सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला Sarth Dnyaneshwari Chapter 201-275

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥

॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥

॥ अथ प्रथमोऽध्यायः – अध्याय पहिला ॥

॥ अर्जुनविषादयोगः ॥

जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें ।परि कळिकेमाजी सांपडे । कोंवळिये ॥ २०१ ॥
ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड भुंगा पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्ये मात्र अडकून पडतो ॥१-२०१॥

तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परि तें कमळदळ चिरूं नेणें ।तैसें कठिण कोवळेपणें । स्नेह देखा ॥ २०२ ॥
तेथे तो प्राणासही मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्या फाडण्याचा विचार त्याच्या मनासही शिवत नाही. त्याप्रमाणे पहा, हा स्नेह (करुणा) जात्या कोवळा खरा पण महा कठिण आहे. ॥१-२०२॥

हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाही नयेचि आया ।म्हणौनि भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥ २०३ ॥
संजय म्हणाला, राजा, ऐक. हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही. म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाडली. ॥१-२०३॥

अवधारी मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु ।विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥ २०४ ॥
असो, राजा ऐक. मग तो अर्जुन (युद्धाला आलेले) सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान (ईर्षा) विसरून गेला. ॥१-२०४॥

कैसी नेणों सदयता । उपनली तेथें चित्ता ।मग म्हणे कृष्णा आतां । नसिजे एथ ॥ २०५ ॥
तेथे त्याच्या चित्तात सदयता कोठून उत्पन्न झाली कोण जाणे !मग तो म्हणाला कृष्णा, आपण आता येथे राहू नये हे बरे. ॥१-२०५॥

माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ ।जे वधावे हे सकळ । येणें नांवें ॥ २०६ ॥
ह्या सर्वांना मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकूळ होत आहे आणि तोंड हवे ते बरळू लागते.॥१-२०६॥

या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठीरादिकां कां न वधावें ।हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे ॥ २०७ ॥
या कौरवांना मारणे जर योग्य आहे तर धर्मराजादिकांना मारण्याला काय हरकत आहे ? कारण की हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत. ॥१-२०७॥

म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया न ये मज ।एणें काय काज । महापापें ॥ २०८ ॥
याकरता, आग लागो या युद्धाला ! मला हे पसंत नाही. या महापापाची आपणास गरज काय आहे ॥१-२०८॥

देवा बहुतापरी पाहतां । एथ वोखटे होईल झुंजतां ।वर कांहीं चुकवितां । लाभु आथी ॥ २०९ ॥
देवा, अनेक दृष्टींनी विचार केला असता (असे वाटते की) या वेळी युद्ध केले तर (त्याचा परिणाम) वाईट होईल पण ते जर टाळले तर काही लाभ (कल्याण) होईल. ॥१-२०९॥

तया विजयवृत्ती कांहीं । मज सर्वथा काज नाहीं ।एथ राज्य तरी कायी । हे पाहुनियां ॥ २१० ॥
या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा रीतीने राज्य मिळाले तरी आपल्याला काय करायचे आहे ? ॥१-२१०॥

या सकळांतें वधावें । मग हे भोग भोगावे ।ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ॥ २११ ॥
अर्जुन म्हणाला, या सर्वांना मारून जे भोग भोगायचे त्या सगळ्यांना आग लागो. ॥१-२११॥

तेणें सुखेंविण होईल । तें भलतैसें साहिजेल ।वरी जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ॥ २१२ ॥
त्या भोगापांसून मिळणार्‍या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असला तरीही सहन करता येईल. इतकेच काय यांच्याकरता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल. ॥१-२१२॥

परी यांसी घातु कीजे । मग आपण राज्यसुख भोगिजे ।हें स्वप्नींही मन माझें । करूं न शके ॥ २१३ ॥
पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट माझे मन स्वप्नात देखील सहन करू शकणार नाही. ॥१-२१३॥

तरी आम्हीं कां जन्मावें । कवणलागीं जियावें ।जरी वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें ॥ २१४ ॥
जर या वडील माणसांचे अहित मनाने चिंतायचे तर आम्ही जन्माला येऊनही काय उपयोग ? व आम्ही जगावे तरी कोणासाठी ? ॥१-२१४॥

