाताहात उचित काळें ॥२॥
तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मुळ स्तुति होतां ॥३॥

अर्थ:-

काहीतरी कारणास्तव पत्नीचा त्याग केला किंवा भीती पोटी देशाचा त्याग केला तर त्याला वैराग्य प्राप्त होत नाही.वासनेच्या वासनेच्या लहरीमुळे काम आणि भय वाढते त्यामुळे त्याचा दृढ निश्चयाने त्याग करावा.जो शूरत्वाच्या गप्पा मारतो आणि युद्धाच्या गोष्टी एकूण घाबरतो त्याची युद्धाच्या काळात फजिती होते.तुकाराम महाराज म्हणतात जो खोट्या वैराग्याच्या गोष्ठी करतो त्याची स्तिती आपण करू नये कारण आपली जीभ वितळते.

अभंग क्र.८७०

नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥
मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥ध्रु.॥
नको गुंफो भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥२॥
तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥३॥

अर्थ:-

हरी प्राप्ती साठी अन्न त्याग करवा असे काही नाही तसेच वनात जाऊन राहावे असेही काही नाही सर्व कर्म करत असतांना नारायणाचे स्मरण करावे.बाळ ज्या वेळी आईच्या खांद्यावर बसते त्यावेळी त्याला चालण्याचा त्रास होत नाही कारण आईच्या प्रेमाशी तो एकरूप झालेला असतो त्या प्रमाणे नारायणाचे नारायाणाशी ऐक्य पळून आपले कर्तव्य करावे.जे जे कर्म करशील तू त्याचा त्याग कर.तुकाराम महाराज म्हणतात हाच एक परमार्थ श्रेष्ठ मार्ग आहे या पेक्षा वेगळा उपदेशच नाही.

अभंग क्र.८७१

अवघी मिथ्या आटी । राम नाहीं जव कंठीं ॥१॥
सावधान सावधान । उगवीं संकल्पीं हें मन ॥ध्रु.॥
सांडिलें तें मांडे। आग्रह उरल्या काळें दंडे ॥२॥
तुका म्हणे आलें भागा । देउनि चिंतीं पांडुरंगा ॥३॥

अर्थ:-

रामनाम कंठात जो पर्यंत येत नाही तो पर्यंत सर्व आटाआटी प्रयत्न व्यर्थच आहत त्यामुळे तू सावध हो सावध हो सर्व संकल्पनातूनमोहाच्या जाळ्यातून मनाची सुटका कर.एखाद्या गोष्टीचा त्याग केला आणि त्याचा पुन्हा स्वीकार केला तर मग यम दंड करतो.तुकाराम महाराज म्हणतात आपल्या भाग्यात जे आले आहे ते पांडुरंगाला अर्पण करून पांडुरंगाचे चिंतन करत जा.

अभंग क्र.८७२

न संगावें वर्म । जनीं असों द्यावा भ्रम ॥१॥
उगींच लागतील पाठीं । होतीं रितीच हिंपुटीं ॥ध्रु.॥
शिकविल्या गोष्टी । शिकोन न धरिती पोटीं ॥२॥
तुका म्हणे सीण । होईल अनुभवाविण ॥३॥

अर्थ:-

आपणास ब्रम्ह ज्ञान झाले हे वर्म लोकांना समजू देऊ नये आपण सामान्य आहोत असे लोकांना समजलेले बरे आपण ब्रम्हज्ञानी आहोत हे जर लोकांना समजले तर उगाच ते आपल्या पाठीशी लागतील आणि आपण काही सांगावयास गेलो तर ते कष्टी होतील.एखादी गोष्ट आपण चांगली शिकविली तर लोक तसे वागत नाहीत.आपण अनुभवलेल्या गोष्टी लोकांना अनुभावाविनच सांगितल्या तर त्यांना केलेला उपदेश हा आपल्यालाच शीण होईल.

अभंग क्र.८७३

जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटीं वाहों नये ॥१॥
होणार तें घडो होणाराच्या गुणें । होईल नारायणें निर्मीलें तें ॥ध्रु.॥
व्याघ्राचिये भुके वधावी ते गाई । याचें नांव काय पुण्य असे ॥२॥
तुका म्हणे न करी विचार पुरता । गरज्याची माता पिता खरे ॥३॥

अर्थ:-

एका जातीची दुसऱ्या भिन्न जातीशी भेट करून देऊ नये उदारणार्थ कासाय ची गाईशी वाघाची गाईशी कधीही भेट करून देऊ नये.जे होणार आहे ते होणाऱ्याच्या गुणा नुसार होऊ द्या नारायणाने निर्मिले आहे तसे होईल.वाघाला जर भूक लागली असेल म्हणून त्याला गाय द्यावी याचे नाव पुण्य आहे काय?तुकाराम महाराज म्हणतात जो मनुष्य विचार न करता काहीही कृत्य करतो त्याचे माता पिता हे गाढवेच म्हणावे.

