Amhi Gadya Dongarche Rahnar | आम्ही गड्या ! डोंगरचं राहणार
आम्ही गड्या ! डोंगरचं राहणार ।
चाकर शिवबाचं होणार ।। धृ ।।
निशाण भगवे भूवरीं फडके ।
शत्रूचे मग काळीज धडके ।।
मावळे आम्हीच लढणार ।
चाकर शिवबाचं होणार ।।१ ।।
तानाजी तो वीरच मोठा ।
लढता लढता पडला पठ्ठा ।।
परी नाही धीरच सोडणार ।
चाकर शिवबाचं होणार ।। २ ।।
संताजी धनाजी रणांत दिसता ।
शत्रू पळे प्रतिबिंब पाहता ।।
घोडं नाही पाणीच पिणार ।
चाकर शिवबाचं होणार ।। ३ ।।
बाजीराव तो वीरच मोठा ।
कणसं खाऊनी लढला पठ्ठा ।।
घोडं तो दौडीत सोडणार ।
चाकर शिवबाचं होणार ।।४।।
जगदंबेच्या कृपाप्रसादें ।
शिवरायांच्या आशिर्वादें ।।
म्होरं म्होरं आम्हीच जाणार ।
म्होरं म्होरं आम्हीच लढणार ।
चाकर शिवबाचं होणार ।।५ ।।