पुत्रातें इच्छी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ ।जे निर्दळिजे केवळ । गोत्र आपुलें ॥ २१५ ॥
कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचे काय हेच फल आहे की त्याने आपल्या आप्तेष्टांचा केवळ वधच करावा. ॥१-२१५॥

हें मनींचि केविं धरिजे । आपण वज्राचेया होईजे ।वरी घडे तरी कीजे । भलें इयां ॥ २१६ ॥
हे (मी आपल्या कुळाचा नाश राज्य मिळवण्याकरता करीन असे) आपण मनात तरी कसे आणावे ? वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे ? उलटपक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावे. ॥१-२१६॥

आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें ।हें जीवितही उपकारावें । काजीं यांच्या ॥ २१७ ॥
आम्ही जे जे मिळवावे ते ते या सर्वांनी (वास्तविक) भोगायचे आहे. यांच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्चावयाचे आहेत. ॥१-२१७॥

आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ ।मग संतोषविजे कुळ । आपुलें जें ॥ २१८ ॥
आम्ही देशोदेशीचे सर्व राजे युद्धात जिंकून जे आपले कुळ ते तोषवावे. ॥१-२१८॥

तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत ।जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥ २१९ ॥
तेच हे आमचे सर्व कुळ पण कर्म कसे विपरीत आहे पहा, ते सर्व आपापसात लढावयास तयार झाले आहेत. ॥१-२१९॥

अंतौरिया कुमरें । सांडोनियां भांडारें ।शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपुनी ॥ २२० ॥
बायका, मुले, आपले खाजिने, ही सर्व सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेऊन जे लढाईस तयार झाले आहेत ॥१-२२०॥

ऐसियांतें कैसेनि मारूं ? । कवणावरी शस्त्र धरूं ? ।निजहृदया करूं । घातु केवीं ? ॥ २२१ ॥
अशांना मी मारू तरी कसा ? मी कोणावर शस्त्र धरू ? (हे कौरव म्हणजे आम्हीच, तेव्हा यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या दृष्टीने अर्जुन म्हणतो मी) आपला काळजाचा घात कसा करू ? ॥१-२२१॥

हें नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण ।जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ॥ २२२ ॥
हे कोण आहेत, तू जाणत नाहीस का ? ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म व द्रोण, ते पलीकडे आहेत पहा. ॥१-२२२॥

एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु कीं हे सकळ ।पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥ २२३ ॥
येथे या सैन्यात मेहुणे, सासरे, मामे आणि हे इतर सर्व बंधु, पुत्र, नातू आणि केवळ इष्टही आहेत. ॥१-२२३॥

अवधारी अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे ।म्हणौनि दोष आथी वाचे । बोलितांचि ॥ २२४ ॥
ऐक, अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत. आणि म्हणूनच (यांना मारावे असे) वाणीने नुसते बोलणे सुद्धा पाप आहे. ॥१-२२४॥

हे वरी भलतें करितु । आतांचि येथें मारितु ।परि आपण मनें घातु । न चिंतावा ॥ २२५ ॥
उलटपक्षी हे वाटेल ते करोत, आताच पाहिजे तर आम्हास येथे मारोत, पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनातही आणणे बरोबर नाही. ॥१-२२५॥

त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल प्राप्त ।तरी हें अनुचित । नाचरें मी ॥ २२६ ॥
त्रैलोक्याचे समग्र राज्य जरी मिळणार असले तरी हे अयोग्य काम मी करणार नाही. ॥१-२२६॥

जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाच्या मनीं उरिजे ? ।सांगे मुख केवीं पाहिजे । तुझें कृष्णा ? ॥ २२७ ॥
जर आज आम्ही येथे असे (यांच्याशी लढाई करून यांना ठार मारले) युद्धे केले तर मग आमच्या विषयी कोणाच्या मनात आदर राहील ? आणि मग कृष्णा, सांग तुझे मुख आम्हाला कसे दिसेल ? (तू आम्हाला अंतरशील). ॥१-२२७॥

जरी वधु करोनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा ।मज जोडिलासि तुं हातींचा । दूरी होसी ॥ २२८ ॥
जर मी गोत्रजांचा वध केला, तर सर्व दोषांचे मी वसतीस्थान होईन. आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू आमच्या हातचा जाशील. ॥१-२२८॥

कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडती अशेखें ।तये वेळीं तुं कवणें कें । देखावासी ? ॥ २२९ ॥
कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जडतील, तेव्हा तुला कोणी कोठे पहावे ? ॥१-२२९॥

जैसा उद्यानामाजीं अनळु । संचारला देखोनि प्रबळु ।मग क्षणभरी कोकिळु । स्थिरु नोहे ॥ २३० ॥
ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तेथे क्षणभरही थांबत नाही. ॥१-२३०॥

का सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु ।न सेवितु अव्हेरु । करूनि निघे ॥ २३१ ॥
चिखलाने भरलेले सरोवर पाहून (कमलपत्रावर वसून चंद्रामृत सेवन करणारा) चकोर त्यात न रहाता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो, ॥१-२३१॥

तयापरी तुं देवा । मज झकवूं न येसीं मावा ।जरी पुण्याचा वोलावा । नाशिजैल ॥ २३२ ॥
त्याप्रमाणे हे देवा, जर (माझ्या ठिकाणचा) पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला चकवून माझे कडे येणार नाहीस. ॥१-२३२॥

म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामीं शस्त्र न धरीं ।हें किडाळ बहुतीं परी । दिसतसे ॥ २३३ ॥
म्हणून मी युद्ध हे करणार नाही. या लढाईमधे हत्यार धरणार नाही. कारण हे युद्ध पुष्कळ प्रकारांनी निंद्य दिसत आहे. ॥१-२३३॥

तुजसीं अंतराय होईल । मग सांगे आमुचें काय उरेल ? ।तेणें दुःखें हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥ २३४ ॥
तुझ्याशी ताटातूट होईल, तर मग कृष्णा, तुझ्यावाचून त्या दु:खाने (वियोगाने) आमचे हृदय दुभंग होईल. ॥१-२३४॥

म्हणौनि कौरव हे वधिजती । मग आम्ही भोग भोगिजती ।हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥ २३५ ॥
एवढ्याकरता कौरव मारले जावेत आणि आम्ही राज्यभोग भोगावेत हे राहू दे. ही गोष्ट घडणे अशक्य आहे असे अर्जुन म्हणाला. ॥१-२३५॥

हे अभिमानमदें भुललें । जरी पां संग्रामा आले ।तर्‍ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे ॥ २३६ ॥
हे कौरव अभिमानाच्या मस्तीने बहकून जरी लढण्याकरता आले आहेत तरी पण आम्ही आपले हित कशात आहे ते पाहिले पाहिजे. ॥१-२३६॥

हें ऐसें कैसें करावें ? । जे आपुले आपण मारावे ? । जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट ? ॥ २३७ ॥
आपलेच आप्तसंबंधी आपण मारावे, हे असे भलतेच कसे करावे ? जाणून बुजून हे कालकूट विष कसे घ्यावे ? ॥१-२३७॥

हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंहु जाहला आवचिता ।तो तंव चुकवितां । लाभु आथी ॥ २३८ ॥
अहो महाराज, रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकवून जाण्यातच आपले हित आहे. ॥१-२३८॥

असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा ।तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगे ? ॥ २३९ ॥
असलेला उजेड टाकून अंधकूपाचा आश्रय केला तर देवा, त्यात काय हित आहे ? सांग बरे ? ॥१-२३९॥

कां समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी ।तरी क्षणा एका कवळूनी । जाळूं सके ॥ २४० ॥
किंवा समोर अग्नि पाहून त्याला चुकवून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकील. ॥१-२४०॥

तैसे दोष हे मूर्त । अंगी वाजों असती पहात ।हें जाणतांही केवीं एथ । प्रवर्तावें ? ॥ २४१ ॥
त्याचप्रमाणे हे मूर्तिमंत दोष आमच्या अंगावर आदळू पहात आहेत. हे समजत असताही, या कामी कसे प्रवृत्त व्हावे ? ॥१-२४१॥

ऐसें पार्थु तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं ।या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ॥ २४२ ॥
त्यावेळी इतके बोलून पार्थ म्हणाला देवा, ऐक. मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो. ॥१-२४२॥

जैसें काष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे ।तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥ २४३ ॥
ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असता तेथे अग्नि उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो, ॥१-२४३॥