अभंग क्र.८७४

शाहाणियां पुरे एकचि वचन । विशारती खुण तेचि त्यासी ॥१॥
उपदेश असे बहुतांकारणें । घेतला तो मनें पाहिजे हा ॥ध्रु.॥
फांसावेंना तरिं दुःख घेतें वाव । मग होतो जीव कासावीस ॥२॥
तुका म्हणे नको राग धरूं झोंडा । नुघडितां पीडा होईल डोळे ॥३॥

अर्थ:-

शाहन्या व्यक्तीला एक इशारच खूप असतो त्याला पुढील ज्ञान समजून घेण्यासाठी तो इशाराच खूप असतो.संत उपदेश सर्वांना करतात परंतु संतांचा उपदेश एकाग्र मानाने घेतला पाहिजे.एखाद्याला जर गळू झाले तर ते कापणे योग्य नाही तर ते वाढून जीव कासावीस होतो.तुकाराम महाराज म्हणतात अरे निर्लज्जा मी केलेल्या उपदेशाचा राग तू माणू नको जर तू लवकरच आपले डोळे उघडले नाही तर तुलाच पिडा होईल.

अभंग क्र.८७५

अभिनव सुख तरि या विचारें । विचारावें बरें संतजनीं ॥१॥
रूपाच्या आठवें दोन्ही ही आपण । वियोगें तो क्षीण होत नाहीं ॥ध्रु.॥
पूजा तरि चित्तें कल्पावे ब्रम्हांड । आहाच तो खंड एकदेसी ॥२॥
तुका म्हणे माझा अनुभव यापरि । डोई पायांवरी ठेवीतसें ॥३॥

अर्थ:-

आपण कृत्य अस करवे की,ज्याने आपल्याला सुख प्रप्त होईल याचा मार्ग संतांना विचारवे.स्वरूपाचा विचार केला त्याचे स्मरण केले तर असे लक्षात येते की जीव व स्वरूप एकच आहे त्याचा क्षण भरही वियोग होत नाही.हरी हा सर्वत्र आहे असे जाणून पूजा करणे योग्य पण तो एक विशिष्ट ठिकाणी आहे समजून पूजा केली तर ती व्यर्थच.तुकाराम महाराज म्हणतात मी स्वतः विठोबाच्या चरणांवर मस्तक ठेवतो हा माझा अनुभव आहे सर्वत्र मी विठोबाचे रूप पाहतो.

अभंग क्र.८७६

नटनाटय तुम्ही केलें याच साठी । कवतुकें दृष्टी निववावी ॥१॥
नाहीं तरि काय कळलेचि आहे । वाघ आणि गाय लांकडाची ॥ध्रु.॥
अभेदचि असे मांडियेलें खेळा । केल्या दीपकळा बहुएकी ॥२॥
तुका म्हणे रूप नाहीं दर्पणांत । संतोषाची मात दुसरें तें ॥३॥

अर्थ:-

हे देवा तुम्ही हया जगाचा नट आणि नाट्य उभे केले व तुम्हीच कवतुकाने हे नाटक पाहता.नाही तरी आम्हाला हे कळाले आहे वाघ आणि गाय हि वेगळी जरी दिसली तरी एकाच लाकडाची आहे म्हणजे सर्व जगात तुमचे स्वरूप आहे.जसे एका दिव्याच्या ज्योती पासून अनेक दिपके लावली जातात त्याप्रमाणे तुम्ही अभेद रूपाचा जगद रुपी खेळाचा पसारा मांडला आहे.तुकाराम महाराज म्हणतात जसे दर्पणात आपले खरे रूप प्रतिबिंबित होते पण ते खरे नसते द्वैताचा भास होत असल्यामुळे आपल्याला सुख वाटते.

अभंग क्र.८७७

रवीचा प्रकाश । तोचि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥१॥
आतां हाचि वसी जीवीं । माझे अंतरी गोसावीं । होऊं येती ठावीं । काय वर्में त्याच्यानें ॥ध्रु.॥
सवें असतां धणी । आड येऊं न सके कोणी । न लगे विनवणी । पृथकाची करावी ॥२॥
जन्माचिया गति । येणें अवघ्या खुंटती । कारण ते प्रीति । तुका म्हणे जवळी ॥३॥

अर्थ:-

एकदा कि सूर्योदय झाला की अंधाराचा नाश होतो. पण जर अनेक दिवे लावले तर रात्र नाहीशी होत नाही. अगदी त्याप्रमाणे आता माझ्या अंतरंगात माझा स्वामीचे माझ्या जीवामध्ये वास्तव्य होवो. जेणेकरून आज पर्यंत ज्या काही गोष्टी होत्या जी काही वर्मे आहेत ती सर्व वर्मे मला माहीत होतील. राजा जर आपल्या बरोबर असेल तर रस्त्यामध्ये कोणीही आपल्याला आडवे येऊ शकत नाही. मग कोणाचीही विनाकारण विनवणी करावी लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जर हरी आपल्याबरोबर असेल तर जन्म-मरणाच्या सर्व गतीच खुंटतात. परंतु हे सर्व करत असताना आपल्या जवळ हरी विषय प्रेम असू द्यावे.

अभंग क्र.८७८

ऐसे सांडुनियां धुरे । किविलवाणी दिसां कां रे । कामें उर भरे । हातीं नुरे मृत्तिका ॥१॥
उदार हा जगदानी । पांडुरंग अभिमानी । तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥ध्रु.॥
न लगे पुसावी चाकरी । कोणी वकील ये घरीं । त्याचा तोचि करी । पारपत्य सकळा ॥२॥
नाहीं आडकाठी । तुका म्हणे जातां भेटी । न बोलतां मिठी । उगीच पायीं घालावी ॥३॥

अर्थ:-

या सच्चिदानंद रुपास सोडून तुम्ही केविलवाणे का बरे झालात?काम रुपी वासना तुमच्या हृदयात निर्माण झाली कि शेवटी तुमच्या हातात माती सुद्धा राहणार नाही.उदार असा सर्व श्रेष्ठ दान शूर असा परमात्मा तो भक्तांचा अभिमानी आहे त्याला तुम्ही तुलसी पत्र शुध्द पाणी वाहून चिंतन करावे तो तुमच्या चिंतनाचा भुकेला आहे त्याला तुमच्या चिंतांची अपेक्षा आहे.अहो तुम्ही देवाचे किती स्मरण करता किती सेवा करता किती चिंता करता?हे तुम्हाला कोणीही विचारावयास येणार नाही त्यासाठी कोणत्याही वकिलाची म्हणजे मध्यस्तीची गरज नाही त्याचा तोच सर्व दुखाचे निवारण करत असतो.तुकाराम महाराज म्हणतात या परमात्म्याच्या भेटीला जाताना कसलीही आड कठी येत नाही काही न बोलता तुम्ही त्याला शुद्ध भावाने शरण जा त्याच्या चरणकमलाला मिठी घाला.

अभंग क्र.८७९

उपकारी असे आरोनी उरला । आपुलें तयाला पर नाहीं ॥१॥
लाभावरी घ्यावें सांपडलें काम । आपला तो श्रम न विचारी ॥ध्रु.॥
जीवा ऐसें देखे आणिकां जीवांसी । निखळचि रासि गुणांचीच ॥२॥
तुका म्हणे देव तयांचा पांगिला । न भंगे संचला धीर सदा ॥३॥

अर्थ:-

जो दुसर्‍यावर उपकार करण्यासठी सदैव तत्पर असतो त्याच्या ठिकाणी दुजा भाव नसतो.ज्यात परोपकार आहे असे काम संपन्न करण्यात त्याला मोठा लाभ वाट असतो अश्यावेळी त्याला किती श्रम करावे लागतात याचा तोविचार हि करत नाही व परवा हि करत नाही.असा हा मनुष्य इतरांच्या जीवाची काळजी घेतो व हा मनुष्य म्हणजे फक्त सद्गुनांचीच खाण असते.तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारे आपल्या हृदयात ज्याने परोपकाराचे धैर्य जपलेले असते त्या भक्तांचा देव अंकित झालेला असतो.

कोण पुण्यें यांचा होईन सेवक । जींहीं द्वंदादिक दुराविलें ॥१॥
ऐसें वर्म मज दावीं नारायणा । अंतरीच्या खुणा प्रकटोनि ॥ध्रु.॥
बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥२॥
तुका म्हणे मग नयें वृत्तीवरी । सुखाचे शेजारीं पहुडईन ॥३॥

अर्थ:-

कोणत्या पुण्याईने मी जे संत महात्मे सुख व दुख यांचा त्याग केल्यावर त्यांचा मी सेवक होईल?हे नारायणा मला ते वर्म सांग कि ज्या मुळे माझ्या अंतःकरणातील गुह्य ज्ञान प्रकट करून संतांची भेट होईल.हे हरी अश्या संताची भेट होणे खूप अवघड आहे म्हणून मी तुम्हाला हि करुणा केली आहे.तुकाराम महाराज म्हणतात या संतांचीची मला जर भेट घडली तर मी वृत्तीहीन होईल आणि मी जे अखंड सुख आहे त्या चिद आनंदा जवळ वीरज मान होईल किंवा त्या जवळ मी राहीन.