तैसा गोत्रींचीं परस्परें । जरी वधु घडे मत्सरें ।तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ॥ २४४ ॥
त्याप्रमाणे कुळामधे मत्सराने एकमेकांनी एकमेकांचा वध केला तर त्या महाभयंकर दोषाने कूळच नाशाला पावते. ॥१-२४४॥

म्हणौनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे ।मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजीं ॥ २४५ ॥
म्हणून या पापाने वंशपरंपरागत आलेल्या धर्माचा लोप होईल, आणि मग कुळामधे अधर्मच माजेल. ॥१-२४५॥

एथ सारासार विचारावें । कवणें काय आचरावें ।आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥ २४६ ॥
तेथे सारासार विचार, कोणी कशाचे आचरण करावे व विधिनिषेध (कर्तव्य काय व अकर्तव्य काय) या सगळ्या गोष्टी बंद पडतात. ॥१-२४६॥

असता दीपु दवडिजे । मग अंधकारीं राहाटिजे ।तरी उजूचि कां अडळिजे । जयापरी ॥ २४७ ॥
जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले तर ज्याप्रमाणे सरळ चालले असता अडखळण्याचा प्रसंग येतो, ॥१-२४७॥

तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्यधर्मु जाय ।मग आन कांहीं आहे । पापावांचुनी ? ॥ २४८ ॥
त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेल्या धर्माचा लोप होतो. मग तेथे पापावाचून दुसरे काय असणार ? ॥१-२४८॥

जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा राहाटती ।म्हणौनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥ २४९ ॥
ज्यावेळी इंद्रिये व मन यांचा निग्रह थांबतो, त्यावेळी इंद्रिये स्वैर सुटतात आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातून व्यभिचार घडतो. ॥१-२४९॥

उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती ।तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥ २५० ॥
उच्च वर्णाच्या स्त्रिया नीच वर्णाच्या लोकांशी रत होतात व अशा रीतीने वर्ण एकमेकात मिसळतात. (वर्णसंकर होतो) व त्यामुळॆ जातिधर्म मुळापासून उखडले जातात. ॥२५०॥

जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळीं ।तैसीं महापापें कुळीं । संचरती ॥ २५१ ॥
ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी कावळे येऊन पडतात, त्याप्रमाणे मोठी पापे कुळात शिरतात. ॥१-२५१॥

मग कुळा तया अशेखा । आणि कुळघातकां ।येरयेरां नरका । जाणें आथी ॥ २५२ ॥
मग त्या संपूर्ण कुळाला व कुळघातक्याला दोघांनाही नरकाला जावे लागते. ॥१-२५२॥

देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित ।मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥ २५३ ॥
पहा, ह्याप्रमाणे वंशात वाढलेली प्रजा अधोगतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात. ॥१-२५३॥

जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक क्रिया पारुखे ।तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी ? ॥ २५४ ॥
ज्यावेळी रोज करायची धार्मिक कृत्ये बंद पडतात त्यावेळी कोण कोणाला तिलोदक देणार ? ॥१-२५४॥

तरी पितर काय करिती ? । कैसेनि स्वर्गीं वसती ? ।म्हणौनि तेही येती । कुळापासीं ॥ २५५ ॥
असे झाल्यावर पितर काय करणार ? स्वर्गात कसे रहाणार ? म्हणून ते देखील आपल्या कुळापाशी नरकात येतात. ॥१-२५५॥

जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें ।तेवीं आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे ॥ २५६ ॥
ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत हांहां म्हणता पसरते त्याप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते ॥१-२५६॥

देवा अवधारी आणीक एक । एथ घडे महापातक ।जे संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ॥ २५७ ॥
देवा, ऐका. येथे आणखी एक महापातक होते. ते हे की त्या पतितांच्या संसर्गदोषाने लोकांचे आचारविचार चळतात (भ्रष्ट होतात). ॥१-२५७॥

जैसा घरीं आपुला । वानिवसें अग्नि लागला ।तो आणिकांहीं प्रज्वळिला । जाळूनि घाली ॥ २५८ ॥
ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसर्‍या घरांनाही जाळून टाकतो ॥१-२५८॥

तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती ।तेही बाधा पावती । निमित्तें येणें ॥ २५९ ॥
त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात, ते ते ह्या संसर्गरूप कारणाने दोषी होतात. ॥१-२५९॥

तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ ।मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥ २६० ॥
तसे अर्जुन म्हणतो की अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो. ॥१-२६०॥

पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतींही उकलु नाहीं ।येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥ २६१ ॥
त्या ठिकाणी पडल्यावर कल्पांती देखील त्याची सुटका होत नाही. एवढी कुलक्षयामुळे अधोगती होते. ॥१-२६१॥

देवा हें विविध कानीं ऐकिजे । परी अझुनिवरी त्रासु नुपजे ।हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारीं पां ॥ २६२ ॥
देवा, ऐक. ही नानाप्रकारची (दोषांविषयीची) बोलणी कानाने ऐकतोस पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाही. तू आपले हृदय वज्रासारखे कठोर का केले आहेस ? ॥१-२६२॥

अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक ।ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना ? ॥ २६३ ॥
ज्या शरीराकरता राज्यसुखाची इच्छा करावयाची, ते शरीर तर क्षणभंगुर आहे. असे कळत असताही अशा ह्या घडणार्‍या महापातकांचा त्याग करू नये काय ? ॥१-२६३॥

जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले ।सांग पां काय थेंकुलें । घडलें आम्हां ? ॥ २६४ ॥
हे जे सर्व वाडवडील जमले आहेत त्यांस मारून टाकावे अशा बुद्धीने त्याजकडे पाहिले ही काय लहानसहान गोष्ट (पातक) आमच्या हातून घडली का ? तूच सांग. ॥१-२६४॥

आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवें ।जे शस्त्र सांडुनि साहावे । बाण यांचे ॥ २६५ ॥
आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन यांचे बाण सहन करावे हे चांगले. ॥१-२६५॥

तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें ।परी येणें कल्मषें । चाड नाहीं ॥ २६६ ॥
असे केल्याने जितके दु:ख भोगावे लागेल (तितके सहन करावे, इतकेच काय, पण अशा करण्याने) मृत्यूही जरी प्राप्त झाला तथापि तो अधिक चांगला. परंतु असे हे पातक करण्याची आपल्याला इच्छा नाही. ॥१-२६६॥

ऐसें देखून सकळ । अर्जुनें आपुलें कुळ ।मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु ॥ २६७ ॥
याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कूळ पाहून म्हटले की (यांचा नाश करून मिळवलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोग आहे. ॥१-२६७॥

ऐसे तिये अवसरी । अर्जुन बोलिला समरीं ।संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥ २६८ ॥
संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. असे त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला. ॥१-२६८॥

मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहींवरु आला ।तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥ २६९ ॥
मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला. व त्याला गहिवर आला. मग त्याने रथावरून खाली उडी घातली. ॥१-२६९॥

जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु ।कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥ २७० ॥
ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारांनी निस्तेज होतो किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य तेजोरहित होतो ॥१-२७०॥

नातरी महासिद्धिसंभ्रमें । जिंतिला तापसु भ्रमें ।मग आकळूनि कामें । दीनु कीजे ॥ २७१ ॥
अथवा महासिद्धींच्या योगाने पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग कामनेच्या तडाख्यात पडून दीन होतो ॥१-२७१॥

तैसा तो धर्नुधरु । अत्यंत दुःखें जर्जरु ।दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥ २७२ ॥
त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दु:खाने पीडलेला दिसला. ॥१-२७२॥

मग धनुष्य बाण सांडिले । न धरत अश्रुपात आले ।ऐसें ऐक राया वर्तलें । संजयो म्हणे ॥ २७३ ॥
मग त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यांना अनिवार पाणी आले. संजय म्हणाला, राजा ऐक. तेथे अशी गोष्ट घडली. ॥१-२७३॥

आतां यापरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु ।कवणेपरी परमार्थु । निरूपील ॥ २७४ ॥
आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील ॥१-२७४॥

ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां ।ज्ञानदेव म्हणे आतां । निवृत्तिदासु ॥ २७५ ॥
ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकण्यास फार कौतुककारक आहे. असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥२७५॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्यायः ॥

पहिल्या अध्यायाचा शेवट

REF:- sarth-dnyaneshwari

दुसऱ्या अध्याय येथे क्लिक करा—>

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top