अभंग क्र.८८१

क्षणक्षणां सांभाळितों । साक्षी होतों आपुला ॥१॥
न घडावी पायीं तुटी । मने मिठी घातली ॥ध्रु.॥
विचारतों वचनां आधीं । धरूनि शुद्धी ठेविली ॥२॥
तुका म्हणे मागें भ्यालों । तरीं जालों जागृत ॥३॥

अर्थ:-

हरी चरणी माझे मन रममाण झाले आहे ते कोठेही जाऊ नये म्हणून मी क्षण क्षणाला त्याचा सांभाळ करतोय आणि त्याचा मीच माझा साक्षीदार आहे.म्हणून मी तुमच्या चरणाला जी मिठी घातली आहे ती कधी तुटू नये म्हणू सावधगिरी बाळगतो आहे.या पूर्वीही कित्येक वेळा मी असा अनुभव घेतला आहे कि हरी आज्ञेचे विस्मरण झाले की,तुकाराम महाराज म्हणतात हरी चरणाचा वियोग होतो आणि मी हे पाहूनच सावध झालो आहे.

अभंग क्र.८८२

आणूनियां मना । आवघ्या धांडोळिल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥१॥
यासी अनुसरल्या काय । घडे ऐसें वांयां जाय । देखिले ते पाय । सम जीवीं राहाती ॥ध्रु.॥
तो देखावा हा विध । चिंतनें तें कार्य सिद्ध । आणिकां संबंध । नाहीं पर्वकाळासी ॥२॥
तुका म्हणे खळ । होती क्षणेंचि निर्मळ । जाऊंनियां मळ । वाळवंटीं नाचती ॥३॥

अर्थ:-

अनेक ठिकाणी फीरून मानाने शेवटी तो पंढरीचा राणा पंढरपूर निवासी तो विठ्ठल परमात्मा याच्या चरणासी जाऊन लीन व्हावे हे योग्य आहे असे ठरविले.या हरीच्या चरणी कोणी शरण गेले तर वाया जाईल काय?त्याचे सम चरण पाहता क्षणीच मनात ठसतात.या हरीचे दर्शन झाले हेच पूजा विधी आहे.त्याचे चिंतन केले तर सर्व कार्य सिद्धीस जाते व दुसऱ्या कोणत्याही पर्वकाळासी संबंध ठेवण्याची वेळ येत नाही.तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूरला कोणी सहज जरी गेले तरी त्याच्या पापाचे मळ क्षणात निघून जातात मग तो वाळवंटात हरिनामाच्या छदाने आंनदाने नाचू लागतो.

अभंग क्र.८८३

धरितां पंढरीची वाट । नाहीं संकट मुक्तीचें ॥१॥
वंदूं येती देव पदें । त्या आनंदें उत्साहें ॥ध्रु.॥
नृत्यछंदें उडती रज । हे सहज चालतां ॥२॥
तुका म्हणे गरुड टके । वैष्णव निके संभ्रम ॥३॥

अर्थ:-

जो मनुष्य पंढरीची वाट धरतो त्याला मुक्तीचे संकट नाही.हरीनाम सोहळ्यात हरी चरणांना वंदन करण्यास त्या सोहळ्याच्या उत्सहसाठी आंनदाने देव स्वर्गावरून खाली येतात.वैष्णव जे पंढरपूरला चाललेले असतात त्यांच्या चालण्याने जे त्यांच्या चरणांचे रज उडतात त्याच्या आशेने देव तेथे येतात.तुकाराम महाराज म्हणतात ज्या वैष्णवांच्या हातात गरुड ध्वज आहे तेथे कोणताही संभ्रम न धरता तेच खरे वैष्णव आहेत असे समजावे.

अभंग क्र.८८४

नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृतचि स्रवे । होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥१॥
मन रंगलें रंगलें । तुझ्या चरणीं स्थिरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥ध्रु.॥
जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें । अंगा येती उद्गार ॥२॥
सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा । तुका म्हणे लेखा । आतां नाहीं आनंदा ॥३॥

अर्थ:-

हरी नाम घेता मनाला शांती लाभते.आणि ते हरी नाम घेताना असे वाटते कि जिभेवर वर हरी नाम घेल्यावर शुभ शकुनाचे लाभ होतात.मन हे आता हरी चरणी रंगले आहे.स्थिरावले आहे व हि कृपा विठ्ठलानेच केली आहे.हरीनाम भोजनाने विषय इच्छेवर दगड पडलेला भासतो आणि हे चिन्ह आपोपाप दिसून येतात.आणि आपल्या अंगावर दिसून येतात आणि तसे उद्गार मुखावाटे बाहेर येतात.पांडुरंग रुपी सुख हे आमच्या वाणीला सुख देतात.व तो ठेवा आम्हाला मुखा द्वारे सापडलातुकाराम महाराज म्हणतात या आंनदाला आता पारावार नाही.

अभंग क्र.८८५

रुची रुची घेऊं गोडी । प्रेमसुखें जाली जोडी ॥१॥
काळ जाऊं नेदूं वांयां । चिंतू विठोबाच्या पायां ॥ध्रु.॥
करूं भजन भोजन । धणी घेऊं नारायण ॥२॥
तुका म्हणे जीव धाला । होय तुझ्यानें विठ्ठला ॥३॥

अर्थ:-

हे देवा तुझ्या जवळ जे आम्हाला प्रेमसुख लाभले आहे आता आम्ही ते प्रेम सुख आनंदाने घेऊ.आम्ही एक क्षण देखील वाया जाऊ देणार नाही कायम त्या विठोबाच्या पायचे चिंतन करू.हरीनाम रुपी भजन आणि भोजन करून आम्ही तृप्त होऊ.हे विठ्ठला तुझ्याच चिंतनाने जीव समाधान पावतो.

अभंग क्र.८८६

वेळोवेळां हेचि सांगें । दान मागें जगासि ॥१॥
विठ्ठल हे मंगळवाणी । घेऊं धणी पंगतीसी ॥ध्रु.॥
वेचतसे पळें पळ । केलें बळ पाहिजे ॥२॥
तुका म्हणे दुश्चित नका । राहों फुका नाड हा ॥३॥

अर्थ:-

मी जगासी हेच दान मागत आहे व जगाणे तसेच वागावे की,श्री विठ्ठलाचे चिंतन सर्वांनी करावे या पांडुरंगाचे चिंतन करणे हे मंगल आहे संतांच्या पंगतीस बसून आपण विठ्ठल नाम भोजन सेवन करू क्षणा क्षणाला आपले आयुष्य सरत आहे त्या करता आपण हरी भजना साठी ओढ घेतली पाहिजे.तुकाराम महाराज म्हणतात जर हरी भजना विषयी आलास केला तर तुम्ही फुकट फसाल.

अभंग क्र.८८७

आणीक ऐसें कोठें सांगा । पांडुरंगा सारिखें ॥१॥
दैवत ये भूमंडळीं । उद्धार कळी पावितें ॥ध्रु.॥
कोठें कांहीं कोठें कांहीं । शोध ठायीं स्थळासी ॥२॥
आनेत्रींचें तीर्थी नासे । तीर्थी वसे वज्रलेप ॥३॥
पांडुरंगींचें पांडुरंगीं । पाप अंगीं राहेना ॥४॥
ऐसें हरें गिरिजेप्रति । गुह्य स्थिती सांगितली ॥५॥
तुका म्हणे तीर्थ क्षेत्र । सर्वत्र हें दैवत ॥६॥

अर्थ:-

हे जन हो या पांडुरंगा सारखे दैवत अन्य कोठे आहे का?या कलियुगात हेच एक दैवत आहे कि ते जीवांचा उद्धार करण्यास समर्थ आहे.बाकी दैवातामध्ये काही तरी न्युन असलेले आपल्याला दिसून येते.इतर ठिकाणी केलेल्या पातकाचे क्षालन हे तीर्थाने होते पण तीर्थे करत असताना केलेले पातक जात नाही.आपण केलेले कर्म पांडुरंगाला अर्पण केले तर ते त्याला अर्पण होते आणि आपल्या अंगी पाप हि राहत नाही.प्रभू शंकराने पार्वतीला हेच गुह्य ज्ञान रहस्य सांगितले आहे.तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूर हे तीर्थ क्षेत्र म्हणजे पांडुरंगाचेच रूप आहे.

अभंग क्र.८८८

पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥
नव्हती हे आहाच बोल । मोकळें फोल कवित्व ॥ध्रु.॥
भावें घ्या रे भावें घ्या रे । एकदा जा रे पंढरिये ॥२॥
भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥३॥
पापपुण्या करिल झाडा । जाइल पीडा जन्माची ॥४॥
घ्यावी हातीं टाळदिंडी । गावे तोंडीं गुणवाद ॥५॥
तुका म्हणे घटापटा । न लगे वाटा शोधाव्या ॥६॥

अर्थ:-

पुराणातील इतिहासाचा गोड रस मी ग्रहण सेवन केलेला आहे.म्हणून मी जे बोल बोलतो ते इतरांच्या काव्य प्रमाणे वाया जात नाही.म्हणून मी जे बोल बोलतो आहे त्या मधील तुम्हीअर्थ:- लक्षात घेऊन पंढरीला अवश्य जा.अहो तुम्ही भाग्यवान आहात कारण तुम्हला मनुष्य देह मिळाला आहे म्हणून या विठ्ठलाचे दर्शन घ्या.त्यामुळे तुमच्या पाप पुण्याचा झाडा होऊन ते नष्ट होईल आणि तुमच्या जन्म मरणाची पीडाच टळेल.हातात टाळविना घेऊन या विठ्ठलाचे गुणगान गावे.तुकाराम महाराज म्हणतात असे केल्याने तुम्हाला घट पट व इतर मार्ग शोधावे लागणार नाही.

अभंग क्र.८८९

कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगें पतन ॥१॥
भलत्या काळें नामावळी । सुलभ भोळी भाविकां ॥ध्रु.॥
प्रायिश्चत्तें पडती पायां । गाती तयां वैष्णवां ॥२॥
तुका म्हणे नुपजे दोष । करा घोष आनंदे ॥३॥

अर्थ:-

वेदोक्त कर्म जर निट आपल्या हातून झाले नाही काही उणीव राहिल्यास कर्ता पतित होत असतो.परंतु जर आपण हरी नाम केंव्हाही घेतले कधीही घेतले व कसे हि घेतले तरी त्याचा दोष लागत नाही.कायम स्वरूपी हरीनाम घेणाऱ्याच्या प्रायश्चीत्ये सुद्धा पाया पडतात.तुकाराम महाराज म्हणतात हरीनाम घोष करताना आनंदाने करावे तेथे कुठल्याही प्रकारचा दोष उत्पन्न होणार नाही.


अभंग क्र.८९०

पाहा रे हें दैवत कैसें । भक्तीपिसें भाविका ॥१॥
पाचारिल्या सरिसें पावे । ऐसें सेवे बराडी ॥ध्रु.॥
शुष्क काष्ठीं गुरुगुरी । लाज हरी न धरीता ॥२॥
तुका म्हणे अर्धनारी । ऐसीं धरी रूपडीं हा ॥३॥

अर्थ:-

अहो पहा ओ पहा हे आमचे दैवत कसे आहे?ते भक्ती वश झालेले आहे.कोणीही त्याला हाक मारली त्याला बोलावले कि तो लगेच धावत येतो.अहो प्रल्हादासाठी या हरीने शुष्क खांबातून नरसिंह रुपात गुरगुर करून प्रकट होण्यास लाज धरली नाही.तुकाराम महाराज म्हणतात की,हा देव भक्तांच्य सहाय्यास कधी नर तर कधी नारीचे रूप घेतो व तत्परतेने धावत येतो.

अभंग क्र.८९१

बहुत सोसिले मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावें ॥१॥
एकाचिये अंगीं हें ठेवावें लावून । नये भिन्ना भिन्न चांचपडो ॥ध्रु.॥
कोण होईल तो ब्रम्हांडचाळक । आपणेचि हाक देईल हाके ॥२॥
तुका म्हणे दिलीं चेतवूनि सुणीं । कौतुकावांचूनि नाहीं छळ ॥३॥

अर्थ:-

आम्ही अज्ञानामुळे अनेक दुखे भोगली पण आता पुढे आंधळे पणाने का राहावे?जे काही सुख दुख असतील ते या हरीला अर्पण करून इतर काही खट पट करू नये.या विश्वाचा ब्रम्हांडाचा चालक जो कोणी असेल त्याला हाक मारली असता तोच ओ देईल.तुकाराम महाराज म्हणतात काम क्रोध रुपी कुत्री या देवाने आपल्या मागे चेतवून दिले आहेत आणि हे देवाचेच कवतुक आहे.

अभंग क्र.८९२

आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचें । कैचे दिलें साचें करोनियां ॥१॥
दुजियासी तंव अकळ हा भाव । कराया तो जीव साक्षी येथ ॥ध्रु.॥
एकीं अनेकत्व अनेकीं एकत्व । प्रकृतिस्वभावत्व प्रमाणेंचि ॥२॥
तुका म्हणे करूं उगवूं जाणसी । कुशळ येविशीं तुम्ही देवा ॥३॥

अर्थ:-

या देवाचे खरोखर कौतुक वाटते कारण त्याने नसत्या छंदात या जीवाला टाकले आहे जीव हा मिथ्या असून सर्वांना तो खरा वाटतो या भ्रमात देवाने टाकले आहे.हा भ्रम कसा होतो ते दुसऱ्याला कळत नाही हा मोह न धरता जीवाने साक्षित्वाने राहावे.या हरीच्या ठिकाणी नामात्मक रूपाचा भास होतो व तो आपल्याला एकत्वाने भासतो याचे कारण म्हणजे प्रकृती स्वभाव आहे.तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारचा गुंता करण्या विषयी आणि सोडविण्या विषयी तुम्ही मोठे कुशल आहात देवा.

अभंग क्र.८९३

अस्त नाहीं आतां एकचि मोहोरा । पासूनि अंधारा दुरि जालों ॥१॥
साक्षत्वें या जालों गुणाचा देखणा । करीं नारायणा तरी खरें ॥ध्रु.॥
आठवू विसरु पडियेला मागें । आलें तेचि भागें यत्न केलें ॥२॥
तुका म्हणे माझा विनोद देवासी । आम्ही तुम्हां ऐसीं दोन्ही नव्हों ॥३॥

अर्थ:-

आत्म ठिकाणी जो मी ब्रम्ह आहे या प्रकाशाचा उदय झाला आहे त्याला आता अस्त नाही.त्यामुळे आम्ही अज्ञानाच्या अंधःकारा पासुण वेगळे झालो आहोत.आत्म स्थितीने आम्ही साक्षी झालो आहोत त्यामुळे हे त्रिगुण आम्हाला दिसू लागले आहेत आणि हाच बोध आमच्या ठिकाणी दृढ कर.तुझेच स्मरण केल्यामुळे या प्रपंचाचा विसर पडला आहे आम्हाला जे काही ज्ञान झाले याचे आम्ही यत्न्य पूर्वक सांभाळ केले आहे.तुकाराम महाराज म्हणतात आता या हरीशी माझे विनोदाने संभाषण चालते की,आता जीव व शिव या दोन्ही पासून आम्ही वेगळे झालो आहोत अगदी तुझ्याच सारखे.

अभंग क्र.८९४

क्षर अक्षर हे तुमचे विभाग । कासयानें जग दुरी धरा ॥१॥
तैसे आम्ही नेणों पालटोंचि कांहीं । त्यागिल्याची नाहीं मागें चाड ॥ध्रु.॥
प्रतिपादिता तूं समविषमाचा । प्रसाद तो याचा पापपुण्य ॥२॥
तुका म्हणे तुम्हां नाना अवगुणीं । लागे संपादणी लटिक्याची ॥३॥

अर्थ:-

हे देवा क्षर आणि अक्षर म्हणजे जीव आणि माया हे तुमचेच विभाग आहेत मग तुम्ही जगाला आपल्या पासून भिन्न का ठेवता?असे जरी असले तरी आमचा जीव भाव तुम्ही स्वीकारा व आमच्या वस्तुस्थित आम्ही बदल होऊ देणार नाही पाप आणि पुण्य हे प्रतिपादन तुमचेच आहे आणि हा तुझाच खेळ आहे.असे असून जीवाला जन्म मरणाच्या फेर्‍यात का ठेवले हे?तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही नाना प्रकारचे सोंग घेऊन तुम्ही खोट्याचे खरे भास्विता म्हणजे मिथ्या असलेले खरे भासवीता

अभंग क्र.८९५

अर्थ:-

सर्वरसीं मीनलें चित्त । अखंडित आनंदु ॥१॥
गोत पति विश्वंभरीं । जाला हरी सोयरा ॥ध्रु.॥
वोळखी ते एका नांवें । इतरवाव खंडणा ॥२॥
तुका म्हणे नांवें रूपें । दुसरीं पापें हरपलीं ॥३॥

हरी रसात माझे मन रमले आहे त्यामुळे मला अखंड आंनद प्राप्त होतो.आमचे सर्व गोत्रज सर्व संबंधी हे हरिरूप झाले आहे.एक विथोबाचीच आम्हांला ओळख झाली आहे इतर विषयी आमची भावना नाहीशी झाली आहे.तुकाराम महाराज म्हणतात नाव व रूप हे एक प्रकारचे भ्रम आहे व त्यापासून पापच होते व आता ती पापे हरपली.

अभंग क्र.८९६

मीं हें ऐसें काय जाती । अवघड किती पाहातां ॥१॥
नाहीं होत उल्लंघन । नसतां भिन्न दुसरें ॥ध्रु.॥
अंधारानें तेज नेलें । दृष्टीखालें अंतर ॥२॥
तुका म्हणे सवें देव । घेतां ठाव दावील ॥३॥

अर्थ:-

खरे म्हणजे देहाला मी म्हणणे किती अवघड आहे?खरे पहिले तर आपल्या वाचून म्हणजे आपल्या मूळस्वरूपा वाचून काहीच नाही पण उगाचच देहाच्या ठिकाणी मी पणा येतो.असे भासल्यामुळे काय होते तर देहाच्या ठिकाणी अहंकाराच अंधार वाढतो व त्यामुळे मूळ स्थितीचा प्रकाश नाहीसा होतो व आपली आत्म दृष्टी आंधळी होते.तुकाराम महाराज म्हणतात जर देवाने आपल्याला जवळ घेतले तर तो आपल्याला आपल्या आत्म्स्थितीचे स्थान तो नक्की दाखवील.

अभंग क्र.८९७

कवीश्वरांचा तो आम्हांसी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥१॥
दंभाचे आवडी बहिरट अंधळे । सेवटासि काळें होईल तोंड ॥ध्रु.॥
सोन्यासेजारी तों लाखेची जतन । सतत ते गुण जैसे तैसे ॥२॥
सेव्य सेवकता न पडतां ठावी । तुका म्हणे गोवी पावती हीं ॥३॥

अर्थ:-

स्वार्था साठी किविता करणाऱ्यांचा तुकाराम महाराजांना राग येतो ते म्हणतात आम्हाला त्यांचा विटाळ आहे कारण असे जे कवी आहे ते दुसऱ्याचे काव्य चोरून काव्य करतात व ते काव्य त्यांनी केले असे भासवितात.दंभाची आवड असणाऱ्या बाहीरट मूर्ख व आंधळ्यांचे शेवटी तोंड काळेच होते.सोन्याच्या वस्तूंना लाखेच बंध असतो परंतु लाखेमुळे जरी सोन्याचे रक्षण होत असले तरी लाखेची मूळ जी स्तिती आहे ती तशीच राहते.तुकाराम महाराज म्हणतात जो पर्यंत आपल्याला स्वामी आणि सेवक या मधील फरक जो पर्यंत कळणार नाही तो पर्यंत आपल्याला बंधनातच राहावा लागेल.

अभंग क्र.८९८

वाढलियां मान न मनावी निश्चिती । भूतांचिये प्रीती भूतपण ॥१॥
म्हणऊनि मना लावावी कांचणी । इंद्रियांचे झणी ओढी भरे ॥ध्रु.॥
एका एकपणें एकाचिया अंगीं । लागे रंग रंगीं मिळलिया ॥२॥
तुका म्हणे देव निष्काम निराळा । जीवदशे चाळा चळणांचा ॥३॥

अर्थ:-

लोकांमध्ये आपला मान वाढला असेल तर त्यात समाधान माणू नये कारण भौतिक मान्यतेने भौतीकच जन्म मिळेल म्हणून मनाला हरी भजनाची आवड लावावी नाहीतर मन हे इंद्रियां मागोमाग बहिर्मुख होईल.मनाला हरी स्वरूपा कडे तल्लीन करावे नाहीतर मन हे असे इंद्रिय आहे की,ते ज्या रंगा कडे ते लागले तो रंग ते धरण करतो.तुकाराम महाराज म्हणतात हा देव निष्काम आहे निराळा आहे पण मात्र आपला जीव कर्मा मागे धावण्यास प्रयत्न करत असतो.

अभंग क्र.८९९

माया साक्षी आम्ही नेणों भीड भार । आप आणि पर नाहीं दोन्ही ॥१॥
सत्याचिये साठी अवघाचि भरे । नावडे व्यापार तुटीचा तो ॥ध्रु.॥
पोंभाळिता चरे अंतरींचें दुःख । लांसें फांसें मुख उघडावें ॥२॥
तुका म्हणे नव्हे स्फीतीचा हा ठाव । निवाड्यासी देव साक्षी केला ॥३॥

अर्थ:-

आम्ही ब्रम्ह दृष्टीने पाहतो कि हा संसार माया ने भरलेला आहे त्यामुळे आम्हाला त्याची भिड नाही हा आपला आणि हा परका असा भेद नाही.आमचा सत्य कर्मा साठी आमचा भर असतो व अन्य कोणत्याही नुसकानीचे व्यापार आम्ही करत नाही व ते आम्हाला चालतही नाही.जसे गळू झाले तर त्याला गोंजारून चालत नाही ते बाहेरू वाढले कि ते आतून हि वाढते त्यामुळे त्याला कापवेच लागते तसेच लोकांनाही जास्त गोंजारून चालत नाही त्यांच्या हिताकर्ता आम्हाला स्पष्ट बोलावेच लागते.तुकाराम महाराज म्हणतात हिगोष्ट फक्त आम्ही वरवर नाही बोलत तर याचा साक्षी प्रत्येक्ष परमात्मा आहे देवाने जो निवडा केला आहे त्याचीच साक्ष घेऊन आम्ही बोलत आहोत.

अभंग क्र.९००

संतां आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ ॥१॥
परिसत्ता तेथें नाहीं एकविणें । मोहें न पवे सीण ऐसें राखे ॥ध्रु.॥
केले अन्याय ते सांडवी उपचारें । न देखें दुसरें नाशा मूळ ॥२॥
तुका म्हणे मुख्य कल्पतरुछाया । काय नाहीं दया तये ठायीं ॥३॥

अर्थ:-

जो संतांना आवडतो तो काळाचाही काळ असतो राजा ज्या प्रमाणे समर्थ असतो त्याप्रमाणे त्याचे बाळ हि समर्थ असते त्या बालकावर राजाचीच सता असते व त्या बालकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या साठी राजा कायम प्रयत्न करत असतो.जर त्या बालकाने काही अन्याय केले तर राजा त्या बालकाला समजून सांगतो व पुन्हा असा कुठल्याहि प्रकारचा अन्याय त्याच्या हातून होणार नाही याची काळजी तो घेत असतो त्याचा कुठल्याही प्रकारच घात होणार नाही असे राजा करत नाहि.तुकाराम महाराज म्हणतात कल्पतरूची छाया अत्यंत शीतल असते त्या प्रमाणे संतही निर्मळ व दया वंत असतात.

सार्थ तुकाराम गाथा ८०१ ते ९०० समाप्त

संत तुकाराम महाराज अभंग गाथा ९०१ ते १०००

REF : सार्थ तुकाराम गाथा 801 ते 900

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top